द सिक्रेट मिशन भाग -7

रहस्यकथा द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन भाग - 7

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[मागील भागात तुम्ही वाचले की धनेषला पकडलेल्या गुन्हेगारांपैकी एका भिल्ला कडून काहीतरी खास माहिती मिळाली.

इकडे सावंताच्या घरच्या फॅमिली फोटोतही धनेशला एक विशेष गोष्ट दिसली ज्यामुळे त्याचे डोळे चमकले.जुम्मनच्या बहिणीच्या अपहरणाची गुत्थी सोडवण्याची एक दिशा तर मिळाली ज्या समाधानात धनेश झोपी गेला.]

आता पूढे……..

रोजच्या मंदिरात जाण्यामुळे पूजारी आता जरा सरावला होता.धनेषच्या उपस्थितीत पूर्वीसारखा तो भांबावायचा नाही.त्यांची एकमेकांना बऱ्यापैकी सवय झाली होती त्यामुळे वागण्या बोलण्यातही सहजता आली होती.आज पूजेनंतर पूजाऱ्याशी संवाद साधायचा हे ठरवुनच तो मंदिरात पोहोचला.

गर्भागाराचे दर्शन घेऊन धनेष पायऱ्यांशी टेकला.गाभाऱ्याचा दरावाजा बंद करून नेहमीप्रमाणे पूजारी जाऊ लागला तसे धनेशने त्याला रोखले.

" गुरूजी बसा की जरावेळ..एवढी काय घाई आहे जायची? "

धनेषच्या बोलण्यामूळे पूजारीही तसाच पायरीवर टेकला.

धनेषने आपल्या गोड वाणीतच हळूहळू पूजाऱ्याला बोलते करायचा प्रयत्न सुरू केला.

"गुरूजी वय काय हो तुमचे?"

डोळे जरासे किलकिले करत माथ्यावर प्रचंड आठ्यांचे जाळे विणत आठवायचा प्रयत्न करत पूजारी म्हणाला," भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाऽऽऽ मी असेन 10/12 वर्षाचा.नक्की तारीख तर काय आठवत नाही मलाही. "

"बापरेऽऽऽ..! म्हणजे ऐंशीच्या पूढेच दिसता की तुम्ही..तरीही ह्या वयातही इतके तंदुरूस्त आहात,काय रहस्य आहे ह्या तंदुरूस्तीचे? जरा आम्हाला पण कळूदेत की… "

धनेशने केलेल्या कौतुकाने पूजारी हरखला मनोमन.मग जरा मनमोकळेपणाने हसुन तो संवाद साधता झाला.

" त्याचे काय आहे साहेब,जन्मापासुन रानात वाढलो.रानचा मेवा,औषधी झाडपाल्यांच्या सेवनाचा परीणाम असेल बाकी काही नाही…"

धनेशने आता मुद्द्यावर यायला सुरवात केली.

"अरे वाह् गुरूजी!! मग तर तुम्हाला बऱ्याच जडीबुटींची माहिती असणार.त्याबद्दल आम्हालाही सांगा की कधी."

"बर मग तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी पासून इकडे मंदिराची देखभाल करताय?"

पूजारीही रंगात येऊन सांगू लागला." आता वय किती ते नाही सांगता येणार पण.जसे समजतेय तसे ह्या मंदिरात येत होतो.हळूहळू ह्याची साफसफाई मग पूजा-अर्चना करायला लागलो."

"बरं आणखी एक प्रश्न विचारू का?"

धनेशने विचारले.

" हो विचारा की.."

पूजारी आज बऱ्या मूडमधे असावा किंवा धनेशच्या कौतुकाने हुरळला म्हणूया पण रोज पूजा झाली रे झाली की मंदिरातून पळ काढणारा आज पहिल्यांदाच बोलण्यासाठी उत्सुक दिसत होता.

धनेशने त्याच्या मनात खदखदणारा तोच प्रश्न पूजाऱ्याला विचारला," ह्या मंदिरात अभिषेक ,पूजा आणि गर्भगृहात दर्शनाला मज्जाव का आहे? "

त्या प्रश्नावर पूजारी एकदम चपापला.त्याला काय उत्तर द्यावे समजेना.उगीचच इकडे तिकडे नजर फिरवत तो उत्तरला, " त....तेऽऽ...तेऽऽ काही माहित नाही मला..इकडे अशीच प्रथा आहे.म्हणुन आम्ही पण त्याचे पालन करत आलोय.."

