द सिक्रेट मिशन भाग -6

रहस्यकथा - द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन भाग - 6

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[मागील भागात आपण पाहिले की धनेश आणि जगदाळे मंदिराच्या पूजाऱ्याशी संगनमत करवुन गर्भगृहाच्या दर्शनाची परवानगी मिळवतात.तिकडे खोदकामात सापडलेल्या दगडी पाईपाचे मूख कुठे जाऊन मिळते ह्याचा गूप्ततेने शोध सूरू होतो.धनेश सावंताच्या पत्नीची भेट घ्यायचे ठरवतो.]

आता पूढे…….

धनेश आणि जगदाळे सांगितल्या वेळेच्या आधीच नेहमीसारखे मंदिरात जाऊन पूजारी यायची वाट पहात बसतात.कालपेक्षा आज पूजारी तासभर आधी म्हणजे साडेतीन चारच्या आसपासच येताना पाहून जगदाळे आणि धनेश चकीत होतात.पण दोघेही त्याला काहीच बोलत नाहीत.तो निमूटपणे मंदिरात प्रवेश करून नेहमीसारखी पूजा करतो आणि अखेरीस हे दोघे कालच्या सारखेच दर्शन घेऊन बाहेर येतात.दरवाजा बंद करून पूजारी निघत असतानाच धनेश पुजाऱ्याला विचारतो," आज तुम्ही तासभर लवकर आलात कालपेक्षा?? "

पूजारी गांगरतो.काय उत्तर द्यावे त्याला समजेना.त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव धनेश आणि जगदाळे दोघांनीही अचूक टिपले.

मूळात ह्यांना कालच्यावेळी या सांगुन हा स्वत: मात्र लवकर आला हेच धनेशला पटले नव्हते.

म्हणजे ह्या दोघांना टाळून पटकन पूजा उरकुन पोबारा करायचा तर त्याचा प्लॅन नव्हता ना??

आपले खोटे दोघांसमोर उघड झाल्यामुळेच तो नजरेला नजर मिळवून उत्तर द्यायचे टाळत होता.जरा जोर लावुन तोच प्रश्न विचारल्यावर मात्र म्हातारा जोरानेच म्हणाला.

" माझ्याकडे वेळ बघायला घड्याळ कुठेय?दिसतेऽय ..दिसतेय का तुम्हाला?"

" जेव्हा जाग येते तेव्हा मी सरळ मंदिरात येऊन पूजा करून जातो."

पूजाऱ्याने केलेला युक्तिवाद ऐकुन दोघेही चूप झाले परंतु पूजारी काहीतरी लपवाछपवी करतोय हे ही त्याच्या बदलत्या चर्येवरून जाणवत होते.

तरीही त्याच्या जास्त तर्कटी न लागता आपला हेतू साध्य करण्या हेतुने धनेशही ह्या विषयाच्या जास्त खोलात शिरणे टाळले.

     ~~~~~~~~~~~~~~~

सकाळचा वॉक आणि देवदर्शन आटोपून रोजची सर्व कामे उरकुन धनेश पोलिस स्टेशनला पोहोचला.

आज सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे सावंतांच्या पत्नीची भेट.धनेशनी त्या केस संदर्भातली सर्व कागदपत्रे जवळ बाळगत बाईकवरच तालुक्याची वाट धरली.

भालेवाडी पासुन हे अंतर साधारण आठ ते दहा किमी.च्या आसपास असल्याने सावंतांची पोस्टींग जरी भालेवाडीत होती तरी त्यांचे बिऱ्हाड मात्र तालुक्याच्याच गावी होते.ते आठवड्याच्या सुट्टीत तालुक्याला मुक्कामी जात असत.

सावंतांच्या पत्नीने सांगीतलेल्या पत्त्यानूसार काही वेळातच ते एका दाराशी जाऊन पोहोचले.

दरवाजाची बेल वाजताच एका स्त्रीने दार उघडले.त्या सावंताच्या पत्नीच होत्या.

त्यांनी अदबीने दार उघडून धनेशचे स्वागत केले.धनेश बैठकीतल्या आटोपशीर सोफ्यावर बसला. बैठकीत बसल्या बसल्या सहजच सवयीनूसार धनेशची नजर घराचे निरीक्षण करू लागली.निरीक्षण करता करता त्याची नजर तिथे भिंतीवर लावलेल्या सावंतांच्या फॅमिली फोटोवर

थबकली.सावंतांची पत्नी पाणी आणायला आत गेली तेवढ्या वेळात धनेशने त्या फोटोचे वेगवेगळ्या अँगलने जमतील तेवढे फोटो आपल्या मोबाईलवर काढुन घेतले.

