थोडं तिचंही कौतुक करा...भाग 5 अंतिम

Katha tichya jivnachi

थोडं तिचंही कौतुक करा भाग 5 अंतिम


‘कुणाचं चुकतंय? खरं तर माझंच चुकतंय.’ मीनलचे मनातल्या मनात विचार सुरू होते.


माझंच चुकतंय मी सकाळी उठून सगळ्यांसाठी सगळं करते.
माझंच चुकतंय मी सगळ्यांच्या आवडी निवडी जपून त्यांना ते ते करून देते.


माझंच सगळं चुकतंय मी स्वतःपेक्षा यांची काळजी जास्त करते, स्वतःचा विचार न करता यांच्यासाठी दिवसभर करत असते.


आणि एवढं करूनही दोन प्रेमाचे शब्द नाहीत की कौतुकाची थाप नाही. 


ते म्हणतात ना,


घटकेची फुरसत नाही 
कवळीची मिळकत नाही


दिवसभर राबत राहायचं आणि घरी येऊन काय नवरा हेच म्हणतो दिवसभर काय करत असतेस? दिवसभर मी घरी असले तरी घराचं सगळं काही काम करत असते, घराला घरपण देत असते हे त्याला कळत नाही. एक दिवस मी घरी नसेल तर तुमचं घर कसं अस्त्यव्यस्त होऊन जातं हे कोण सांगणार त्यांना.

खूप झालं, आता नाही... आता मी माझ्या अस्तित्वाला असा तडा जाऊ देणार नाही. स्वतःची ओळख अशी मिटू देणार नाही. मी माझी नवी ओळख निर्माण करून मी माझ जॉबही करेन. मीनलने स्वतःशी निर्णय केला, तिने ठरवलं घरचे काहीही बोलत असले तरी माझा निर्णय हा ठाम असणार आहे. तिने घरी सगळ्यांना तिचा निर्णय सांगितला.

तिच्या निर्णयावर.. तिच्या बोलण्यावर सासूबाई काही बोलणार तेवढ्यात मीनलच बोलली.

“आई थांबा तुम्ही काही बोलण्याच्या आत मी तुम्हाला मला काय बोलायचं ते सांगते. मी नोकरी करणार आहे हे मी तुम्हाला विचारत नाहीये तर सांगते आहे, मी तुम्हा लोकांना विचारायला आलेली नाही आहे तुम्हाला सांगायला आली उद्यापासून मी माझ्या जॉबला जाणार आहे आणि राहिला आता प्रश्न माझ्या मुलीचा तर तिला सांभाळण्याची तुम्हाला गरज नाही मी तिला पाळणाघरात ठेवेल. त्याच्यामुळे माझ्या मुलीची काळजी तुम्ही करू नका. मी माझं सगळं काम करून जाईल आणि आल्यानंतर माझं सगळं काम करेल.” असं म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली.

आज खूप दिवसानंतर तिला रिलॅक्स वाटत होतं. मन मोकळे झाल्यासारखं वाटत होतं. कुठेतरी पिंजऱ्यात डांबून ठेवल्यानंतर बाहेर पडताना जे फील येतं तसं तिला वाटत होतं.

तिने दीर्घ श्वास घेतला आणि आकाशातल्या चांदण्यांकडे बघत राहिली आणि एकदा निखळपणे हसली.

आज तिला खूप मोकळं वाटत होतं. स्वतःची तिने पाठ थोपटली,
‘मीनल यू आर ग्रेट, आज तू खूप चांगला निर्णय घेतलास. हे तुला आधी करायला हवं होतं.’

दुसऱ्या दिवशी सकाळी मीनल तिच्या मुलीला घेऊन तिच्या जॉबला  निघाली, मोकळा श्वास घ्यायला मुक्त संचार करायला आणि स्वतःसाठी जगायला निघाली होती.

समाप्त:

मीनल सारख्या अनेक स्त्रिया आपल्या समाजात वावरत असतात, कुणी घरकाम करणार असतं तर कुणी जॉब करणार असतं. पण काही ना काही सारख्या प्रमाणात सगळ्यांना ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. कुणाच्या घरी सुनेचे खूप कौतुक होतात तर कुणाच्या घरी कधी सुनेने कितीही काही चांगलं केलं तरी त्यांना काही चांगलं दिसत नसतं. का तर ती दुसऱ्या घरून आलेली मुलगी असते. सून ही तिचं माहेर सोडून, तिची माहेरची माणसं सोडून ती तुमच्या घरात येते, सासरी येते तिलाही थोडं समजून घ्या. तिला नवीन नवीन घरी ऍडजेस्ट व्हायला वेळ लागतो. सगळ्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. स्त्री घरकामात कधीच कामचुकारपणा करत नाही आणि करणारही नाही. फक्त तिला थोडं समजून घ्या, थोडं तिचंही कौतुक करा..


धन्यवाद

🎭 Series Post

View all