तीन झुंजार सुना भाग ३५

० आता विशाल आणि निशांत फूल फॉर्म मधे आलेत.

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.

कार्तिक                         निशांतचा मुलगा.

भाग ३५

भाग ३४  वरून पुढे वाचा .................

“बरं. कामाची बोलणी झाली असतील तर जरा फॅमिली मॅटर वर बोलू का ?” – सरिता.

सगळे जणं सरिताकडे बघू लागले.

“निशांत आणि विशालची लग्नं होऊनही जवळ जवळ चार वर्ष झालीत. ही दोघं कुठे फिरायला गेलेच नाहीत. आता वर्षा तर जाऊ शकत नाहीये, पण विशाल आणि विदिशा नक्कीच जाऊ शकतील.” – सरिता.

“अग वहिनी, इतकी कामं पडली आहेत, आणि तू हे काय सांगते आहेस ?” – विशाल.

“हो वहिनी आत्ताच तर मुसळीवर सगळ्यात जास्त काम असतं. आम्ही प्रवासाला गेलो तर इथे कामाची खोटी होईल.” – विदिशा.

“काही खोटी वगैरे होणार नाही. मी बघेन सगळं. तुम्ही आता प्लॅन  करा. वर्षानी नंबर लावला आहे आता तुमची वाट आहे.” – सरिता.

सरिता इतकी डायरेक्ट बोलेल अशी कोणीच कल्पना केली नव्हती. विदिशा तर लाजून चूर झाली.

विशाल म्हणाला “ वहिनी, हे ३-४ महीने जाऊ द्या. मुसळीची कापणी झाली, की विदिशा मोकळी होईल, मग आम्ही जाऊ. तुमच्यावर सुद्धा खूप भार पाडणार नाही, चार महिन्यांनी असा काही फारसा फरक पडणार नाहीये.” विदिशानी सुद्धा त्याचं म्हणण उचलून धरलं. तेवढ्या पुरता हा विषय संपला.

दीड महिन्यात, सर्व कामं आटोपली. कुंपण घालून झालं, शेड हलवून झालं. आता जरा मोठं शेड टाकलं होतं आणि त्यातच एक छोटीशी जागा वर्कशॉप साठी ठेवली होती. गुरांचा गोठा पण बरड जमिनीवर हलवून झाला होता. बरड जमिनीवरच एक पाझर तलाव खोदला होता. दोन अडीच फूटाखाली चांगली जमीन होती. २० फूटा वर झरे पण लागले. एक मोठं काम झालं होतं. पुढच्या वर्षी पाण्याचा प्रश्न सुटणार होता. विशालनी वर्कशॉप चं काम खूपच मनावर घेतलं होतं. सरिताला अपेक्षित असलेली अटॅचमेंट त्यांनी करून दिली होती. विशाल मुळातच हुशार होता आणि आता त्यांनी कामात स्वत:ला झोकून दिलं होतं.

गेलेली पत  परत मिळवण्याचा हा एकच मार्ग होता. सुरवात तर याच विचाराने झाली होती, पण आता त्याला कामात खरंच interest यायला लागला होता. त्यांनी एक अटॅचमेंट स्वत”च्या विचाराने बनवलं होतं. ते ट्रॅक्टरला लावल्यावर ते माती उचलून सर्व ढेकळं  फोडून पुन्हा खाली टाकून द्यायचं. त्याच्या साठी  त्यानी एक छोटं crusher बसवलं होतं. मुसळीला अगदी महीन माती लागते, ढेकळं असून चालत नाही. आत्ता पर्यन्त मजूर ते काम करायचे. पण आता ट्रॅक्टर अटॅचमेंट मुळे ते काम खूप वेगाने व्हायला मदत झाली. सरिता आणि विदिशा तर खूपच खुश झाल्या. आता सगळीच कामं पूर्वीपेक्षा जास्त गतीने होऊ लागली होती.

