(सदर कथा एक काल्पनिक कथा असून , या कथेतील पात्र , घटना प्रसंग यांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
आज रमा च लग्न आहे . गौरीहार पूजनात रमाचं मन अजिबात लागत नाहीये . हातावरची मेहंदी, डोई वरच्या मुंडावळ्या आणि अंगाला लागलेली ओली हळद या सगळ्यांना काहीच अर्थ उरला नव्हता, पण तरीही तिला हे लग्न करावंच लागणार होतं , कदाचित तीच नियतीची ही अपेक्षा असावी.
रमा एक सुंदर , चुणचुणीत, निर्भीड आणि लढावु वृत्तीची , हुशार मुलगी , तालुक्याच्या गावी जाऊन बीए करणारी, कॉलेजच्या युवा संघटनेची कार्यक्षम कार्यकर्ती , कॉलेजमधल्या पेपर फुटीचे प्रकरण असो अथवा आयकार्ड चा घोटाळा , रमा संघटनेच्या प्रत्येक कामात हिरहिरीने भाग घ्यायची. पण तिचे सौंदर्य आणि तिची धडाडी यांनीच तिचा घात केला होता...........
भर उन्हाळ्यातला मे महिना , सखा पाटलाच थोरला आपली फटफटी घेऊन धुराळा उडवत शेताच्या बांधावरून पायवाटेने निघाला होता. आधीच डोक्यावरचा इंधनाचा भारा , आणि त्यात मे महिन्यातच ऊन ,अन आता शिरप्यानं उडवलेला धुराळा ........पाय वाटेने जाणाऱ्या बायका आणखीनच कावल्या , पण त्या बिचाऱ्या तरी काय बोलणार ?
शिरप्या (श्रीपाद) - सुकळी गावच्या सखा पाटलाचा थोरला मुलगा....... एकदम गेलेली केस......... लहानपणीच आईचं छत्र हरवल्याने - सखा पाटलांनं मुलांना त्रास नको म्हणून दुसरे लग्नही केलं नाही - पण शिरप्या मिसरूड फुटायच्या आतच वाईट संगतीनं वाया गेला होता. अनेक वाईट व्यसन आणि सवयी त्याला लागल्या होत्या..... उडाणटप्पू, भंटोल आणि लफँडर, अशीच साऱ्या पंचक्रोशीत त्याची ख्याती होती............ तर सखा पाटील म्हणजे सुकळी गावचा जणू देवच ! एकदम भला माणूस !! अडल्या - नडल्याला मदत करणं हाच जणू पाटलाचा धर्म !!! पाच वर्षांपूर्वी जेव्हा सुकळी सकट अख्या पंचक्रोशीत दुष्काळ पडला , तेव्हा सखा पाटलांनं साऱ्या पंचक्रोशीतील माणसांसाठीच नाही , तर त्यांच्या गुराढोरांनं साठी ही आपलं धान्याचं कोठार खुलं केलं होतं. महामारी च्या काळातही पाटील अन् पाटलाचा धाकटा राम यांनी गावा करता आवश्यक ती सर्व आर्थिक आणि शारीरिक मदत केली होती.
सखा पाटलाच्या या सद् गुणांमुळेच गावाच्या निवाड्यात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा......
राम - सखा पाटलाचा धाकटा... नावाप्रमाणेच अतिशय सभ्य, शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व . तालुक्याच्या गावाहून कृषी शास्त्रातली पदवी गोल्ड मेडल सह पास करून आलेला..... आणि आता आपल्या गावाच्या शेतीतच अनेक आधुनिक, पर्यावरण स्नेही प्रयोग करणारा , प्रयोगशील, मेहनती शेतकरी.....
रमाच्या कानावर जरी सनईचे सूर पडत असले तरी तिला ते दिवस आजही स्पष्ट आठवत होते...... जेव्हा तीनं आणि गावातल्या इतर तरुण - तरुणींनी मिळून गावच्या सरपंचाचं चारा भ्रष्टाचाराचं प्रकरण गावासमोर आणलं होतं....... तेव्हापासूनच रमा - सरपंच आणि त्याच्या गाव गुंडांच्या हिटलिस्टवर होती आणि शिरप्या च्या रूपाने सरपंचाला तर आयतं कोलीतच मिळालं होतं.
शिरप्याला रमा खूप आवडायची , तिचे लांब काळे केस, मोठे मोठे बोलके डोळे, पाणीदार कांती, आणि तलवारीसारखे लांब नाक, तिला बघुन शिरप्या बेभान होई...... शिरप्याला रमा आवडते हे चांडाळ चौकडीनं हेरलं , आणि रमा तुझीच आहे असे खूळ शिरप्या च्या डोक्यात भरवलं.......
लेखिका राखी भावसार भांडेकर.
************************************************