तीन झुंजार सुना भाग ३१

खरी माहिती आता बाहेर यायला लागली. निशांत आणि विशाळचं आता काही खरं नाही.

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.           

भाग ३१           

भाग ३० वरून पुढे वाचा .................

“मोठ्या साहेबांना भेटायचं आहे.” एका कामगारानी  उत्तर दिलं. वर्षांनी बाबांना बोलावलं. बाबांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि वर्षाला म्हणाले की “विशाल कुठे आहे ? त्याला जरा बोलाव.” विशाल आल्यावर त्याला बाबा म्हणाले “ अरे ही सगळी मंडळी आपल्याकडे गेल्या १० वर्षांपासून काम करताहेत, यांना केवळ एक महिन्याच्या पगारावर बोळवण करता येणार नाही. यांचा नीट हिशोब कर सगळ्यांचा.”

“हो बाबा, करतो.” विशाल म्हणाला. आणि त्यानी लोकांना “उद्या या” असं सांगितलं. ते लोक गेले. विशाल करतो असं म्हणाला तर खरं पण त्याला कुठे माहीत होतं कसं हिशोब करायचा ते. त्यांनी निशांतला विचारलं पण निशांतला सुद्धा आयडिया नव्हती, म्हणून त्यांनी वर्षा कडे बोट दाखवलं. पुन्हा वर्षा ! ती पुन्हा वेडे वाकडे प्रश्न विचारेल म्हणून  विशाल वैतागला. काय करावं याचा विचार करूनही उपयोग नव्हता. चला वर्षाकडे.

तो वर्षांच्या खोलीत गेला, वर्षा कामात होती, तो उभा राहिला. वर्षांचं लक्ष गेल्यावर ती म्हणाली “अरे, विशाल, असा उभा का ? बस. सांग काय काम आहे.”

“ते कामगार, एक महिन्याच्या पगारावर ऐकत नाहीयेत. ते बाबांना भेटले. आता बाबांनी त्यांचा पूर्ण हिशोब करून तेवढे पैसे त्यांना द्यायला सांगितलं आहे.” विशालनी एका दमात सांगून टाकलं.

“मग ? मी तर आधीच म्हंटलं होतं. आता बाबाच म्हणाले आहेत, तर हिशोब कर  आणि देऊन टाक.” – वर्षा.

“अग मला कुठे करता येतोय हिशोब. म्हणून तर तुझ्याकडे आलो आहे, तेवढं करून दे ना please”

“ओके. घेऊन ये सगळे बुक्स. ते पाहिल्यावरच मला काही करता येईल.” – वर्षा.

“बुक्स तर नाहीयेत.” – विशाल.

“बुक्स पाहिल्या शिवाय, मला काहीच करता येणार नाहीये.” वर्षा ठाम पणे म्हणाली.

“ठीक आहे मीच बघतो काय करता येतं ते.” विशाल म्हणाला. आणि तो विषय तिथेच संपला.

दुसऱ्या दिवशी, कामगारांना विशालनी सांगितलं की तो त्यांना पगारांच्या शिवाय, अजून ५००० द्यायला तयार आहे. पण कामगारांनी ते मानलं नाही. मग त्यांनी रक्कम वाढवून १०००० केली. तरी सुद्धा ते मानायला तयार नव्हते. ते म्हणाले की असं करण्यापेक्षा जर हिशोब करूनच रक्कम दिली तर बरं होईल. मग ती कमी का असेना. आता विशालला समजेना की हा तिढा कसं सोडवायचा ते. मग तो बाबांकडे गेला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. बाबा म्हणाले “ अरे मी तुला कालच सांगितलं होतं की हिशोबा प्रमाणे सर्वांना पैसे देवून टाक म्हणून. मग माशी कुठे शिंकली ?”

“बाबा, त्यासाठी मी वर्षाला म्हंटलं, पण तिला बुक्स हवे आहेत. आणि मी बुक्स लिहिलेच नाहीयेत. बिना बुक्स, ती काहीच करायला तयार नाहीये.” विशालनी अडचण सांगितली.