मुसळीची कांपणी होऊन ती शेड मधे सुकायला गेली होती. विशालला आता अटॅचमेंट बनवण्याचं वेडच लागलं होतं. त्याच्या नशीबानी, त्याला एक चांगला वेल्डर पण मिळाला होता. तो पण स्वत:चं डोकं खूप चालवायचा. तो कामात गुंतलेला असतांना सरिता तिथे आली. ती एका बाजूला उभी राहून कौतुकानी त्याचं काम बघत होती.

विशालचं सरिताकडे लक्ष गेलं म्हणाला  “अरे, वहिनी केंव्हा आलीस तू ? माझं लक्षच नव्हतं.”

“झाले, पांच मिनिटं. तू कामात गर्क होतास म्हणून तुला आवाज दिला नाही. काय बनवतो आहेस ?” सरिता म्हणाली.

“मुसळी पेरणी यंत्र बनवतो आहे. म्हणजे जवळ जवळ बनलच आहे.” – विशाल.

“विशाल, मुसळीची  हातांनीच रोवणी करावी लागते. ते वेडं वाकडं लागून चालत नाही.”

“वहिनी मी काय सांगतो ते ऐक आणि मग ठरव. आधी, ट्रॅक्टरनी नांगरणी आणि वखरणी करून घ्यायची. मग ही बारीक जाळी बसवलेलं अटॅचमेंट आहे ते वापरायचं. त्यांनी सगळं काडी कचरा या चाळणीत जमा होईल. मग टिलरला लावलेलं अटॅचमेंट एक फुट उंचीचे बेडस बनवेल. मग हे जे मशीन तू बघते आहे, ते त्या बेड वर सहा इन्च खोल एक भोक  पाडेल आणि बरोबर त्या छिद्रात आपण एक tuber टाकायचं. मशीन ला ती पण सोय करणार आहोत. प्रॅक्टिस झाल्यावर ही सगळी प्रोसेस एका मागोमाग होईल आणि वखरणी पासून पेरणी पर्यन्त सर्व कामं खूप फास्ट होतील.” विशालनी पूर्ण स्पष्टीकरण दिलं. सरिताला पण खूप बरं वाटलं. तीने विशालला शाबासकी दिली. आणि निघाली. सरिताला विशालशी काही बोलायचं होतं पण तिने विचार केला की संध्याकाळीच बोलू.

मग सरिता गोशाळे का गेली आता गुरांची संख्या शंभरावर गेली होती. गुरांची व्यवस्था ठीक ठाक होते आहे हे बघून ती माघारी आली. ती संध्याकाळच्या मीटिंगचा विचार करत होती. बरेच विचार आणि नव नवीन कल्पना डोक्यात आकार घेत होत्या. त्यावर चर्चा करायची होती.

असेच दिवस भराभर चालले होते. विशाल आणि विदिशाला काही फिरायला जाण्याचा मुहूर्त मिळत नव्हता. वर्षांचं बाळंतपण झालं आणि तिला एक गोंडस मुलगा झाला. त्या मुळे विशाल आणि विदिशावर कामाचा बोजा अजूनच वाढला. पाहता वर्ष संपलं. सगळ्यांनी अथक परिश्रम घेतले होते त्यामुळे मालाची क्वालिटी उत्तम राखल्या गेली होती. आदल्या वर्षीच्या ५ एकरांवरून एकदम ५५ एकरांची उडी घेतली होती पण विशालनी बनवलेल्या अटॅचमेंट मुळे कामाची गती सुद्धा उत्तम राखल्या गेली. भरपूर पैसा हाताशी आला. सर्वांना बोनस वाटला, त्यामुळे मजूर लोकं सुद्धा खुश होते. त्यांच्या बायकांना सुद्धा कामा मुळे जास्तीचे पैसे आणि बोनस मिळाला. एकूण सगळे समाधानी होते. सगळं कुटुंब निशांतच्या मुलांच्या कौतुकात रमून गेले होते. बारशाचा मोठा कार्यक्रम झाला. मुलांचं नाव कार्तिक ठेवलं. अजून पुढच्या वर्षांची कामं सुरू व्हायची होती.

