सहज बोलावंसं वाटलं

Thought Sharing
वधुवरसूचक मंडळाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर मुलींची माहिती आणि अपेक्षा वाचत असताना एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला.

प्रत्येक सौभाग्यकांक्षिणीला आपल्या भावी पतीचा पगार पॅकेज 8 ते 10 लाखांच्या घरात असावं असं वाटतंय. किमान उत्पन्न अपेक्षा मासिक रु 50000/-. तसंच दुसरं म्हणजे मुलगा पुणे किंवा मुंबई इथे राहणारा हवा.

बरोबर आहे. वधूपालकांसाठी वरसंशोधन करत असताना मुलाचे उत्पन्न किंबहुना आर्थिक स्थैर्य हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे ह्यात शंकाच नाही.

आज काळ बदललाय. आपल्या समाजात नोकरीचे प्रमाण फार कमी आहे. आपल्या मुलांना सरकारी नोकरी हे दिवास्वप्न ठरले आहे.

पण म्हणून मुलाला 25-30 हजार पगार आहे म्हणजे तो अगदी टाकाऊ, निम्न-मध्यमवर्गीय, त्याच्यासोबत आपली मुलगी सुखात राहू शकणार नाही हा समजही चुकीचा आहे.

मला सांगा, आपण जेव्हा आपल्या लग्नानंतर स्वतंत्र आयुष्याला सुरुवात केली तेव्हा आपल्याला किती पगार होता?

आपल्यापैकी बऱ्याच जणांवर धाकट्या भावा बहिणीच्या शिक्षणाची, आईवडिलांची जबाबदारी होती. त्यामुळे थोडीफार आर्थिक ओढाताण देखील होती. आईवडिलांचे स्वतःचे घर असले तरी स्वतःचे घर घेण्यासाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत क्वचितच मिळाली. तरीही आपण स्वतःच्या पाठबळावर चांगली मजल मारलीच ना!

त्याकाळी म्हणजेच तीस वर्षांपूर्वी आपल्या पालकांनी "मुलाला 10000/- किंवा पाच आकडी पगार हवाच" असा अट्टाहास केला असता तर आपल्यापैकी किती मुलांची लग्न झाली असती बरं?

आता हम दो हमारे दो/एकच्या जमान्यात आपली पिढी बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहे.स्वतःचे स्थावर, जंगम मालमत्ता, सोने-नाणे, वर्षातून एखाददुसरी ट्रीप ह्यासहित आपली पिढी बऱ्यापैकी उच्चमध्यमवर्गीय जीवन जगतेय. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःसहित मुलांच्या भवितव्याची उत्तम तरतूद करून ठेवली आहे आपला पैसा आपल्या मुलांच्या कामी नाही येणार तर कुणाच्या?

आपली मुलं देखील आपल्या जीवनशैलीला सरावली आहेत. त्यामुळे येणारी सून ही त्याच लाईफस्टाईलमध्ये राहणार म्हणजेच तिच्या घरी ती ज्या सुखसोयीमध्ये आणि आर्थिक सुरक्षिततेत राहतेय त्याच किंबहुना त्याहून जास्त आर्थिक स्थैर्य तिला मिळणार हे नक्की.

शिवाय आपली मुलं हुशार आहेत, कर्तबगार आहेत... त्यामुळे स्वतःच साम्राज्य उभं करतीलच पण त्यासाठी काही काळ जाऊ द्यायला लागेल.

आजकाल मुलींना किंवा त्यांच्या पालकांना अपेक्षित असलेलं आर्थिक स्थैर्य येईतोवर मुलं चाळीशी आणि मुली पस्तीशी ओलाडणार. मग त्यांचा संसार वाढणार कधी? फुलणार कधी?

आमच्याकाळी वरपक्षाची वरवर असायची. आता काळ बदललाय... आता दोन्ही पक्ष समान पातळीवर आलेत. असायलाच हवेत.नाकारण्याचा हक्क मुलगा-मुलगी दोघांनाही आहेच.

ज्या मुलीला चांगली नोकरी आहे किंवा जिला खरोखर करिअर करायचे आहे किंवा जी पुण्या- मुंबईत अगोदरपासूनच स्थायिक आहे तिने पुण्यामुंबईच्या मुलाची अपेक्षा केली तर एकवेळ ठीक आहे. पण ज्या मुलीला साधी नोकरी पण करायची नाहीये तिनं पुण्याचाच मुलगा हवाय असा अट्टाहास का करावा?

