तीन झुंजार सुना भाग ३०

विशाल अडचणीत. पुन्हा वरशांकडे जायला लागणार. आता काय ?

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई.                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.           

भाग ३०          

भाग २९    वरून पुढे वाचा .................

एक दिवस संध्याकाळच्या बैठकीत सरिताने नवीनच विषय चर्चेला घेतला.

“मला असं वाटतं की आपली दाल मिल आता जवळ जवळ २० वर्ष जुनी झाली आहे. मशीनरी बिघडण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. जुन्या यंत्रावर क्वालिटी चं काम होत  नाहीये. कस्टमर पण खूप कमी झाले आहेत, या परिस्थितीत मिल चालू ठेवण्या पेक्षा बंद केली तर ते जास्त फायदेशीर होईल.”

थोडा वेळ कोणीच बोललं नाही. सगळे आपापल्या परीने विचार करत होते. मिल विशालच्या अखत्यारीत येत होती. तो म्हणाला

“काय म्हणतेस वहिनी तू ? दाल मिल हे बाबांचं स्वप्न होतं, आणि तू म्हणते आहेस की बंद करू म्हणून. मनात, नेमकं काय आहे तुझ्या ?”

“आपण जरा भावना बाजूला ठेवून बोलू. मिल बाबांचं स्वप्न होतं, ते त्यांनी मिल बांधून पूर्णत्वास नेलं. आता त्यांचं स्वप्न हर्बल शेती आहे. ते आपण पूर्ण करू.” – सरिता.

“हर्बल शेती हे बाबांचं स्वप्न होतं ? बाबा, वहिनी काय म्हणते आहे ?” – विशाल.

“सरिता म्हणते आहे ते बरोबर आहे. मी आणि प्रतापनी बरंच संशोधन आणि प्लॅनिंग केलं होतं पण प्रत्यक्षात नाही उतरवू शकलो, पण सरिता आता ते करते आहे.” बाबा.

“बाबा तुम्ही बदलले आहात. आजकाल तुम्ही वहिनीच्या हो ला, हो करता. आता सुद्धा तुम्ही म्हंटलं की हर्बल तुमचं स्वप्न होतं म्हणून, आम्हाला तर कधी तुमच्या बोलण्यातून जाणवलं नाही. दादाही कधी बोलल्याचं आठवत नाही.” निशांत म्हणाला.

“अरे तुम्ही कधी आमच्याकडे लक्ष दिलं का ? दिलं असतं तर कळलं असतं. अजून काही नाही. बरं पण ते जाऊ दे. सरिता असं का म्हणते आहे ते तरी ऐकून घ्या.” – बाबा.

“ओके सांग वहिनी. मिल का बंद करायची ते ?” विशाल म्हणाला. नाही म्हंटलं तरी, मिल विशाल बघत होता त्यामुळे त्यांची मिल मधे भावनात्मक गुंतवणूक होती. त्याला जरा वाईटच वाटत होतं.

“असं बघा” सरिता नी बोलायला सुरवात केली. “ तुम्हाला माहितीच आहे की मुसळी काय अश्वगंधा किंवा भृंगराज हे सगळे high value items आहेत. त्यांची अतिशय काळजीपूर्वक निगा राखावी लागते. आता मुसळी तोंडायची वेळ येईल तेंव्हा आपल्याला बरीच मोठी जागा लागणार आहे. त्याकरता एक मोठं शेड लागणार आहे. जर मिल ची मशीनरी आपण विकून टाकली तर बरीच मोठी जागा आपल्याला मिळेल. म्हणून हा पर्याय मला दिसतो आहे. तशीही मिल आता फारशी फायदेशीर राहिली नाहीये.”

