तहान

Child rape case.
*स्पर्धा - अष्टपैलू लेखक महासंग्राम*
पहिली फेरी -लघुकथा
शीर्षक - तहान
लेखिका -©® स्वाती बालूरकर, सखी

"तहान लागल्यावर पाणी पितात ना आई, मग त्या दादानी असं का केलं ?"
त्या चिमुकलीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं.

डॉक्टर बिराजदार केबिन मधे आले आणि विचारात गढून गेले.

एमरजंसी मधे आलेल्या त्या मुलीचं विव्हळणं आठवून काळजाचं पाणी पाणी होत होतं.

या क्षणी डॉक्टराऐवजी पोलिस किंवा वकील असतो तर त्या नराधमाला अशी शिक्षा केली असती की ते पाहूनच पुन्हा कुणी हे असं करावयास धजावणार नाही असं तीव्रतेने वाटून गेलं.

पाच-सहा वर्षाच्या कोवळ्या मुलीला असं विव्हळताना पाहून डॉक्टरांचा जीव कासावीस झाला होता.
ती बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याकडे आणली गेली होती. इलाज सुरू केल्यानंतर तिचे आई-वडील धावत पळत पोचले होते.

झालेली घटना कळतच आईने एकच हंबरडा फोडला होता तोही त्यांच्या कानात घुमत होता.

शुद्धीत आली की तिने विचारलं होतं "तहान लागल्यावर पाणी पितात ना आई , मग त्या दादांनी असं का केलं होतं?"

दोन वेळा तिने हा प्रश्न विचारला होता पण कुणाकडेच त्याचे उत्तर नव्हते.
त्या चिमुरडीला आपल्या छातीशी कवटाळून आई सतत रडत होती.

शांताक्का सारखी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती व तिच्या आई वडिलांचे पाय धरत होती व माफी मागत होती.
त्या मुलीचे आईवडिल इतके शॉक होते की ते माफ करण्याच्या व बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतेच.

झालेली गोष्ट दुर्घटना म्हणावी की नियोजित सांगता येत नव्हतं.
तो मुलगा पळून गेला होता आणि पोलीस तपास करत होते.
शेवटी शर्थीच्या प्रयत्नानंतर रात्रीपर्यंत तो पकडला गेला होता.

पोलिसांच्या दोन-चार लाथा - बुक्क्या व छड्या खाल्ल्यावर त्याने गुन्हा कबूल केला होता.

त्याच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं होतं.

त्याचे आई वडील नोकरी करायचे. खूप पैसा होता पण मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्या लाड पुरवण्याचे व वाईट संगतीचे परिणाम अशा प्रकारे समोर आले होते. त्या चिमुकलीला त्याने नरक दाखवला होता.

शरीरापेक्षा मनाची जखम खूप खोल होती.

ही चिमुकली , विव्हळणारी चिमुरडी खूप आनंदी लेकरू होतं, जिचं घरचं नाव बिट्टू.

शांतक्का बिट्टूला लहानपणापासून तिच्या घरी येवून सांभाळत राहायच्या.
हळूहळू बिट्टू मोठी होत होती.
मग ४ वर्षाच्या बिट्टूला शाळेत टाकलं व तिकडेच डे केअर त्यामुळे शांताक्कांची नोकरी गेली.
२-३ घरी काम करूनही त्यांना खर्चाचे पैसे पुरेनात .
त्यांना आपली कमाई वाढवण्याची चिंता सतावू लागली. कारण त्यांना एक भाचा सोडला तर कुणीच नव्हतं . त्यामुळे काही वेळेकाळेला पैसे लागले तर कसे ? या विचाराने शिवाय औषधगोळ्यांसाठी ही गरज होतीच.

मग त्यांनी काय केलं बिट्टूच्या आईला विनंती केली. मी सांभाळते , मला कसम द्या म्हणून.

शाळेतून बिट्टू घरी आली की तिला क्रच मधे ठेवल्यापेक्षा तिला घरी ठेवलेलं बरं शिवाय सांभाळणाऱ्या बाई तर तिला लहानपणापासून ओळखतात असाही विचार झाला . ती सुरक्षित राहिल या उद्देशाने शांतक्कांना होकार दिला.

दोन वाजता बिट्टू शाळेतून घरी यायची.

हे कंम घेण्यापुर्वी शांताक्काने थोडासा कमाईचा जुगाड केला होता . म्हणजे चार वाजता वगैरे त्यांच्या घरासमोर मुलं खेळायला यायची.