अगदी आमच्या विदर्भाबद्दल विचार केला तर आमचा विभाग म्हणजे अगदी काही खेडं नाही. चांगल्या सुखसोयी इथे सुद्धा आहेत.

जसं एखाद्या मुलाला वाटतं की पुण्यात राहून साठ हजार पगार कमावण्यापेक्षा गावात चाळीस हजारात काम करू, आपल्या घराजवळ राहू, आपलं घरदार आहेच.. आईवडिलांकडे लक्ष देता येईल. तसं एखाद्या मुलीलाही वाटतं असेल ना आईवडिलांच्या जवळपास राहिलं तर अडीनडीला आपली त्यांना मदत होईल.

इथे आपली प्रशस्त घरं आहेत. इथले खर्च कमी आहेत... कामासाठी मदतनीस मुबलक आहेत. शिवाय आपलं माणूस..हाकेच्या अंतरावर... कधी लागलीच गरज तर...

मग इतकं सगळं असताना निव्वळ पुण्या-मुंबईच्या आकर्षणापायी टू बी एच के मध्ये इतिकर्तव्यता का मानावी!

एखाद्या मुलाला बाकी सगळं जुळत असताना फक्त पुण्याला राहत नाही किंवा पगार कमी आहे अश्या कारणासाठी नाकारण्यापूर्वी एकदा त्याच्याशी, त्याच्या घरच्यांशी बोला तर खरं, त्याचं घर बघा, त्याच्या कुटुंबाला भेटा, तो जिथे राहतो -काम करतो तिथे संपर्क करा, मुलाचा स्वभाव जाणून घ्या आणि नाहीच आवडलं तर खुशाल नकार द्या.

नुसतं वर्षागणिक फॉरेन ट्रिप अन् दर आठवड्याला हॉटेलमध्ये पार्ट्या करणाऱ्या सो कॉल्ड श्रीमंतीपेक्षा मुलीला स्वाभिमानाने जगायला मिळेल, तिच्या आवडीनिवडी जपल्या जातील, ती सासरच्यांसोबतच माहेरच्या व्यक्तींची काळजी घेऊ शकेल असं घर बघा ना तिच्यासाठी!

मध्यंतरी असं वाचण्यात आलं की आजकालच्या मुलींनी त्यांच्या आईचा, मावशी-आत्याचा सासुरवास बघितलाय म्हणून त्या स्वतः वरनिवडीसाठी जागरूक आहेत.

खरंच मुलींच्या (आणि मुलांच्याही) आयांनो, आपल्याला नक्की कश्याचा त्रास झाला हो?

आर्थिक तंगीचा ? असेलही. पण कमी पैश्यात संसार करण्याची तयारी होतीच ना आपली. त्यावेळी गरज होती ती कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं ह्याची.

पदवी-पदव्यूत्तर शिक्षण घेऊन समंजस झालेली आपली पिढी... शिक्षणाची चाड आणि अन्यायाबद्दल चीड निर्माण झालेली मुलींची फौज आपली त्यावेळेसची....

आपल्याला त्रास झाला तो सुनेला पायातली वहाण समजण्याचा... लग्न तुटू नये म्हणून सासरच्यांशी समझोता करत संसार रेटण्याचा!

"चल,निघ माझ्या घरातून" चा! वारंवार स्वाभिमान ठेचल्या जाई त्याचा!

कित्येकदा आईवडिलांना गरज असताना माहेरी जाऊ दिलं नाही त्याचा!
सासरी सतत आईबापाचा उद्धार होत असे त्याचा!

खरंय की नाही सांगा बरं! जर पैसा आणि डिग्निटी पारड्यात ठेवलं तर कुठलं पारडं जड असायला हवं? तुम्हीच ठरवा.

तुमच्या मुलीला आणि मुलालाही हे सांगा... जीवनसाठी निवडताना प्राधान्य कशाला द्यायचं ह्याचा विचार एकदा नक्की करा.

शेवटी आपलं भवितव्य आपल्याच हातात असतं!

#सहज बोलावंसं वाटलं...