Oct 21, 2020
स्पर्धा

दि टर्निंग पॉईंट भाग - ९

Read Later
दि टर्निंग पॉईंट भाग - ९

दि टर्निंग पॉईंट भाग-

आता पुढे ....

मल्हारला पुस्तके वाचण्याचा खूप शौक होता. त्याच्या घरात सामान कमी आणि पुस्तकंच जास्त होती.मल्हारंच एक स्वप्न होतं. माझी स्वतःची एक लायब्ररी असावी. तिथे वाचकांनी येऊन पुस्तके वाचावीत आणि त्यांना पुस्तके वाचतांना मस्त कडक कॉफी मिळावी. हे संजीवनीच्या लक्षात होतं. पुस्तक, कॉफी, लायब्ररी असे विचार संजीवनीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तिने विचार केला की येत्या दोन महिन्यात मल्हारचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला ती त्याला मस्त सरप्राईज देणार होती. 

तिच्या विचारांनी आता गती घेतली. तो जेव्हा ऑफिसला जायचा, तेव्हा मॅडम त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागायच्या. तिने अंबरच्या मदतीने एका मोक्याच्या ठिकाणी एक जागा बघीतली. त्या जागेसाठी तिने सुरुवातीला काही पैसे पण दिलेत.तिने त्या जागेचं इंटेरियर करायला घेतलं.  तीने स्वतः नीलाच्या मदतीने सगळं डिझाईन बनवलं आणि त्याप्रमाणे इंटेरिअरच काम सुरू केलं. 

दरम्यानच्या काळात तिचं आणि अंबरच नातंही फुलू लागलं होतं. जणू आई म्हणजे काय हे त्याला आत्ता कळायला लागलं होतं. आईवर अंबरंच इतकं प्रेम होतं की ती म्हणजे त्याची मैत्रीण आधी आणि मग नंतर आई होती. प्रत्येक गोष्ट तो आईसोबत शेअर करायचा. तिने नीलाचा विषय काढून त्यांच्या लग्नांच पण मनावर घेतलं होतं. तिने याबाबत मल्हार सोबत बोलून लवकरात लवकर अंबर आणि नीलाचे लग्न लावून द्यायचं ठरवलं. 

दोन महिन्यात लायब्ररीचं काम पण होतं आलं होतं. तिने घरातल्या सगळ्या पुस्तकांची मल्हारच्या नकळत यादी तयार केली.मल्हारकडे असलेली पुस्तके सोडून तिने अजून बरीच नवी पुस्तके मागवलीत. काही दुर्मिळ, पुरातन पुस्तके शोधून काढली. त्यात काही लहान मुलांसाठी, काही तरुण पिढीसाठी तर काही वार्धक्याकडे झुकलेल्या व्यक्तींसाठी होती.

लायब्ररीची सगळीच व्यवस्था खुप सुंदर बनवली होती. प्रत्येकाच्या सोयीचा विचार केलेला होता. ज्यांना एकट्याला वाचायंच असेल त्यांना बॉक्समध्ये बसून वाचता येईल. काही व्यवस्था अशी होती की ग्रुप डिस्कशन करता येतील. सगळ कसं अगदी सिस्टिमॅटिक होतं. सगळी पुस्तके रॅकमध्ये व्यवस्थित मांडुन ठेवलेली होती. त्यांची यादी कम्प्युटराइज केलेली होती. कोणतं पुस्तक कोणत्या रकान्यामध्ये, कोणत्या कप्प्यात आहे, हे बरोबर सांगता यायचं. 

जागा पाहण्यापासुन, ती अंतीम करणे आणि नंतर इंटेरिअर वैगेरे करेपर्यंत अंबरची खूप मदत झाली. मल्हारच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, मल्हार ऑफिसला गेल्यावर, संजीवनीने नीलाच्या मदतीने घरातील सगळी पुस्तके खोक्यांमध्ये पॅक केलीत आणि लायब्ररीत पाठवुन दिलीत. मल्हार घरी आला. पाहतो तर काय घरातील सगळी  पुस्तके गायब होती.

मल्हारः संजीवनी, अगं माझी सगळी पुस्तके कुठे गेली?

संजीवनीः (त्याची मजा घेत) अरे फिरायला गेलीत... तुला सांगितलं नाही का त्यांनी? 

मल्हारः संजू, काहीही काय बोलतेस गं? पुस्तके आणि फिरायला? 

