Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

हरवलेला संवाद

Read Later
हरवलेला संवाद


हरवलेला संवाद…

त्या दोघांचं लग्न झालं.

अगदी पाहून सवरून.

चहा पोह्यांचा कार्यक्रम करून.

ती पंचविशीच्या पुढची तो तिशीच्या पार.

त्याच्या घरी गोतावळा हिच्या घरी आर्थिक टंचाई. कदाचित म्हणूनच त्या दोघांचं लग्न झालं.


सासरच्या गोतावळ्यात त्या दोघांना चार दोन क्षण निवांतपणाचे मिळणे कठीणच होतं.

तसाही तो अबोल, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कडवट झालेला आणि जरा एकलकोंडा.

ती मात्र बडबडी, गोतावळ्यात रमणारी, उत्साहाचा अखंड धबधबा असणारी.

पण सासरच्यांनी तिला आपलं मानलच नाही.

आणि मग सासरच्या चालीरीती, जुनाट विचारसरणी, कालबाह्य परंपरांमध्ये तिचा जीव गुदमरू लागला.

घरात तीने एखादा सूर विरोधाचा लावला तर रामायण महाभारत अगदी ठरलेलं.

तिला हे दिवसेंदिवस असह्य होत होतं.

नवऱ्याला काही सांगायला जावं तर तो ऐकायला तयार नव्हता.

एखाद वेळी ही चिडून बोलली तर मग मारझोड आणि अर्वाच्य शिव्यांची लाखोळी ठरलेली.

तशात तिला मातृत्वाची चाहूल लागली. तिला ते नको होतं एवढ्यातच, पण त्या एका घटनेने नवरा जरा वरमला. कधी नव्हे ते तिची विचारपूस करू लागला.


पण घरच्यांना तेही खूपलं. तो परत त्याच्या कामात आणि कोशात गेला.


हिला देवानं एक परी दिली. गुबऱ्या गालाची, मोठ्या मोठ्या डोळ्यांची, कुरळ्या कुरळ्या केसांची.

हिला जगण्याचं कारण मिळालं. पण नवऱ्याच आणि तिचं नातं मात्र पूर्वीसारखाच राहिलं भयाण शांततेच.


म्हणतात ना आयुष्य कधीच एक सूरी नसतं.

एकदा नवरा बाहेरगावी गेला - कामानिमित्त. दोन दिवस फोन नाही. मेसेज नाही.त्याच फोन रेंजच्या बाहेर.


ही अस्वस्थ झाली आणि शेवटी न रहावून नवऱ्याच्या मित्राला फोन लावला. तो नवऱ्यासोबतच होता, म्हणाला \"सगळं ठीक आहे. काळजी करू नका\".

ते नवऱ्याने ऐकलं आणि संशयाचं भूत नवऱ्याच्या मानगुटावर बसलं.

त्यानं घरी परतल्यावर खूप थयथयाट आणि तमाशा केला. कधी नव्हे ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. घटस्फोटाची मागणी केली. अगदी हीन दर्जाच्या शिव्या आणि घरातून निघून जाण्याचा हुकूम दिला.

तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्याला. स्वतःचं निर्मळ, स्वच्छ चारित्र्य, निष्पाप असल्याची ग्वाही दिली. क्षमायाचना ही केली.

पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

अखेर रडत स्फुंदत तीन बॅग भरली.

मग मात्र त्याच्या उरात कालवा कालव झाली.

ती घरातून निघणार तेवढ्यात अगदी दरवाजाजवळ त्याने तिचा हात धरला.

तिचं अंगत ताठरलं. त्यानं तिला बळजबरीने स्वतःच्या बाहू पाशात घेतलं.

आणि दोघेही एकमेकांच्या आसवात आणि मिठीत कधी विरघळले ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


फोटो साभार गूगल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//