Oct 29, 2020
स्पर्धा

दि टर्निंग पॉईंट भाग- ३

Read Later
दि टर्निंग पॉईंट भाग- ३

दि टर्निंग पॉईंट भाग-3

आता पुढे.....

संजीवनी: मी तुला रोज फोन करायची. आभाने मला तुझी काळजी घ्यायला सांगितली होती. ती गोष्ट मी इतकी मनाला लावून घेतली होती की, तु आता कोणत्या परिस्थितीमध्ये असशील, हे मी समजु करू शकत होती.

मल्हारः हो गं! आपण रोज एक-एक तास बोलत बसायचो... तुझं नेहमी तेच ते सांगणं असायचं... तेही रोज वेगवेगळ्या पद्धतीने! (हे बोलताना  आजही त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं). जसं मुलाला भाजी आवडत नाही तर, आई कशी वेगवेगळ्या पदार्थात टाकून खाऊ घालतेच, अगदी तसंच! मला सगळं समजत होतं गं...पण मन ते स्वीकारायला तयार नव्हतं... ते म्हणतात ना, कळतं पण वळत नाही.. तसं तुझ्याशी बोलायचो त्यानंतरचा बराच वेळ मी ठीक असायचो...  पण मग नंतर दारू पीत बसायचो... सिगारेटची पाकीटच्या पाकिटं संपायची... जेणेकरुन तिला विसरायला होईल, पण तरीही विसरता येत नव्हतं... खूप प्रयत्न केले मी तिला विचारायचे, पण नाही शक्य व्हायचं..

संजीवनीः  मी तुला एक-दोनदा भेटायला पण आले होते मुंबईला.. त्यादिवशी आपण सकाळपासून तुझ्या फ्लॅटच्या गॅलरीत बसून संध्याकाळपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. जेवणाची पण शुद्ध नव्हती आपल्याला! खूप छान दिवस गेला तो... आजही जसाच्या तसा आठवतो... (दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं)

मल्हारः हो गं... मग शेवटी न राहवून राहुल नेच आपल्यासाठी मेस मधून डबे आणले होते. मग आपण तिघे एकत्र जेवलो होतो... त्यानंतर मी तुला स्टॅंडवर सोडलं... तुझी बस लागली होती. तु बसमध्ये जाऊन बसली. तरी आपल्या गप्पा सुरुच होत्या. बस निघायची वेळ झाली, पण माझा पायच निघत नव्हता. मग जशी तुझी बस निघाली,  तसं मी पण माझ्या धन्नोसोबत तुझ्या बसच्या मागे मागे आलो होतो... किती विचित्र वागलो होतो ना... (स्वतः हसायला लागला). पण त्या दिवसापासून मी हळूहळू आभाच्या धक्क्यातून सावरायला लागलो होतो. शेवटी किती दिवस तेच तेच उगाळत बसणार. आभा तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली होती. मग मी पण पुढे जायचं ठरवलं... 

संजीवनीः मी मुंबईला येऊन गेल्यावर मग तू आला होतास माझ्याकडे... मग आपण दिवसभर फिरलो, खूप मज्जा केली आपण... त्या एका दिवसात आपण कित्ती ठिकाणं पाहिली... किती भरभरून जगलो... तेव्हा कुठे तू जरा नॉर्मल वाटायला लागला होतास.. तसं आपलं फोनवर बोलणं चालू होतं आणि नकळतपणे तुला डोस देणेपण... अजाणतेपणी, मी तुझ्यात गुंतत चालले होते आणि अशातच माझ्या घरी पण माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला  होता... आणि एका स्थळाने होकार दिला. जसं तुला हे सांगितलं, तसं तू परत कोलमडलास... पण यावेळी तु जरा लवकर सावरलास... सद्य परिस्थिती स्वीकारायला तुला कमी वेळ लागला... 

मल्हारः हो खरं आहे गं... पण मी तुझ्यात अडकत चाललो होतो, असं मला पण तेव्हा जाणवलं होतं... पण माझ्यापेक्षा चांगला मुलगा तुला सांगून आला होता. शेवटी तू सुखात असणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. जसा तुझा साखरपुडा झाला, तसं मी स्वतःला समजवायला सुरुवात केली होती की मला आता एकट्याने जगायचं आहे. कोण आणि किती दिवस आपल्यासाठी थांबणार आहे... मलापण आयुष्य आहे, जे माझं मलाच जगायचं आहे, कोणी सोबत असो किंवा नसो...  मला जगावं लागणारच होतं.. 

संजीवनीः हो खरं आहे..  माझा साखरपुडा झाला आणि मी त्या दिवसापासून देवेनला माझा पती मानलं होतं.  त्याच्याबरोबरच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. आमच्या लग्नाची तारीख पण पक्की झाली होती. आणि लग्नाला काही दिवस राहिले असतानांच तो लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असतानाच वाटेतच त्याचा अपघात  झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. ते ऐकून आम्हाला जबरदस्त धक्का बसला होता, मी तर पुरती कोलमडली होती.. खूप विचार करत बसायची.... रात्र रात्र रडत बसायची... माझी अशी काय चूक झाली होती की माझ्या नशिबात अशी वेळ आली... मी तर कधीच कोणाचं वाईट चिंतलं नव्हतं, तरी माझ्या नशिबात हे असं का? असा विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. सगळे नातेवाईक, माझ्या व बाबांच्या ऑफिसचे लोक, घरच्या आजूबाजूचे लोक सगळ्यांना माहीत झालं होतं..  अशातच देवेनला अपघात झाला आणि त्यात  त्याला त्याचे प्राण गमवावे लागले आणि त्याचे खापर पण माझ्याच डोक्यावर फोडलं गेलं.  देवेनच्या घरचे तर मला पांढऱ्या पायाची म्हणून बोलू लागले. आणि अर्थातच हे लग्न मोडल्याचा ठपका माझ्या डोक्यावर बसला होता... यात माझी काय चूक होती, पण मला भोगावं लागत होतं... का देव माझ्या आयुष्याशी खेळला? का? का मल्हार का?

