थोडं त्याला ही समजून घ्या हो... २

त्याच्या मनाची व्यथा
"हेल्मेट की वजहसे छोरे का सीर बचा हैं. कौनसा धुंदीमे गाडी चलातारे तुम लोग? घरमें बिवी बच्चे, बुढे मा बाप राह देखते रहते." एक तृतीयपंथी त्याला उचलत बडबड करत होता. परिवार काय असतो, त्याच्या बोलण्यातून ती कळकळ जाणवत होती.

तिथे जमलेल्या दोघातिघांनी त्याला उचलत बाजूच्या बेंचवर बसवले. आणि त्याला कुठे लागले काय बघत होते.

"आटो sss" तो तृतीयपंथी आवाज देत होता. तशी एक ऑटोरिक्षा तिथे येऊन थांबली.

"बैठो, चलो दवाखाना.." तो तृतीयपंथी म्हणाला.

"नाही, ठीक आहे." तो म्हणाला.

" हात पाव देख, कही तुटे फुटे तो नही?" परत तो तृतीयपंथी काळजीने म्हणाला.

"थोडंसं खरचटले आहे. पण ठीक आहे."

"गाडी तो गया. भगवान की कृपासे तुम बच गये. चलो घर छोड देता."

" जातो मी. थोड्या वेळ बसतो इथे."

"ठीक आहे जास्त वेळ नको करू. फॅमिली को टेन्शन आत रे बच्चे.." म्हणत तो तृतीयपंथी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत निघून गेला.

बाकी पण लोकांनी त्याला पाणी आणून दिले. थोडी विचारपूस केली आणि आपापल्या वाटेने निघून गेला.

तो एकटाच तिथे बेंचवर बसून होता. नारायणराव त्याच्या शेजारी जाऊन बसले.

"ठीक वाटतेय आता?" त्यांनी विचारपूस केली.

त्याने होकारार्थी मान हलवली.

"बरं रात्र बरीच झाली आहे. जा आता घरी, सगळेच काळजीत बसले असतील."

"कोणते घर हो काका? घर नाही कटकट वाडा झालाय. घरी कोणालाच माझी काही काळजी पडली नाहीये. सगळे फक्त स्वतः पुरती बघतात. मी कुठल्या परिस्थितीतून जातोय, जिवंत राहील, मरेल.. कुणाला त्याचं काहीच पडलेले नाही. सगळ्यांना फक्त त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या, झालं."

"नाही रे असे नाही बोलू. घरी आईबाबा वाट बघत असतील. तुम्हा पोरांसाठी तर जगत असतात."

"घरी गेले की सारखी आईची कुरकुर सुरू होते. सारख्या कम्प्लेंटस् तुझ्या बायकोने हे केले, ते केले. माझं हे ऐकले नाही. हा सण नाही केला, ती पूजा बरोबर नाही केली.. तिला हे नाही करता येत, तिला ते नाही करता येत.. झोपूनच आहे, उठली नाही, मान नाही पान नाही.. तिच्या माहेरचे तिला आमच्या विरोधात भरवतात. उद्धटाप्रमाणे बोलते. मुलांना हेच नाही शिकवले, ते नाही.. तू तिचेच ऐकतो, तिच्या ताटा खालचे मांजर झालाय.. लिस्ट संपतच नाही हो." तो वैतागत बोलत होता.

"स्त्रियांचे ते काय सुरूच असते. दुर्लक्ष करायचे. वडील आहेत ना, त्यांच्याकडे बघ."