त्याला आता राग यायला लागला होता. पुस्तके म्हणजे त्याचा जीव की प्राण होती... हे तिला माहित होतं. तिने अजून त्याची मजा घ्यायचं ठरवलं. 

संजीवनीः अरे मल्हार, इतकी जुनी पुस्तके घरात ठेवून काय करायचं? म्हणून मी घेतली आणि बॉक्समध्ये पॅक केली... आणि रद्दीच्या दुकानात नेऊन दिली... हे बघ, किती पैसे आले त्याचे!

आता त्याला भयंकर राग आला होता. पण तो काहीही न बोलता रूम मध्ये चालला गेला. जेवतांनाही गप्पच होता. संजीवनीला त्याची मनःस्थिती समजत होती. पण तिचा नाईलाज होता. तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं. रात्री जेवण करून सगळे रुम मध्ये गेले... पण हा गॅलरीत जाऊन बसला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तेव्हाच संजीवनी तिथे आली. त्याला असं रडतांना पाहून तिला वाईट वाटलं. ती त्याच्याजवळ गेली.  

संजीवनीः(त्याचं तोंड आपल्याकडे करून भरल्या डोळ्याने, कान पकडून) सॉरी मल्हार! तुला वाईट वाटलं का? अरे मला वाटलं, घरात अडचण नको. म्हणून रद्दीत दिले रे मी... उद्या जाऊन घेऊन येते. 

मल्हारः तू नको सॉरी म्हणू.. आय एम सॉरी! मी तुझ्यावर जास्तच चिडलो. सॉरी यार आणि नको जाऊस पुस्तकं  परत आणायला. असू दे... (तो नाराजीनेच बोलला)

संजीवनीः नक्की मल्हार? 

मल्हारः हो नक्की.. 

संजीवनीः बरं मल्हार,  ऐक न.. आज आपण थोडं लॉंग ड्राईव्हला जायचं का? 

मल्हारः नको. आज नको. पुन्हा जाऊ कधीतरी. 

संजीवनीः मल्हार, प्लीज चल ना.. लवकर येऊ आपण... प्लीज, प्लीज..  वाटलं तर मी गाडी चालवते...

तिच्या त्या निरागस चेहर्‍याकडे पाहुन त्याला राहवलं नाही. तिने गाडी काढली आणि ते निघाले. त्या आधीच अंबर आणि नीला लायब्ररीत गेले होते . त्यांनी जाऊन बर्थ डेची सगळी तयारी केली होती. मस्त सजावट केली होती. केक आणला होता. 

संजीवनीने गाडी चालवत थोडी दूरपर्यंत नेली आणि बरोबर ११.५५ ला लायब्ररी जवळ आणली. ती गाडीतुन उतरली आणि त्याच्या बाजुला जाऊन...

संजीवनीः उतर  मल्हार. 

मल्हारः इकडे कुठे आलो आहोत आपण? 

संजीवनीः अरे तू आधी बाहेर तर ये.. 

तसा तो बाहेर आला. तिने त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली.

मल्हारः सांग ना आपण कुठे जात आहोत? 

संजीवनीः दोन मिनिट थांब फक्त... चल माझा हात पकडून ठेव..

त्याला घेऊन ती आतमध्ये आली. लाइट्स बंद होते. जसे बारा वाजले, तसे तिने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पण अंधारामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात लाइट्स सुरु झाले. जसे लाईट सुरु झाले, तसे मल्हार सगळीकडे पहातच राहिला... त्याला सगळीकडे त्याची पुस्तके दिसत होती... अगदी आनंदाने तो सगळीकडे पळू लागला आणि पुस्तके हातात घेऊन छातीशी कवटाळू लागला. इतकी प्रिय होती त्याला पुस्तके.. तो तर आनंदाने वेडा झाला होता. त्याला एवढा आनंदी पाहून दोघांचेही डोळे भरून आले. मल्हार ने तिचे हात हातात घेतले आणि हाताला कीस करू लागला. तिचा हात हातात घेऊन तिला गोल गोल फिरवत नाचू लागला. 

संजीवनीः मग मल्हार, कसं वाटलं सरप्राईज? 

मल्हारः खूप खूप सुंदर! ही सगळी माझी पुस्तके आहेत ना? आणि काही नवीन पण दिसत आहेत. काही तर खूपच दुर्मिळ आहेत. थँक्यू! पण ही पुस्तके इथे कशी? 