शांताक्काच्या घराबाहेर म्हणजे समोर एक मोठं मैदान होतं. तिथे रोज दुपारी काही मुलं, संध्याकाळी काही मुलं क्रिकेट खेळायची.

खेळून खूप जणं मुलं दमली तेव्हा शांताबाई कडे पाणी मागायला यायची.

थोडे दिवस त्या पण मुलांसाठी जास्तीचं पाणी भरून ठेवायच्या. पण त्यांना वजन उलचणं व्हायचं नाही म्हणून मग त्यांच्या भाच्याला सांगून त्यांनी चॉकलेट, गोळ्या,चिप्स आणि पाण्याची पाकीट वगैरे मागून घेऊन घराबाहेर बसायला सुरुवात केली. या विक्रीने मुलांची सोय झाली व थोडी बहुत कमाई व्हायला लागली.

पण बिट्टूला सांभाळण्यासाठी नोकरी लागल्यापासून हे सगळं बंद झालं होतं, वर्षभर झालं .

मग बिट्टूला शाळेत टाकलं तेव्हा आईने त्यांना समजावून सांगितलं.

बिट्टू शाळेतून येण्याच्या वेळी त्या यायच्या, बस स्टॉपवरून तिला घरी आणायच्या , युनिफॉर्म बदलून फ्रेश करून खाऊ घालायच्या. मग झोपी घालायच्या.
संध्याकाळी सहा वाजता ती उठायची.
इतका वेळ शांतक्कांना रिकामं बसणं बेचैन व्हायला लागलं.

एक दिवस त्यांनी बिट्टूला आपल्या सोबत घरी नेलं.

ती पण थोडा वेळ तिकडे रमली, थोडा वेळ झोपली, खेळली, व आई येण्याच्या वेळी त्या घेवून आल्या.

मग शांताक्कांना एक नवीन कल्पना सुचली.

त्यांनी मालकीण बाईंना विचारलं की "मी बिट्टूला दोन तास माझ्या घरी घेऊन जात जाऊ का? ती झोपली की मला काहीच काम नसतं. "

अगोदर त्या नाही म्हणाल्या.

पुन्हस शांताक्काचा मायाळू स्वभाव , ईमानदारी व विश्वास आहे म्हणून त्यांनी परवानगी दिली.


मग आठवड्यातले पाच दिवस बिट्टू त्यांच्यासोबत दुपारी त्यांच्या घरी जायची. झोपायची व खेळायची व संध्याकाळी आई तिथे येऊन घेऊन जायची.

घरात छोट्या -मोठ्या खाण्याच्या वस्तू तयार करूनही त्या विकायला लागल्या.

हा पगार आणि हा वरचा खर्च त्या पैशात निघत होता.

नेमकी बिट्टूची युकेजी ची परीक्षा झाली, पुढच्या वर्गात ऍडमिशन झालं व तिला सुट्टी पण लागली.

परंतु आई-वडिलांना सुट्टी नाही.
मग बिट्टूची पूर्ण जबाबदारी शांताक्कांवर!

कधी कधी तर सकाळीच त्या तिला घेऊन यायच्या ,कधी दुपारी तिला सोडायच्या. पण त्यांना तिचा खूप लळा लागला होता , दोघींना एकमेकांचा खूप ल ळा लागला होता.

समोर मैदानावर क्रिकेट खेळायला येणारी मुलं पण बिट्टूला ओळखू लागली होती.
ती पण ताई दादा म्हणून सगळ्यांत छान रमायची.

दहावीच्या परीक्षेनंतर सुट्ट्या लागल्या होत्या.
क्रिकेट खेळायला येणारा दहावीचा रक्षित खूपदा बाटलीतील पाणी संपलं म्हणून पाणी प्यायला यायचा. . . शांताक्का पाणी द्यायच्या. तो टिमचा दादा व कॅप्टन होता.

पाकीटं संपली तर त्या घरातले माठातले पाणी पण द्यायच्या.

बरीच मुलं त्यांच्या ओळखीची झाली होती.


एका अशाच दुपारी बिट्टू शांताक्का च्या वरच्या खोलीत झोपलेली होती व शांतक्का खालीच कामात.

कुणीतरी पळतच सांगत आलं शांतक्काच्या एकुलता एक भाच्याचा एक्सीडेंट झालाय म्हणून!

शांताक्का घाबरल्या व ऊर फुटून रडू लागल्या.

