तीन झुंजार सुना भाग १८

रावबाजीने तर पैसे द्यायला नकार दिला पुढे काय ? वाचा या भागात.

            तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

भाग १८    

भाग १७   वरून पुढे वाचा .................

“निशांत, आम्ही वहिनींच्या बरोबरीने खटलो आहे तिकडे. आता तर आम्हाला सुद्धा शेतीची इतकी माहिती झाली आहे की आम्ही सुद्धा शेतकरी झालो आहे. तो रावबाजी किती  पैसे देणार आहे तुम्हाला ? अजून दिले नाही ना ?” वर्षा म्हणाली.

“नाही अजून नाही दिले.” – निशांत.

“केंव्हा देणार आहे ? कॉंट्रॅक्ट प्रमाणे, आत्ता पर्यन्त तर त्यांनी तुम्हाला तुमचा वाटा देवून तुम्हाला शेतीचा, परत ताबा द्यायला हवा होता.” – वर्षा.

“तो आम्ही घेउच. पण मला सांग, की तू आणि विदिशा वहिनींच्या  बरोबरीने कष्ट करत होता तर तुम्हाला किती पैसे दिले वहिनींनी ?” – निशांत.

“आम्ही नोकर म्हणून गेलो नव्हतो. वहिनी एकट्या होत्या म्हणून त्यांना मदत करायला गेलो होतो. वरतून तुम्हाला सगळी माहिती देत होतो. तुमच्याच परवानगीने गेलो होतो ना तिथे मग पैश्यांचा प्रश्न कुठे येतो ?” – विदिशा.

“तरी पण कष्टाचा मोबदला तर मिळायलाच हवा. साधी गोष्ट आहे.” – निशांत. 

“हात जोडले तुमच्या पुढे. घरच्या शेतीत कष्ट केले त्याचा मोबदला मागायचा ? कमाल आहे. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मोबदला तुमच्या रावबाजीला मागा. ते सोडून आम्हाला म्हणता आहात.” वर्षाला आता राग आला होता. 

एवढं झाल्यावर मग, दुसऱ्या दिवशी, निशांत नी रावबाजीला फोन केला आणि भेटायला बोलावलं. रावबाजीने त्यांना सांगितलं की येणाऱ्या वर्षांची तयारी करायची आहे म्हणून तुम्हीच शेतावर या. शेतावर गेल्यावर निशांत नी लगेच पैशाचा विषय काढला.

रावबाजी, किती उत्पन्न झालं आणि आमचा वाटा केंव्हा देणार ? आजच फायनल झालं आणि पैसे दिलेस तर बरं होईल. आम्हाला पण आता जरूर आहे.

यावर रावबाजी म्हणाला

“बरं झालं निशांत तुम्हीच विषय काढला. अरे, तुम्ही लोकांनी शेतीची वाट लावली होती. जमिनीची काय अवस्था केली होती तुम्ही लोकांनी, याची कल्पना आहे का ? अरे जमीन तयार करण्यातच किती खर्च झाला याला काही सुमारच नव्हता. जमिनीचा कस सगळा   निघून गेला होता. ती पुन्हा कसदार करायला अजून दोन वर्ष तरी लागतील. त्यामुळे सगळं नुकसानच झालं आहे. तुम्हाला सुरवातीला १० लाख दिले होते, ते सुद्धा जास्तच होते. पण ठीक आहे त्या बद्दल मी काही बोलत नाहीये. पण अजून काही देणं शक्य नाही.”

त्याचं बोलणं ऐकून निशांतला रागच आला तो म्हणाला

“आम्ही शेतीची वाट लावली ? शेतीच्या मातीतला कस पूर्ण निघून गेला ? काय बोलतो आहेस तू रावबाजी, अरे याच मातीतून आमच्या वहिनींनी सोनं पिकवलं, आणि तू म्हणतो शेती नीट करायला दोन वर्ष लागतील ?  पागल झाला आहेस का ?”