उत्तर देताना पूजाऱ्याची उडालेली भंबेरी बघुन धनेषच्या लक्षात आले की पूजारी काहीतरी लपवतोय पण काय ते कळत नव्हते.

संयम राखत धनेश पूढे बोलला, " हो..बरोबर आहे तुमचे.प्रथा परंपरांचे पालन तर केलेच पाहिजे पण मग महिन्यातुन एक दिवस मंदिर पूर्ण बंद असते म्हणे….ते का ? आणि कोणता विशेष दिवस असतो हा ? "

पूजाऱ्याची चूळबूळ वाढू लागली आता.धनेशचे एकावर एक प्रश्न त्याला भाल्याप्रमाणे टोचू लागले.कारण आजवर असे प्रश्न त्याला कोणीच विचारले नव्हते त्यात मंदिराबद्दलची माणसे मरण्याची  वदंता त्यामूळे तिकडे कोणीच फिरकत नसे मग मंदिरच दुर्लक्षित असेल तर कोण कशाला प्रश्न विचारतील??

गावातली अशिक्षित अडाणी जनता.पूजाऱ्याचे तोंडही त्यांना कधी दिसायचे नाही मग विचारतील तरी  कुणाला?

पण धनेशने मात्र आज पूजाऱ्याला चांगलेच कोंडीत पकडले होते.उत्तर दिले तरी पंचाईत नाही दिले तरी पंचाईत…

शेवटी घाईघाईने उपर्णे सावरत पूजारी म्हणाला, "सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच मिळवायची घाई थोडीच आहे.सांगेन कधीतरी फुरसदीत.चला आज खूपच उशीर झालाय.मला निघायला हवे.येतो मी…"

थोडे अंतर पूढे जाताच काहीतरी आठवले तसा पूजारी बूवा पून्हा मागे आला व म्हणाला,  "आणखी एक..उद्या मंदिर बंद राहील हा.. तेव्हा उद्या ऐवजी थेट परवाच या."

 सांगता सांगताच पूजारी घाईघाईने दिसेनासा झाला.

धनेश मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक टक पहात राहीला.त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देत पूजारी शिताफीने सुटला होता.

तरीही धनेशच्या चेहऱ्यावर कसलेतरी समाधान विलसत होते.

लवकरच सगळ्या घटनांचा गूंता सुटण्याची आस आता मनोमन जागी झाली होती.

         ~~~~~~~~~~~~~~~

दिवसभरातल्या सगळ्या धावपळीनंतर दिवस मावळला तसा धनेश जगदाळेंसह घरी आला.रात्रीचे जेवण उरकुन धनेश आपल्या पोटमाळ्याच्या खोलीत गेला.

पण का कुणास ठाऊक त्याला खूपच अस्वस्थ वाटत होते.मंदिर उद्या बंद राहणार म्हणजे त्याबाबतीतले गूढ माहिती करून घ्यायला आजच्या इतका योग्य दिवस नाही.जायला तर हवेच….

ही हिंम्मत कोणी ना कोणीतरी करायलाच हवी.अशी संधी परत इतक्या लवकर मिळणार नाही.

काय करू? जाऊ का मंदिराकडे??

जगदाळेंना सांगावा का आपला मनसूबा? 

पण त्यांनी ह्या गोष्टीला मोडता घातला तर??

"नाही नाहीऽऽ..ही इतकी नामी संधी हातची घालवून चालणार नाही.मला काहीतरी केलेच पाहिजे.."

मनातल्या मनात विचार करत धनेशने एक सिगारेट सुलगावून पोटमाळ्याला असलेल्या मागच्या खिडकीकडे तोंड करून उभा रहात एक झुरका हवेत सोडला.इतक्यात मागील परसाकडे काही सावल्या हलताना दिसल्या. पटकन स्वत:ला खिडकी आड सारत किलकिल्या डोळ्याने धनेशने बाहेर बघितले.ह्यावेळी मात्र त्या सावल्या गायब झालेल्या होत्या.

कसल्या असतील त्या सावल्या ?

त्या मानवी सावल्याच होत्या की झाडाच्या फांद्या??

आपल्याला काही भास तर होत नाहिएत ना??

धनेशच्या पोलिसी मेंदूत विचारांची गिरणी सुरू झाली.

कोणी माझ्या पाळतीवर तर नसेल ना ?

हि एखाद्या संकटाची चाहूल तर नाही ?

पण काय असेल ते संकट ?

विचार करून धनेशचे डोके गरगरायला लागले.