सगळे जणं विचारात पडले. थोड्या वेळाने बाबाच बोलले. “मला सरिताचं बोलणं पटतंय कारण असं की या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. यांचा लोकांच्या आरोग्याशी सरळ  संबंध येतो. यांची गुणवत्ता उत्तमच राखली पाहिजे. याच्या प्रोसेस मधे मानवी श्रम फार असतात. त्यामुळे शेड असणं गरजेचं आहे.”

“पण वहिनी, तू दोन एकर जागा राखून ठेवली आहेस ना खास याच कामासाठी मग त्याचा उपयोग करू ना.” विशाल अजूनही गुंतलेलाच होता.

“ती लागणारच आहे पण हवामानात बदल झाला तर मुसलीचा रंग बदलतो आणि भाव एकदम पाडून मिळेल किंवा ती ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली आहे, ते स्वीकारणारच नाहीत.” सरितानी उत्तर दिलं.

यावर वर्षा म्हणाली “ विशाल या सगळ्या बाबींचा तुम्हाला अनुभव नाहीये पण आम्हाला चांगली जाणीव आहे. मागच्या वर्षी फक्त ५ एकर होती म्हणून निभलं  .पण आता २५ एकर करतो आहोत, we cannot take chances. We need to be absolutely sure about quality, otherwise we will land in trouble.”

यावर बरीच चर्चा होऊन असं ठरलं की पेपर मधे जाहिरात द्यायची की मशीनरी विकायची आहे, म्हणून. विशालनी काहीशा अनिच्छेनीच संमती दिली.

महिन्यायाभरात काही कोटेशन आले. विशाल ते घेऊन वर्षा कडे आला. म्हणाला.

“हे काही कोटेशन आले आहेत. खूपच कमी किंमत सांगताहेत. आपली मिल काही विकल्या जात नाही.”

“ज्याची बोली जास्त असेल, त्याला विकून टाक.” वर्षा म्हणाली.

“असं कसं ? आपली मिल अजून चालू कंडिशन मधे आहे. काही तर पटण्या सारखी किंमत यायला पाहिजे.” – विशाल.

“मिल चालू आहे म्हणून एवढी तरी बोली आहे, नाही तर भंगार मध्येच काढावी लागली असती.” वर्षा म्हणाली. “तसंही मिलची वॅल्यू आता २० वर्षांनंतर शून्य झाली आहे.

“हे तू काय सांगते आहेस ? कशाची वॅल्यू शून्य झाली आहे ?” निशांत आला होता आणि त्यांनी विचारलं.

विशालनी त्यांचं आधी काय बोलणं झालं होतं ते सांगितलं. मग निशांत म्हणाला

“शून्य कशी झाली ते नीट आम्हाला समजेल असं सांग.”

“निशांत, तुला तर हे माहीत असायला हवं. शिकलो आहे आपण. मशीनरीचं depreciation होतं आणि दर वर्षी त्यांची वॅल्यू कमी कमी होत जाते. आता २० वर्षात त्याच हिशोबाने मिलची वॅल्यू जवळ जवळ शून्य झाली आहे. मग आता जी किंमत येईल तो आपला प्रॉफिट आहे. हेच मी विशालला समजावून सांगत होते.”

“हो, विशाल, वर्षा म्हणते आहे ते बरोबर आहे. जी बोली जास्त असेल त्याला विकून टाक.” – निशांत.

नाइलाजानी विशालने मान्य केलं. मग त्याला आठवलं की त्यांचे ४ कामगार होते, “त्यांचं काय करायचं” त्यांनी वर्षाला विचारलं.

“त्यांचा हिशोब करू आणि जायला सांगू.” वर्षा म्हणाली. “तू मला मिलचे सगळे बुक्स आणून दे. मी बघते.”

“बुक्स कसले ? माझ्या जवळ काहीच नाहीये.” – विशाल.

“म्हणजे ? हाजरी बूक, कॅश बूक, लेजर, बिल बूक, खर्चाच्या पावत्या, खरेदीची बिल, बँकेच्या स्लिप, पास बूक  वगैरे सगळंच आणून दे.” वर्षा म्हणाली.

