घडा भर अक्कल

Story about wisdom

(फार फार वर्षापूर्वी बादशाह अकबराच्या राज्यात घडलेली ही गोष्ट ,ही काही खरी नाही पण गमतीदार नक्कीच आहे)













एकदा काय होतं! अकबर बादशहाच्या बेगम चा भाऊ त्याच्या बहिणीला म्हणतो "आपा शहंशाहच्या दरबारात आम्हाला तसं मानानं च वागवलं जातं पण, बिरबलाला सारखा आमचा अहोदा नाही. तुम्ही जर शहेनशहांना शब्द टाकला तर, ते आम्हाला दरबारात नक्कीच बिरबलाची जागा देतील". तसेही बेगम साहिबा अकबर बादशहाच्या तोंडून बिरबलाची वारंवार तारीफ ऐकून जरा चिडलेल्याच  होत्या, बादशहा रोज रात्री गप्पा मारताना बिरबलाच्या शहाणपणाचे आणि हुशारीचे एकेक किस्से त्यांना रंगवून , रंगवून सांगायचे आणि त्या मनातल्या मनात बिरबला वर आणि त्याच्या शहाणपणा वर  जळत ही होत्या, म्हणूनच भावाचीही आर्जव त्यांनी लगेच मनावर घेतली आणि रात्रीच शहेनशहांशी गुफ्तगू करून आपल्या भावाला बिरबलाची जागा देऊ केली.







        आपल्या बेगम च्या मनात काय आहे ?,हे चौकस अकबर बादशहाला नक्कीच ठाऊक होते, पण बेगम च्या भावाची बुद्धी किती सुमार आहे हे जणू साऱ्यांना कळावे म्हणूनच बादशहाने बेगम ची विनंती तात्काळ मान्य केली.



        लगेच दुसऱ्या दिवशी दरबारातून एक फतवा निघाला , आणि बिरबलाला दरबारात न येण्याचा हुकूम दिल्या गेला. आणि सोबतच बेगम च्या भावाला बिरबलाची दरबारातली जागा देण्यात आली.



        आता दरबारात रोज रोज नवनवीन किस्से घडत होते पण बिरबलाच्या गैरहजेरीमुळे बादशाह अस्वस्थ होते, त्यातच अकबर बादशहाच्या दरबारात आता बिरबल नसल्याचं ऐकल्यामुळे शेजारच्या राज्याच्या राज्याने अकबर बादशहा साठी एक लखोटा पाठवला , त्या लखोट्यात असे लिहिलेलं होतं की, "शहेनशहा अकबर आमच्या राज्यात मागल्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे अकलेचा महाभयंकर दुष्काळ पडलेला आहे तरी आपण आपल्या राज्यातली एक घडाभर अक्कल आमच्या राज्यात पाठवावी, जेणेकरून आम्ही तिची लागवड करून आमच्या राज्यातला अकलेचा दुष्काळ संपवू शकू".



       हा खलिता वाचल्या बरोबर अकबर बादशहाला अतिशय राग आला आणि मनातल्या मनात हसूही आलं,बादशहा हे जाणून होते की , दरबारातल्या बिरबलाची अनुपस्थिती आजूबाजूच्या राज्यांपर्यंत पोहोचली आहे, पण त्यांनी मनात ठरवलं की, बेगमच्या भावाचा अभिमान तोडण्यासाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. बादशहाने लगेच बेगमच्या भावाला निरोप धाडला आणि संबंधित लखोटा  हुजऱ्याला वाचून दाखवायला सांगितलं. लखोटयातले शब्द बेगमच्या भावाच्या कानात जोरजोराने आदळायला लागले. "घडाभर अक्कल" हेच शब्द त्याच्या डोक्यात फिरू लागले. "कुठून आणावी आताही घडाभर अक्कल?" बेगमच्या भावाने बादशहाकडून रात्रभराचा वेळ मागून घेतला आणि उद्या घडाभर अकलेची सोय करतो असे आश्वासन बादशहास दिले.



         दरबारातून बेगम चा भाऊ तडक आपल्या बहिणीकडे गेला आणि दरबारात घडलेली हकीकत तिला सांगून म्हणाला "आपा आता ही घडाभर अक्कल मी कुठून आणू ग"? शेजारच्या राजाची ही अशी विचित्र मागणी ऐकून क्षणभर बेगम ही भांबावली पण नंतर तिच्या लक्षात आलं की , दरबारात बिरबल नसल्यामुळे, बादशहाला कमी लेखण्यासाठी हा सारा खटाटोप केलेला आहे, याशिवाय आपण स्वतः आणि आपल्या भावाने कितीही प्रयत्न केला तरी आपण घडाभर अक्कल तयार करू शकत नाही म्हणुन मग तिने तिच्या भावालाच बिरबलाकडे जायला सांगितले.



