(माझा कथा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा होत असेल तर कृपया मला समजून घ्या. माझ्या झालेल्या चुका मला दाखवल्या, तर मला जास्तच आनंद वाटेल. मी लिहित असलेली ही कथा वाचुन कमेंट करा. कथा कशी वाटली ते सांगा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि मी अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करेन...
तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत....)
आता पुढे....
ती फ्रेश व्हायला गेली. तेवढ्यात तोही तिच्यामागे बेडरुममध्ये आला.... ती आरशात पाहून तिच्या कानातले काढत होती... तोही तिच्यामागे जाऊन उभा राहीला... तो तिच्या डोळ्यांत पाहु लागला ... जसं तीचं त्याच्याकडे लक्ष गेलं, त्याच्या डोळ्यांत तिला तिच्याबद्दलंच प्रेम ओथंबुन वाहतांना दिसत होतं.... ती त्याच्या डोळ्यांत एवढी हरवुन गेली की तिला वाटत होतं आपण त्याच्या डोळ्यांच्या प्रेमसागरात स्वच्छंदपणे विहार करत आहोत... त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिचा हात धरला.... आणि स्वतः तिच्या कानातले काढू लागला.... तिला हे अनपेक्षित होतं... पण जसं तिने त्याच्या डोळ्यात बघितलं, तसं ती त्याच्या डोळ्यांत स्वतःला हरवून बसली... त्याने तिच्या डोळ्यांत बघतच, अलगद तिच्या कानातले काढले.... हात हातात घेऊन तिच्या हातातले ब्रेसलेट काढले... त्याने तिचे टचअप केलेले केस मोकळे केले... तरी ती अजूनही त्याच्या डोळ्यातच हरवलेली होती... तिला असं हरवलेलं पाहुन तो गालातल्या गालात हसत होता... त्याने तिच्या कपाळावर आलेल्या तिच्या केसांच्या दोन बटा मागे केल्या.... थोडं समोर होऊन त्याने तिचा चेहरा हातात घेतला... आणि अलगद तिच्या कपाळावर किस केलं... तशी ती अचानक भानावर आली आणि मागे जात त्याच्यापासून दूर झाली... द्विधा मनस्थितीत होती ती! ती पळतच गॅलरीत आली...
त्याचा मुंबईत 22 व्या मजल्यावर आलिशान फ्लॅट होता... सर्व सोयींनी युक्त असा... हॉलला लागूनच गॅलरी होती. गॅलरी बऱ्यापैकी मोठी होती.... ओपन असल्यामुळे अगदी दूर पर्यंतची मुंबई दिसायची... मोकळं आकाश दिसायचं... आधीपासूनच तो निसर्गप्रेमी असल्यामुळे त्याने गॅलरी विविध झाडांनी, फुलांनी सजवलेली होती.. वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची रोपटी होती... निशिगंध होता... मोगरा होता... जाई जुई चे सुंदर वेल होते... गॅलरीत एक मोठा सोफा, खुर्च्या आणि एक टेबल होता... हे सगळं सुंदर दृश्य दिसेल अशा ठिकाणी एक सुंदर बंगळी पण होती.... त्याला कधी एकटं वाटायला लागलं की तो इथे येऊन बसायचा.... तासन् तास त्या झाडांशी, फुलांशी नाहीतर त्या चंद्राशी बोलत बसायचा.... त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं करायचा आणि पुन्हा फ्रेश होऊन कामाला नव्याने सुरुवात करायचा..... पण आजचा दिवस वेगळाच होता... आज ती त्याच्यासोबत होती.... त्याच्या सुखदुःखांची सोबती, त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींची साक्षीदार! तिला असं अचानक गॅलरीत आलेलं पाहून तो जरा बुचकळ्यात पडला... पण एकीकडे त्याला आनंदही झाला.... शेवटी ते त्याचं आवडतं ठिकाण होतं आणि तिथे आज त्याची आवडती व्यक्ती पण होती.... ती रेलिंगला टेकून उभी होती आणि आणि चंद्राकडे बघत होती.... तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात चाललेल्या द्वंद स्पष्ट दिसत होतं... त्याला पण तिचं ते अवघडलेपण समजत होतं... त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती दचकली....
संजीवनीः मल्हार, आई एम सॉरी! मी.. ते...तेव्हा.. तुला...
