तीन झुंजार सुना भाग ३७

आता एक नवीनच प्रॉब्लेम उभा राहिला.

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.

कार्तिक                         निशांतचा मुलगा.

भाग ३७

भाग ३६  वरून पुढे वाचा .................

“पण वहिनी, आत्ताच तर तू म्हणालीस की शेतीत पैसा गुंतवल्यामुळे working capital कमी होण्याचा धोका आहे आणि त्याचा उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आणि आता तू जास्त शेती घेण्याचं समर्थन करते आहेस. ही दोन्ही परस्पर विरोधी विधानं आहेत. असं नाही का तुला वाटत ?” निशांत बोलला.

“मघाशी मी working capital बद्दल जे बोलले ते आत्ताची  परिस्थिती लक्षात घेऊन  बोलले. आत्ता मी जे बोलले, तो फक्त एक विचार आहे, स्वप्न आहे. समाजाचं आपल्यावर काही ऋण असतं, ते अंशत: तरी फेडता यावं, हाच एक उद्देश आमच्या मनात आहे.   कदाचित पुढच्या वर्षी मला हवी तशी परिस्थिती होईल मग त्यावेळेस आपण यांचा विचार करू.”

“आपल्या जवळ पैसा आला की लोक समाजाला, आपण काही देणं लागतो हे विसरतात, पण सरिता तू विसरली नाहीस. तुझे विचार स्तुत्य आहेत. मला आनंद वाटला तुझं बोलणं ऐकून.” बाबांनी समाधानाने त्यांचं मत सांगितलं.

“वहिनी तू ग्रेट आहेस. तू असामान्यच आहेस. अग आम्ही कोणीच कधी असा विचार केला नाही. तू म्हणतेस तसंच करू. पण माझ्या मते याची सविस्तर चर्चा करावी लागेल आणि फूल प्रूफ प्लॅन बनवूनच पुढे जावं लागेल. कारण, नाही तर असं व्हायचं की सगळे उत्तम स्थितीत आणि आपण गर्तेत. असं नको व्हायला. लोकं त्या वेळेला आपला विचार करणार नाहीत.” निशांतनी आपली शंका बोलून दाखवली.

“हो वहिनी” विशाल बोलला.” मी निशांतशी सहमत आहे. पण तुझा दृष्टिकोन मला आवडला. आपण या मार्गावर नक्कीच वाटचाल करायला पाहिजे.”

“ठीक आहे. मग सर्वानुमते जेंव्हा योग्य वेळ येईल तेंव्हा आपण यावर सखोल चर्चा करू.” असं बोलून सरितानी चर्चेला पूर्णविराम दिला.

दूसरा दिवस भर वर्षा बरीच आकडेमोड करत होती. संध्याकाळी मिटिंगला तीने सांगितलं की “यस. आपण पुढे जाऊ शकतो. काही अडचण येईल असं मला तरी वाटत नाहीये. तरी पण मला असं वाटतं की आकस्मिक खर्चा साठी पुरेसे पैसे उरत नाहीयेत, त्याची  जर जरूर पडली तर आपल्या खिशातून घालावे लागतील.”

आता सगळे जणं निशांतकडे बघायला लागले. ते पाहून निशांत म्हणाला “ नुसतं माझ्याकडे बघू नका. काय करायचं ते सांगा.”

“निशांत, तू जर शिवरामच्या च्या मुलाला पटवू शकलास की आता ५५ घे आणि पुढच्या वर्षी १० घे तर सगळं वर्ष बिना टेंशन चं जाईल.”

“ठीक आहे. बघतो प्रयत्न करून, पण जर त्यांनी नाही ऐकलं तर काय करायचं ? ते ही सांगून ठेवा.” निशांत म्हणाला.

“डील करायचंच. पण जरा प्रयत्न करून बघ, नाही तर जे आहे ते अॅक्सेप्ट करू.” सरितानी निर्णय दिला.

निशांत फोन करायला आंगणात गेला. साधारण अर्ध्या तासाने आला आणि म्हणाला की “थोडे आढे वेढे घेतले पण शेवटी कबूल झाला. पण या वेळेस त्यांनी एक अट टाकली की त्याला पोस्ट डेटेड चेक हवाय. मी पण विचार केला आणि सांगितलं की ५ लाखांचा डिसेंबर मध्ये आणि बॅलन्स  ५ चा मे मधे देवू म्हणून. कारण डिसेंबर पर्यन्त, मुसळीचे पैसे येऊन जातील. आणि मे मधे काही प्रॉब्लेमच नाहीये. तुमचं काय मत आहे. ?”

