Login

The Window

The Memories With Window

      दिवस उगवतो आणि मावळतो, घरातली स्त्री - मग ती गृहिणी असो किंवा नोकरदार, तिला घरातला कोपरा न् कोपरा परिचयाचा असतो. दिवाणखान्यातली टापटीप, सोफा ,लोड, गाद्या गिरद्या, झोपण्याच्या खोलीत ली व्यवस्था, पलंगावर स्वच्छ सुरकुत्या न पाडता टाकलेली चादर, उशांचे स्वच्छ अभ्रे, किंवा मग स्वयंपाक खोलीतली नीटस मांडणी, मिक्सर, फ्रिज, ओवन यांची सुकर सुलभ व्यवस्था, चकचकीत घासलेले पितळी दिवे तांब्याचं लखलखणारं ताम्हण, आणि तांब्याचा चकाकणारा कलश म्हणजेच देवघराचे पावित्र्य, खिडक्यांचे पडदे घरातले पायपोस या साऱ्यांचा च प्रत्येक गृहिणीला असतो भारीच सोस.

                      असं साऱ्या घरभर आपल्या असल्याच्या खाणाखुणा ठेवणारी "स्त्री", "ती"कुठे रमते? तिला आवडणारा, तिचा हक्काचा घरातला कोपरा कोणता? मला सहजच हा प्रश्न पडला, मग वाटलं फावल्या वेळेत टीव्ही बघताना तिच्या सोबत असणारा सोफा किंवा कुणाला वाटेल गृहिणीच ती, "स्वयंपाकात घरच" तिला जास्त भावत असेल, साऱ्या घराचं करता-करता ती स्वयंपाक घरातच समरस होते नाही, रांधा वाढा उष्टी काढा हे करताना आयुष्याचा एक मोठा काळ प्रत्येक गृहिणी स्वयंपाक घरातच घालवत असते, तर कुणाला वाटेल झोपण्याची खोली म्हणजेच "शयनकक्ष"तिला भावत असेल. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी, सहचरा सोबत चार क्षण निवांत जगण्यासाठी, आपल्या तान्हुल्याला अंगाईगीत म्हणण्यासाठी तिला "शयनकक्षच" आवडत असावा!

              पण ह्या सार्‍या घराच्या पसार्‍यात"खिडकी", किंवा "वातायन"आपण अगदी सहज विसरतो."वातायन-नावातच सारं काही आहे", खरं तर घर कितीही मोकळं किंवा मोठं असो अथवा लहान एक "खिडकी"प्रत्येक घराचं सौंदर्य नक्कीच वाढवते नाही?"

             परवा मी माझ्या लेकीला जरा रागानेच विचारलं-"अगं दोन दिवसांनी तुझा पेपर आहे ना?, आणि खिडकीत बसून काय करते आहे स ग?" "काही नाही आई झाडावर उडणारी फुलपाखरे बघते आहे" आणि मग मला एकदम जाणवलं की खरंच भाद्रपद महिन्यात किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला झाडांना काय बहर येतो नाही? अबोली, जास्वंद, कन्हेर, तगर, गोकर्ण, झेंडू, प्राजक्त किती फुले? किती रंगांची आणि गंधाची उधळण आणि सोबतच फुलपाखरांचा फुलांवर चा पाठशिवणीचा खेळ. क्षण दोन क्षण मी पण मग माझ्या बालपणात रमले.

                 लहानपणी मलाही "खिडकी"तून दिसणारी झाड, फुलं, फुलपाखरं बघायला खूप खूप आवडायचं! मुळात माझा हट्टच "खिडकी" साठी असायचा. त्याकरता मी माझं अभ्यासाचं टेबल खिडकी जवळ ठेवून घेतलं होतं. शाळेतही "खिडकी" जवळचा भाग मला खूप आवडायचा, मामाच्या गावाला जाताना एसटी तली "खिडकी"  मला पळणारी झाड, डोंगर, विजेचे खांब, निष्पर्ण जंगलाची नक्षी आणि काही काही दाखवत राहायचे, मीही मोठे- मोठे डोळे करून तो चलत चित्रपट बघत राहायची. मोठं झाल्यावर ऑफिसातली "खिडकीची"जागा दुसऱ्याला मिळाली म्हणून जरा हिरमुसली ही! पण पुढ्यातल्या संगणकात अनेक "खिडक्या" होत्या आणि "त्या"माझ्यासाठी नवी नवी दालनं उघडत होत्या.

                 सासरी जाताना ाबाजूला बसलेल्या नवर्‍याकडे बघायचं टाळून कारच्या "खिडकीतून" बाहेर बघत मी माझे अश्रू पुसत होती.

                  नव्याच्या नवलाईत माझा सखा आणि मी खूप भटकलो, तो गाडीत एफ. एम. वर छान छान गाणी लावली आणि मी गाडीच्या "खिडकीतून" दूर कुठे तरी निसर्ग सौंदर्य न्याहाळत राही! तसा शब्दसंवाद जरी कमी असला तरी आवडीनिवडी सारख्याच असल्याने माझा संसार यथावकाश बहरला आणि माझी "खिडकीची" आवड सहचरालाही समजून चुकली.

               संसारात रूळतांना , घरातला हक्काचा कोपरा शोधतांना माझ्या मदतीसाठी ही "खिडकीच" आली! घराच्या उबदार खिडकीत बसून मी लेखन केलं, संसारातल्या फुटकळ भांडणं साठी अश्रुही गाळले, पहिलटकरीण असताना माहेरच्या खिडकीतून झाडा -पाना- फुलांशी, फुलपाखरं आणि पक्ष्यांशी गप्पाही मारल्या.

                    माझ्या बाळाला न्हाऊ घातल्यावर सकाळची कोवळी उन्हे, चिऊ-काऊच्या गोष्टी, वरण भाताचा मऊ मऊ घास "खिडकीत"बसूनच खाऊ घातला.

           मनातलं मळभ दूर सारायला, एकांतात स्वतःशीच गप्पा मारताना, बालपणीच्या, शाळा- कॉलेजातल्या आठवणींना उजाळा देताना मी आणि खिडकी असं एक अनामिक नातंच तयार झालं.

               टाळेबंदी च्या काळात प्रत्यक्ष संपर्क बंद झाल्यावर, रस्त्यावरचा शुकशुकाट आणि शहरातली नीरव शांतता यांच्यासह मी अन् माझ्या लेकीनं "खिडकीतून" आकाशाचे नाना रंग पाहिले, आभाळाचे विविध आकार बघून आम्ही दोघी हरखून ही गेलो!

               मला तर वाटतं "खिडकी" म्हणजे एक जिवंत अनुभव देणारी खरी किंवा मैत्रीण असावी!

                  घरात हवा खेळती रहावी म्हणून भिंतीत बनवलेला एक नाजूक कोपरा पण, या छोट्याशा आणि हक्काच्या गवाक्षान स्त्रीचं अवघं विश्वच सामावलं आहे असं मला वाटतं. रस्त्यावर उघडणाऱ्या खिडकीतून येणाऱ्या-जाणाऱ्या कडे बघत, वाहनांचा आवाज ऐकत आपण या गवाक्षात कितीही काळ रमू शकतो! जणू एखादा जादूगार त्याच्या जादू कडे आपल्याला भान हरखून बघायला लावतो अगदी तसंच हो ना!




( सदर लेख हा मोबाईल मध्ये लिहिला असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व!)

🎭 Series Post

View all