द सिक्रेट मिशन भाग -8

रहस्यकथा द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन भाग -8

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[मागील भागात आपण पाहिले की मंदिर बंद राहणार ह्या विचाराने धनेश त्यामागचे कारण शोधण्या हेतूने मध्यरात्री एकटाच मंदिराच्या दिशेने जायला निघतो.परंतु वाटेतच एक अशी घटना घडते की तो मंदिराकडे जाऊ शकत नाही.

पोत्यातून सोडवलेल्या व्यक्तीकडे धनेश विस्फारल्या डोळ्याने बघतो…. ]

आता पूढे….

धनेश पोत्याचे तोंड मोकळे करतो.तो चेहरा पाहून तो जागीच थिजतो.संकट संकट ते हेच तर नव्हते??फक्त त्या भोलेबाबाची कृपा म्हणून मला मंदिराकडे जायची बुद्धी सूचली आणि हा एवढा मोठा अनर्थ व्हायचा टळला.मनोमन देवाचे आभार मानत धनेशने त्या महिलेला बाहेर काढले.करकचून बांधल्यामुळे तिची शुद्ध हरपली होती.त्याने घाईने सॅक मधली वॉटर बॉटल काढून त्यातले पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडले.पाण्याच्या थंड स्पर्शाने ती भानावर आली.इकडे तिकडे बघतच तिची नजर समोर असलेल्या धनेशवर स्थिरावली.

काही कळायच्या आत तिने धनेशला घट्ट आलिंगन दिले आणि ढसढसा रडायला लागली.तिच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने धनेश कावराबावरा झाला.काय घडतेय हे त्यालाही कळत नव्हते.स्त्री देहाच्या अवचित स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहीले.पण फक्त काही क्षण आणि तो लगेच सावरला.स्वत:ला तिच्यापासून दूर केले तसे भानावर येत तीही त्याच्या पासून दूर झाली.तीही खूप आेशाळली होती स्वत:च्याच कृतीने.पण त्या क्षणी फक्त मानसिक आधारासाठी तिने त्याला मिठी मारली होती.हे धनेशही जाणून होता.

परंतु का कुणास ठाऊक आपल्याच कृतीने लज्जीत तिने आपली मान खाली वळवली.

चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अश्रु दाटलेले.

आपला मंदिराकडे जायचा मनसूबा रद्द करून धनेशने तिला आपल्या हाताचा आधार देत उठवले आणि घराच्या दिशेने निघाला.वाटेत दोघेही मौन.घराजवळ येताच तिच्या ऋदयाची धडधड वाढायला लागली.हातापायाला कंप सुटू लागला.अंग थरथरू लागले.तिच्या हाताची थरथर धनेशलाही जाणवली.त्याने नजरेतुनच सांत्वन करत तिला घरी घेऊन आला.

घराच्या फाटकाजवळ पोहोचताच धनेशच्या हातातला आपला हात सोडवून ती तिथेच थांबली.

धनेशने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले तशी ती रडवेल्या पण दबक्या स्वरात हात जोडून विनवणी करू लागली, " सरऽऽ एक विनंती आहे....!"

त्यावर धनेश प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला.

तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला उमगत नव्हता हे जाणून तिने बोलायला सूरवात केली.

 " सर आत्ता जे काही नाट्य घडले ते माझ्या घरी कळू देऊ नका…."

धनेशची तर मतीच गूंग झाली तिच्या ह्या विचित्र विनंतीने.

"अगंऽऽ एवढी मोठी घटना कशी लपवता येईल तेही तुझे वडील पोलिस खात्यातील असताना??"

" नाही नाही..हे मला शक्य नाही. "

त्यावर रडवेल्या सूरातच ती म्हणाली, " सरऽऽ आमच्या समाजात अशा गोष्टींचा बोभाटा झाला तर गावातले बिरादरीतले लोक मूलीलाच वाईट चालीची समजतात.मग माझ्या आई-वडीलांचे जगणे मुश्कील होऊन जाईल."