" त्यांचे पण सतत आपले काही ना काही सुरू असते. औषध, डॉक्टर, मग हा डॉक्टर बरोबर नाही, तुम्ही पैसे बघून कुठल्याही डॉक्टर कडे नेता.. कुठेही जायचं म्हणजे आताच जायचं, असेच पाहिजे, हीच परंपरा आहे, अशीच निभावयाची.. हट्टाला पेटले असतात. माझं कसे चुकतेय तेच बोलत असतात. बायकोचं ऐकतो म्हणून साधा डॉक्टर निवडतो, असे बोलतात. ती काहीच म्हणत नाही. त्यांना सांगून सांगून थकलो, पण ते ऐकतच नाही. चांगल्या चांगल्या स्पेशालिस्टकडे घेऊन जातो. आता वयामानाने औषधं पूर्वीसारखी एकदम कसे काम करणार? त्यात पथ्य असतात, ती पण पाळत नाहीत. त्यावरून बोललो तर आई बाबा दोघेही चिडतात, आता आमचं खाणे मोजतो काय? त्यात पै पाहुणे वेगळे. त्यांचे मनासारखे नाही झाले की चिडतात. काही बोलायला गेलो तर आम्ही नव्हतो करत का? हे सुनावत असतात. कुणी सन समारंभाला नाही गेले की तुम्हाला नातीगोती नको म्हणून खूप चिडतात. रागराग करतात." त्याच्या शब्दातून त्याच्या मनाची एक एक वेदना जाणवत होती.

"काका, असे आधीचे लाईफ आणि आताचे लाईफ कंपेर करून कसे चालेल? प्रत्येक काळाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य होते. काळ बदलतो, गोष्टी बदलतात. प्रत्येक पिढी जशीच्या तशी पुढे येत आहे का? जगा प्रमाणे काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही धरून पुढे जावे लागते. आधी जास्तीतजास्त नातेवाईक सगळे जवळ जवळ राहत, जायला यायला सोपी होते. आता सगळे किती दूर राहतात. आम्हाला त्या सुट्ट्या तरी कितिशा असतात? आमचा हा जॉब, सकाळी आठ वाजता निघतो तर रात्री ९-९.३० ला घरी पोहचतो. आधी तुम्ही लोकं साडे पाच सहाला घरी येत. मुलांना, घराला वेळ देऊ शकत होते. आमचं तसे पण नाही उरले आहे. सकाळी मुलं शाळेत जातात, घरी येतो तर झोपली असतात. कामाचं सतत टेन्शन असते. आता कंपिटीशन इतकी वाढली आहे की कधीही जॉब जायची सतत भीती असते. टार्गेट पूर्ण करायचे असतात. कधी कधी दोन तास जास्त थांबावे लागते."

"बायको आहे ना घरी? मग तिच्यासाठी जा लवकर." नारायणराव समजावत म्हणाले. त्यांना तो फार खचलेला दिसत होता.

"ती पण समजून घेईना हो. घरात पाय ठेवलं की आईवडिलांचे कंप्लेंट करणे सुरू होतात, बेडरूममध्ये गेले की ती सुरू होते. आईने असा टोमणा मारला, माझे आई वडील काढले, हे इथेच ठेवले, ते तसेच.. आईच्या पदराला बांधलेले कोकूला बाळ आहात. आईचेच ऐकतात, माझ्या मनाचे घरात काहीच करत नाहीत. मताप्रमाणे काही वागता येत नाही. कामात मदत करत नाहीत, केलेल्या कामात चुका काढतात. कौतूक तर नाहीच.. टोमणे अन् सल्लाच सतत.. दुसऱ्यांच्या सूना गोड वाटतात..खूप चिडचिड करते. प्रेमाने कधी जवळ आली, आठवत पण नाहीये. तिला खूप समजवतो, आपलेच आईवडील आहेत, म्हातारे आहेत, थोडं समजून घ्यायला हवे. ती म्हणते मलाच समजवतात, त्यांना काहीच बोलत नाही. आई मला घालूनपाडून बोलतात, तरी चूप बसले असतात म्हणते. दिवस ऑफिसच्या कटकटी आणि राजकारणात जातो तर रात्र यांच्या कटकटीमध्ये. शांततेने कधी झोपलो आठवत नाही. जगणं नकोस झालेय. पैशांचे इतके लोन काढून ठेवले आहे ना की मरता पण येत नाही की परिवार उघड्यावर पण सोडता येत नाही. डोक्यात सतत इतकं काही सुरू असते मग गाडी चालवताना हे असे घडते." तो कळवळीने सगळं सांगत होता.


क्रमशः

🎭 Series Post

View all