आला उन्हाळा उन्हाळा......

Is Summer Really Scorching Or Soothing

 आला उन्हाळा उन्हाळा.....



       आज जवळपास दोन वर्षानंतर आपल्या मुलांना घेऊन रमा माहेरी गेली होती. रमाची थोरली म्हणजे नेहा आता नववीत शिकत होती. आजीकडे जायला तिला कंटाळा आला होता. शिवाय आजीच्या गावाचं-अकोल्याचं ऊनही यावर्षी दरवर्षीपेक्षा जरा जास्तच तापलं होतं आणि तापमानाचे गेल्या शंभर वर्षाचे सारे रेकॉर्डस् त्याने तोडले होते. रमाचा नवराही मुलांसह तिला माहेरी पाठवायला तयार नव्हता. पण मग रमाने त्याची समजूत घातली. दोन वर्ष झाले महामारीमुळे ती माहेरी जाऊ शकली नव्हती, त्यामुळे तीला आईची भेट घेणं गरजेचं आहे हे तिने नवऱ्याला समजून सांगितलं आणि पटवून दिले, म्हणून आठवड्याभराची सुटी त्यानाां बायको-मुलांना माहेरासाठी मंजूर केली.


             माहेरी-अकोल्याला  पोहोचल्यावर,  रमाच्या आईनं तिचं आणि मुलांचं घराच्या उंबरठ्यावर भाकरतुकडा ओवाळून लिंबलोण केलं. नातीच्या आणि नातवाच्या चेहऱ्यावरून , डोक्यावरून आपले दोन्ही हात फिरवून कानाजवळ बोटं दुमडून त्यांची दृष्ट काढली.


         माहेरी रमा आणि तिच्या आईच्या नेहमीच्याच गप्पा सुरू होत्या. तिच्या मैत्रिणीपैकी या उन्हाळ्यात माहेरी कोण , कोण येणार आहे? तिचे बालपणीचे सगळे खेळ, खेळणी ,भातुकली, हरतालिका आणि कोजागिरी पौर्णिमा, आठवत रमा आणि तिची आई दोघी अगदी रमून गेल्या होत्या. तेवढ्यात नेहा तिथे आली आणि कुरकुर करायला लागली.


नेहा - "मम्मा किती ग हा उन्हाळा! शिवाय आजीकडे तर ए.सी. पण नाही. गरमी आणि उकाड्याने मला नुसती चिडचिड होते आहे. मला ना हा उन्हाळा अजिबात आवडत नाही. यापेक्षा मी माझ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जायला हवं होतं. तु उगाच मला आजीकडे घेऊन आलीस"! (नेहा तक्रारीच्या सुरात म्हणाली).



          नेहाची चिडचिड बघून आजी काही तरी बोलणार होती , पण रमाने नजरेनच आईला थांबवलं.


रमा - "नेहा किती वैतागते आहेस तू ! लहानपणी उन्हाळी परीक्षा संपली आणि शाळेला सुट्टी लागली की , आजीकडे नेण्यासाठी तु माझ्याकडे किती हट्ट करायची? आणि आता बघ! अगं मागची दोन वर्ष महामारीमुळे आपण आजीकडे येऊ शकलो नाही, त्यामुळे आजीची भेट घेणं गरजेचं आहे ना! आणि ए.सी.च काय घेऊन बसलीस आजीकडे पण छान डेझर्ट कूलर लावला आहेच ना !"


नेहा -"अगं पण आजीकडे सकाळ-संध्याकाळ दोन दोन तासाचा लोडशेडिंग आहे काय उपयोग त्या डेझर्ट कुलरचा? आणि इंटरनेट ते पण इतका स्लो आहे ना… नुसता वैताग. पप्पा म्हणाले होते , आपण शिमल्याला जाऊया पण नाही तुला तर आजीकडेच यायचं होतं ना!" नेहा नाक उडवून म्हणाली.


रमा - " अगं हातातला मोबाईल जरा बाजूला ठेवून तुझ्या आजूबाजूला बघ खूप सुंदर , नाजुक आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा सापडेल तुला तुझ्या भोवताली. आणि ट्रेकिंग म्हणशील तर तू पुढल्या महिन्यातही जाऊ शकतेस. आणि शिमल्याच म्हणशील तर तिथे आपण यापूर्वीही दोन-तीनदा जाऊन आलो आहोत. पुढल्यावर्षी तुझी दहावी आणि मग अकरावी-बारावीचे क्लासेस. तुला , तुझ्या अभ्यासातून आणि तुझ्यासोबत मलाही वेळ मिळणार आहे का आजी इकडे यायला आणि चार दोन दिवस निवांत राहायला?"


            " अगं जरा बाहेर बघ चैत्राच्या पालवीनं झाडांना किती सुंदर साज चढविले आहेत. हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा असतात हे तरी तुला माहिती होते का? कडुलिंबाचा रुपेरी नाजूक मोहर , वातावरणात मंद मंद सुवासासह डोलणारी आंब्याची कोवळी, तांबूस , चकचकीत, नवी कोरी पानं , आणि चैत्राच्या आधी काळया डांबरी रस्त्यावर , रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांनी अंथरलेला फुलांचा गालीच्या कधीतरी नजरेत सामावून घे ."