पुढच्या वर्षांची आखणी आणि योजना करण्या साठी एक दिवस संध्याकाळची मीटिंग सुरू झाली. साधारण पायंडा असा होता की सरिता सुरवात करायची आणि मग बाकी लोकं बोलायचे. पण आज निशांतनीच सुरवात केली. म्हणाला

“शिवरामकाकांच्या मुलाचा फोन आला होता. त्यांना आपण पाठवलेले ५ लाख रुपये त्यांच्या अकाऊंट मधे जमा झाले आहेत. त्या बद्दल धन्यवाद द्यायला फोन केला होता.”

“चला हे ठीकच झालं. वर्षा, विलासकाकांना पण पैसे पाठवले ना ?” – सरिता.

“हो. आणि त्यांचा पण फोन येऊन गेला.” – वर्षा.

“ऐका न.” निशांत बोलला. “शिवरामकाकांचा मुलगा अजूनही बरंच काही बोलला. आणि ते महत्वाचं आहे. ते जरा ऐका.”

“अरे ! आधी नाही का बोलायचं ? सांग काय विषय आहे ?” – सरिता.

“तो म्हणत होता की त्यांना नागपुरात घर घ्यायचं आहे तेंव्हा जर शेती आपण विकतच घेतली तर बरं होईल. त्याला घर घेण्यासाठी एक रकमी पैसे हवे आहेत.” निशांतनी काय बोलणं झालं ते सांगितलं.

“काय रेट हवाय त्याला ?” बाबांनी विचारलं.

“तो ५ लाख एकर म्हणतोय. म्हणजे  टोटल ७५ लाख ” – निशांत.

“सध्या काय रेट चाललाय ?” – बाबा

“रेट पाचच आहे. पण बाबा त्यांची जवळ जवळ सहा एकर बरड जमीन आहे, त्या जमिनीला एवढा रेट कसा  देणार आपण ? म्हणून मी त्याला ९ एकरांचे ५ प्रमाणे आणि सहा एकरांचे दोन प्रमाणे देवू असं म्हंटलं. म्हणजे ५७ लाख होतात.” – निशांत

“मग तो काय म्हणतो आहे ?” – बाबा.

“त्यानी भलताच हिशोब लावला आहे. तो म्हणाला की आपण बरड जमिनीवर गोठा आणि शेड हलवलं आहे, पाझर तलाव पण काढला आहे, आणि तो म्हणतो आहे की आपण ज्या पद्धतीने काम करतो आहोत त्या हिशोबाने आपल्याला गोठ्यांची जागा अजून खूप वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी बरड जमीन एकदम योग्य आहे. आणखी तो हे ही म्हणाला, की आपलं घर पण त्याच जमिनीवर हलवा म्हणजे तुमची अडकलेली सुपीक जमीन मोकळी होईल आणि तुम्हाला ती लागवडी खाली आणता येईल. आणखी तो म्हणाला, की त्या जमिनीवर तुम्ही एक पाझर तलाव खोदला आहे, त्यामुळे, पाण्याचं दुर्भिक्ष कधीच जाणवणार नाही.” निशांतनी

“मग ?” – बाबा.

“बाबा, तो म्हणाला ते अगदीच नाकारण्यासारखं नाहीये. पण हे सगळं करण्यात आपला पण बराच खर्च झालाच आहे. आणि जर घर शिफ्ट करायचं म्हंटलं तर अजून येईल मग या हिशोबानी आपल्याला हा सौदा खूपच महागात पडेल.” – निशांत.

“मग, काय ठरवलं आहेस ?” बाबांनी विचारलं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all