Login

दि टर्निंग पॉईंट भाग - ६

Ya bhagat ambar aalya nantr sanjeevani ne tyala kass aapalass kell ani tyane pn tila kass accept kell he sangitall aahe. Tasech sanjeevani ani malhar ch lagn kass julaun aanalay te sangitall aahe. Aata baghuya sanjeevani malhar la navara mhnun kadhi

दि टर्निंग पॉईंट भाग-

आता पुढे.....

मल्हारने दरवाजा उघडला आणि समोर अंबरला पाहून त्याला खूप आनंद झाला. एकदम हळू आवाजात 

अंबरः  बाबा, आंटी कुठे आहेत? 

मल्हारः आत किचनमध्ये आहे. का रे?

अंबरः बरं.. काही नाही, असंच विचारलं..

मल्हारः बरं जा, लवकर फ्रेश होऊन ये.. आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत. 

अंबरः अरे बाबा, इतका वेळ का थांबलात? जेवून घ्यायचं होतं ना... 

मल्हारः लवकर फ्रेश होऊन ये. मग बोलू.

अंबरः बरं बाबा, हा गेलो आणि हा आलो.. 

अंबर फ्रेश व्हायला जातो. तेवढ्यात संजीवनी आवाज ऐकून हॉलमध्ये येते. 

संजीवनीः अरे अंबर आलाय नं.. कुठे आहे? दिसत नाही?

मल्हारः हो आलाय तो..  फ्रेश व्हायला गेलाय. येईल इतक्यात..

तेवढ्यात अंबर फ्रेश होऊन येतो. सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसतात. 

अंबरः बाबा, आंटी, तुम्ही का थांबलात इतका वेळ? जेवून घ्यायचं होतं ना. मी जेवलो असतो आल्यावर.. 

मल्हार संजीवनी दोघं एकमेकांकडे थोडं आश्चर्याने आणि नाराजीने बघतात. मग संजीवनी डोळ्यानेच असु दे सांगते. साधाच स्वयंपाक केलेला असतो.  वरण-भात-भाजी-पोळी, चटणी, कोशिंबीर आणि अंबरच्या आवडीचा बदामाचा शिरा! संजीवनी दोघांना मनापासून वाढते. वाटीत दिलेला गरमागरम बदामाचा शिरा पाहून..

अंबरः बाबा आज काय खास? बदामाचा शिरा? 

मल्हारः हो संजीवनीने बनवाय, खास तुझ्यासाठी. 

अंबरः आंटी, तुम्ही कशाला करत बसलात?  सीमा काकूंना सांगायचं होतं ना  (शिरा चमच्याने खात).

संजीवनीः असं कसं? माझ्या मुलाने काल एवढं मोठ्ठ डील फायनल केलं, तेही एकट्याने... सेलिब्रेशन तो बनता हैं ना.. म्हणून मीच माझ्या हाताने तुझ्यासाठी बदामाचा शिरा बनवलाय. खाऊन बघ कसा झाला आहे तर?

अंबर तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहतो. शिरा खाता खाता त्याच्या हातातून चमचा गळून पडतो, डोळे भरून येतात. त्या डोळ्यांमध्ये आईबद्दलचं खूप सारं प्रेम, विश्वास आणि आदर दिसत असतो. 

अंबरः (साश्रु नयनाने) काय म्हणालात तुम्ही? 

संजीवनीः अरे, माझ्या मुलाचे यश साजरे करायला नको का? म्हणून तुझा आवडता बदामाचा शिरा बनवलाय. 

अंबरः परत एकदा सांगा, तुमचा मुलगा? 

संजीवनीः हो हो, माझा मुलगा! माझा आणि मल्हारचा मुलगा... आज पासून तू माझा पण मुलगा आहेस.... पण मी तुला आई म्हणून चालेल ना? 

अंबरला आता अश्रू अनावर झाले आणि अश्रू त्याच्या डोळ्यातून बरसू लागले. तो तसाच उठला आणि संजीवनीच्या समोर जाऊन उभा राहिला. खरंतर सगळं अंधुक दिसत होतं. तरी तिच्या डोळ्यात एकटक बघत, 

अंबरः  खरंच, तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणालात?

संजीवनीः अरे खरंच.. थांब मीच तुला भरविते शिरा.

अंबरने संजीवनीला अडवलं आणि पटकन तिला मिठी मारली आणि मनसोक्त रडून घेतलं. तिनेही त्याला आईच्या मायेने जवळ घेतलं आणि त्याच्या केसातून मायेने हात फिरवत, पाठीवर थोपटत त्याला रडू दिलं. मग तो शांत झाला. तसं थोड्यावेळाने, 

अंबरः सॉरी, मी तुला ऑंटी म्हणालो. आज पासून तूच माझी आई.. आई.... 