त्याचा परीणाम म्हणून माझे घराबाहेर पडणे बंद होईल किंवा मग मला ते पूढे शिकू देणार नाहीत आणि गावातल्यांच्या दबावाला बळी पडून कदाचित माझे कुणाशीही लग्न लावून देतील."

" तुम्हाला तर माहितीय सरऽऽ, बाबा किती हळव्या स्वभावाचे आहेत.लोकांच्या भीतीने ते मला ह्यापूढे कधीही कॉलेजला जाऊ देणार नाहीत आणि मला तर अजून खूप शिकायचेय."

" माझे स्वप्न आहे की पूलीस फोर्स जॉईन करून तुमच्यासारखेच ऑफीसर बनायचे.त्यासाठीच मी 

रात्रं -दिवस सिव्हील सर्व्हीसेस करता मेहनत घेतेय सर."

" प्लिजऽऽ माझी एवढी विनंती मान्य करा ना सर…? "

तिच्या अशा अडचणीत टाकणाऱ्या विनंतीपूढे धनेशला काय बोलावे हेच समजेना.

होऽऽऽ..ती दूर्वाच होती जिचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु केवळ धनेशच्या चाणाक्षपणामूळे तो बेत हाणून पडला होता.

म्हणजे पून्हा एकदा वीस ते तीस वयोगटातील तरूण मूलीचेच अपहरण घडले होते.

धनेशच्या डोक्यात असंख्य प्रश्न होते ज्याची उत्तरे अजुनही सापडलेली नव्हती.झाल्या घटनेबाबतही त्याला बरेच प्रश्न दूर्वाला विचारायचे होते.त्याखेरीज त्याच्या पोलिसी डोक्याला चैन थोडीच पडणार होते पण आत्ताची दूर्वाची मन:स्थिती आणि भर मध्यरात्रीची अडनिडी वेळ पाहता आत्ता तिच्याशी कुठलाही संवाद साधणे तितकेसे संयुक्तिक नव्हते म्हणून त्यानेही तिला शांतपणे आपल्या खोलीत जाऊन आराम करायला सांगितले.

संधी मिळताच तिच्याशी संवाद साधायचे मनाशी पक्के करून तोही आपल्या खोलीत जाऊन पडला.

परंतु मन मात्र सैरभैर झाले होते.काय हेतू असेल ह्या अपहरणांमागे??

गावात घडलेल्या इतर घटना काही कमी होत्या का म्हणुन त्यात अजून एकाची भर पडली.जुम्मनच्या बहिणीला गायब होऊन अजून पंधरा दिवसही नाही झाले की ही घटना घडली किंवा घडता घडता राहिली.

नक्की त्यांना दूर्वालाच पळवायचे होते की त्यांचा डोळा माझ्यावर आहे.सावंतांसारखे मलाही………???? 

नुसत्या विचारांनीच त्याला सरसरून काटा आला.

आता काहीही करून ह्या सगळ्याचा शोध लावायलाच हवा.

ह्या सगळ्या केसेसचा लवकरात लवकर छडा लागल्या शिवाय मी चैन बसणार नाही असा मनाशी निग्रह करतच त्याने बिछान्यावर अंग टाकले आणि मघाचच्या सर्व घटनाक्रमांमूळे शीणलेले डोळे कधी मिटले त्याचे त्यालाही कळले नाही.

        ~~~~~~~~~~~~~~~~

दूसरा दिवस.जगदाळे नेहमीप्रमाणे तयार होऊन धनेशची मॉर्निंग वॉक करता वाट पहात होते.

परंतु रोजची वेळ उलटली तरी धनेश अजून खाली उतरला नाही हे पाहून जगदाळेही विचारात पडले.

रोज पहाटेची पायपीट कधीही न चुकवणारा इतका फिटनेस फ्रीक धनेश आज सूर्य उगवला तरी उठला नाही हे गणित काही जगदाळेंच्या पचनी पडेना.

