काहूर
" काकू अहो काकू", "अनामय कुठे आहे काकू?"वैजयंती घरात शिरल्या पासूनच अनामय ला शोधत होती, आज तिचा एम. ए. चा रिझल्ट लागला होता, आणि आपण पास झालो हे तिला सगळ्यात आधी अनामय ला सांगायचं होतं, स्वयंपाक घरातून काकू कणकेचे हात पुसत पुसत बाहेर आल्या,"काय ग आज फारच खुश आहेस, लग्न ठरलं की काय तुझं?", वैजू लाजून म्हणाली,"काकू माझी थट्टा करता कि काय?"मी तर आणि मध्येच थांबली, जणू तिच्या तोंडातून शब्दच हरवले मग काकू म्हणाल्या "अगं अनामय बसलाय वाकड्यातिकड्या रेघोट्या ओढत, जा वर गच्चीवर, नाहीतर माळ्यावर असेल तो". वैजू लगेच माळ्याकडे वळली पण वळतांना जरा लाजली, जणू तिची चोरी पकडल्या गेल्यासारखी! काकूही मंदस्मित करत स्वयंपाक करण्यासाठी वळल्या जणू दोघींना एकमेकींचे गुपित कळलं होतं.
वैजयंती आपल्याच नादात माळ्यावरच्या अन आनामयच्या रूमकडे वळणं घेत जात होती. मनात अनेक नवे तरंग नव्यानंच तयार होत होते, जणू काही तिला एका अनामिक व लयान वेढलं होतं. ती आज इतकी आनंदी कधीच नव्हती, एम.ए च्या निकालाने तिचे स्वप्न सत्यात येणार होतं .आपल्याच दुनियेत रमता रमता अनामयच्या त्या रेषा, रंगांच्या दुनियेत ती कधी पोहोचली तिचं तिलाच कळलं नाही.
अनामय एका पांढऱ्या कॅनव्हास समोर तंद्री लावून शांत बसला होता. त्याची अशी ध्यानस्थ ऋषीची मुद्रा वैजयंती ला फार आवडायची. जणू वैजयंती ला अनामय वैदिक काळाचीच आठवण करून द्यायचा, पण आज वैजयंतीला आनामयचा रागही आला होता, कारण तिला तिचा एम ए चा रिझल्ट सर्वात आधी अनामय लाच दाखवायचा होता."हा दुर्वासा आता समाधीतून कधी भानावर येईल देवच जाणो"असं तिला एक क्षण वाटूनही गेलं, पण तरीही काही केल्या तिचा पाय आज काही त्या इंद्रधनुष्याच्या रंगात रंगलेल्या खोलीतून निघत नव्हता.
शेवटी कंटाळून अर्ध्या तासानंतरहि अनामय ची समाधी सुटत नाही म्हटल्यावर, वैजू जरा रागानेच आणि निराशेने ही उठली आणि जवळच्या कुंचल्यानं तिनं त्या पांढऱ्या कॅनव्हासवर ,"मी एम.ए.झाले" असं लिहिलं आणि माघारी फिरली .हिरमुसल्यानं तिनं काकूनाही टाळलं.
जवळपास दीड तासाने अनामय भानावर आला, त्याला जाणू साक्षात्कारच झाला होता, पण समोरचा कॅनव्हास कोणीतरी खराब केल्याचं लक्षात येताच त्याचा पारा चढला आणि त्यांन घर डोक्यावर घेतलं."आई आई"अशा हाका मारतच, ओरडत तो तावातावानं खाली आला, अन् चिडून म्हणाला,"तुला शंभर वेळा सांगितलं ना की कोणालाही माझ्या खोलीत पाठवत जाऊ नकोस, मग का तू असं करतेस?"आणि पाण्याचा लोटा त्याने जमिनीवर आदळला.