डोक्यात अशी विचारांची लडी फूटायला लागली की धनेशला सिगारेटची गरज भासे.त्याने लगेच दुसरी सिगारेट शिलगावली.एक मोठ्ठा कश नाकात भरून घेतला.बंद डोळ्याने नाका तोंडातून धूर बाहेर सोडला...

मग काय वाटले कोण जाणे…..ती सिगारेट तशीच विझवून त्याने खिडकी बाहेर फेकून दिली.काहीतरी विचार मनाशी पक्का करून तो कामाला लागला.

वरच्या लाकडी कप्प्यातून आपली सॅक बाहेर काढली आणि काही वस्तू त्यात भरू लागला.

बाहेर थंडी मी म्हणत होती.त्याने एक वाकळ जसे इकडची लोक वापरतात तशीच अंगावर लपेटली.आपले सर्व्हीस रीव्हाॅल्व्हर पँटच्या खिशात सरकवले.सॅकमधे एक दूर्बीण,वॉटर बॉटल,हातात पोलीसी दंडू,मोबाईल,एक हाय लेन्सेस कॅमेरा अशा आवश्यक गोष्टी एकत्र करत मध्यरात्र उलटायची वाट पाहू लागला.सगळे गाव सूमसाम झाले की मगच तो आपल्या कामाला लागणार होता.अजून किमान दिड तास तरी त्याला घरातच वाट पहावी लागणार होती.

मधुनच तो खिडकीतून मागील परसाचा अंदाज घेत होता.

तर समोरच्या जिन्याकडून जगदाळेंच्या घराची चाहूल घेत होता.

अखेरीस बारा एकच्या सुमारास त्याला हवी तशी गडद शांतता झाली आणि त्याने पायात गमबूट चढवले.

हलकेच पायऱ्या उतरून तो समोरच्या गेटने दबक्या पावलाने बाहेर पडला.

रातकीड्यांचा किर्रकिर्र आवाज त्या निरव शांततेचा भंग करत होते बाकी गाव मात्र दुलईच्या ऊबेत गाढ झोपलेले होते.

बाहेर पौर्णिमेच्या चंद्राचा सौम्य दूधाळ प्रकाश पडलेला.त्या पीठूर चांदण्यात पायवाट नीट दिसत होती.धनेश सावधपणे पावले टाकत आजुबाजूचा कानोसा घेत पूढे जात होता.

थोडे पूढे जाऊन एका गल्लीच्या तोंडाशी तो वळणार इतक्यात एक तसाच वाकळधारी मनुष्य पाठीवर कसलेतरी वजनदार पोते वाहून नेताना दिसला.त्याने स्वत:ला भिंतीआड लपवले.अगदी बारीक डोळ्याने त्याच्याकडे नीट निरखून पाहिल्यावर धनेशला त्या पाठीवरील पोत्याची हालचाल होताना दिसली.एखादा प्राणी बकरी,डूक्कर किंवा मग कुत्रं/मांजर असावे अशी ती हालचाल बघून धनेश अगदी चोरपावलाने त्या व्यक्तीच्या मागे जात राहीला.अंतर बरेच कमी करत आपला वेग वाढवत धनेशने त्याचा पाठलाग चालूच ठेवला.

त्याच्यापासुन काही अंतर जवळ येताच मात्र त्याला जाणवले की पोत्यातून कोण्यातरी मनुष्यप्राण्याचा  "सोडा साेडा…!!" असा अस्फूट आवाज येत होता.हा नक्की काय प्रकार आहे हा अंदाज येत नसला तरी एखाद्या मनुष्यप्राण्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात असावा ही मात्र त्याची मनोमन खात्री पटली.

त्याने सावध पवित्रा घेत श्वास रोखला आणि धावत जाऊन त्या पोत्याला मागून जोरदार धक्का मारला.

त्या अनपेक्षित धक्याने पोते त्या माणसाच्या हातातून खाली पडले आणि त्यातून बांगड्यांचा खळ्ळखळ आवाज झाला.

वाकळधारी व्यक्ती सावध होऊन गर्रकन मागे वळली.त्या अंधुक प्रकाशात तोंडावर कपडा बांधल्याने धनेषला त्याचा चेहरा नीट दिसू शकला नाही.

कोणीतरी केलेल्या अशा अवचित हल्ल्याने तो क्षणभर गोंधळला पण लगेच दुसऱ्याच क्षणी एक तीक्ष्ण हत्यार बाहेर काढून तो धनेशसमोर उभा ठाकला.धनेशनेही प्रसंगावधान राखत अत्यंत चपळाईने त्याच्या एका हाताला काठीचा एक जाेरदार वार करत हिसडा देत ते धारदार शस्त्र खाली पाडले आणि दुसऱ्या हाताने त्याच्या नाकावर एक जाेरदार ठोसा लगावला.धनेशच्या पोलिसी मजबूत हाताच्या ठोस्याने त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले आणि त्या वाराच्या वेदनेने तो हेलपाटत लांब जाऊन पडला.

