Login

आयुष्याची गोष्ट - भाग तीन तारुण्य

वागणं बदललं की जगणं बदलत म्हणतात.
गोष्ट एका आयुष्याची - भाग तीन तारुण्य


|| बालपण गेले अजाणतेकडे
तारुण्य वेचले कुकर्माकडे ||

आजी देवाची पोथी वाचत होती.

"अगं आगम्या, ये बाळा. देवाला नमस्कार कर." आजीने अगम्याला बोलावलं.

"आजी, तुला माहितीये हे देव बिव मला पटत नाही." सोळा वर्षांची आगम्या ताडफाड बोलत होती.

"बरं आईला फोन केलास का? ", आजीने विचारलं.

"आजी, ती जशी माझी आई आहे, तशीच तुझी मुलगी आहे. त्यामुळे तुही करू शकतेस फोन.
आजीला मी बाबाच्या घरात नको होते म्हणून आईने मला दुपट्यात गुंडाळून इथे आणून सोडलं." - अगम्या


"बाळा, तुझा राग कळतोय मला. पण ती आई आहे तुझी. दहा वर्ष झाली, तू तिच्याशी एक अक्षरही बोलली नाहीयेस. तिने तुझं आयुष्य घडावं म्हणून तुला इकडे पाठवलं." आजी तिची समजूत काढत होती.

"आजी बास यार. मला नाही बोलायचंय यावर. मी जुईकडे चाललीये. संध्याकाळी येईन." असं बोलून अगम्या तिथून रागाने निघून गेली.


बिचारी ती माऊली पदराच्या कडाने पापण्यांच्या कडा पुसायला लागली.

ना चुक जान्हवीची होती, ना अगम्याची. मग कोण चुकलं?? अविनाश?

त्याने तर त्याच्या आईचं ऐकलं मग तो कसा चुकीचा?

परिस्थितीचा फेरा
घालतोय घेरा
पळतोस कुठे सैरावैरा
लावलाय कर्माचा पारा

कुठुनशा या ओळी आजीच्या कानावर आल्या.

आणि फोन खणखणला..

देवकी जोशी? फोन करणाऱ्याने विचारलं.

"हो मीच." - आजी

"अगम्या तुमची कोण?" - फोनवरील व्यक्ती

"तुम्ही काय झालंय ते सांगा. " - आजी काळजीच्या स्वरात बोलली.

"अगम्याचा अपघात झालाय, तिला नवजीवन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय." - एवढं बोलून त्या समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला.


आजीने घाईने जान्हवीला फोन केला पण ती फोन उचलत नव्हती. शेवटी आजी एकटीच त्या हॉस्पिटलमध्ये गेली."तिने reception ला विचारलं. अगम्या, माझी नात कोणत्या वॉर्ड मध्ये आहे?"


Receptionist ने चेक करून सांगितलं, असा कुठलाही patient आमच्याकडे आलेला नाही.


आजीला काय सुरु आहे, तेच कळत नव्हतं. ती एका जागी बसली आणि तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजली.


"आई, अगं घरी नाहीयेस का तू? मी केव्हाची आपल्या घरच्या टेलिफोनवर फोन करतेय." - जान्हवी


"जान्हवी, अगम्या.." - आजी थरथरत अस्पष्ट आवाजात बोलली.


"काय झालं अगम्याला?? आई बोल ना. तू कुठेयस आणि अगम्या?? आई प्लीज बोल काहीतरी. " - जान्हवीचा धीर सुटत चालला होता.

"जान्हवी मी नवजीवन हॉस्पिटल ला आहे. " - आजीने क्षीण आवाजात सांगितलं.


जान्हवी तडक निघाली आणि तिने ते हॉस्पिटल गाठून देवकीबाईंना घरी आणलं.

"आई बस तू. पाणी घे." - जान्हवी

"जान्हवी, माझी काळजी सोड. आपल्या अगम्याचा जीव धोक्यात आहे. " - आजी


आजीने जान्हवीला सगळा वृतांत सांगितला.

जान्हवीलाही काही कळत नव्हतं.

अगम्याचा फोनही लागत नव्हता.

संध्याकाळ झाली.

दारावरची बेल वाजली.


"आजी किती उशीर गं दार उघडायला. " - अगम्या दारातच चिडली.


अगम्या. अगम्याला सुखरूप पाहून जान्हवीने तिला मिठीच मारली.


"आई, बंद करा तुमचा ड्रामा." - अगम्या


"अगम्या, नीट बोल. " - जान्हवी


"नाहीतर काय. ऑलरेडी खूप वैतागलिये. " - अगम्या


"आणि आजी, हिचा ड्रामा झाला असेल तर हिला जायला सांग. " - अगम्या


"आई, निघते मी. काळजी घे. बाय अगम्या. " - जान्हवी


"आजी जाम भूक लागलीये, जेवायला वाढ." - अगम्या


आजीने अगम्याला जेवायला वाढलं.


"हे काय, एकच ताट. तुला नाही जेवायचंय का? " - अगम्या


"मला भूक नाहीये. मी जेवेन नंतर. तू घे जेवून" - आजी


"जेवायला बस नाहीतर मीपण नाही जेवणार. " - अगम्या


शेवटी अगम्याने जबरदस्तीने आजीला जेवायला लावलं.


जेवणं आटपल्यावर अगम्या झोपून गेली पण आजीच्या मनात विचारांचा चरखा सुरु झाला होता.


"खरंच कोणी मस्करी म्हणून फोन केला असेल का? की अगम्याच्या जीवाला धोका आहे." - आजीला काहीच कळत नव्हतं.


शेवटी तिने न राहवून अगम्याच्या खोलीचं दार ठोठावलं.


दाराआडून तिला काहीतरी अस्पष्ट मंत्र ऐकू येत होते. तशी ती आणखी घाबरली.


अगम्याने दार उघडलं. "काय गं आजी, काही हवं होतं का?" - अगम्याने विचारलं.


आजीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता.
नाही, काही नाही, इतकंच बोलून ती निघून गेली.


आजीने आज रात्रीच भीतीने पोथी वाचायला सुरुवात केली.

🎭 Series Post

View all