लेखणी एक शस्त्र

Pen Have More Strength Than An Army


शब्द संभारे बोलिये शब्द के हाथ न पाव l

एक शब्द करे औषधी एक शब्द करे घाव ll

शब्दांमध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. जेव्हा शब्दांचे हे वार लेखणीच्या धारधार तलवारीतून परजतात तेव्हा भले भले नामोहरम होतात.

इतिहासातही लेखणीची करामत आणि कयामत आपण सर्वांनी दस्तूर खुद्द पेशवाईत अनुभवलीच आहे. राघोबा दादांच्या पत्नी आनंदीबाई यांनी गार्द्याँ साठीच्या पत्रातल्या मजकुरात \"ध चा मा\" केला आणि "काका मला वाचवा" म्हणत नारायणराव प्राणास मुकला.

बाळशास्त्री जांभेकर हे भारतीय पत्रकारितेचे जनक. आपल्या दर्पण या वृत्तपत्रातून त्याकाळी त्यांनी समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. पण लेखणीला खऱ्या अर्थाने शस्त्र बनविले ते भारतीय असंतोषाचे जनक आणि सर्वसामान्यांचे \"लोकमान्य\" म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांनी.

लोकमान्य टिळक यांचे अग्रलेख ब्रिटिश सरकारला ठणकावून प्रश्न विचारत असत आणि भारतीयांचे प्रबोधनही करत असत. \"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?\" हा अग्रलेख लिहून, लोकमान्य टिळकांनी इंग्रजी सरकारची आपल्या अग्रलेखातून चांगलीच कान उघडणी केली. त्यामुळेच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालला आणि त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली.


गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे मनोरंजन करणे हे वर्तमानपत्राचे खरे कर्तव्य नव्हे. पत्रकार हे वाचकांचे राजकीय मार्गदर्शक म्हणूनच काम करीत असतात. असा विचार लोकमान्यानी समस्त पत्रकारांना दिला.

लोकमान्यांन   प्रमाणेच आचार्य प्र.के. अत्रे यांचेही अग्रलेख विशेष गाजले.

गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली पर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे…..!!!

अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी ‘मराठा’ तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा ‘7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख’.

“सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.”

आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते.

आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय.

आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा होय.

आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.

आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय.

आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय.”

“महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध” हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.

“महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध” हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.

… हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा “बंडखोर गुरूंचे” आंबेडकर हे सच्चे चेले होते.”


गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात दीदींच्या जन्मदिवसानिमित्त साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी 28 सप्टेंबर 1964 रोजी लिहिलेल्या "मराठाच्या" अग्रलेखातील काही गोळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.


शब्दप्रभू आचार्य अत्रे लिहितात.


"स्वर्गीय माधुर्याचा या इहलोकीतील मूर्तिमंत अवतार असलेल्या लता च्या वाढदिवसानिमित्त तिला केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर अभिवादन करणे म्हणजे एखाद्या अप्सरे च्या स्वागतासाठी तिच्या मृदृ चरण कमला खाली जाड्याभरड्या गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्या इतके विशोभीत आहे, कारण लताच्या कंठातील अलोकिक कोमल त्याला साजेसे अभिवादन तिच्या जीवनातील या शुभदिनी जर तिला करायचे असेल तर त्यासाठी प्रभात काळाची सूर्यकिरणे दवबिंदू मध्ये भिजवून बनवलेल्या शाईने तंतूच्या लेखणीने लिहिलेले मानपत्रच गुलाब कळीच्या करंडक आतून तिला अर्पण करायला हवे. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि श्री कृष्णाच्या बासरीची साथ हे सारे एकवटून विधात्याने लता चा कंठ घडविला असला पाहिजे. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी इथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली

"ल ता मं गे श क र"

लेखकाच्या लेखणीत किती ताकद असू शकते हे वरील दोन्ही अग्रलेखातून आपल्या लक्षात आलेच असेल. एकीकडे महामानवाचा आयुष्यभराचा संघर्ष तर दुसरीकडे गान कोकिळेच्या सुमधुर गोड गळ्याचे आणि स्वर्गीय माधुरी असलेल्या स्वरांचे इतके सुंदर चित्र आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखणीतून अगदी हुबेहूब चितारले आहे.

शब्द जर मनुष्याचा आत्मा असतील तर लेखणी त्याचे पार्थिव स्वरूप.

शब्द जर मनुष्याचा श्वास असेल तर लेखणी म्हणजे त्याच्या हृदयाचे ठोके.

तुकाराम महाराजांनाही शब्दांचे मोल कळले होते म्हणूनच ते म्हणतात -

आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने

शब्दांचिच शस्त्रे यत्ने करू

शब्दाचि आमुच्या जीवाचे जीवन

शब्द वाटू धन जन लोका


लेखणीचा प्राण म्हणजे शब्द, त्यामुळे लेखणी नावाचे हे शस्त्र फार जपून वापरावे लागते. समाजात जेव्हा जेव्हा  अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि सामाजिक असमानता वाढते, त्यावेळी लेखणीचे खरे कार्य सुरू होते. अशावेळी लेखणी म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत वर्गाच्या हाती असणारे सांबासदाशिवाचे त्रिशूळ.


शब्दांना मूर्त स्वरूप देण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ लेखणीत आहे. त्यामुळे शब्दांवर सुसंस्कार करणारी माता म्हणजेच लेखणी.


शब्दांनी शब्दांची गुंफण केली तर कविता,

शब्दांची शब्दांशी मैत्री म्हणजे कथा,

शब्दांशी शब्दांचे नाते असते स्तोत्र,

शब्दांनी शब्दांशी हितगुज म्हणजे अभंग,

शब्दांची शब्दांनी ओवाळणी म्हणजे भूपाळी,

शब्दांनी शब्दांची आरती असते ओवी,

आणि शब्द जेव्हा शब्दांच्या हातात हात घालून चालतात दीर्घ पायवाट तेव्हा ती असते नांदी कादंबरीची.



©® राखी भावसार भांडेकर.



संदर्भ

आचार्य अत्रे यांचे अग्रलेख आणि फोटो साभार गुगल