बाजूच्या शेजारणीला सांगितलं तर तिने नवर्‍याला गाडीवर घेऊन घटनास्थळी जायला सांगितलं.

पण बिट्टू वर झोपलेली होती त्यामुळे त्यांचा पाय निघेना.

शेजारीण म्हणाली "ती उठेपर्यंत तुम्ही जाऊन या ती उठली तर मी बघते तिला !"


आणि त्या काळ्या दिवशी त्या काळ्या वेळी रक्षितचं बाटलीतलं पाणी संपलं .
पण त्याने पाहिलं शांताक्का खाली दिसत नाहीत. आणलेलं पाणी संपलेलं होतं तर घरातलं पाणी मागायला तो वर गेला.

पाहतो तर कुणीच नाही. बिट्टू एकटीच झोपलेली होती.
त्या निरागस मुलीला शांत झोपलेलं पाहून मनात लाड जागी झाला.

हळूच झोपलेल्या बिट्टूचे तो पापे घेऊ लागला पण त्या कोमल स्पर्शाने शरीराला वेगळीच चालना दिली.
लॉकडाउन मधे फोनवर नको ते व्हिडिओ पाहून त्या क्षणी मनातला सैतान जागा झाला व तो त्याच्या अंगात शिरला .
त्याच्या सलगीने तिला धक्का लागला आणि बिट्टूला एकदम जाग आली.

"दादा काय पाहिजे ?"

तो म्हणाला "बिट्टू तहान लागलीय गं!"

ती म्हणाली, "मग पाणी पी ना !"

आणि
"तहानच भागवतोयना . . तू शांत बस !"
त्याच्या या सुरातल्या बोलण्याने ती ओरडायला लागली की त्यांने तिचं तोंड दाबलं आणि
त्याने निर्दयीपणे चिमुरडीशी दुष्कृत्य केलं व माणुसकीला काळीमा फासली.

तोंड दाबल्याने ती घाबरून बेशुद्ध झाली होती.

चहापाणी घेवून थोड्यावेळाने शेजारणीने बाहेर येवून पाहिलं तर काहीतरी हुंदके दिल्यासारखा आवाज येतोय म्हणून घराजवळ येऊन पाहिलं बाहेर रक्षितला घाईने बूट घालताना पाहिले आणि घरामध्ये दृश्य पाहून त्यांच्या तर पायाखालची जमीन सरकली .
"अरे सैताना!" ती ओरडली.
त्या आवाजाने रक्षित वेगाने पळून आला आणि त्यांना ढकलून निघून गेला .

त्या ओरडत राहिल्या.
" त्याला पकडा, पकडा , नीच सेैतान! "

पण तेवढ्या मोठ्या मैदानातून खिलाडी फरार झाला होता.

शांताबाई येईपर्यंत वाट पाहण्यात अर्थ नव्हता.
बिट्टूची आवस्था पाहून त्या शेजारणीने मोठ्या मोठ्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं.
त्यांनी ऑटो बोलावली ते दवाखान्याकडे निघाले.

भाच्याला जास्त इजा झाली नाही म्हणून परतताना रस्त्यात शांतक्कांना ही घटना कळाली.
त्याही भेदरलेल्या अवस्थेत तिथे पोहोचल्या. बिट्टूच्या आईचा नंबरही कुणाला तोंड पाठ नव्हता.

तोपर्यंत रोजच्याप्रमाणे संध्याकाळी ती बिट्टूला घ्यायला आली आणि तिला कळालं की बिट्टू दवाखान्यात आहे.

पोलिसात एफ आय आर दाखल केली होती.

"पण या गोष्टीचा तपास करून खटला भरताना, न्याय करताना शंभर वेळा माझ्या लेकीच्या भविष्याचा विचार करा " असे म्हणून आई रडत होती व वदील संतापाने थरथरत होते.

\"याची बातमी करु नका , मेडियाला कळवू नका म्हणून विनंती करत होते.\"

शांताक्काने तर स्वतःला संपवण्यासाठी सुरी घेतली होती पण सर्वांनी थांबवलं.

त्या ओरडत होत्या अन रडत होत्या-
" माय खेळणार्‍या लेकरांची तहान भागवायला पाणी घेवून बसले होते! देवाने काय पाप माथी मारलं . . . माय कसली तहान गं सैतानाची. . . माझ्या लेकराला नरक दाखिवला! " त्यांच्या या आक्रोशाने पोलिंसांचं काळीजही पाणी झालं.

समाप्त

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक -२९ .०१ .२३