“ठीक आहे, वर्षाला बोलाव. मी सांगतो तिला.” बाबा म्हणाले. वर्षा आल्यावर बाबा तिला म्हणाले की “विशाल जवळ बुक्स नाहीयेत तेंव्हा तुला जी काही माहिती हवी असेल ती याला विचार. आणि विशाल तिच्या सर्व प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे. मग ती करेल मॅनेज.”

वर्षां ठीक आहे असं म्हणाली आणि बाहेर आली. सर्व कामगारांना बोलावलं आणि त्यांनाच विचारलं की किती वर्ष काम करता आहात आणि पगार काय मिळतो ते. ही माहिती घेतल्यावर ती त्यांना म्हणाली की “तुम्ही उद्या या, तुमचे पैसे तयार असतील. चिंता करू नका.”

आपल्या टेबल वर आल्यावर तिने आधी कामगारांची ग्रॅच्युटी काढली, मग इतकी वर्ष काम केलं म्हणून द्यायची बक्षिसी काढली. सर्व मिळून त्या चार लोकांची रक्कम लाखांच्या वर जात होती. विशालला सांगितल्यावर विशाल हबकलाच. म्हणाला “इतकी मोठी रक्कम मी कुठून आणू ?” त्याच्या या बोलण्यावर, वर्षां म्हणाली “तू किती वर्षांपासून मिल सांभाळतो आहेस.”

“त्याचा इथे काय संबंध आहे ?”- विशाल.

“संबंध आहे ना. तू सांग तर खरं., म्हणजे मला माहीत आहे, पण तू सांग.” – वर्षा.

“सहा वर्ष.” – विशाल.

“तू मला कुठलेच बुक्स दिले नाहीत,  मलाच अंदाज बांधावा लागतो आहे.” -वर्षा.

“कसला अंदाज ?” विशाल आता गोंधळला होता. त्याला काही कळतंच नव्हतं की वर्षा हे सगळं का विचारते आहे ते ? तिच्या जवळ पैसे आहेत तर तिने देवून मोकळं व्हावं बस.

“दर वर्षांचा नेट प्रॉफिट जवळ जवळ ४  लाख धरला तर अंदाजे २० लाख रुपये आजच्या घडीला  तुझ्याजवळ असायला हवेत. मग लाखभर रक्कम द्यायला एवढी खळखळ का करतो आहेस ?” वर्षानी बॉम्बच टाकला.  विशाल हादरला होता पण लवकरच सावरला. म्हणाला.

“छे, छे, माझ्याजवळ कुठले आले एवढे पैसे ? तू कशाच्या आधारावर बोलते आहेस हे मला माहीत नाही. तुला माहीत नाही, पण मिल तोट्यात चालत होती. मीच म्हणून सांभाळून घेत होतो.”

“तोट्यात चालत होती तर विकायला एवढा विरोध का केला ?” – वर्षा.

“मला माहीत नाही. माझ्या जवळ एवढे पैसे नाहीत हेच खरं.” – विशाल आता चिडला होता.

“ठीक आहे तुझं बँक बूक आणून दे. मीच calculate करते. ठीक आहे ?” – वर्षा.

तेवढ्यात तिथे विदिशा आली. विशालला पाहिलं आणि म्हणाली “ अरे तू इथे काय करतो आहेस ?”

ते कामगारांचा हिशोब केला, लाखाच्या  वर जाताहेत. आता वर्षाला म्हंटलं की दे पैसे, कारण ही जागा तुम्हालाच मिळणार आहे, तर मला म्हणाली की माझं पास बूक आण, बघू दे.”

“अरे ती आपली अकाऊंटंट आहे. दे तिला आणून. बघू दे काय हवं ते.” – विदिशा. “आणि जागा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे काय ? ती आपलीच आहे, हे आमचं तुमचं कुठून आलं”

आता विशालला समजेना, त्यानी आजवर विदिशा पासून सगळंच लपवून ठेवलं होतं, पण आता ते सगळं उघड होणार होतं. शेवटी त्याने माती खाल्ली. बावचळून गेला होता तो, म्हणाला की “मग फक्त माझंच का ? सगळ्यांचेच पास बूक चेक कर ना.” विशाल.