“excellent निशांत एकदम परफेक्ट काम केलस. पण तो तयार आहे का दोन हपत्यात  पैसे घ्यायला ?” सरिताने विचारले.

“हो. तयार आहे. आणि ते परवाच येताहेत.” – निशांत.

शिवरामकाकांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे ते लोकं एक आठवड्या नंतर आले. रजिस्ट्री पार पडली. त्यांना ५५ लाखांचा डिमांड ड्राफ्ट देऊन झाला. दोन्ही पोस्ट डेटेड चेक पण देऊन झाले. व्यवहार पूर्ण झाला. सरिता, निशांत आणि विशाल च्या नावांनी ५ -५ एकर नोंदवली. हा सगळा प्रकार लँड सीलिंग च्या कायद्याचा फटका बसू नये म्हणूनच केला होता. तरी पण वास्तवामधे एकूण शेती आता यांची स्वत:ची अशी ४५ एकर झाली होती.

दिवस कामाचे होते. आणि सर्व जमीन तयार करण्याची कामं सुरू झाली होती. विदिशा जातीने नेहमीप्रमाणे लक्ष पुरवत होती. आधीच्या प्लॅन प्रमाणे दुसरं ट्रॅक्टर काही घेणं झालं नव्हतं. ते पैसे शिवराम ला दिल्या गेले. पण दोन टिलर मात्र घेतले आणि त्याला विशालनी बनवलेली अटॅचमेंट पण बसवून झालीत. आता कामं वेगात सुरू झाली होती. संध्याकाळी, मीटिंग च्या जरा आधी, सरिता आणि वर्षा कशावर तरी चर्चा करत होत्या. बोलता, बोलता वर्षा म्हणाली “वहिनी, विदिशा आणि विशाल दुपारीच कुठे तरी गेले आहेत. मी विचारलं तर काही नाही, असच जरा भटकून येतो आहे म्हणाली. मला जरा विचित्रच वाटलं. विदिशा असं कधीच बोलत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं. काय झालं असावं याची  तुम्हाला काही आयडिया आहे का ?”

नाही ग. मला पण विदिशा आज कुठे दिसली नाही. मला वाटलं की असेल इकडे तिकडे, आता शेत बऱच मोठं आहे, त्यामुळे चटकन कळत नाही.” सरिता काळजीच्या स्वरात म्हणाली. “तू म्हणते तसा विशाल पण बरोबर असेल तर फार विचार करायची जरूर नाही. येतील थोड्या वेळात.”

पण थोडा वेळ गेला आणि जवळ जवळ अर्ध्या तासाने विदिशा आली.

“काय ग ,काय झालं ?” सरितानी विचारलं. “चेहरा उतरलेला दिसतो आहे ?”

“वहिनी, वर्षा, बरं झालं तुम्ही दोघीही भेटल्या. मला काही सांगायचं आहे” – विदिशा.

“अरे ! एकदम असं अचानक ? काय झालं ?, तब्येत तर ठीक आहे ना ?” – सरिता.

“तब्येत एकदम ठीक आहे. पण बाकी ठीक नाहीये. आणि तेच तुम्हाला सांगायचंय.”

विदीशाचा स्वर जरा गंभीरच होता. सरिता आणि वर्षा दोघीही जरा सावरून बसल्या. सरिता म्हणाली “असं काय झालंय ? जरा नीट सांग. तुला पाणी देऊ का ?”

विदिशांनी मान हलवली. मग  वर्षांनी पाणी आणून विदिशाला दिलं.

“वहिनी, मी आणि विशाल साधारण ७-८ महिन्यांपूर्वी डॉक्टर कडे गेलो होतो. लग्नाला सहा वर्ष झालीत म्हणून.” विदिशा म्हणाली. “वर्षांनीच सांगितलं होतं. त्यांनी पण दीड वर्षा पूर्वी त्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. आम्ही पण त्याच वेळी जाणार होतो, पण विशालला ती कल्पना आवडली नव्हती. तो म्हणाला की जर यांना फायदा झाला तर विचार करू म्हणून त्या वेळेस राहिलं.”