जरा वेळ वाट पाहून अखेरीस ते जिना चढून धनेश रहात असलेल्या पोटमाळ्याच्या खोलीशी पोहोचले.धनेश अजूनही गाढ झोपेत होता.

एकीकडे त्याला उठवावेसेही वाटत नव्हते तर दूसरीकडे ड्यूटीची वेळ होत होती.काय करावे जगदाळेंना समजत नव्हते.ते पून्हा खाली आले.बायकोला मस्त त्याच्या आवडीचा गरमागरम चहा सोबत थोडी न्याहारी तयार करायला सांगितली.ते सगळे घेऊन ते स्वत:च धनेशजवळ पोहोचले.

" साहेब,ऊठा..गूड मॉर्निंग तर कधीची झाली.तुम्ही अजून उठले नाही.हे काही कळेना बूवा.चला मस्त वाफाळता चहा आणलाय खास तुमच्यासाठी.तो घेऊन मग जावा स्नानाला."

जगदाळे इतके काय काय बडबडत होते तरी धनेश हुंऽऽ नाही की चूंऽऽ नाही.

आज त्याला बरेच वाटत नव्हते.कालच्या झटापटीत खांद्यावर बसलेल्या घावामूळे अंगात सडकून ताप भरला होता.वेदनेने शरीर कण्हारले होते.त्यामूळे तो ग्लानीतच पडून होता.धनेशचा कुठलाच प्रतिसाद नाही हे पाहून आता मात्र जगदाळे थोडे काळजीत पडले.

सहजच धनेशच्या माथ्याला हात लावला तसे विजेचा झटका बसावा तसा त्यांनी तो बाजूला झटकला.धनेशचे अंग चूलीतल्या पेटत्या निखाऱ्यागत तापले होते.अंगातून गरम वाफा निघत होत्या.त्यांनी जरा हलवून धनेशला जागे केले.तसा थोडा कण्हतच तो जागा झाला.समोर जगदाळेंना बघुन तोही चक्रावला.जगदाळेंनी त्याच्या पाठीला उशीचा आधार देत बसते केले.आणलेला गरम चहा त्याला पाजला आणि धनेशला निजते करत ते घाईघाईने फटफटी बाहेर काढून गावातल्या एका डॉक्टरला पकडून घेऊन आले.डॉक्टरने धनेशला तपासले.बरेच टेंपरेचर होते.त्याने काही मेडिसिन्स लिहून दिली.

अंगावरच्या पांघरूणामूळे अजूनही कुणालाच त्याच्या जखमेबाबत समजले नव्हते.ते एका दृष्टीने योग्यच झाले नाहीतर जखमेचा घाव बघुन जगदाळेंना लगेच कळले असते की काहीतरी विपरीत घडले आहे किंवा साहेबांवर कोणीतरी प्राणांतिक हल्ला केलाय एवढा निष्कर्ष तरी त्यांनी नक्कीच काढला असता.त्या सगळ्याची उत्तरे देणे शक्यतो टळावे म्हणुन धनेशनेही काहीच सांगितले नाही.

परंतु त्या घावावर त्वरीत ईलाज होणे आवश्यक होते.नाहीतर प्रकरण जास्त चिघळायची भीतीही होतीच.

काय करावे ? कसे सांगावे ? कोणाची मदत घ्यावी ?

ह्याचा धनेश मनातल्या मनात विचार करत होता.

        ~~~~~~~~~~~~~~~~

जगदाळेंना तर ड्युटीवर जाणे भागच होते.परंतु त्यांना धनेशची चिंताही सतावत होती.शेवटी त्यातून मार्ग म्हणून त्यांनी दूर्वालाच मधून अधून त्याला काय हवे नको बघायची जवाबदारी सोपवून ते ड्युटीवर गेले.

आजचे त्यांचे पहिले काम म्हणजे त्या बुरखाधारी माणसाला पकडणे होते.धनेशनेच तशी ऑर्डर काढली होती.