पाणी पिऊन त्यांच्या बायकोशी जुजबी गप्पा सुरू केल्या.त्यातुन असे कळले की सावंतांची पत्नी इथेच एका खासगी शाळेत नौकरी करत होती.लग्ना नंतर त्यांच्या नौकरी मूळेच सावंतांनी तालुक्याच्या गावी बिऱ्हाड थाटले.

तेव्हा सावंतांचे लग्न होऊन चार पाचच वर्ष झाली होती.त्यांना एक मुलगाही झालेला होता.

दर शनिवारी ते तालुक्याच्या गावी मुक्कामी येत असत परंतु 2012  च्या त्या डीसेंबर महिन्यात त्यांनी निघताना फोन करून आपल्या पत्नीला निघालोय  असे कळवूनही घरी मात्र पोहोचलेच नाहीत.

त्यांच्या पत्नीचा समज झाला की कदाचित एखादे काम निघाले असेल म्हणुन उशीर होत असेल पण चार पाच तास उलटूनही ते घरी परतले नाहीत तसा त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधला पण सगळ्यांचे म्हणणे पडले की ते तर पो.स्टेशनमधुन लवकरच निघाले होते.मग नंतर ते कुठे गेले हे कुणालाच माहित नाही.

त्यानंतर कायदेशीर मिसिंग कम्प्लेंट झाली, खूप तपास केला गेला पण आजपर्यंत त्यांचा कुठलाच ठावठिकाणा लागला नाही.

धनेशला ती सर्व माहिती ऐकुन मन सुन्न झाले.सावंतांची बायको एकटीच आपल्या मुलाला वाढवत होती.

धनेशने शेवटी प्रश्न विचारला,"त्यांच्या गायब होण्यापूर्वी ते कोणत्या केसबद्दल किंवा काही लोकांबद्दल तुमच्याशी कधी काही बोलले का?"

त्यावर तिने उत्तर दिले," तसे तर ते कामाच्या गोष्टी घरी बोलत नसत.परंतु गायब व्हायच्या आधीच्या आठवड्यात ते खूप अस्वस्थ वाटत होते.मी खूप खोदून विचारल्यावर त्यांनी एवढेच 

सांगितले की कोणीतरी त्यांच्यावर केस बंद करण्यासाठी दबाव आणत आहे.

ते त्या व्यक्तीचा शोध घेत होते.परंतु काही ठोस पूरावे हाती लागण्या पूर्वीच त्यांचीच केस मिसिंग झाली.

पोलिस खात्यातुन सुरवातीला बराच जोर लावला गेला पण नंतर नंतर ती केस फाईल्समधे बंद होऊन पडली.

मी अगोदर खूप तगादा लावून चौकशी करायचे पण नंतर नंतर मलाही उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.दरवेळी कुणीतरी वेगळाच ऑफीसर आलेला असायचा.त्यांना ह्या केसबद्दल माहित नसायचे.मग मी दरवेळी सगळ्या घटना प्रसंग ,आणि केस रजिस्टर केल्याचे सर्व पेपर्स दाखवायचे.

त्यावर ते आश्ववासन तर द्यायचे पण नंतर केस कुठवर आली विचारले की " शोध चालूय,काही कळताच कळवू आम्ही.तुम्ही सारखे सारखे फोन करू नका " अशी उत्तरे मिळायला लागली.मग मी ही आशा सोडून दिली साहेब.

"इतक्या वर्षात तुम्ही पहिले ऑफीसर आहात ज्यांनी स्वत:हून ह्या केसची चौकशी करायला फोन केला आणि प्रत्यक्ष भेटायला आलात."

तिच्या डोळ्यात हे बोलत असताना अश्रु तरळत होते.

धनेशने त्यांचे सांत्वन करत " मी पूर्ण प्रयत्न करतो ह्या केसच्या मुळाशी जाण्याचा " असे अश्वासन देत तिथुन बाहेर पडला.

पण म्हणजे धनेशचा अंदाज खरा होता.सावंत सारख्या प्रामाणिक ऑफीसरवर कुठलाही दबाव काम करेना तेव्हा कदाचित त्यांचेही अपहरण केले गेले..मग ही इतकी ताकदवर व्यक्ती कोण असेल जी इतक्या हालचाली गूप्त राहून करत आहे आणि मूळात ह्या सगळ्या मागचा उद्देश काय असेल??