            बेगम चा भाऊ ही बिरबलाकडे जायला तयार झाला कारण पेच असा विचित्र होता की त्याच्याजवळ बिरबलाकडे जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. रात्री गुपचूप बेगमचा भाऊ बिरबलाकडे आला, बिरबल नुकतेच जेवण करून अंगणात शतपावली करत होता, बेगमच्या भावाला आपल्या दारात पाहून बिरबल जरा चरकला ,पण सुरवातीचे आदर सत्काराचे नमस्कार झाल्यावर, बेगम चा भाऊ सकाळी दरबारात घडलेली लखोटया ची हकीकत बिरबलाला सांगू लागला , म्हणाला की, "माझ्याकडे खरंच घडाभर अक्कल नाही आहे, आणि आता बादशहाच्या ईभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला आहे ,आणि मी बादशहाला शब्द दिला आहे की ,उद्या सकाळ पर्यंत घडाभर अकलेची कुठून तरी तजवीज करतो" . बेगम च्या भावाची ती दीनवाणी अवस्था पाहून बिरबलाला एक क्षण मनातल्या मनात हसू आलं पण त्याने स्वतःच हसू आवरलं आणि बेगमच्या भावाला विश्वासात घेऊन सांगितलं की, "तुम्ही उद्या दरबारात बादशहांना सांगा की शहेनशहा तुम्ही आलेल्या घोडेस्वारा जवळ उत्तरादाखल एक पत्र द्या आणि त्यात असे लिहून पाठवा की , "अक्कल ही खूप मौल्यवान वस्तू आहे त्यामुळे , आम्ही आता तुमच्या इच्छेखातर तिची लागवड आमच्या राज्यात करत आहोत. बरोबर तीन महिन्यानंतर तुम्हाला हवी तेवढी अक्कल आम्ही तुमच्या पर्यंत पोचती करू, तोपर्यंत तुमच्या राज्यात असलेल्या अकलेच्या दुष्काळा प्रती आम्ही सद्भावना व्यक्त करण्या शिवाय काहीच करू शकत नाही" . आणि घोडेस्वार ते पत्र घेऊन त्याच्या राज्यात परत गेला.



      इकडे बिरबलाने त्याच्या अंगणात कोहळ्याच्या बिया लावल्या आणि रोज त्यांची देखभाल करू लागला बरोबर दोन महिन्यानंतर कोहळ्याला छोटे-छोटे कोहळे लागले, बिरबलाने लगेच आत या कोहळ्यांना छोटे-छोटे मातीचे घडे लावले, बिरबल रोज त्याला पाणी देत होता आणि बरोबर महिन्याभरानंतर ते सगळे कुहळे त्या घड्यांमध्ये फिट बसले, बिरबलाने बेगमच्या भावाकडे निरोप पाठवला कि, "घडाभर अक्कल तयार आहे". हा निरोप ऐकताच बेगमचा भाऊ तातडीने बिरबलाच्या घरी पोहोचला, पाहतो तर काय अंगणात सगळीकडे मातीचे घडे च घडे आणि त्या घड्यांमध्ये कोहळे लागलेले. बेगमच्या भावाने न राहवून विचारले ,"बिरबलजी हे काय आहे?" बिरबल उत्तरले "घडाभर अक्कल! आता तुम्ही एका बैलगाडीत हे सगळे घडे घेऊन जा आणि शेजारच्या राजासाठी एक पत्र लिहा, "आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि , आमच्या राज्यात आम्ही तुम्हाला पाहिजे असलेली घडाभर अक्कल तयार केली आहे .फक्त एक विनंती आहे की , ह्या घड्या मधली अक्कल काढून घेऊन आमचे घडे आम्हाला परत पाठवावे"



      बिरबलाचे हे चातुर्य बघून बेगमचा भाऊ तर आवाक झालाच, पण शेजारच्या राजाने ही बादशहा ची क्षमा मागितली आणि  म्हंटलं की, "ज्या राज्यात बीरबल सारखा चतुर व्यक्ती आहे तिथे अकलेची  कधीच कमतरता पडणार नाही"



              या प्रसंगानंतर बेगमच्या भावाने बिरबलाला त्याची जागा दरबारात परत दिली हे वेगळे सांगायलाच नको!







(सदर लिखान हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा)

🎭 Series Post

View all