द सिक्रेट मिशन भाग-1

रहस्यकथा- द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन….!

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

भालेवाडीच्या बस स्टँडवर लालपरीतून खाली उतरून धनेशने सभोवार नजर फिरवली.

ब्लू जिन्स आणि व्हाईट टि शर्ट,रेबॅन गॉगल्स,गोरापान चेहरा,साडेसहा फूट उंची,मजबूत कमावलेली शरीरयष्टी,मिचमिचे डोळे पण सेकंदात सुक्ष्मतीसुक्ष्म गोष्टी स्कॅन करतील अशी भेदक नजर,खर्जातला आवाज,कुशाग्र बुद्धी तरीही तितकेच मधाळ बोलणे,एकंदर पोलिसी खाक्याला शोभेल अशी रूबाबदार पर्सनॅलिटी तरीही मोस्ट इलिजीबल बॅचलरचा टॅग लावुन फिरणारा अतिशय तडफदार ऑफिसर भालेवाडी पोलिस स्टेशनच्या स्पेशल सेलचा इंचार्ज म्हणुन रूजू व्हायला आला होता.

पोलिस कॉन्स्टेबल जगदाळे आपली टोपी संभाळत धावतच धनेशला घ्यायला पोहोचले.कॉन्स्टेबल पदावर असुनही जगदाळेंनी वयाप्रमाणे कमावलेला अनुभव त्यांना सर्व सिनियर आॅफिसर्स कडून शाबासकीची थाप मिळवून देत असे.त्यांचे त्या परिसराविषयीचे ज्ञान,गावात चाललेल्या सर्व छूप्या कारवाया आणि त्याच्याशी संबंधीत सर्व माणसांची त्यांना असलेली खडा न खडा माहिती हे त्यांच्या विशेष व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.त्यांचे एखाद्या व्यक्ती अथवा घटनेसंबंधीचे अंदाज अतिशय अचूक असत.त्यामुळेच इन्स्पेक्टर धनेशने जगदाळेंची आपल्या कामासाठी स्पेशल शिफारस करून मागणी केली होती.

स्पेशल इनव्हेस्टीगेशन सेलच्या वतीने त्याची अतिरीक्त पदभारासाठी नेमणूक झाली होती. तो चार्ज स्विकारण्यासाठीच तो भालेवाडीत दाखल झाला होता.धनेशच्या सांगण्यावरून दोघेही तडक पोलिस स्टेशनवर पोहोचले.सध्याचे पोलिस इन्स्पेक्टर श्रीयुत मांडके त्यांच्या येण्याची वर्दी मिळताच थोडेसे नर्व्हस झालेले. मांडकेंच्या भोंगळ कारभाराची कल्पना तशी डिपार्टमेंटच्या प्रत्येक माणसाला नविन नव्हती  पण इनस्पेक्टर धनेशची नेमणूक नेमकी का झालीय ही माहिती अद्यापही गुप्तच ठेवण्यात आली होती.मांडकेंना उगीचच भीती की त्यांच्यावर कारवाई करायला तर धनेश येत नसेल?? 

त्या दिशेने विचारचक्र सूरू झाले तसे धनेशला कसे खुष करून बाटलीत उतरवायचे ह्याचे मांडकेंच्या मनात प्लॅनिंग सुरू झाले.त्याच्या स्वागता प्रित्यर्थ गावातल्या प्रतिष्ठीतांना बोलावुन त्यांच्याकरवी धनेशचा जंगी पाहूणचार केला तर!!

ही कल्पना डोक्यात येताच मनोमम मांडके खूष झाले स्वत:वरच..

आता ह्या कार्यक्रमाचे आयोजन कसे करायचे ह्याची योजना ते आखू लागले…

मांडकेंनी विचारांची अंमलबजावणी करत लगेच एक फोन फिरवला.थोड्यावेळ कुणाशी तरी बोलुन त्यांनी लगेच फोन ठेवला.

मनाप्रमाणे सर्व गोष्टी आकाराला येताहेत तेही अगदी कमी वेळात ह्यामुळे त्यांची मूद्रा अगदी प्रसन्न झाली.मघाचचा सगळा नर्व्हसनेस गळून त्या जागी उत्साह संचारला...आता ते आतूरतेने धनेशची वाट पहात होते.