जगदाळेंना भालेवाडीचा कोपरान् कोपरा ठाऊक होता.अशी लोक कूठे सापडू शकतात ह्याचा जराजरा अंदाजही होता परंतु सरांच्या अपरोक्ष तो हाती लागला आणि जर तो मांडकेंच्या हातात सापडला तर पैशांचे अमिष दाखवून तो सहज तूरी देऊन निसटून जाईल.आपली सगळी मेहनत फूकट जाईल.नंतर मग त्याचे नखही पून्हा बघायला मिळणार नाही.

काय करावे?

सर बरे होऊन ड्युटी जॉईन करेपर्यंत थांबावे का??

जगदाळेंच्या मनात द्वंद्व चालले होते.मांडके सारखा माणूस मूद्दाम त्याला सोडूनही देऊ शकतो त्यापेक्षा त्याच्या पाळतीवर राहून फक्त त्याच्या हालचालीवर नजर ठेवली तर..! 

हा विचार जगदाळेंना जास्त पटला.म्हणजे तो दिवसरात्र काय करतो,कुठे राहतो,त्याचा ठिकाणा,त्याचे कोण लोक जवळचे ही सगळी बित्तंबातमी काढून ठेवायची आणि आदेश मिळताच त्याला साहेबांपूढे हजर करायचे..

विचार पक्का होताच जगदाळेंनी आपला पोलीसी पोषाख बदलून साधारण गाववाल्यांची वेशभूषा करून त्याचा शोध घ्यायला सूरवात केली.

         ~~~~~~~~~~~~~~

इकडे अकरा बारा वाजून गेले तसे दूर्वा धनेशला बघायला वर आली.धनेश अजूनही ग्लानीतच होता.तिने हलकेच हात हलवून त्याला उठवले.किलकिल्या डोळ्यांनी त्याने समोर बघितले.जगदाळें एेवजी दूर्वाला समोर पाहून तो सकपकला.थोडेसे अंग हलवण्याचा प्रयत्न करताच सर्व शरीरातून असह्य वेदना उमटली आणि नकळतच तो चित्कारला, " आईऽऽआई गंऽऽऽ! "

दूर्वाने त्याच्या खांद्याला धरून बसवायचा प्रयत्न करताच तो पहिल्यापेक्षा जास्तच जोराने विव्हळला." आह्ऽऽ आई गऽऽ…!"

त्याला उठुन बसवताना चुकून दूर्वाने त्याच्या जख्मी खांद्याला स्पर्श केला होता त्यामूळेच तो कळवळून आेरडला.घाबरून दूर्वाने हात मागे घेतला आणि पांघरूण हटवून बघितले तर त्याची  जखम पाहून ती प्रचंड घाबरली.आपल्याला वाचवण्याच्या नादात धनेशला झालेली ती एवढी खोल जखम पाहून तिचे काळीजच फाटले.

तिच्या डोळ्यात नकळत अश्रु जमा झाले.

ती रडत रडतच धनेशला म्हणाली," सर माझ्यासाठी तुम्ही किती मोठे संकट स्वत:वर ओढवून घेतलेत.काल जर तुम्ही वेळेत पोहोचला नसता तर माझे काय झाले असते देवालाच ठाऊक ??"

कोणत्या शब्दात आभार मानू मला खरच समजत नाहीये सर..! "

दूर्वा खरच मनापासून हे सगळं बोलत होती.तिच्या बोलण्यातली काळजी धनेशलाही साफ जाणवत होती.

अशा छोट्या मोठ्या घावांची पर्वा त्याला कधीच नव्हती परंतु आज पहिल्यांदाच कोणीतरी त्याची इतक्या मायेने चौकशी करत होते ते पाहून क्षणभर तोही भावूक झाला.