“हे बघा निशांत भाऊ, पागल म्हणायचं काही काम नाहीये. मातीची प्रत सुधारण्यासाठी, आधीच माझा १० लाखांच्यावर खर्च होऊन गेला आहे. खोटं नाही सांगत मी, वाटल्यास विचारा या लोकांना, यांनीच सर्व कामं केली आहेत.” रावबाजीने आता संघर्षाचा पवित्रा घेतला. 

“अरे आमची शेती उत्कृष्ट आहे असं सर्टिफिकेट दिलं आहे तहसीलदाराने आणि तू म्हणतोस की बेकार आहे म्हणून ?” – निशांत.

“एकरी दोन अशी ५० सॅम्पल मी पाठवली होती टेस्टिंग साठी. सगळे रिपोर्ट खराब. आता बोला.” - रावबाजी.

“काय सांगतोस ? हे कसं शक्य आहे. ?” निशांतला आता वेगळाच वास यायला लागला होता.

“निशांत भाऊ, सर्टिफिकेट चं काय घेऊन बसला आहात ? तुमच्या दोघांजवळ पण डिग्रीची सर्टिफिकेटं  आहेत. काय किंमत आहे त्याला ? तुम्हाला ना इंजीनीरिंग मधलं काही कळत, न शेतीतलं कळतं. त्यामुळे मी जे काय सांगतो त्यावर विश्वास ठेवा. पुढच्या वर्षी चांगला फायदा होईल. कशाला काळजी करता.” रावबाजीने निशांतला सुनावलं.

“इतकी मानहानि ! आणि ते ही  जेमतेम मॅट्रिक असलेल्या माणसाकडून ! निशांत ला ते सहन झालं नाही. तो खूपच चिडला होता पण विशाल नी त्याला थांबवलं. आणि ते दोघंही घरी आले.

घरी आले ते फसफसतच आले. वर्षभरापूर्वी जो रावबाजी अदबीने बोलत होता, त्याच रावबाजीने आता त्यांची पायरी त्यांना दाखवून दिली होती. कवडीची ही किंमत त्यांना दिली नव्हती. त्यांचे चेहरे पाहूनच वर्षा आणि विदिशा काय ते समजल्या. रावबाजीने पैसे दिले नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. त्या काही बोलल्या नाही. आत्ता विषय काढण्यात काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन चूप चाप जेवणाची तयारी केली. आणि दोघांना बोलावलं.

विशाल एकदम चिडला.

“एवढं रामायण झालं आणि तुम्हाला जेवणं सुचतायत.”

थोडा वेळ तसंच गेला. दोघी डायनिंग टेबल वर शांत पणे बसून त्यांची वाट पहात होत्या.

“मला कळत नाही तू का थांबवलंस मला, मी आज मारलच असतं त्याला. दोन चार कानफाटात  बसल्या असत्या मग ताळ्यावर आला असता तो. पैसे देत नाही म्हणजे काय ?” निशांत म्हणाला. भयंकर संतापला होता तो.

“म्हणूनच तुला थांबवलं. ती वेळ नव्हती. आपलं शेत आणि सामान त्यांच्या ताब्यात आहे आणि वर त्याची सगळी माणसं पण अवती भवति होती. अश्या परिस्थितीत आपण काय करू शकलो असतो ?” विशालनी आपली बाजू मांडली.

“हूं.” – निशांत

“हे बघा, चीड चीड करून काही उपयोग होणार नाहीये. जेवून घ्या मग शांत डोक्याने विचार करा” वर्षा म्हणाली.

“बरोबर आहे. मलाही असं वाटतं की आता जेवून घेऊ आणि मग शांत पणे ठरवू, की काय करायचं ते”.- इति विशाल

“मला असं वाटतं की बाबांचा सल्ला घ्यावा. त्यांना बराच अनुभव आहे ते योग्य सल्ला देतील.” विदिशा म्हणाली.