तेवढ्यात
मल्हारः अगं संजीवनी, इट्स ओके! मी तुझी मनःस्थिती समजू शकतो... मी तुझ्या मनाची तयारी झाल्याशिवाय काहीच करणार नाही... डोन्ट वरी ....
तिला एकीकडे हे सगळं हवं होतं... पण दुसरीकडे मन अजूनही तिला परवानगी देत नव्हतं... मल्हारने पुढाकार घेतला आणि
मल्हारः आपण जरी आता नवरा-बायको असलो तरी आपण आधी मित्र आहोत, हे तू विसरलीस का? (ती त्याच्याकडे पहातच राहिली) आणि जर विसरली असशील तर आतापासून आपण नव्याने फ्रेंड्स... फ्रेंड्स ?
त्याने हसून तिच्यासमोर हात पुढे केला.... त्याच्या अशा वागण्याने, ती पण रिलॅक्स झाली आणि हात पुढे करुन ती पण म्हणाली "फ्रेंड्स".... आणि मग दोघं अगदी मनापासून आणि समाधानाने हसले अगदी आधीसारखे....
मल्हारः संजू, ये इकडे. आपण त्या बंगळीवर बसू आणि गप्पा मारू... (काहीतरी जाणीव होऊन) ए तुला झोप तर नाही आली ना? झोप येत असेल तर आपण नंतर बोलु...(काहीसा हताश होऊन) मला काय रात्र रात्र जागायची सवय आहे, झोपच येत नाही.
संजीवनीः अरे, असं काही नाही. मला पण झोप नाही येत आहे. (तिही हताश होत) असंही माझं काही वेगळे नाही... माझ्या रात्री पण अशाच जातात...
मल्हारः (तिच्याकडे एकटक पाहत) पण आता मी असं नाही होऊ देणार... मी तुला खूप आनंदात ठेवेन.. सगळी सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवीन... डोन्ट वरी ! आता तू फक्त आनंदी राहा...
संजीवनीः माहीत आहे मला, तू मला नेहमी सुखातच ठेवशील... आजच नाही, पण हे मी पस्तीस वर्षांपूर्वीच ओळखलं होतं... पण, म्हणतात ना,आपल्या हातात काहीच नसतं... शेवटी त्याची इच्छा (वर पाहून)!
मल्हारः नाही संजीवनी... त्याची इच्छा होती, त्यांने संधी पण दिली होती ... पण चूक माझीच आहे ... मीच माती खाल्ली आणि माझ्या-तुझ्या आयुष्याची माती करुन घेतली... अजूनही मला सगळं जसंच्या तसं आठवतं गं..
एम बी ए पूर्ण केलं आणि जॉबच्या शोधात मुंबईत गाठली. त्या निमित्ताने जवळजवळ सगळी मुंबई पालथी घातली होती. खूप शोधाशोध केल्यानंतर एका चांगल्या कंपनीत माझं सिलेक्शन झालं. एखाद्या वर्षात मी त्या कंपनीत चांगलाच रुळलो. खूप स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत आलो होतो. स्ट्रगल करून करून थकून जायचो. घरच्यांची खूप आठवण यायची. खूप वेळा वाटायचं घरी पळून जावं. अशातच आमच्या कंपनीत आभा जॉईन झाली. तिचा ऍडमिनिस्ट्रेशन सेक्शन होता आणि माझा मार्केटिंग. त्यामुळे बऱ्याच वेळा जाता-येता आमची भेट व्हायची. एकाच गावाकडचे असल्यामुळे आमची जरा घट्ट मैत्री झाली. ती एकटी होस्टेलमध्ये राहायची आणि मी मित्रांसोबत एक फ्लॅट घेऊन. मग काय, सुट्टीच्या दिवशी आम्ही खूप फिरायचो. टू व्हीलर काढायची आणि पूर्ण दिवसभर गाडीवर फिरायचं. मुंबईतील प्रत्येक ठिकाण आम्ही फिरलो. असं एकही ठिकाण नव्हतं, जे आम्ही पाहिलं नाही. खूप निर्मळ मैत्री होती आमची.... आमची ही मैत्री, प्रेमात कधी बदलली, हे आम्हालाच समजलं नाही. तिकडे आभासाठी स्थळ पाहणी सुरू झाली होती. पहिलंच स्थळ आलं आणि त्यांनी फोटो पाहुनच होकार कळवला. मग कुठे आम्हाला जाणीव झाली.