लवकरात लवकर सत्य शोधायलाच हवे..पण कुठुनच काही क्लू मिळत नव्हते त्यामुळे धनेशचीही स्वत:वरच चिडचिड होत होती.

काम संपवुन तो पून्हा भालेवाडीत आला.

त्या दगडी पूरातन बांधणीच्या पाईपाचे दुसरे मूख त्या मंदिराच्या ईशान्य कोपऱ्याकडील बाजूने काही मीटर अंतरावर दिसेनासे झाले होते.

मंदिराचा इतिहास बराच जूना होता.

बांधकामही बरेच प्राचीन होते.हा पाईपही त्यावेळी पाणी वाहून जाण्यासाठीच बांधला गेला असणार.त्यात काही फार विशेष अस नव्हते.पण मग मंदिराच्या जवळपास मात्र त्याचे कुठलेच अवशेष का दिसत नव्हते?  हे काही धनेशला समजत नव्हते.

त्यासाठी मंदिराचा परीसरही तसाच पिंजून काढायची गरज होती.पण तसे करणे म्हणजे पूजाऱ्याची परवानगी मिळवणे हिच सगळ्यात मोठी समस्या होती.

ह्यातुन कसा मार्ग काढावा हाच विचार धनेश करत होता.

जर असे गृहित धरले की तो पाणी वाहून नेणारा साधारण पाईप आहे तर मग पूर्वी कधीतरी नक्कीच ह्या मंदिरात अभिषेक होत असेल.मग ह्या मंदिरात तर सध्या वेगळाच नियम आहे.कोणत्याही प्रकारच्या अभिषेकाला इकडे परवानगी नाही हे कसे काय???

आणि जर मूर्तीवर कुठलेही अभिषेक निशिद्ध आहेत तर पाईपाच्या तोंडाशी सापडलेला तो द्रव तर अगदी ताजा वाटत होता...हि नेमकी काय भानगड आहे?

त्यात मंदिर महिन्यातून एकदा पूर्ण बंद का असते?

ह्या सगळ्याचा मंदिराशी काही संबंध आहे का?

आणि जर तसा काही संबंध असेलच तर ह्याचा सुत्रधार कोण?

ह्या सगळ्या प्रश्नांची गुत्थी सोडवण्यासाठी धनेश मनातल्या पुढची स्ट्रॅटेजी काय करावी हा प्लॅन करत होता.

विचार करता करताच तो भालेवाडीत येऊन पोहोचला देखील.

पोलिस स्टेशनमधे शिरत असतानाच तो परत माघारी आला.कोणीतरी झरकन वळून दिसेनासे व्हावे तसा भास झाला.मागे फिरून चहुबाजूने आवारात सुक्ष्म निरीक्षण करून पाहिले पण तिकडे कोणीच जाताना दिसले नाही.

आपल्या खूर्चीत बसुन तो सावंतांच्या घरी काढलेले फोटो बारकाईने झूम करून पहात काहीतरी गहन विचार करत होता इतक्यात जुम्मन आला.

" साहेब,काय झाले माझ्या बहिणीच्या केसचे? "

धनेष आपल्या तंद्रीतून बाहेर आला आणि एक कटाक्ष जुम्मनकडे टाकला.

त्याच्याजवळ जुम्मनला सांगण्यासारखी कोणतीच पॉझिटीव्ह लीड नव्हती..तो काय सांगणार होता जुम्मनला.? त्याला खूप हतबल वाटत होते.

परंतु चेहऱ्यावर कुठलीही उदासिनता न दिसू देता तो किंचित स्मित करत म्हणाला," आम्ही त्याच केसवर काम करतोय.नक्कीच काहितरी ठोस बातमी लवकरच मिळेल.प्रयत्न चालू आहेत. "

धनेष चक्क खोटे बोलत होता परंतु जुम्मनच्या मनाची निराशा न होवो ह्या कारणास्तव तो हे असे बोलत होता.

जुम्मन रडवेल्या सूरात काळजीने म्हणाला," साब,आज हफ्ता होने को आया.कहाँ होगी मेरी सईदा? मुझे अब चिंता होने लगी है उसकी.., ,,उसके साथ कुछ भला बूरा तो नही हुवाँ होगा ना?"

