तहान 2

Marathi Story
तातडीने दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं की पॅरालिसिस चा झटका आहे तातडीने ऑपरेशन करावं लागेल, सत्तर हजार तयार ठेवा. सासू सुना धास्तावल्या. एवढे पैसे कुठून आणणार? हाताशी हजारहून जास्त रुपये जमत नव्हते, अंगावरचं सोनं देऊनही फारसे पैसे येणार नव्हते.

दोन्ही सासू सुनांनी नातेवाईकांकडे अक्षरशः भीक मागितली. सुनेच्या घरच्यांनी कशीबशी निम्म्या पैशांची व्यवस्था केली, बाकी पैसे नातेवाईक देत होते पण देत असताना परत कधी करणार हे विचारून भंडावून सोडत होते.

कसेबसे पैसे जमले आणि त्याचं ऑपरेशन झालं. मुळातच काहीही काम न करणारा मोहन आता जागेवरच बसून राहायचा. या सासू सुनांना मोलमजुरी करून वर त्याचंही लहान मुलासारखं आवरावे लागे.

मोहन पूर्णवेळ झोपून असायचा. तो आता खरंच एक भार बनला होता. त्याच्या मुलाची फरफट होत होती. एकीकडे वडील जागेवर आणि दुसरीकडे आई आणि आजी पूर्णवेळ कामाला. त्याचं बालपण पूर्णपणे हरवलं होतं.

या सगळ्या परिस्थितीत सुनेचे हाल सुमनताईंना बघवत नव्हते. त्यांनी तिला न कळू देता तिच्या आई वडिलांना सांगितलं,

"तुमच्या मुलीचे हाल तुम्हाला दिसतच आहेत, तुम्ही तिला घेऊन गेलात तरी चालेल..अश्या अपंग नवऱ्याचं आयुष्यभर करण्यापेक्षा तुमच्याकडे ती सुखात राहील.."

सुनेचे आईवडीलही गरीबच..त्यांना स्वतःच्या दोन वेळच्या अन्नाची पडली होती, त्यात आणखी मुलीचा भार पेलणं शक्यच नव्हतं.

"ताई, आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखी सासू आमच्या लेकीला मिळाली..पण आम्हाला तिला परत आणणं शक्य नाही. स्पष्टच सांगायचं तर आमच्यात एवढी ताकद नाही की तिला आम्ही पोसू. वर गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, लोकं म्हणतील की बघा नवरा आजारी पडला तर सोडलं त्याला लगेच..तिच्या पदरात एक लेकरू आहे, त्याला काय भविष्य राहील? तिला तिथेच राहुद्या...बाकी आम्ही इथून काय मदत करता येईल तेवढी करू.."

सुनेच्या माहेरहूनही कसला आधार सुनेला मिळणार नाही हे सुमनताईना लक्षात आलं, पण यातलं काहीही त्यांनी सुनेला सांगितलं नाही. कारण आपलेच आई वडील असं म्हणाले असं तिला कळलं तर ती पार कोसळून गेली असती.

वर्ष झालं, मोहन तसाच पडून होता. सुनेची वेगळीच चिडचिड सुमनताईंना दिसत होती. तरुण वय, त्यात नवरा असा पडून..तारुण्याला वाट द्यायला मार्गच उरला नव्हता. सुमनताई मौन पाळून सगळं बघत असायच्या.
*****

🎭 Series Post

View all