तेवढ्या वेळात धनेशने पोत्याचे तोंड मोकळे करण्याचा प्रयत्न केला इतक्यात त्या व्यक्तीनेही चपळाईने तेवढ्या वेळात जमिनीवरचे शस्त्र पून्हा उचलले आणि त्वेषाने धनेशवर वार केला.त्या अवचित प्रहाराने धनेशच्या खांद्याला हलकेच तो वार चाटून गेला आणि त्यातुन रक्ताची एक चिळकांडी उडाली.त्यामुळे धनेशची पोत्यावरची पकड सुटली.तरीही आपल्या जखमेची पर्वा न करता स्वत:ला सावरत तो उभा राहिला.

पूर्ण ताकदीनिशी त्याने वाकळधारी मनुष्याला पकडण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याने सर्वांगाला कसलेतरी ऊग्र वासाचे तेल फासलेले असल्याने त्याचे हात धनेशच्या हातातून निसटले.तिच संधी साधून परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून त्या माणसाने तिथुन पोबारा केला आणि अंधारात दिसेनासा झाला.तो गेलेल्या वाटेकडे धनेश असहाय्यपणे पहात राहिला.

अंधारामूळे आणि कपड्याने झाकलेला असल्या कारणाने धनेशला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही.आपल्या हातून एक महत्त्वाचा पूरावा निसटला ह्याचेे धनेशला प्रचंड दू:ख होत होते.

त्याला पकडण्यात जर यश मिळाले असते तर मागील सर्व केसेसचा तो एकमेव साक्षीदार तर बनू शकला असताच पण गेल्या कित्येक वर्षांपासुन भालेवाडीत घडणाऱ्या मिसिंग केसेसच्या भयावह नाट्यामागचा सूत्रधार आणि त्यामागचे कारण दोन्हीही उजेडात यायला मदत झाली असती पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही ह्याचे धनेशला खूप म्हणजे खूपच वैषम्य वाटत होते.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब एकच होती ती म्हणजे एका व्यक्तीचे (कदाचित स्त्रीचे?) पून्हा अपहरण होण्यापासुन तरी तो वाचवू शकला होता.

गुन्हेगार काय आज नाहीतर उद्या सापडेलच पण कोणाची तरी सहिसलामत सूटका केली हे समाधान मात्र फार मोलाचे होते त्याच्यासाठी.

त्याने पोत्याचे बांधलेले तोंड घाईघाईने मोकळे केले.आतील व्यक्ती बराचवेळ कोंडून राहील्याने तिचा श्वास गुदमरला होता.धनेशने त्या व्यक्तीच्या तोंडावर सॅकमधल्या वॉटर बॉटलमधले पाणी शिंपडले तसे तिने हालचाल करायला सुरवात केली.आपल्या विजेरीच्या प्रकाशात त्याने चेहरा निरखून बघितले आणि समोरचे दृश्य बघुन धनेशचे हातपायच थंड पडले.

आश्चर्य आणि भयचकीत मूद्रेने तो एकटक त्या व्यक्तीकडे पहात राहीला…………..!!

~~~~~~~~~~~(क्रमश:-7)~~~~~~~~~~~~~~~~

कोण असेल ती पोत्यातली अपहारीत व्यक्ती??

धनेशने जगदाळेंना त्या बुरखाधारी व्यक्तीला ताबडतोब पकडून आणण्यास सांगितले होते. त्याला हजर करण्यात जगदाळे यशस्वी होतील का?

धनेश ह्या सगळ्या केसेसचा छडा लावू शकेल ?

त्याच्या मनातली स्वत: बद्दलची भीती खरी असेल की खोटी???

काय होणार पूढे…..!!

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला पूढचा भाग नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रीया नक्की कळवा.

(रहस्यकथा लिखाणाची ही माझी पहिलीच वेळ आहे.उत्तम द्यायचा प्रयत्न करतेय.माझ्या ह्या प्रयत्नात मी कितपत यशस्वी झालेय हे मला फक्त तुमच्या कमेंट्समधुनच कळणार आहे.तेव्हा प्लिज वाचून तुमचे अभिप्राय कळवा.

काही चूकल्यास क्षमस्व..)

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत लिंक कुठेही शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.


 

🎭 Series Post

View all