विदीशाचं म्हणण दोघांनाही पटलं. आणि संध्याकाळी शेतावर जायचं ठरलं.

संध्याकाळी निशांत, विशाल, वर्षा आणि विदिशा चौघे शेतावर.

“काय मंडळी, आज सह कुटुंब ! काय खास ?” बाबांनी विचारलं.

“काही नाही, सहजच. तुमची हाल हवाल पाहायला आलो. अजून काही नाही.” निशांत चुळबुळत म्हणाला.

“नाही हो बाबा, निशांतला तुमच्याशी बोलून काही बाबींवर तुमचा सल्ला हवाय. निशांत अरे बोल न, तू सांगितल्या शिवाय बाबांना कसं कळणार ?” वर्षा बोलली.

“निशांत बोल काय अडचण आहे ? मला कळल्यावर बघू काही मार्ग निघतो आहे का ते.” बाबांनी निशांतला आश्वस्त केलं.

मग निशांतने  सकाळी रावबाजी बरोबर काय बोलणं झालं ते सांगितलं. आणि म्हणाला “आता या परिस्थितीत काय करायचं हे समजत नाहीये.”

“हा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये.” बाबा म्हणाले. ते पुढे म्हणाले की “ तुम्ही असं करा, तुम्ही दोघंही या शेती विषयातून अंग काढून घ्या. यापुढे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही शांत पणे बसा आता.”

“काय करणार आहात बाबा तुम्ही ?” विशालने विचारलं.

“मी काहीच करणार नाहीये. जे काही करायचं ते या तिघी मिळून करतील. तुम्ही निश्चिंत रहा.” बाबांनी त्यांना सांगितलं. आणि सरिता कडे वळून म्हणाले “ काय ग सांभाळता का सर्व शेती ?”

“हो बाबा,” तिघी सुना एक सुरात बोलल्या.

निशांत आणि विशालनी खांदे उडवले. तसंही त्यांनी आता बाबांकडे येऊन शरणागती पत्करलीच होती. आणि शेतीमध्ये काही करण्याची त्यांच्यात धमक पण उरली नव्हती. त्यामुळे त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

आता सरिताने सूत्रे हातात घेतली. म्हणाली

“निशांत, विशाल तुम्ही काहीच बोलत नाहीये, तुमची तयारी आहे न ? तरच आम्ही तिघी कामाला लागतो. एवढी मोठी शेती कसायची म्हणजे खायचं काम नाहीये. तुमची मदत आम्हाला लागणारच आहे. काय म्हणता ?”

“आमची तयारी आहे, पण तुम्हाला झेपणार आहे का एवढा व्याप ?” – विशाल

“तुम्ही त्याबद्दल निश्चिंत असा. शक्यतो आम्ही तुम्हाला त्रास देणार नाहीच, पण जर एखाद्या वेळी जरूर पडलीच तर आम्ही बोलावल्यावर मदतीला या म्हणजे झालं.” वर्षांनीच परस्पर उत्तर दिलं.

“ठीक आहे. तुम्ही घ्या हातात सर्व, आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू.” – निशांत

“ठरलं तर मग. आता बघा आम्ही काय करतो ते.” सरिता म्हणाली. आणि तिने वर्षा  आणि विदीशाला खूण केली, तिघी जणी जरा दूर गेल्या आणि आपसात काही ठरवलं. मग विदिशा कामगारांची घरं होती तिकडे गेली. निशांत आणि विशाल बाबांजवळ बसले होते. काय चाललं आहे हे काही त्यांना कळतच नव्हतं. त्यांनी बाबांच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. पण बाबांनी खांदे उडवले. त्यांनाही काही माहीत नव्हतं. पण आता ते सरिताच्या कार्यपद्धतीवर पूर्ण समाधानी होते त्यामुळे काही बोलले नाहीत.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all