भालेवाडी सारख्या फार फार तर चारपाचशे घरांची वस्ती असलेल्या गावात इतक्या मोठ्या ऑफिसरची नेमणूक होणे हा तसा उत्सुकतेचाच विषय होता पण नेमके त्यामागचे गूढ काय ते मात्र वेळ आल्यावरच उलगडणार होते.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

इनस्पेक्टर धनेश पोलिस स्टेशन मधे शिरताच मांडकेंनी त्याला जरा बळजबरीनेच सलाम ठोकला.त्याची जी काही ख्याती ऐकली होती ती पाहता एखादा भारदस्त वयस्क ऑफीसर असेल असे त्यांना वाटले होते पण हा तर एकदम पिक्चरच्या चॉकलेट हिरो सारखा कुणालाही एका नजरेत गार करेल असा तरूण पोरगा होता.त्याला आपण साहेब साहेब करत कडक सलाम ठोकणे अंमळ जडच जात होते मांडकेना..पण आलिया भोगासी...या तत्वाला अनुसरून ते औपचारिकता निभावत होते.धनेशच्या स्वागताची सगळी तयारी झाल्याचा मेसेज मिळाला तसे ते पुढील तयारीत गुंतले.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

धनेशने आल्या आल्याच काही जून्या फाईल्स मांडकेंना टेबलवर काढायला सांगीतल्या त्याबरोबर मांडकेंच्या पोटात पून्हा डूचमळायला लागले.आता हा पोरगेलासा दिसणारा माझ्या उरावर बसुन मला ऑर्डरी सोडणार आणि मला ह्याची जीहुजूरी करायला लागणार ह्या कल्पनेने मांडकेच्या कपाळावरची शीर नकळत तडतडली.

ह्याचा लवकरच काहीतरी बंदोबस्त करायला हवा असा विचार मनातल्या मनात करतच त्यांनी रेकॉर्डरूम मधल्या धुळकट फाईल्सच्या जमावड्यातुन त्या विशिष्ट फाईल्स शोधायला सुरवात केली.

कशाबशा त्या फाईल्स सापडल्या.त्यावरची धूळ झटकतच त्यांनी त्या धनेशच्या टेबलवर आणुन पटकल्या.धनेशने मांडकेंकडे पाहून एक छानसे स्माईल दिले.मांडकेना मात्र ते छद्मी हसू वाटले कारण आजवर मांडकेंना काम सांगणारा कोणी पैदाच नाही झाला ह्या गुर्मीत ते वावरत असत परंतु आज त्यांच्याहून दहा वीस वर्ष वयाने ज्युनियर असुन काल आलेला पोरगा त्यांना ऑर्डर सोडत होता हे कुठेतरी त्यांच्या अहंकाराला ठेच पोहोचवणारे होते.बरं तो इकडे आलाय कशाकरता हेही अजुन रिव्हील झाले नव्हते.त्यांची नेमणूक इतकी गूप्त का ठेवली जातेय हे ही एक कोडेच होते मांडकेंसाठी.

तुर्तास हा विचार बाजूला सारून मांडकेंनी स्वागतासाठीच्या कार्यक्रमावर मन केंद्रीत केले.त्यांचा एक पंटर झब्या त्यांनी सांगीतल्या प्रमाणे गावचे पाटील तसेच चावडी प्रमुख पंच मंडळी अशा काही प्रतिष्ठीत मंडळींना गावच्या पंचायत कार्यालया समोर जमण्यास सांगीतले. त्याप्रमाणे छोटासा मांडव टाकुन पंधरा वीस खूर्च्यांची अॅरेंजमेंट केली गेली होती.चहा आणि गरम भजी असा छोटेखानी बेतही केला गेला.

सर्व तयारी झाल्याचा झब्या पंटरचा फोन आला तसे मांडके लगेच धनेश जवळ येत अति विनम्रपणे म्हणाले,"जयहिंद धनेश साहेब.!एक सांगायचं होतं…."