सडे फटिंग आयुष्य जगता जगता त्याचे मन, भावना इतक्या कोरड्या झाल्या होत्या की असा भावनिक ओलावा त्याने कधी अनुभवलाच नव्हता.मात्र इकडे आल्यापासून जगदाळेंनी घेतलेली काळजी आणि आता दूर्वा करत असलेली काळजी हे दोनही अनुभव नकळतपणे धनेशला नात्यांच्या विणीत अडकवू पहात होते.

जे काही घडतेय ते योग्य की अयोग्य हे समजायच्या तो सध्या मन:स्थितीतच नव्हता पण दूर्वाची जवळीकता नकळत त्याच्या वैराण वाळवंटी जीवनात मायेचा ओलावा मात्र नक्कीच फूलवत होती.

तिचा सहवास त्याला हवाहवासा वाटत होता.

आपल्या मनातली ही भावनिक उलथापालथ लपवतच तो दूर्वाला म्हणाला, " दूर्वा काम डाऊन!! हे माझे कर्तव्यच होते.माझ्याजागी कोणीही असते तरी हेच केले असते.मी काहीही वेगळे केलेले नाहीये.सो रिलॅक्स...आणि तूझ्या जागी कोणीही असते तरी मी हेच केले असते.

तेव्हा आता माझी काळजी करणे बंद कर आणि मला काही प्रश्नांची उत्तरे हवीएत ती दे."

बोलताना त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना उमटताना स्पष्ट दिसत होती.

दूर्वाने त्याला बोलता बोलताच अडवले, " सर तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईन पण आत्ता नाही.आत्ता तुम्हाला आरामाची नितांत गरज आहे.मी ही गरमागरम खिचडी आणलीय ती खाऊन घ्या.ह्या गोळ्या बाबांनी तुम्हाला जेवणानंतर द्यायला सांगितल्याएत त्या घेऊन तूम्ही आराम करा.मी पून्हा येईन थोड्या वेळाने तेव्हा बाेलू."

ती ज्या अधिकारवाणीने बोलत होती ते पाहता तिचा शब्द मोडायची ताकद धनेशमधे मूळीचच नव्हती.मौन राखत त्याने ती सांगेल त्याला मान डोलावली.दूर्वाने गरम खिचडी चमच्याने धनेशला भरवायला सुरवात केली.प्रथम थोडीशी लाज वाटली पण नंतर त्याने दूर्वाच्या हातून सगळी खिचडी खाल्ली.तिने दिलेल्या टॅबलेट्सही  त्याने निमूटपणे घेतल्या.

त्याचे पांघरूण ठिक करत दूर्वा जायला निघाली तसे धनेश पटकन बोलून गेला " मला झोप लागे पर्यंत थांबशील इकडेच??"

"feeling very lonely.Need somebody near me..Please..,If you can.. !! "

त्याचे वाक्य ऐकुन दूर्वा जाताजाताच थबकली.

तिने मागे वळून बघितले.धनेशच्या नजरेतील आर्जव तिला पाऊल पूढे टाकू देत नव्हते.

काय करावे ? तिही विचारात पडली.

मग किंचित हसून म्हणाली," खाली आई जेवायला वाट पहातेय.मी जेवण उरकून माझी पुस्तके घेऊन इकडेच येते अभ्यासाला,

चालेल??"

धनेशने मानेनेच होकार दिला तसे स्मित करतच ती खोलीबाहेर पडली.

इकडे गोळ्यांनी आपले काम चोख बजावले आणि धनेशला पडताक्षणी झोप लागली.

दूर्वा सगळे उरकून वर आली तेव्हा धनेश गाढ झोपलेला होता.तिने येताना दगडीपाला आणि हळदीचे वाटण केलेला लेप आणला होता त्याच्या जखमेवर लावायला.

कुठल्याही घावावर हे रामबाण उपाय म्हणून गावातले लोक वापरत असत.तिने हलकेच त्याचे पांघरूण बाजूला करून अलगदपणे त्याच्या जखमेवर तो लेप लावला.त्यावर पोटीस बांधुन जखम नीट झाकली आणि खोलीसमोरील सोप्यातच पुस्तक वाचत बसली.