आता दोघांनाही राहावलं नाही. परत दोघं एकमेकांना जवळ घेऊन रडू लागले. 

संजीवनीः तू खरंच मला आई म्हणालास? यापुढे मी तुझी आईच असेल आणि आजच किती रडायचं ते रडून घे. यानंतर कधीही आई नाही, म्हणून रडायचं नाही. आता मीच तुझी आई... परत एकदा म्हण न आई... 

अंबरः (तिला उचलून गोल गोल फिरवत) आई, आई, आई, Thank you so much...

संजीवनीः अरे हो हो! उतरव आता या म्हातारीला... नाहीतर मी चक्कर येऊन पडायची. 

अंबरः ए आई, म्हातारी काय ग? माझी आई तर अजून तरुण आहे. तरुणींना पण लाजवेल इतकी तरुण! 

अंबरः (मल्हार आणि संजीवनीला एकत्र घेऊन) आई-बाबा, मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. काहीही झालं तरी, हा तुमचा मुलगा नेहमी तुमच्या सोबत असेल. Love you आई... Love you बाबा.. 

संजीवनीः बरं आधी जेवून घ्या, सगळं थंड होत आहे. 

अंबरः आई आपण ताईला पण कॉल करू न.. 

संजीवनीः आधी निवांत जेवा बघु.. मग बोलू तिच्याशी. ती पण आता ऑफिसमध्ये असेल, अर्जंट मीटिंग वगैरे असतील. रात्री निवांत बोलू.

संजीवनी दोघांना आग्रह करून करून जेवू घालते. आज पहिल्यांदा त्यांना असं कोणी एवढ्या आग्रहाने आणि प्रेमाने वाढत असतं. त्यामुळे त्यांना सारखं भरून येतं. मजा-मस्ती गप्पा करत तिघेही जेवतात. जेवण करून मल्हार आणि अंबर थोडा आराम करायला जातात. संजीवनी डायनिंग टेबलवरंच आवरत किचनमध्ये जाते. तसा मल्हार अंबरच्या रुममध्ये जातो. 

मल्हारः अंबर, (त्याच्या डोळ्यात पाणी असतं) Thank you अंबर.. तू संजीवनीला आई म्हणून स्वीकारलं. मला तर भीती होती की, तुम्ही दोघं एकमेकांना स्वीकारता की नाही याची.. पण तुम्ही दोघांनीही एकमेकांना एवढ्या लवकर स्वीकारलं, की मी खूप खूप आनंदी आहे. खूप खुश आहे..

अंबरः अहो बाबा, याचं सगळं श्रेय आईला जातं. तिने सुरुवातच अशी केली की, मी स्वतःला रोखू शकलो नाही. मला आईची माया माहीतच नव्हती. मला पण आईचं प्रेम हवं होतं. लहानपणापासून बघायचो, शाळेत जातांना, बऱ्याच मुलांची आई त्यांना शाळेत सोडायला, कधी घ्यायला यायची. पण माझी आई कधीच शाळेमध्ये आली नाही. लहान मुलं त्यांच्या आईसोबत गार्डन मध्ये खेळायला यायची. मात्र माझ्यासोबत आली तर आजी नाहीतर मग कधी कधी तुम्ही यायचे. मम्मा कधीच नसायची. मला कधी काही लागलं, मी कधी रडत असलो, तरी मम्माने कधीच माझ्याकडे लक्ष दिले नाही, ना कधी मला प्रेमाने जवळ घेतलं. कधी माझ्यासाठी काही करून खाऊ घातल्याच मला आठवत नाही. मला वाटायचं, आईच प्रेम नाहीच माझ्या आयुष्यात. खूप वाटायचं, मम्मासोबत फिरायला जावं. तिने मला प्रेमाने भरवावं.. प्रेमाने जवळ घ्यावं.. पण हे असं कधी झालंच नाही.. पण ही आई आली आणि एका तासातच मला स्वीकारलं पण आणि प्रेमाने जवळ घेऊन माझ्या आवडीचं करून खाऊ पण घातलं. हे सगळं तिला सांगावं  पण नाही लागलं. खूप छान आहे ही आई, माझी आई... 