“मग ?” सरिता.

“वर्षाला तर फायदा झाला, पण ..” विदिशा बोलायची थांबली.

“अग बोल ना, त्या शिवाय कसं कळेल आम्हाला ?” सरिता काळजीने म्हणाली.

“त्यांनी आमच्या सगळ्या टेस्ट केल्या. आणि सांगितलं की दोघांमध्येही काही दोष नाहीये.” विदिशा म्हणाली.

“मग ?” – सरिता.

विदिशाला थोडा संकोच वाटला. म्हणून ती जरा थांबली. तिची अवस्था बघून मग वर्षांच म्हणाली. “वहिनी त्यांनी सांगितलं असेल, की महिन्यातले असे ३-४ दिवस आहेत की त्या विशिष्ट दिवशीच गर्भधारणा होते. ते दिवस कसे मोजायचे ते देखील डॉक्टर सांगतात.”

“मग विदिशा, एवढं सगळं जर डॉक्टरांनी तुम्हाला नीट समजावून सांगितलं होतं, आणि वर्षाला फायदा झाला आहे, हे तर दिसतंच आहे मग माशी कुठे शिंकली ?” सरिता.

“वहिनी त्यांनी जे काही सांगितलं ते आम्ही पूर्ण पाळलं. त्या म्हणाल्या होत्या की सहा सात महिन्यात रिजल्ट येईल. जर नाही आला तर आपण पुढचं पाऊल उचलू. म्हणून आम्ही आज पुन्हा गेलो होतो.” विदिशा म्हणाली.

“मग आता, काय म्हणताहेत डॉक्टर.” – सरिता.

“त्या म्हणताहेत की आणखी टेस्ट कराव्या लागतील. त्या साठी नागपूरला जावं लागेल. त्यांनी तिथल्या डॉक्टर साठी चिठ्ठी लिहून दिली आहे.” – विदिशा.

“नागपूरला कुठे जाणार आहात तुम्ही आणि कुठल्या टेस्ट करणार आहेत ते ?” – सरिता

विदिशांनी न बोलता डॉक्टरांची चिठ्ठी सरिताला दिली. सरितानी ती चिठ्ठी वाचली आणि म्हणाली “वंध्यत्व निवारण केंद्राच्या नावाची चिठ्ठी दिसते आहे.” आता विदिशा रडायलाच लागली.

“मी काय पाप केलं आहे हो वहिनी ?” विदिशा रडता रडताच बोलली. तेवढ्यात विशाल पण तिथे आला. त्याचा चेहरा पण उतरलेला होता. तो आला आणि विदिशाच्या बाजूला चूपचाप येऊन बसला.

आता सरिता आणि वर्षाला  काय बोलावं हे सुचेना. त्या पण गप्पच बसल्या. हा एक प्रकारचा आघातच होता सर्वांच्या मनावर. थोडा वेळ तसाच गेला मग सरिता थोडी सावरली आणि म्हणाली की “केंव्हा जायचं आहे नागपूरला ?”

“शक्य तितक्या लवकर. डॉक्टर म्हणाल्या की आता वेळ वाया घालवू नका. आणि हे पण म्हणाल्या की घाबरू नका, आता यावर खात्रीशीर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. सगळं ठीक होईल. तुमच्या दोघांमध्येही दोष नाहीये, तेंव्हा तुम्हाला बाळ होणारच. चिंता करू नका.” विशालनी सांगितलं.

“ठीक आहे. डॉक्टर जर असं म्हणाल्या असतील तर काळजीचं काहीच कारण नाहीये थोडा वेळ लागेल पण ठीक आहे, वर्षा कम्प्युटर बद्दल बोलते तेंव्हा बऱ्याचदा म्हणते की या दोन गोष्टी compatible नाहीयेत. तसंच यात सुद्धा मला compatibility issue दिसतो आहे. It will be sorted out. Just don’t worry. तुम्ही जाल तेंव्हा मी पण तुमच्या बरोबर येईन. म्हणजे तुम्हाला जरा भीती वाटणार नाही.” सरितानी त्यांना धीर दिला. सरिताचं बोलणं ऐकून दोघांनाही, नाही म्हंटलं तरी खूपच हायसं वाटलं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all