मधूनमधून तिची नजर त्याच्याकडे जायची.तो झोपेत बघून पून्हा ती स्वत:ला वाचनात गूंतवून घेई.

दूपार टळली.सायंकाळची लालीमा सभोवार पसरली.ती केशरी किरणे खिडकीतून प्रवेश करून थेट धनेशच्या गोऱ्या चेहऱ्यावर पसरली तसा त्याचा मूळातला गोरा वर्ण अधिकच रक्तीम दिसू लागला.डोळ्यावर पडलेल्या त्या कलत्या उन्हाच्या तिरिपेनी धनेशची झोप चाळवली.

त्याची झालेली हालचाल पाहून दूर्वा लगबगीने त्याच्या जवळ येऊन बसली.आपल्या हाताने तिने त्याच्या माथ्यावरचा ज्वर तपासला.ताप थोडा कमी झाला होता परंतु अजुनही त्याचा हात कण्हारला होता.दुखऱ्या हातावर सूज चढली होती.

त्याचे आपल्या खांद्याकडे लक्ष गेले आणि आश्चर्यचकीत होऊन त्याने प्रश्न केला, " हे कोणी केले ? "

त्यावर दूर्वा हसतच उद्गारली, " ते पोटीस मीच बांधलेय तुमच्या जखमेवर.आमच्या गावात हाच झाडपाल्याचा ईलाज करतात.त्याने जखम लवकर भरून तर येतेच त्याशिवाय हळदीमूळे जखमेत पूं ही भरत नाही."

" अरे वाह् दूर्वा! तूला तर झाडपाल्याची बरीच माहिती दिसतेय की."

धनेशच्या कौतूकाने दूर्वा थोडीशी लाजली.काही न बोलताच ती झटकन तिकडून निघून गेली.

धनेशला खूप चूटपूट लागली.

"आपले बोलणे आवडले नाही की काय हिला?"

" छे .!! उगीच मी तिची तारीफ केली!!"

" गावातल्या लोकांशी कसा संवाद साधायचा हे काही कळत नाही..कशाचा काय अर्थ लावतील काही समजत नाही. "

" ह्यापूढे काही न बोलणेच बरे…"

मनाशी स्वत:च स्वत:ला बजावत धनेशने कूस वळवली.

आणि काय आश्चर्य!!!

ह्यावेळी खरच वेदना जरा कमी झाल्या होत्या.ताप थोडा कमी झाल्याने जरा फ्रेश फील करत होता.

जरा बरे वाटायला लागल्यावर आता घरात बसून एकट्याने करायचे काय? हा प्रश्न त्याला खाऊ लागला.काम सोडून घरी बसणे त्याच्या रक्तातच नव्हते. 

तितक्यात मोबाईलमधे कालचे सावंताच्या घरचे फोटो त्याला आठवले.बसल्या बसल्या तो पून्हा फोटोचे निरीक्षण करू लागला.

अजूनही काहीतरी होते जे त्याच्या नजरेतून सूटत होते.तेच शोधण्याचा तो प्रयत्न करत होता.

इतक्यात हवेची एक थंड झुळूक आणि त्यासोबत एक मंद सूवास खोलीभर पसरला.

तो सुगंध आपल्या श्वासात भरून घेत असतानाच दूर्वा एका हातात उदबत्ती स्टँड आणि दुसऱ्या हातात चहाचा कप घेऊन वर आली…

धनेशच्या खोली बरोबर आयुष्यातही असाच मंद सुगंध पसरण्याची ही नांदी तर नव्हती ना…….!


 

~~~~~~~~~~~(क्रमश:-8)~~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

दूर्वा बरोबर जुळणाऱ्या नात्यातून काही नविन नाट्य तर उदयाला येणार नाही ना….???

जाणून घ्यायला वाचत रहा..द सिक्रेट मिशन..

कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा..

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा लिंक नक्कीच शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all