मांडके वाक्य तिकडेच सोडून धनेशची काय प्रतिक्रीया येतेय ह्याची वाट पाहू लागले.

धनेशने समोरच्या फाईल्स मधुन आपली मान वर करत भूवया किंचित उंचावतच मांडकेंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

त्याची ती भेदक नजर पाहून मांडके जरा चपापले.त्यांना समजत नव्हते की धनेशला कसे सांगावे की त्यांनी धनेशच्या स्वागता प्रित्यर्थ काहीतरी कार्यक्रमाचा घोळ घातलाय.जनरली लोकांना आपले कौतुक सोहोळे आवडतात हा विचार करून मांडकेंनी हा प्लॅन आखला होता परंतु धनेशला बघितल्यावर त्याला आपली ही आयडिया कितपत रूचेल हा विचार आत्ता त्यांना सतावू लागला पण आता विचार करण्याची वेळ निघुन गेली होती.त्यामुळे धनेशने डोळ्यांनीच विचारलेल्या प्रश्नाला मांडकेंनी तेच नेहमीचे लिबलिबीत हसू फेकत जरा घसा साफ करत उत्तर दिले,"साहेब गावकऱ्यांनी तुमच्या स्वागता प्रित्यर्थ एक छोटासा कार्यक्रम ठेवलाय पंचायत कार्यालयात. तिकडे बोलावलेय आपल्याला ..तुमची इच्छा असेल तर जाऊयात का?"

मांडकेनी भीतभीतच वाक्य कसबसं पूर्ण केलं.

"पण मी आलोय ही बातमी त्यांना दिलीच कोणी?"

मी तर जगदाळेला सांगुन ठेवले होते की ही बातमी कुणाला कळता कामा नये तरी ही बातमी फुटलीच कशी?"

धनेशच्या ह्या प्रश्नावर मांडकेचा चेहरा खर्र्कन उतरला.त्याच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा बघुन धनेश पून्हा स्वत:शीच हसला.त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर काही न बोलताच मिळून गेले होते.

तो लगेच तेच स्माईल चेहऱ्यावर बाळगत मधाळ स्वरात मांडकेंना म्हणाला,"त्याचे काय आहे ना मांडके साहेब, आपल्याला पोलिस ट्रेनिंगमधे चेहरा पाहून माणसे कशी वाचायची हे पहिले शिकवतात.तुम्ही हा धडा गिरवायचे विसरला दिसताय.आता ह्यावेळी तुमचे मन राखायचे 

म्हणुन मी येतो पण पुढल्यावेळी असा कुठलाही बिनडोकपणा करण्यापूर्वी मला विचारत जा."

जगदाळे आणि इतर कॉन्स्टेबल्स समोर आपली काढलेली इज्जत बघुन मांडकेंचा चेहरा लाल पिवळा झाला पण आपणच ह्याला चिल्लर पोरगा समजायची चूक करून माती खाल्लीय तर गप्प बसण्यावाचून पर्याय नाही हे ओळखून ते तोंड आवळून उसने हसू चेहऱ्यावर आणत जीपच्या दिशेने धनेशच्या मागोमाग चालू लागले.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

पंचायत कार्यालयासमोर पटांगणातच एक चौथरा तयार करून त्यावर चार सहा खूर्च्या मांडलेल्या होत्या.चावडीचे पंच,गावचे पाटील मांडके स्वत: आणि इनस्पेक्टर धनेश आपापल्या जागी स्थानापन्न झाले.कॉ. जगदाळे धनेशच्या मागेच ऊभे होते.एक एक जण उभे राहून आपल्या स्वत:ची ओळख देऊन आपल्याच आरत्या ओवाळत होते.मी कसा ह्या गावचा प्रतिष्ठीत नागरिक आहे.मी कसे गावाच्या विकासासाठी याव केले न त्याव केले अशा वल्गना करत भाषणबाजी करत होते.इ. धनेशला हीच एक नामी संधी होती प्रत्येकाची खरी ओळख समजून घेण्याची त्यामुळे तो लक्षपुर्वक त्यांची फेकूगिरी एेकत होता त्याबरोबर तो त्या परीसराचेही बारीक निरीक्षण करत होता.