तो अगदी शून्यात नजर लावून हे सगळं सांगत होता. जणू एखादा पिक्चरच त्याच्या डोळ्यासमोर सुरू आहे. अगदी काल-परवा सगळे घडल्यासारखं. खुप समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर...
संजीवनीः अरे, आम्हाला तर तेव्हा तुमची खूप काळजी वाटत होती. आम्ही कधी तुम्हाला विचारलं नव्हतं की कोणी कोणाला प्रपोज केलं पण उत्सुकता होती. कधी वाटायचं तुम्ही प्रेमी आहात, तर कधी वाटायचं फक्त निर्मळ मैत्री आहे. पण कधी हिम्मत नाही झाली आमची विचारायची. मी पडली खूप दूरची मैत्रिण...
मल्हारः तसं काही नव्हतं गं. (थोडं हसून) खरं तर आम्ही दोघांनीही एकमेकांना कधी प्रपोजच केलं नाही. आमचं एक वेगळंच नातं होतं... न बोलता व्यक्त होणार! आम्हाला कधी याची आवश्यकताच वाटली नाही. खूप वेगळं प्रेम होतं आमचं!
नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आजही तो तिला मीस करत होता.
संजीवनीः हो नं, जसं तिचं लग्न ठरलं तसं तिने घरी तुमच्या बद्दल सांगितलं. पण घरचे ऐकायला तयार नव्हते. काहीही झालं तरी हे इंटरकास्ट लग्न आहे, म्हणून नाकारत होते. तिने हे जेव्हा आम्हाला सांगितलं होतं, तेव्हापासून आमचा जीव तीळतीळ तुटत होता. खूप मनापासून वाटायचं की तुमचं लग्न झालं पाहिजे.
मल्हारः हो ना गं. पण मी मजबूर होतो. माझ्या लहान बहीणीचं लग्न व्हायचं होतं. तिच्या आधी जर आम्ही लग्न केलं असतं, तर माझ्या बहिणीचं लग्न जमलं असतं की नाही, देवालाच माहीत! तेव्हा नव्हतं गं एवढं फ्री वातावरण.. मी तर पूर्ण खचून गेलो होतो.
आजही त्याबद्दल त्याच्या डोळ्यात तिला गिल्ट दिसत होतं.
संजीवनीः तेव्हापासून मी जरा तिच्या जास्त जवळ गेली होती. खूप रडली ती माझ्याजवळ! पण तुझा प्रॉब्लेम माहीत असल्यामुळे ती एकदम खंबीर झाली. आणि त्या मुलाला होकार कळवला... मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला होता. शेवटी तिची एंगेजमेंट झाली. पण लग्नाची तारीख सहा महिन्यानंतरची काढलेली होती.
मल्हारः हो ना! साखरपुडा जरी झाला असला तरी सहा महिन्यानंतर लग्न असल्यामुळे मला थोडी आशा होती. मी सर्व ताकदीने बहिणीचे लग्न जुळवण्याच्या मागे लागलो आणि सहा महिन्यांच्या आत बहिणीच लग्न जमवलं आणि करुन दिलं. तेव्हा बहिणीचं लग्न झाल्यामुळे माझ्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. आता मी घरच्यांशी भांडू शकत होतो.
पण अचानक तो हमसाहमशी रडायला लागला????. त्याला असं रडताना मी कधी पाहिलं नव्हतं. तिने त्याला जवळ घेतलं आणि मनसोक्त रडू दिलं. तो जरा सावरला तसं
संजीवनीः मल्हार, मला माहित आहे रे, तू तिला किती पटवून सांगत होतास. पण आता आभा तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने जणू तिचं मन मारून टाकलं होतं. आम्ही पण तिला खूप समजावलं, पण नाही. तीचं एकच उत्तर... तेव्हापासून मी जणु तुमच्यातला दुवा होती. ती त्या दिवशी बोलली की, माझं लग्न काही दिवसांवर आलं आहे. माझं लग्न झालं की मला त्याला भेटता येणार नाही, त्याची काळजी घेता येणार नाही. खूप निष्काळजीपणे वागतो गं तो. वेळेवर जेवत नाही, दुखणं अंगावर काढतो. दिवसभर त्या गाडी वर फिरत असतो. बाॕसही त्यालाच सगळी बाहेरची आणि जबाबदारीची कामे सांगतात. हा असा घाणीला जुंपलेल्या बैलासारखं सतत काम करत राहतो.