असं बोलून ती आजही रडायला लागली. तसं त्याने तिला आपल्याकडे ओढलं. आपल्या कुशीत घेऊन डोक्यावर थोपटू लागला, पण तरीही ती शांत व्हायला तयार नव्हती.. जणू तो प्रसंग आताच घडला आहे, असं वाटत होतं... शेवटी त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि पाठीवर थोपटू लागला... त्याने तिला नीट बसवलं आणि पाणी प्यायला दिलं.. पाणी पिल्यावर तिला थोडं बरं वाटलं, ती थोडी शांत झाली..  पण आजही तो प्रश्न अनुत्तरित होता, का खेळला तो तिच्या आयुष्याशी?

मल्हारः तुझी तेव्हाची अवस्था पाहून मीच हतबल झालो होतो गं.. 

संजीवनीः हो आठवतं मला.... मग घरी पण सगळे दुःखात होते. साखरपुडा झाल्यावर मुलीचं लग्न मोडलं, आता कोण लग्न करणार हिच्याशी, अशीच परिस्थिती होती. मी खूप सैरभैर झाली होती, मला काहीच मार्ग दिसत नव्हता. आणि अशातच विचार करता करता  माझ्या डोळ्यासमोर  एकदम तुझा चेहरा आला. मग मी तुला विचारलं, की माझ्याशी लग्न करशील का?

मल्हारः  हो, तु मला विचारलं होतं, माझ्याशी लग्न करशील का म्हणून. त्या दिवशी मी खूप विचार केला आणि परत एकदा मनावर दगड ठेवून तुला नाही बोललो. 

संजीवनीः का, का मल्हार का? मी इतकी वाईट होती का? अनोळखी लोकांचं जाऊ दे रे, पण तू तर माझ्या इतक्या जवळ होतास, मला इतकं ओळखत होतास. माझी प्रत्येक गोष्ट मी तुझ्यासोबत शेअर करत होती. मग का तू मला नाही म्हणालास? का मल्हार का?

 ती परत रडायला लागली. त्याने परत तिला शांत केले.
 
मल्हारः (विचार करून) संजू, मी तेव्हा तुला सांगितलं की माझे घरचे जातीबाहेर लग्न असल्यामुळे नाही बोलत आहेत, पण खरी गोष्ट ही नव्हती. 

तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं, अपराधीपणाची भावना त्याच्या डोळ्यात होती. एक मोठा श्वास घेऊन तो...

मल्हार: संजू, मी ही गोष्ट घरी सांगितलीच नव्हती. मला माफ कर गं... मी तुझा अपराधी आहे... पण खरी गोष्ट सांगू का? तुला कदाचित आजही राग येईल, पण शेवटी खरं ते खरंच असतं... 

संजीवनी: बोल ना मल्हार! खरंच सांग मला. का नकार दिलास तू मला त्यावेळी? 

मल्हार: संजीवनी माझं आभावर प्रेम होतं आणि मी तिच्याशी लग्न करू शकलो नाही... मी तिचा अपराधी होतो...  खूप अपराधीपणाची भावना होती माझ्या मनात.. त्यामुळे जर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, तर ही गोष्ट आभाला माहीत झाली असती आणि तेव्हा तिला वाईट वाटलं असतं...तीला वाटलं असतं की आपण त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याने माझ्याशी लग्न न करता माझ्याच मैत्रिणीशी लग्न केलं... असं मला वाटलं, म्हणून मी तुला नकार दिला होता.

संजीवनीः  मल्हार, हे कारण होतं तुझ्या नकारामागे? अरे, मग हे असं स्पष्ट का नाही सांगितलं तेव्हाच? मला वाटत होतं की मी तुझ्या लायकच नाही... तुला मी आवडत नाही... आणि काय काय विचार केले होते मी... तू हे तेव्हाच सांगायला सांगायला हवं होतं रे... आपण बोललो असतो तिच्याशी... उलट तिला आनंदच झाला असता की माझ्याशी याचं लग्न होऊ शकलं नाही, पण माझ्या मैत्रिणीशी होतंय... आता त्याला सांभाळायला माझी हक्काची मैत्रीण आहे... तुझी परिस्थिती तिला माहित होती... आणि आपण तिची परवानगी घेऊनच लग्न केलं असतं... मला खात्री आहे, ती नाही बोलली नसती. उलट तीचं प्रेम तिच्याच मैत्रिणीकडे राहीलं असतं... दोघांनाही ती भेटू शकली असती... का रे, का नाही सांगितलं तेव्हाच स्पष्ट आणि खरं? का?

मल्हारः खरंच गं, मी हे खरं सांगतोय... खरंच चुकलं माझं... मी खरं सांगायला हवं होतं... मला माफ कर... सॉरी संजू... प्लीज, प्लीज, मला माफ कर... 

तो तिचा हात हातात धरुन गुडघ्यांवर बसला आणि तिच्या गुडघ्यांवर डोके ठेवून रडू लागला... तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला...  त्याने फोन काढला आणि पाहु लागला... त्यावर नाव दिसतं होतं, Aabha calling....

क्रमशः

Circle Image

Deepmala Bhaskarrao Salunkhe

Service

Trying to do everything that I have lapsed from my childhood...