तहान 1

मराठी कथा
"तुझी सून घरी एकटीच आहे का मग?"

देवळात जमलेल्या बायका सुमनताईंना खोचकपणे विचारत होत्या. त्या बायकांचा रोख न कळण्याइतपत सुमनताई अडाणी नव्हत्या. बायकांना काय म्हणायचं आहे हे सुमनताईंना बरोबर समजायचं. त्या किरकोळ उत्तर देऊन त्यांचं तोंड गप करत.

5 वर्षांपूर्वी,

"मोहन कुठे गेलाय गं?"

"गेले असतील त्यांच्या मित्रांना घेऊन अड्ड्यावर.."

आईला सुनेची चिडचिड कळत होती, मुलगा कायम दारू प्यायला बाहेर पाळायचा. गावातच त्याने एक टपरी टाकली होती, पण तिथेही तो नसायचा. टपरी कायम बंद. टपरी बंद असल्याने तिथे फारसे ग्राहकही जमायचे नाहीत. सासू सुना मोलमजुरी करून घराला हातभार लावत.

मोहन घरी आला, अंगाला दारूचा वास सुटला होता. त्याचा 5 वर्षाचा मुलगाही नुकताच शाळेतून आलेला. सुमनताईंनी नातवाला खाऊ घालून पटकन बाहेर खेळायला पाठवलं आणि मोहनला बोलायला सुरुवात केली

"मोहन तुला आता शेवटचं सांगते..यापुढे जर तू परत मित्रांना घेऊन गेलास तर याद राख..अरे शरीराची पार वाट लावून टाकलीये.. तुला मुलगा आहे त्याची जबाबदारी कोण घेणार?"

मोहन गुंगीतच ते सगळं ऐकत होता,

त्याने पटकन ताट घेतलं, झिंगतच स्वतःला वाढून घेतलं. वाढताना अर्ध अन्न खाली सांडत होतं.. कसाबसा जेवला आणि लगेच झोपला.

त्याची बायको सगळं कोपऱ्यात बसून बघत अश्रू गाळत होती.
सुमन ताईंना तिचं फार वाईट वाटायचं. प्रत्येक बाईला आपला संसार सुखाचा असावा असं स्वप्न असतं, पण आपल्या मुलामुळे सुनेचा संसार पार कोलमडून चाललाय हे स्पष्ट दिसत होतं. पण आईचं मन, मुलाचीही दया यायची. लहानपण गरिबीत गेलं, त्यात वडिलांचा आधार नव्हता..मग काय करणार मुलगा? असं तिला सतत वाटायचं.

एके दिवशी असंच तो झिंगतच घरी आला. आल्यावर जेवून झोपला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो अंघोळीला जात असतांना जोरात आवाज आला. सुमनताई आणि त्यांची सून धावतच आले. मोहन जमिनीवर कोसळला होता, त्याचे हातपाय बधिर झाले होते.
******

🎭 Series Post

View all