खाली बसलेल्या लोकांच्या मागे एक मोठे पिंपळाचे झाड होते.त्याच्या बुंध्याच्या आडुन कोणीतरी वाकळ ओढलेली एक व्यक्ती चेहरा झाकून त्या सगळ्या लोकांकडे निरखुन पहात असल्याचे धनेशला जाणवले.बाजूलाच उभे असलेल्या जगदाळेंना धनेशने जवळ बोलावुन कानात काहीतरी कुजबुजला.जगदाळे लगेच तिकडून गायब झाल्याचे मांडक्यांच्या लक्षात आले पण त्यावर जास्त लक्ष न देता मांडके भाषणासाठी उभे राहीले.आपल्या दिव्य इंग्रजीमधे मोठेपणा दाखवत त्यांनी भाषणाला सुरवात केली.बिचारे गरीब अडाणी लोक त्याच इंग्रजीला काहीतरी खूप भारी समजत होते पण धनेशवर इम्प्रेशन पाडण्याकरता चाललेले मांडकेंचे प्रयत्न पाहून धनेशला त्यांच्या बुद्धीची कीव येऊ लागली.

जरावेळ इंग्रजीची कसरत करून दमछाक झाल्यावर आपल्या तोडक्या मोडक्या धेडगुजरी भाषेचे मिक्स्चर वापरून त्यांनी आपल्या स्वत:वर स्तूती सुमने उधळण्यास सुरवात केली.

प्रचंड पेशन्स ठेवुन सुहास्य मुद्रेने धनेश सगळ्यांची मापे मनातल्या मनात काढत होता.कोण किती पाण्यात आहे हे समजण्यासाठी त्याला वेगळी मेहनत करावी लागली असती ती मांडकेच्या ह्या कार्यक्रमामूळे वाचली होती म्हणुन मनोमन धनेशने मांडकेंचेही आभार मानून टाकले.

"नाऊ माय कोलीग मि.धनेश विल से यु समथिंग.." अशा अतिशय थुकरट इंग्रजीमधे मांडकेंनी धनेशला व्यासपिठावर आमंत्रित केले.धनेश सारखा राजबिंडा पुरूष उभा राहील्यावर सगळ्यांना वाटले आता हा पण आपले इंग्रजी झाडणार पण 'जैसा देश वैसा भेष' ह्या उक्तीनूसार धनेशने अगदी सामान्यालाही समजेल अशा बोली भाषेत बोलायला सुरवात केली.

माझ्या प्रिय गावबंधु/भगिनींनो,

तुम्हा सर्वांना माझा आदरपुर्वक नमस्कार.

पोलीस म्हणले की तुम्ही सगळ्यात पहिले घाबरता पण ह्या पोलिसाला घाबरायची तुम्हाला मूळीच गरज नाही.मी इकडे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आलोय.त्यामुळे ह्यापूढे तुम्ही मला तुमचा मित्रच समजा.

जशी तुम्हाला आमची गरज असते तशीच आम्हालाही तुमची गरज असते त्यामुळे ह्यापुढे तुमच्या कुठल्याही अडचणी किंवा समस्या असतील तर तुम्ही ताबडतोब मला सांगा.मी त्यांचे निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

आणखी एक गोष्ट…….,,,,

जेव्हा पण गावात एखादा गून्हा घडतो,,जेव्हा आम्ही पोलीस चौकशीला येतो तेव्हा 'कशाला ही नसती ब्याद' म्हणुन तुम्ही आम्हाला कुठलीही माहिती सांगत नाही.जर तुम्ही आमच्यापासुन काहीही न लपवता तुम्हाला असलेली माहिती सांगितलीत तर गुन्हेगार पकडायला आम्हाला मदतच मिळते.आणि जर गुन्हेगार लवकर पकडला गेला तर पुढले दहा गुन्हे होण्याचे वाचतात.परंतु तुम्ही गावकरी पोलीसांना हवे ते सहकार्य करत नाहीत आणि नंतर पोलीस आपले काम वेळेत करत नाहीत म्हणुन आमच्यावरच आरोपबाजी करता.तर कृपया असे करू नका.