मल्हार हे सगळं बघून खूप खुश झाला. खूप समाधानी वाटंत होता तो. संजीवनीच्या येण्याने सगळंच अगदी छान वाटायला लागलं होतं. आणि रुममध्ये जाता जाता हे सगळं संजीवनी ऐकत असते. अंबर बरोबर आजपर्यंत जे झालं ते ऐकून तिला खुप वाईट वाटंल. या नंतर अंबरला कधीच अंतर द्यायचे नाही, त्याला खुप प्रेम द्यायचे, असं मनात ठरवून तीही तिच्या रुममध्ये गेली. मल्हार पण रुममध्ये जायला निघाला होता, तेवढयात अंबरने त्याला आवाज दिला,

अंबरः बाबा, मग कुठे जाताय हनीमुनला? कधी निघताय?

मल्हारः (जरा लाजंत पण थोडं नाराजीने) बघु, अजुन काही दिवस तरी नाही.. संजीवनीने अजुन आमचं नातं पूर्णपणे स्वीकारलं नाहीय.. बघु पुढे.

अंबरः ओह! हे सगळं अचानक झालं.. तिला थोडा वेळ लागलेच..

पण मल्हारला काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या आयुष्यात आता ती आहे, हेच त्याच्यासाठी महत्वाचं होतं. संध्याकाळी तिघेही चहा पीत गप्पा मारत असतात. आज संजीवनीने दोघांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. तिघेही हसत-खेळत जेवले आणि त्यांच्या आवडत्या गॅलरीत येऊन गप्पा मारत बसले.

अंबर संजीवनीच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत पडला होता. संजीवनीच्या बाजूलाच मल्हार पण बसला होता. तेवढ्यात अन्वीचा अंबरला व्हिडिओ कॉल आला. त्याने व्हिडिओ कॉल रिसीव केला, तसं 

अन्वीः OMG...Hello Love birds आणि आई हे गं काय , बापरे! अंबर तुझ्या मांडीवर डोकं ठेवून निवांत पडला आहे आणि तु मला एकटीला सोडून तिकडे मुंबईला गेलीस.(आणि रडायचं नाटक करू लागली) 

अंबरः ए अन्वी दी, ही तुझीच नाहीतर माझी पण आई आहे. आणि मी माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो आहे. तू पण ये, तुला झोपायचं असेल तर! (अजूनच आईला चिकटत आणि अन्वीला चिडवत)

अन्वीः हो बाबा, आता ती तुझी आई.. आम्हाला कोण विचारणार आता? आम्ही पोरके झालो... 

संजीवनीः अगं अन्वी , तू पण माझी मुलगी आहेस. तू पण ये इकडे. आपण मज्जा करू, बोल कधी येतेस?

अन्वीः  हो गं,  माहित आहे मला.. गंमत करत होते मी!  खूप खूप छान वाटत आहे, तुम्हाला एकत्र पाहून..  मी पण तिथे असायला हवी होती. पप्पा गेले तेव्हापासून आपण दोघी एकट्याच होतो ना गं..

मल्हारः अन्वी, बेटा मी तुझा पप्पा तर नाही होऊ शकत. पण स्वतःला कधीच एकटी समजू नकोस...हा तुझा बाबा नेहमी तुझ्या सोबत असेल. मी येऊ का तुला घ्यायला? 

अन्वीः  नको बाबा.. सॉरी, तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल ना? 

मल्हारः हो रे बेटा! मला बाबाच म्हण... मग कधी येतेस इकडे? 

अन्वीः येईल लवकरच... बरं कसं वाटलं आमचं सरप्राईज?

संजीवनी मल्हार: हो रे बाळांनो, आम्हाला तुमचं सरप्राईज खूप आवडलं. Thank you so much!  मुलांनो, पण हे एवढं सगळं तुमच्या डोक्यात कसं काय आलं? 

अन्वीः  आई माझं लग्न झालं तसं सगळा बिझनेस आमच्यावर सोपवून तु मोकळी झालीस आणि ते एकटेपण मला स्पष्टपणे दिसायचं. तुझ्या चेहऱ्यावर, वागण्यातून जाणवायचं. मी पण बिझनेस, नवा नवा संसार आणि घर या सगळ्यांचा ताळमेळ साधण्यात व्यस्त झाल्यामुळे, तुला वेळ देऊ शकत नव्हती आणि नंतर अजून कामं वाढली असती, मग तू काय केलं असतं? मी यावर उपाय शोधत होते. पण, तुझं मन रमेल, असं मला काही दिसत नव्हतं.

अंबरः  आणि बाबा तुम्ही पण मम्मा होती तोपर्यंत तिचं रागवणं, अपमान सहन करण्यातच तुमचा घरचा वेळ जायचा आणि ऑफिस होतंच. पण ती गेल्यानंतर ते पण नव्हतं. मी बिझनेस सांभाळायला लागलो तर तुमचं पण तसंच.. एकटं राहणं, शुन्यात नजर लावुन बसणे, कोणाशी जास्त बोलणार नाही, कोणामध्ये मिसळणार नाही. ऑफीसमध्ये असायचे, तेवढा वेळ तुम्ही खुश असायचे. पण नंतर रात्र रात्र जागत बसायचे. तुम्हाला नैराश्य येत चाललं होतं. 