“माझ्या जवळ हे काहीच नाहीये.” विशाल.

आता चकित होण्याची पाळी वर्षांची होती. ती म्हणाली “ मग तू मिल चालवली कशी ? कसलाच हिशोब ठेवला नाहीस ? असं कसं ? लोकांचं काम केल्यावर आलेले त्यांचे पैसे, वेग वेगळ्या कारणांसाठी जो खर्च केला त्याचा हिशोब, मजुरांचे पगार दिलेस, या सगळ्या गोष्टींचा हिशोबच ठेवला नाहीस, तर मग तुला कळतं कसं की मिल नफ्यात चालली आहे तोट्यात ते ? ” मग थोडं थांबून म्हणाली “तुझी कामाची नेमकी पद्धत काय आहे ते सविस्तर सांगशील का म्हणजे मला लोकांचा हिशोब नीट करता येईल.”

“त्यांच्यात हिशोब काय करायचा आहे ? एक महिन्यांचा पगार द्यायचा आणि बाय बाय म्हणायचं. फिनिश. आहे काय आणि नाही काय?” – विशाल.

“विशाल अरे असं नसतं. इतकी वर्ष ती माणसं आपल्या कडे आहेत, कायद्या प्रमाणे, त्यांचा हिशोब हा करावाच लागेल. योग्य ते पैसे त्यांना द्यावेच लागतील.” – वर्षा.

“वर्षा तू नको काळजी करू ते मी बघून घेईन. काय निशांत ?” विशाल म्हणाला. एवढं बोलून ते दोघं निघाले.

ज्याची बोली फायनल झाली, तो येऊन चेक देऊन गेला आणि त्याच्या माणसांनी मिल सूटी करण्याचं काम चालू केलं. जागा मोकळी व्हायला जवळपास एक महिना तरी लागणार  होता.

दुसऱ्या दिवशी विशाल नी लोकांना बोलावून एक महिन्याचा पगार घ्या आणि दुसरी नोकरी शोधा म्हणून सांगितलं, पण ते ऐकेनात. त्यांना असं वाटत होतं की त्यांना नोकरीवरून काढणार नाही म्हणून, पण आता विशाल त्यांना जायला सांगत होता. ते काही त्यांना पटलं नाही. ते सगळे जणं घरी आले बाबांना भेटायला. वर्षा त्या वेळेस सहज म्हणून बाहेर आली होती तिला हे सगळे लोकं दिसले. तिने विचारलं की काय काम आहे म्हणून.

“मोठ्या साहेबांना भेटायचं आहे.” एका कामगारानी  उत्तर दिलं. वर्षांनी बाबांना बोलावलं. बाबांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि वर्षाला म्हणाले की “विशाल कुठे आहे ? त्याला जरा बोलाव.” विशाल आल्यावर त्याला बाबा म्हणाले “ अरे ही सगळी मंडळी आपल्याकडे गेल्या १०-१२  वर्षांपासून काम करताहेत, यांची केवळ एक महिन्याच्या पगारावर बोळवण करता येणार नाही. यांचा नीट हिशोब कर सगळ्यांचा.”

“हो बाबा, करतो.” विशाल म्हणाला. आणि त्यानी लोकांना “उद्या या” असं सांगितलं. ते लोक गेले. विशाल करतो असं म्हणाला तर खरं, पण त्याला कुठे माहीत होतं कसा  हिशोब करायचा ते. त्यांनी निशांतला विचारलं पण निशांतला सुद्धा आयडिया नव्हती, म्हणून त्यांनी वर्षा कडे बोट दाखवलं. पुन्हा वर्षा ! ती पुन्हा वेडे वाकडे प्रश्न विचारेल म्हणून  विशाल वैतागला. काय करावं याचा विचार करूनही उपयोग नव्हता. चला वर्षाकडे.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all