ह्यापूढे ह्या गावात जोपर्यंत मी आहे एकही गून्हा घडणार नाही ह्याची मी खात्री देतो त्याचवेळी तुम्हीही कुठेही काहीही संशयीत कारवाई घडताना दिसली तर न घाबरता मला किंवा जगदाळेंना येऊन सांगायची.जर कुणी आम्हाला अशा प्रकारची उपयुक्त माहिती दिली तर आम्ही त्या व्यक्तीचा असाच गावकऱ्यांसमक्ष सत्कार करू.त्याला बक्षिस दिले जाईल.

तर..,आजपासुन आपण सगळे गावाच्या भल्यासाठी एकत्रीतपणे काम करू..

मग आहे तयारी तुमची??

हो असेल तर सगळ्यांनी एक साथ हात उचलून जयहिंद म्हणा.त्याबरोबर एकच आवाजात सर्वांनी जयहिंदचा नारा दिला.

मांडकेंना असे सगळे अजिबात अपेक्षित नव्हते.आजपर्यंत लोकांवर आपली जरब आणि पोलिसी खाक्या दाखवून त्यांची गळचेपी करत कोणत्याही कम्प्लेंट साठी पैसे खाणे,दंडुकेशाहीचा वापर करून लोकांना घाबरवणे इतकेच मांडके करत आले होते पण धनेशच्या हया मैत्रीपूर्ण अश्वासनानंतर गावकऱ्यांनी त्याला दिलेला प्रचंड प्रतिसाद बघुन आता आपली इकडची सत्ता संपत आली असून लवकरच आपल्याला आपले चंबुगबाळ आवरायला लागणार ही जाणीव मांडकेंना होवू लागली.

हि स्वागतसभा एका दृष्टीने फायद्याचीच ठरली 

धनेशच्या.गावात चाललेल्या गुप्त संशयीत कारवायांबद्दल सततचे येणारे गूप्त रिपोर्ट्सच धनेशला इकडे त्याची चौकशी करण्यासाठी एका गुप्त मिशनवर सिबीआय स्पेशल सेलनी पाठवले होते.परंतु गावातले गावकरी पोलीसांना हवे ते सहकार्य न करण्याने कित्येक गुन्हे वर्षानुवर्ष फायलींमधेच खितपत राहतात आणि त्यावर योग्य कारवाईही होत नाही.

त्यामुळे इकडे चार्ज स्विकारल्यावर धनेशच्या अजंड्यामधे गावकऱ्यांशी भेट हाच सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लिस्टवर होता.

मांडकेंनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या ह्या कार्यक्रमाचा धनेशने इतका बेमालूम फायदा उठवला की जे काम करायला एरवी त्याला महिना किंवा त्याहून जास्त वेळ लागला असता ते काम आज काही मिनिटात शक्य झाले ते फक्त ह्या स्वागतभेटीमुळेच.गावकऱ्यांची  मने जिंकण्याचे महत्त्वाचे काम धनेशच्या मधाळ वाणीने अगोदरच केले होते.एकदा  गावकऱ्यांच्या मनात आपुलकीची जागा निर्माण केली की धनेशची बाकीची बरीच कामे सोपी होणार होती ह्यात धनेशला मुळीचच शंका नव्हती.

पोलीस स्टेशनमधे परत येऊन टेबलवरच्या फाईल्स चाळता चाळता धनेश जगदाळे कधी येताहेत ह्याची आतुरतेने वाट पहात होता……...

~~~~~~~~~~~(भाग-1)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(क्रमश: भाग-1)

©®राधिका कुलकर्णी.

काय होईल पुढील भागात?

धनेश भालेवाडीत का आलाय?

धनेशने जगदाळेला कोणती कामगिरी सोपवली आहे?

तो पिंपळाआडून बघणारा मनुष्य कोण असेल?

ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढील भाग नक्की वाचा..

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्कीच शेअर करू शकता.

आजचा पहिला भाग कसा वाटला हे जरूर कळवा.

धन्यवाद

@राधिका.                                                   

🎭 Series Post

View all