एकदम बरोबर. निशांतला पण बोलाव. त्यालाही सांग. बाबांच तर माझ्या जवळच आहे. वाहिनींचं अकाऊंटच नाहीये त्यामुळे पासबूकच नाहीये. विशालनी माती खाल्ली होती, त्यामुळे, आता निशांतला बोलायला आणि विरोध करायला जागाच उरली नव्हती. दोघांचीही पास बूक वर्षाकडे आले. वर्षांनी विदीशाला मदतीला घेतलं. दोघींनी मिळून दोन्ही अकाऊंट खणून काढली.

संध्याकाळी मीटिंग भरली. सुरवातीचं दिवसभराच्या कामाचा आढावा घेऊन झाल्यावर, निशांत म्हणाला की “वर्षा तू आमच्याकडून पास बूक घेतले, मग काय मिळालं तुला?

“सांगते, पण आधी मला काही माहिती बाबांच्या कडून हवी आहे. बाबा, अकाऊंट लिहिण्याचं काम निशांत च्या अगोदर कोण करत होतं ?” – वर्षा.

सुरवातीला  तुझी सासू करत होती. मग प्रताप आणि मग निशांत. पण यमुना फक्त जमा खर्च एवढंच लिहायची. प्रताप आल्यावर त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या. मग निशांतनी हातात घेतलं, त्यांनी काय केलं ते त्यालाच विचार.” बाबा म्हणाले.

“बाबा, मी आणि विदिशाने सुरवातीपासूनचे सगळे हिशोब चेक केलेत. सर्व सामान्य नियम असा दिसतो आहे की होणाऱ्या उत्पन्नाचे चार वाटे करून चौघांच्या खात्यात जमा करायचे. निशांत, विशाल आणि तुम्ही आणि प्रताप. त्या पैकी तुमचं आणि प्रतापचं खात एकच होतं म्हणून दोन वाटे तुमच्या खात्यात जमा व्हायचे. बरोबर आहे ना ?”

“हो एकदम बरोबर.” – बाबा.

“निशांतनी हातात घेलयांवर हळू हळू, दर वेळी, येन केन  प्रकारेण, काही रक्कम त्याच्या खात्यात वळती व्हायला लागली. आमच्या आकलना नुसार, जवळ जवळ २० लाख रुपये रक्कम निशांतच्या खात्यात एक्स्ट्रा सापडली आहे. ह्या रकमेचे सुद्धा चार वाटे व्हायला हवे होते, पण तसे न करता निशांतनी ती रक्कम आपल्या खात्यात जोडली.” वर्षानी गौप्य स्फोट केला. आपलीच बायको आपल्या विरोधात गेली म्हंटल्यांवर निशांत चवताळणं साहजिकच होतं. तो म्हणाला.

“तू माझ्यावर सरळ सरळ, मी फ्रॉड केला, असा आरोप करते आहेस. तुझ्या जवळ याचं काही प्रमाण आहे का ? उगाच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस.”

“तू “आम्हाला” असं म्हणालास, याचा अर्थ काय ? याच्यात विशाल पण सामील आहे का ?” – आता विदिशा पण चवताळली.

“हे तू काय बोलते आहेस विदिशा ? तुझ तुला तरी कळतंय का ? निशांत, बायकांच विरोधात उभ्या राहिल्या आहेत याला काय म्हणायचं , निशांत ?” – विशाल.

“आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत. आम्ही कुटुंबा  बरोबर आहोत. आणि कुटुंबात तुम्ही पण येता. किंबहुना तुमच्या मुळेच हे कुटुंब आहे. खरं तर आमची ओळखच तुमच्यामुळे आहे. तुम्ही दोघं आधारस्तंभ आहात या कुटुंबाचे. कुटुंब प्रमुखांचा दर्जा आहे तुम्हाला. पण कुटुंब प्रमुखच असं वेगळं वागायला लागला, तर त्याचं काय स्पष्टीकरण देवू शकतो आपण ?” विदिशा म्हणाली तिचा स्वर जरा कातर झाला होता. परिस्थितीतलं गांभीर्य तिच्या स्वरात डोकावत होतं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all