अन्वीः  बाबा, पप्पा गेल्यानंतर तुम्ही आमचा आधार बनलात, आम्हाला बिझनेस सांभाळायला मदत केली. तसेही आपण फॅमिली फ्रेंड होतोच. मला खूप वाटायचं, माझे पप्पा असते, तर तेही असेच माझ्या सोबत राहिले असते.

अंबरः  आई, मम्मा गेल्यानंतर बाबांना मी असा एकटा पाहू शकत नव्हतो. मग एकदा असाच विचार करता करता माझ्या डोक्यात विचार आला, बाबा इकडे एकटे, तिकडे तुपण एकटी.. तुम्हा दोघांचीही सारखीच परिस्थिती! दोघेही एकटे... पण हे दोघं एकत्र आले तर? मला आई मिळेल आणि अन्वि दीला बाबा.. मग मी तिच्यासोबत विचार विनिमय केला. तिला पण हा विचार खूप आवडला. पण एक अडचण होती. काहीही झालं तरी आम्ही पडलो लहान. आमचा विचार तुम्हाला पटला नाही तर? म्हणून मग आम्ही आभा मावशीला हे सांगितलं. 

तेवढ्यात अन्वीने आभाला पण कॉन्फरन्स मध्ये घेतलं होतं. मग ती पण बोलू लागली. 

आभाः  जेव्हा मुलांनी हे सर्व मला सांगितलं, तेव्हा या मुलांनी त्यांच्या आई बाबांचा एवढा विचार केला, हे पाहून मलाही खूप आनंद झाला. आपण तिघे खूप जीवलग मित्र होतो आणि आता जर तुम्हा दोघांचं लग्न लावून दिलं तर त्यांना पण आनंद होईल. (आभाने मनातच विचार केला की माझं आणि मल्हारंच लग्न नाही होऊ शकलं, पण आता माझ्या जीवलग मैत्रिणी बरोबर होतंय तर मला त्याची काळजीच नाही वाटणार, हा विचार माझ्या डोक्यात का नाही आला इतके दिवस).. मग आम्ही तिघांनी मिळुन हा निर्णय अंतिम केला आणि तुमची लग्नासाठी नोंदणी केली.

अन्वीः आता तुम्हाला लग्नाला तयार करायचं, खूप मोठ्ठं काम होतं. 

अंबरः आम्ही हळूहळू तुम्हाला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि तुम्ही दोघं एकत्र आले तर कसं तुमचं उर्वरित आयुष्य सुखात जाईल, याची जाणीव करून दिली. तिकडे अन्वी दी आईच्या मनाची तयारी करत होती आणि इकडे मी बाबांच्या.. आणि शेवटी दोघेही तयार झालात. पण हे सगळं स्वीकारायला तुम्हाला दोघांना वेळ लागणारच... हे आम्ही गृहीधरलं होतं. आम्ही पण मग मनाची तयारी केली.. सगळ्यांना त्या त्या नात्याला वेळ द्यावा लागणार होताच. 

अंबरः पण आज अगदी एका दिवसात सगळ्यांनी सगळी नाती स्वीकारलेली आहे, हे पाहून आम्ही खूप खूप खुश आहोत. 

अन्वीः हो रे.. आई बाबा, खरंच आम्ही खूप खुश आहोत. आणि सॉरी आम्ही तुमच्या लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही. खूप इच्छा होती तिकडे यायची, पण जमलंच नाही.

मल्हारः हो रे बाळांनो, आम्ही पण खुप खुष आहोत. Thank you पिल्लांनो...

हे सगळं ऐकून संजीवनी मल्हार कडे अपराधीपणाने बघत असते. कारण सगळ्यांनी जरी हे नातं स्वीकारलं असलं तरी अजून संजीवनीने मल्हारशी असलेलं बायकोचं नातं अजून स्वीकारलेलं नसतं..  तीच्या मनात अजूनही खंत असते. पण मल्हार तिच्याकडे पाहून तिला आश्वासित करतो. डोळ्यांनीच इशारे करत, तू तुझा पूर्ण वेळ घे, असं म्हणत असतो. त्यामुळे संजीवनीच्या मनात मल्हार बद्दलचा आदर अजूनच वाढलेला असतो.

क्रमशः

🎭 Series Post

View all