यशची गोष्ट (सूटका) भाग एक

A Story Of A Little Boy Who Escape From Kidnappers

जलद कथा मालिका लेखन 

यशची सुटका  एक



ही कथा आहे एका धाडसी अकरा वर्षाच्या मुलाची. जो मुलांना पकडून नेणाऱ्या टोळीतून प्रसंगावधान राखून सही सलामत सुटला त्या यशची.

*********************************************

मीत -"मम्मा तुला माहिती आहे, आम्ही लहान मुलांनी घरात खेळण्याण्यांचा अजिबात पसारा करू नये."

मीनाचा सहा वर्षाचा मीत तोंडाचा चंबू करून मीनाला सांगत होता.

मीत -"घरात जर आम्ही आमची खेळणी इकडे तिकडे टाकली तर घरातल्या कुणाचाही त्या खेळण्यावर पाय पडून ती व्यक्ती खाली पडू शकते. तिला लागूही शकतं,कधीकधी तर फ्रॅक्चरही होऊ शकतं."


मीतच्या सांगण्यावर खरंतर मीनाला खूप छान वाटत होतं कारण, दिवसभर मीत घरभर खेळण्याचा खूपच पसारा करून ठेवायचा. त्याला कितीही सांगितलं, ओरडलं तरी मीत स्वतःची खेळणी उचलून जागेवर ठेवत नसे, त्यामुळे आज मीत जे मीनाला सांगत होता त्यामुळे, मीनाला खरंतर एकीकडे जरा बरं वाटत होतं आणि त्याचवेळी मीत शाळेत शिक्षिकेने सांगितलेल्या गोष्टी आणखी किती दिवस लक्षात ठेवेल याबद्दल जरा ती साशंकच होती. मीत पुढे आणखी सांगू लागला…

मीत -"मम्मा माहितीये आम्ही छोट्यांनी कैची, चाकू, सुरी, ब्लेड असल्या धारदार वस्तूंना अजिबात हात लावायचा नसतो. काही कापायचं चिरायचं असेल तर घरातल्या मोठ्या माणसांची मदत घ्यायची असते."

मीना -"अग बाई हो का? अजून काय सांगितलं तुझ्या टिचर ने?"

मीत -"ओल्या अंगाने बाथरूम मधल्या इलेक्ट्रिकच्या बटनांना चालू बंद करायचं नाही. पप्पा, मम्मी घरी नसताना अनोळखी लोकांसाठी दरवाजा उघडायचा नाही."


मीना -"अगदी बरोबर. बरं आता चल छान फ्रेश हो. मी तुला छान छान खाऊ देते खायला."


तर हा आहे मीत वय वर्षे सहा. पहिला वर्गात शिकतो. मीनाचा धाकटा तर, राधा ही मीनाची थोरली. वय वर्षे अकरा सहाव्या वर्गात शिकते. दोघेही शाळेत टीचर ने वर्गात काय शिकवले? काय गमतीजमती झाल्या? ते अगदी रोज न विसरता मीनाला सांगतात.


स्वतःच्या अभ्यासातून लक्ष काढून, राधा ही मीतच मघाचं बोलणं ऐकत होती. मीतच सांगून झाल्यावर तिनेही मीनाला सांगायला सुरुवात केली.

राधा -"मम्मा तुला माहिती आहे आज आम्हाला पण सेफ्टी ऑन रोड शिकवण्यात आलं! म्हणजे रस्त्यावर चालताना इकडे तिकडे बघायचं मग रस्ता ओलांडायचा. रस्त्यावर उगाच इकडे तिकडे धावायचं नाही. बस, रिक्षा, कारमध्ये बसल्यावर खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही आणि रस्त्याने कोणी अनोळखी व्यक्तीने काही खायला दिले तर म्हणजे चॉकलेट, चिप्स असं काही आवडीचं जरी खायला दिलं ना! तरी खायचं नाही. त्या अनोळखी व्यक्तीशी अजिबात बोलायचं नाही."


मीना -"राधा अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही. काही खायला दिलं तर खायचं नाही असं टीचरने का शिकवलं बरं?"

राधा -"ते अनोळखी लोक आमचं अपहरण करू शकतात."

मीना -"अगदी बरोबर म्हणूनच टीचर ने तुम्हाला असं म्हटलं आहे की, अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही. बरं चला आता आपण बगिच्यात जाऊ."

संध्याकाळी मीना, राधा आणि मीत गार्डनमध्ये गेले. तिथेच मीनाची मैत्रीण रमा ही आली होती. मीनाची राधा आणि रमाचा यश एका शाळेत आणि एकाच वर्गात शिकत असल्यामुळे यशही संध्याकाळी तिथे बगीच्या मध्ये खेळायला आलेला होता. मुलं खेळत होते. रमा आणि मीना गप्पा मारत बसल्या होत्या.


रमा -"अग आजकाल वर्तमानपत्रांमध्ये आणि समाज माध्यमांवर मुलांना पळवून नेणाऱ्या लोकांविषयी किती बातम्या आणि मेसेजेस येत आहेत?"

मीना -"हे बघ रमा कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा, त्याची शहानिशा करून घेणं जास्त महत्त्वाचा आहे आणि अनोळखी व्यक्तींनी मुलांना पकडून नेण्यापेक्षा, आपली मुलं त्यांच्या हाती लागूच नये असे प्रयत्न आपण केले तर जास्त चांगलं होईल नाही? ते इंग्रजीत म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हो ना?."

*********************************************
सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


🎭 Series Post

View all