हे वाक्य आवंढा गिळतच जुम्मन बोलला आणि रडायला लागला.त्याच्या डोळ्यात पुढच्या आशंकेची भीती साफ साफ दिसत होती.

धनेशच्या मनातही अगदी हिच शंका निर्माण झाली होती पण तो ती बोलून दाखवत नव्हता.

त्याने जुम्मनचे सांत्वन करून त्याला कसेबसे पाठवले आणि लगेच जगदाळेंना बोलावले.

" जगदाळे,आत्ताच्या आत्ता सगळ्या आसपासच्या गुन्हेगारीशी संबंधीत लोकांना पकडून आणा.नक्की कुणाकडून तरी काही ना काही माहिती मिळेल.सोबत कदमांनाही घेऊन जा.एकटे जाऊ नका.आणखी एक, तो बुरखाधारी जिथे कुठे सापडेल त्याला शोधून माझ्या समोर हजर करा.त्याला कोठडीची हवा द्यावी म्हणतो एकदा."

" जयहिंद सर.लगेच कामाला लागतो.." 

असे म्हणतच जगदाळेंनी कदमांसोबत आधी मागील रेकॉर्डवरून सर्वांच्या नावाची एक यादीच तयार केली आणि मग बाहेर पडले.

सगळी कबील वस्ती पालथी घालून आत्तापर्यंत जे जे गुन्हेगारीच्या संबंधात कुठल्या ना कुठल्या केसमधे अडकलेले होते त्यांना शोधुन दोघेही त्यांना पकडून ठाण्यात घेऊन आले.

धनेशनी प्रत्येकाची कसून चौकशी केली पण ह्यापैकी कोणीच सईदा बद्दल काहीच सांगू शकले नाही.एक मात्र दुसऱ्यांच्या हो ला हो मिसळत होता.धनेशची नजर पडली की मान वळवुन दुसरीकडे पहायचा.ते लक्षात येताच धनेशने तो सोडून बाकी सगळ्यांना सोडले.आता त्याची एकट्यात कसुन चौकशी केली तेव्हा घाबरत घाबरतच त्याने एक अशी गोष्ट सांगितली की जी ऐकुन धनेशला धक्काच बसला.त्याने दिलेली माहिती कितपत खरी होती ह्याची शहानिशा तर करावीच लागणार होती.

धनेशने त्याला एकाच अटीवर सोडले.जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत गाव सोडून कुठेही जायचे नाही आणि वेळ आली तर साक्षीदार  म्हणुन हेच सगळे कोर्टात सांगायचे.

तो ही हो म्हणतच घाबऱ्या घाबऱ्या पो.स्टेशनमधुन बाहेर पडला.

धनेषच्या विचारांना आता एक दिशा मिळत होती.पूढे काय करायचे ह्याचे प्लॅनिंग मनात तयार होऊ लागले तसे त्याच्या चेहऱ्यावर हलकेच समाधान पसरले.

दिवस कलून आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता.

सकाळ नंतर सावंतांच्या घरी जाण्याच्या नादात धनेश आज जेवलाच नव्हता.त्याला आता कडकडून भूक लागली होती.ताबडतोब सगळी टेबलावरची आवराआवर करतच तो जगदाळेंसहीत बाहेर पडला…

      ~~~~~~~~~~~~~~~~

रात्रीची जेवणे उरकली तसे धनेश आपल्या बिछान्यात पडल्या पडल्या सावंतांच्या फॅमिली फोटोला पून्हा पून्हा निरखून पाहू लागला.एक गोष्ट बघुन त्याचे डोळे चमकले.तो काहीतरी विचार करू लागला…

उद्यासाठीचा तीनचा अलार्म लावून मनातल्या मनात काहीतरी ठरवुन तो झोपी गेला.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

त्या भिल्लाने कोणती चमत्कारिक माहिती धनेशला दिली?

धनेशने त्याचा उलगडा करण्यासाठी काय प्लॅनिंग केले?

तो त्याच्या प्लॅनमधे यशस्वी होईल का?

फोटोमधे धनेषला अशी कोणती गोष्ट सापडली ज्यामुळे त्याचे डोळे लकाकले?? 

ह्या सगळ्या प्रश्नांसहीत लवकरच भेटू पूढील भागात…

~~~~~~~~~~~~(क्रमश:-6)~~~~~~~~~~~~~~~ 

©®राधिका कुलकर्णी.

आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमधे जरूर कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all