मल्हारः काय करणार गं मग? ती नाहीच म्हणत होती. सगळी लग्नाची तयारी झालेली होती, तशातच तिच्या बाबांना अटॅक येऊन गेलेला. तिच्या अश्या वागण्याने जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, असं ती नेहमी म्हणायची. तिला आई-बाबांची काळजी होती पण माझ्यासाठी जीवही अडकत होता. शेवटी तिने आई बाबांना महत्व दिलं. मी पण तिच्या निर्णयाचा आदर केला आणि आजही करतो.
संजीवनीः तिने खास मला दोन दिवस आधी तिच्या लग्नासाठी म्हणून बोलून घेतलं होतं. मी पदोपदी तिला सांगत होते, अजूनही वेळ आहे, विचार कर. तुम्ही पळून जा. पण शेवटपर्यंत ती नाहीच म्हणाली. स्वतःच्या लग्नाच्या दिवशी ती नाखुशीनेच तयार झाली होती. नेहमी हसत राहणारी ती, आयुष्यातल्या त्या महत्त्वाच्या दिवशी पूर्ण चेहरा उतरवून लग्नाला उभी होती. लग्नाचा जो ग्लो असतो तो नव्हताच तिच्या चेहऱ्यावर. अगदी निर्विकार चेहऱ्याने ती शीवच्या गळ्यात माळ टाकायला उभी होती. तुमच्या दोघांसाठी माझा जीव तुटत होता. पण तुम्ही दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते आणि शेवटी मी हरले. तिच्या डोक्यावर शीवच्या नावाच्या अक्षदा पडल्या... आणि मी फक्त बघत रहाण्यापलिकडे काहीच करू शकली नाही. तिकडे तिच्या डोक्यावर अक्षदा पडत होत्या आणि तिकडे माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या.
मी तिच्या सोबत करवली म्हणून गेली होती. दुसऱ्या दिवशी पूजा होती म्हणून ती माझ्यासोबत झोपणार होती. ती रात्र आम्ही पूर्ण जागून काढली. शेवटपर्यंत, तू त्याची काळजी घे, यातून त्याला बाहेर काढ, एवढंच सांगत होती. तिला तेव्हाही स्वतःची काळजी नव्हती. ती फक्त तुझीच काळजी करत होती. मी तुमच्या प्रेमाची साक्षीदार तर नाही होऊ शकले, पण तुमच्या जुदाईची साक्षीदार मात्र झाले.
मल्हारः हो ना.. त्यानंतर मी स्वतःला खूप समजावण्याचा प्रयत्न केला गं ..... पण नव्हतं होत माझ्याने... खुप सवय झाली होती तिची. मन तयारच होत नव्हतं मानायला की आता तिचं लग्न झालेलं आहे आणि ती आपल्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. तिच्या लग्नाआधी आम्ही एकदा भेटलो होतो, तेव्हा तिने म्हटलं होतं, आता यानंतर मला कॉल करायचा नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी कॉल करेल...आणि तुला तर माहीतच आहे, मी आजपर्यंत कधीच स्वतःहून तिला कॉल केला नाही. नेहमी तीच कॉल करते. माझ्या बर्थडेला पण तिच कॉल करते आणि तिच्या बर्थडेला पण तीच करते.(आता त्याच्या गालावर थोडं हसू आलं होतं.)
संजीवनीः ती तिच्या संसारात अडकली होती. पण आम्ही दोघी एकमेकींच्या संपर्कात होतो. तिला काही सांगायचं असलं किंवा तुला काही सांगायचं असेल तर मी होतेच. तुमचा मिडीएटर... मला दुसऱ्या शहरात जॉब मिळाल्यामुळे मी मुंबईत नव्हते त्यामुळे कॉल करून तुझ्याकडे लक्ष ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.
(मित्रांनो, मागील भाग एक मध्ये मल्हार आणि संजीवनी सोबत आपणही रोमँटिक वातावरणाचा आस्वाद घेतला असेल... आणि आज एकदम रोमँटिक वातावरणातून बाहेर येऊन थोडे सेंटी झाले असणार... पण काय करणार ना, आयुष्यात सुख - दुःख तर येणारच फिरून फिरून... कारण शेवटी पृथ्वी गोलच आहे... मल्हार आणि संजीवनीचं आयुष्य असंच दुःखाने भरलेलं होतं... हे सगळं दुःख भोगल्यानंतर आज हे सुख त्यांच्या पदरात पडलेलं आहे.... आपणही यांच्यासोबत सुख-दुःखाची चव चाखू या...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा