द सिक्रेट मिशन भाग -3

रहस्यकथा - द सिक्रेट मिशन

द सिक्रेट मिशन भाग-3

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[आधीच्या भागात आपण पाहीले की धनेष जगदाळेंकडून त्या लपलेल्या माणसाची माहिती मिळवतो. त्याच्या बाबतीत अजून काही माहिती मिळतेय का ह्याचा जगदाळे प्रयत्न करत आहेत.धनेशने जगदाळेंच्या घरचा पाहुणचार घेत तिकडेच मुक्काम केला.]

आता पूढे……

सकाळच्या किलबिलाटाने जाग आली तसा धनेश कुडकुडतच खाली आला.थंडी नुकतीच सुरू झालेली असली तरी जंगलाला लागून असल्यामूळे भालेवाडीत जास्तच गारवा पडलेला होता.धनेश हलक्या पावलाने जीना उतरून खाली आला तर समोर जगदाळे हजर.

"अरे व्वा जगदाळे.तुम्हीही जागेच दिसताय."

"कोणी जागे नाही बघुन मी जरा गावात फेरफटका मारायचा विचार करत होतो.मॉर्निंग वॉकही होईल आणि गावही बघणे होईल."

धनेशने आपली मनिषा बोलून दाखवली.

त्या बरोबर जगदाळे उत्साहात म्हणाले,"मग चला की साहेब,मीच फिरवुन आणतो तुम्हाला सगळे गाव.साहेब इकडे जंगलाला लागून एक अति प्राचीन शीवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे.फार सुरेख आहे.तेही पाहू.चला निघु."

दोघांनीही चूळा भरल्या आणि गावाचा फेरफटका मारत जंगलाकडे जाणाऱ्या पायवाटेला लागले.परीसर खूपच शांत आणि मनाला सुखद आनंद देणारा होता.पायवाटेने बरेच पुढे गेल्यावर दूरून मंदिराचा कळस दिसू लागला.अवतीभोवतीने भरूपूर झाडी असल्याने जवळ जाईपर्यंत मंदिर दृष्टीक्षेपात येत नव्हते.

अखेरीस ते मंदिराच्या विस्तिर्ण आवारात पोहोचले.त्या आवाराला पार करून ते दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात पोहोचले.चहू बाजूंनी उघडा चौथरा परंतु खांबांवर आणि छतावर अतिशय सुंदर कोरीवकाम असलेले ते मंदिर मनाला भूरळ पाडणारे होते.इतिहासाची कित्येक पाने ह्या वास्तुने आपल्या आठवणीत साठवली असतील ह्याची नुसती कल्पनाच केलेलीच बरी.

मंदिरात प्रवेश करण्या अगोदर गाभाऱ्यात जाण्यास एक जाळीचा दरवाजा होता.ते कूलूपबंद होते.दर्शनाला फक्त तिथुनच परवानगी होती.धनेशने जाळीतून आत डोकावुन पाहिले तर एक भव्य जवळपास आठ नऊ फूट उंचीची शाळूंका असलेले शिवलिंग आत स्थापीत होते.ती शाळूंकाही दगडीच होती.नुकतीच त्याची पूजा झाल्याने वातावरण प्रसन्न दिसत होते.आतून उदबत्तीचा मंद सूवास येत होता आणि बाजूलाच एक छतापासून लोंबती समई मंद तेवत होती.बाकीचा गाभाराही नितांत स्वच्छ होता.परंतु इतक्या सुंदर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश का नाही ह्यावर मात्र धनेशला प्रश्न उमटायला लागले.त्याने हात जोडून नमस्कार करतच जगदाळेंना विचारले,"काय हो जगदाळे,मंदिर तर इतके छान आहे मग इकडे गाभाऱ्यात जायला परवानगी का नाही?"

त्यावर जगदाळे म्हणाले,"आता काय सांगू साहेब.मी जसा इकडे आहे हे मंदिर असेच बंद असते.ह्याचा पूजारी पहाटेच मंदिराची पूजा करून दार बंद करून निघुन जातो.अशी दंतकथा ऐकलीय की ह्या मंदिरात कुठल्याही अभिषेकाला मज्जाव आहे.मागे काही वर्षा पूर्वी असे घडलेय की मंदिरात अभिषेक केला की ती माणसे मरतात किंवा गायब होतात तेव्हापासुन मग हे मंदिर गावकऱ्यांना बंदच असते फक्त इथुनच दर्शन.इकडे कुठलाही सोहोळा समारंभही होत नाही.महिन्यातुन एक दिवस तर हे गाभाऱ्याचे दारही पूर्ण बंद असते.त्यादिवशी ह्या दारातुनही दर्शन होत नाही.आता हे किती खरे किती खोटे परमेश्वर जाणे पण विषाची परीक्षा कोण घेणार म्हणून घाबरून कोणीही गाभाऱ्यात जायला मागतच नाही."

धनेशला ही कथा फारच इंट्रेस्टींग वाटली.तशाही प्रत्येक पुरातन मंदिरांशी अशा काही ना काही आख्यायिका जाेडलेल्या असतातच पण हे प्रवेश केला की माणूस मरतो किंवा गायब होतो ही गोष्ट काही धनेशच्या मनाला पटत नव्हती पण तसे त्याने बोलुन न दाखवता फक्त ऐकुन घेतले.

मग म्हणाला,"बर मग इकडचा पूजारी ?तो कुठे असतो?"

जगदाळे - "अहो साहेब तो जंगलाला लागुनच तिकडे राहतो.महा तर्कटी म्हातारा आहे.

जवळपास ऐशीच्या घरात असेल आता पण तो पहाटे कधीतरी पूजा करून दार बंद करून निघुनही जातो.."

"बर एक काम करू.आपण उद्या भल्या पहाटे येऊन त्या पुजाऱ्याला भेटू.मला आता त्याच्याशी भेटण्याची उत्सुकता लागलीय.इतका वयोवृद्ध व्यक्ति म्हणजे त्याला नक्कीच ह्या मंदिराविषयी अजुन काही माहिती असेल.त्याच्याशी बोलायला हवे."

संवाद पूर्ण करतच दोघेही मंदिराबाहेर पडले.सकाळची थंड हवा घेत मस्त पायपीट करत दोघेही घरी पोहोचले.

आन्हिक उरके पर्यंत जगदाळेंच्या पत्नीने मस्त पैकी गूळाचा चहा आणि न्याह्यारी तयार ठेवली होती.

बरीच पायपीट झाल्यामूळे आता धनेशलाही भूकेची जाणीव होतच होती.त्याने तांदूळाच्या कण्यांचा तो गरमागरम उपमा संपवुन चहा घेतला.गूळाच्या चहाची चव थोडी वेगळी असली तरी त्याला चूलीतल्या शेकाचा लागलेला दर्प वेगळाच फ्लेवर देत होता.त्याने एका दमात तो चहा संपवला आणि दोघेही कामाकरता पोलिस स्टेशनच्या दिशेने निघाले..

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~

काल काढून ठेवलेल्या सर्व फाईल्स वर आज त्याने पून्हा बारकाईने नजर फिरवायला सूरवात केली तेव्हा एक गोष्ट त्याला सर्व केसेस मधे कॉमन जाणवली.प्रत्येक केस मिसिंगची होती आणि ती केस दाखल झालेली असतानाचे त्यावेळी कार्यरत असलेले पोलिस अधिकारी एकतर बदलून गेले होते किंवा मग त्यांनी रीटायरमेंट घेतलीय.फक्त एक केस वेगळी होती.मि.सावंतांची.त्या केस मधे सावंत स्वत: केसच्या शोधा दरम्यानच मिसिंग झाले होते.एका पोलिस ऑफीसरची कार्यकालात मिसिंग केस फाईल होऊनही त्यावर कुठलाही तपास न होता ती फाईल क्लोज करण्यात आली ह्या गोष्टीचे धनेशला जास्त कुतूहल वाटले.

त्यात आज मंदिराची ऐकलेली आख्यायिका.ह्या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध तर नसेल???धनेशच्या डोक्यात ह्या सगळ्या घटनांनी विचारांचे किडे वळवळायला सुरवात झाली.

तो कामात मग्न असतानाच त्याला पून्हा जाणवले की खिडकीच्या आडून कोणीतरी लपून त्याच्याकडे बघतेय.मान वर करून जरा आळोखे पिळोखे देत तो खोलीच्या बाहेर सहजच जातोय दाखवत खिडकीकडे गेला पण तिकडे कोणीच नव्हते.

म्हणजे कालपासुन होताहेत ते भास आहेत की खरच कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतेय??ह्या विचारांनी त्याच्या मनात गर्दी करायला सुरवात केली.

ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र पक्की होती की सिबीआयला येणारे सस्पिशियस कारवायां बाबतचे रिपोर्ट्स अगदीच बीनबूडाचे नव्हते.ह्यात काहीना काही सत्य नक्कीच दडले होत आणि ते आपल्याला लवकरात लवकर शोधुन काढले पाहिजे तेही कुणालाही कसलाही सुगावा न लागू देता..काम तसे खूप जोखमीचे होते कारण मांडकेंवर भरोसा टाकण्या लायक तो वाटत नव्हता.थोड्याश्या पैशांच्या अभिलाषेत ते सगळे कुणालाही सांगू शकत होते.त्यामुळे आपल्याच डिपार्टमेंटच्या एका लाचखाऊ अधिकाऱ्यापासुन गोष्टी लपवुन त्यांच्या नाकाखालुन सगळी गुप्तता राखून हे तपासकार्य करणे वाटते तितके सोप्पे नव्हते.पण जेव्हा कामगिरी जास्त चॅलेंजिंग असते तेव्हाच तर धनेशची आठवण होते ना डिपार्टमेंटला.मग ही कामगिरी फत्ते केल्याखेरीज मी चैन बसणार नाही हे मनाशी पक्के करत सिगारेटचा एक झुरका मारत धनेश पून्हा आपल्या टेबलवर येऊन बसला.

जगदाळे सहीत प्रत्येकाला बोलावुन आधीच्या सर्व मिसिंग केसेस मधले त्यावेळचे पोलिस अधिकारी आता कुठे कार्यरत आहेत त्यांची सर्व माहिती काढायला त्याने डिपार्टेमेंटच्या प्रत्येकावर सोपवली.सावंतांची मिसिंग केस मात्र त्याने जगदाळेंना सोपवली.तोही त्याच केसवर जास्त लक्ष घालणार होता.

सगळ्या कामाची विभागणी झाली तसे धनेशने मांडकेंनाही ह्यात सामील केलेय हे भासवण्या करता मिसिंग केसेसच्या सर्व नातेवाईकांची लिस्ट तसेच ते आत्ता कुठे आहेत. हयात की मयत ही सर्व माहिती काढायला सांगितली.

मांडकेही उत्साहाने कामाला लागले.आता मांडकेंना कुठल्यातरी कामात व्यस्त ठेवणे गरजेचे होते जेणे करून ते कमीतकमी वेळ पो.स्टेशनात उपस्थित राहतील.ज्यामूळे त्यांच्या अपरोक्ष कारभार करणे त्यांना सोपे जाईल.

मांडकेला हलक्यात घेऊनही चालणार नाही हे ही धनेशच्या लक्षात आले होते.त्याने त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

बाहेर कसला तरी गोंधळ एेकू येताच धनेशची तंद्री भंगली.कॉ. कदमांच्या टेबल समोर एक पोरगेलासा तरूण रडत रडत काहीतरी विचित्र भाषेत सांगत होता.कदमही त्याला दरडावुन शांत राहण्यास सांगत होता.

धनेशने कदमला आवाज दिला,"काय कदम,कसला एवढा गोंधळ चाललाय?काय गडबड आहे?"

धनेशने विचारले.

त्याबरोबर धावतच आत येत कदम सांगू लागला, "साहेब तो टपरीवाला पोरगा कम्प्लेंट घेऊन आलाय."

"कसली कम्प्लेंट?"

"काही नाही सर, तो म्हणतोय त्याची बहिण कालपासून घरी नाही आली.त्याने सगळीकडे शोध केला पण तिचा कुठेच पत्ता नाही म्हणतोय."

"बरंऽऽ त्याला आत बोलवा. मी बोलतो त्याच्याशी."

कदम त्यावर नेहमीप्रमाणेच बोलून गेला."काही नाही हो सर ह्या लोकांचे काही खरे नसते.ह्यांच्या कबील्यात आये दिन अशा घटना घडतच असतात.ते लोक एक तर स्वत:च पळून जातात नाहीतर मग त्यांच्या त्यांच्यातच पटले नाही की हाणामारीत जीव घेतात.हे काही नविन नाही इकडे."

कदमांच्या त्या इतक्या असंवेदनशील वक्तव्याने धनेशचे डोकेच सरकले.पण तरीही आपल्या रागावर संयम ठेवत तो कदमांना जरा जरबेतच म्हणाला,"कदम….तुम्हाला भान आहे का कुणासमोर बोलताय? तुम्ही स्वत:ची अक्कल पाजळू नका.मी सांगतो तेवढे करा.जा त्याला आत घेऊन या."

धनेशचा अविर्भाव बघुन कदम घाबरला.

पोरगेलासा दिसणारा एरवी एवढे गोड बोलणारा हा ऑफिसर वेळ येताच असाही कडक पवित्रा घेईल हे कदमांच्या गावीही नव्हते.त्यामुळे तो चांगलाच चपापला आणि आल्या पावली परत जात त्या तरूणाला आत पाठवले.

धनेशने त्याला समोरच्या खुर्चीत बसवुन घेतले.प्यायला पाणी दिले.तो जरा शांत झाल्यावर त्याला विचारले,"हंऽऽ आता सांगा काय झाले?

कोण तुम्ही,काय नाव तुमचे?"

कदम हे सांगतील तसे सर्व लिहून घ्या. एकही शब्द सुटता कामा नये.त्याबरोबर कदम घाबरून वही पेन घेऊन त्यांच्या बाजूला येवून उभे राहीले.

तो तरूण स्वत:बद्दल सांगू लागला.

"साहेब माझं नाव जुम्मन.आमच्या चार पिढ्या इकडच राहिल्या.मी माझ्या वडीलांची चहाची टपरी चालवतो.वडील दोन वर्षापूर्वीच वारले.मी आणि माझी बहिण असे आम्ही दोघेच राहतो घरी.

साहेब काल परवा माझी बहिण पाणी आणायला ओढ्यावर गेली ती घरीच आली नाही परत.मी रात्री दूकान बंद करून घरी गेलो तर ती घरी नव्हती मग मी सगळीकडे चौकशी केली.गावात कुठेच नाही म्हणुन मी काल शहरात आमची एक मौसी राहते तिच्याकडे ही जाऊन आलो पण तिकडेही नव्हती.मग मी इकडे येत होतो तर वाटेत हेच कदम साहेब भेटले. मी त्यांना तोंडीच सांगीतले तर ते म्हणाले चोवीस तास झाल्याखेरीज कम्प्लेंट नोंदवता येत नाही तर तुम्ही उद्यापर्यंत थांबा.जर परत आली नाही तर मग पोलिस स्टेशनात या.म्हणुन साहेब आज आलो कम्प्लेंट नोंदवायला तर हे कम्प्लेंट बी नोंदवून घेईना साहेब.मग आम्ही गरीबांनी कुणाकडे बघायचे?"

जुम्मन पून्हा रडायला लागला.

"बरं बरं. आता तुमची कम्प्लेंट नोंदवून घेतलीय.तुमच्या बहिणीची सगळी माहिती आणि फोटो द्या कदमांजवळ. बाकी आम्ही बघतो."

साहेब लवकरात लवकर तपास लावा हो.आमच्या समाजात पोरगी एक दिवस जरी घराबाहेर राहीली तर तिला वाळीत टाकतात.तिच्याशी कोण बी लगीन करणार न्हाय साहेब..जरा लवकर तपास लावा.."

रडत रडत जुम्मन धनेशची विनवणी करू लागला.

धनेशच्या डोक्यात वेगाने चक्र फिरू लागली.

ह्या घटनेचा मागील मिसिंग केसशी काही कनेक्शन असू शकेल?

इ.धनेश ह्या घटनेचा छडा लावू शकेल?

हे सगळे जाणून घेऊया पूढील भागात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(क्रमश:भाग -3)

©®राधिका कुलकर्णी.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

हा भाग कसा वाटला हे कमेंटमधे जरूर कळवा.

धन्यवाद.

@राधिका.


 

🎭 Series Post

View all