संजीवनीः तू एकदा मला म्हणाला होतास ना, तुझं एक स्वप्न आहे. तुझी स्वतःची एक पुस्तकांची लायब्ररी असावी. तिथे बसून पुस्तके वाचता येतील आणि सोबतच कॉफी पण! म्हणून "पुस्तके कॉफी आणि बरंच काही" तुला वाढदिवसाचं गिफ्ट... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मल्हार...  आवडलं सगळं? 

मल्हारः हो गं... पण तुला हे अजुनही लक्षात होतं? किती जपतेस ग माझ्या स्वप्नांना! आज कितीतरी वर्षांनी मी माझ्या वाढदिवसाला केक पाहतो आहे. 

नीला आणि अंबर हे सगळं बघत असतात. बाबांना एवढा आनंदी बघून मल्हारला पण खूप आनंद होतो. तो मग केक घेऊन येतो. चौघेही केक कापतात आणि एकमेकांना भरवतात. 

नीला आणि अंबरः  बाबा हॅपी बर्थडे आणि असेच आनंदी राहा.. किती छान वाटतय आता सगळं...  काश मम्मा पण अशीच वागली असती.. 

मल्हार त्याला कुशीत घेतो.

संजीवनीः मल्हार आता आजपासून तुला ही लायब्ररी सांभाळायची आहे. नीला आणि अंबर ऑफिस सांभाळेल आणि मी कॉफी शॉप!

चौघे खुप खुश होतात आणि मग घरी येतात. 

संजीवनीः अंबर, जा झोप आता. खूप रात्र झाली आहे.

अंबरः हो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट... 

तिघेही झोपायला जातात. 

मल्हारः संजीवनी, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. थँक यु सो मच... इतक्या वर्षात, मी  सुद्धा या कामाच्या गराड्यात आणि फॅमिली मॅटरमध्ये माझा वाढदिवस विसरून गेलो होतो... पण तू आज पुन्हा माझा स्वप्न जिवंत केलंस, मला जिवंत केलंस.. खरंच, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुझं नाव खरंच सार्थ आहे... मल्हारला नवजीवन देणारी, मल्हारचे स्वप्न पुन्हा जिवंत करणारी, संजीवनी! थँक्यू.. थँक्स अ लॉट....

संजीवनीः तुला आवडलं ना! मग झालं तर.. (खाली मान घालुन)आणि सॉरी मी तुला रडवलं... आय एम सॉरी डियर... 

मल्हारः सोड गं... होत असं कधी-कधी... त्या रडण्यापेक्षा हा आनंद जास्त महत्वाचा होता... आणि तु चांगल्यासाठीच माझ्याशी असं वागलीस. आता सगळं विसरून जा.

दोघं परत एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. संध्याकाळी लायब्ररीमध्येच मल्हारच्या वाढदिवसाची पार्टी ठेवलेली असते. बऱ्यापैकी मोठी पार्टी असते. पार्टीला त्यांचे सगळे क्लायंट्स आलेले असतात. ऑफिस स्टाफ असतो. नीला आणि तिची फॅमिली पण आलेली असते. संजीवनी मल्हार आणि नीलाच्या आई बाबांसोबत बोलून एक अनाउन्समेंट करते.

संजीवनीः लेडीज अँड जेंटलमेन, आम्हाला आज, हा वाढदिवस तुमच्या सोबत साजरा करताना खूप आनंद होत आहे. याच आनंदाबरोबर अजून हा आनंद द्विगुणित करणारी, ही "पुस्तके कॉफी आणि बरंच काही" लायब्ररी सगळ्यांसाठी खुली करण्यात येत आहे. केव्हाही इथे या आणि पुस्तके वाचा... सोबत कॉफी एन्जॉय करा.( सगळे टाळ्या वाजवतात) आणखी एक गोष्ट.... आज आम्ही अंंबर आणि नीलाचं लग्न पक्क करतोय... येत्या काही दिवसात साखरपुडा करु.. त्याची तारिख तुम्हाला कळवुच. तर साखरपुड्याला आणि लग्नाला नक्की या... 

सगळे आणि नीला-अंबरला, मल्हारला शुभेच्छा देतात आणि पार्टीमध्ये मजा करून हा कार्यक्रम संपतो.


क्रमशः 

(पुढचा भाग हा अंतिम भाग असणार आहे. सगळे भाग वाचुन कृपया प्रतिक्रिया देत जा, जेणेकरून मला अजून दुसरं नवीन काही लिहायला मदत होईल)

Circle Image

Deepmala Bhaskarrao Salunkhe

Service

Trying to do everything that I have lapsed from my childhood...