नेहा - "पण मम्मा , तरीही मला उन्हाळा अजिबात आवडत नाही. उन्हाळा मला फार चिड आणि वैताग आणतो."


     

रमा - "मान्य आहे उन्हाळ्यात जीवाची काहिली वाढते. मनाची आणि शरीराची तलखी लवकर शांत होत नाही. पण तरीही जंगलात पळसाची रंगपंचमी अजूनही रंग उधळीत असते."


            आपल्या मम्माचा साहित्यिक मूड बघून मग नेहाही जमेल तसं मराठी भाषेतील अनेक विविध अलंकार घेऊन स्वतःचं म्हणनं आपल्या आईला सांगू लागली…


नेहा - "मम्मा हाश हुश करण्यात मार्च-एप्रिल संपला. आणि आता मे महिन्यात सूर्य सोळा कलांनी तापू लागला आहे.  दुपारी तर सर्वत्र नुसता रखरखाट आणि जणू श्वास रोखून बसलेली स्तब्ध हवा. त्यातही आजीच्या शहरात असलेलं हे लोडशेडिंग म्हणजे नुसते हाल आणि अस्वस्थता. मला तर वाटतं सारी चराचर सृष्टी ,सारा ऋतूच जणू चोहो बाजूंनी नुसता पेटून उठला आहे. आपल्याविरुद्ध वातावरणानं बंड पुकारला आहे . माझ्या जीवाला तर कुठे म्हणून चैन पडत नाही आणि स्वस्थता लाभत नाहीये." नेहा जमेल तसं आणि माहीत असलेले सगळी विशेषण उन्हाळ्याच्या गर्मीच्या वर्णनासाठी वापरत होती.


रमा - "आणि मग अशाच एका रणरणत्या काळात , लोडशेडिंगच्या भर दुपारी हळुच निसर्गाच्या करामतीची चाहूल लागते. आपल्या मनावर , शरीरावर एक थंड हवेची झुळूक अलगद नक्षीकाम करते. अगदी अचानक सुखद गारवा चोहीकडे पसरतो . कितीही उकाडा असला तरी तो गार हवेचा झोत मनाला, शरीराला काही क्षणांसाठी का होईना अलगद मधुर मिठीत घेतो.


              निसर्गात विविधरंगी फुलांची मुक्त उधळण होत असते. लालसर , पिवळ्या रंगांत मनसोक्त फुललेले गुलमोहर दिसतात. तर कुठे नितळ पारदर्शी पिवळ्या रंगांचा , शेलाट्या बांध्यांचा अलामताश खुणावतो. लाल , अबोली लिलीचे दांडे माना उंच , उंच करून , दोन्ही टाचांना ताण देऊन काहीतरी विलोभनीय पाहण्याची त्यांची धडपड सुरू आहे असाच त्यांना पाहणाऱ्याला भास होतो. बोगनवेलींच्या जांभळ्या, शेंद्री, पांढऱ्या आणि लाल रंगाचे तर चक्क धबधबे ओसंडून वाहताना दिसतात. सायंकाळी बाजारात मोगर्‍याचा दाट गंध आपल्याला लपेटून टाकतो. तर निशिगंधाचा मंद सुवास वातावरण आणि मनाला ही धुंद करतो. मधुमालतीची रात्री फुलणारी पांढरी फुलं जणू रात्रीच्या , अंधाऱ्या -काळ्या साडीवर पांढऱ्या , सुगंधी चांदण्यांची खडी काढून , परिमळाची मुक्त हस्ते उधळण करतात. बुचाचे झाड पानोपानी बहरून येतं आणि सकाळी तापलेल्या जमिनीवर नजाकतिचा गालीच्या पसरवतं."


           मम्माने वर्णन केलेल्या या सुगंधाच्या , परिमळावर नेहाने मग पटकन एक छानशी कविता केली….


   नेहा - " सुगंधाने दरवळत राहावं….

          अन् वाऱ्याने वाहत राहावं…

           वाहता वाहता वाऱ्याने...

          सुगंधाला उचलून न्यावं....

          वाऱ्यालाही कुठं जमलं

           सुगंधाला धरून ठेवणं

          सुगंधाला हि कुठे जमतं

           वाऱ्यासोबत झुळूक होणं

           ज्याचं त्यानं काम करावं

           उगाच कशाला वैर घ्यावं\"

   

        माय-लेकीच्या या साहित्यिक जुगलबंदीमध्ये आजीनेही उडी घेतली. आणि ती पण तिला सुचेल तसं उन्हाळ्याचं वर्णन करू लागली.


आजी - "पण उन्हाळा म्हणजे केवळ रंग, गंध ,सुगंध आणि परिमळ यांचेच संमेलन नव्हे तर , रसनेचे ही लाड करणारा हा ऋतू. टरबूज , खरबूज ,आंबा, कैरी, अंगुर यांच्या चवींचं स्नेहमिलन म्हणजे उन्हाळा. थंडगार , लालेलाल , रवाळ टरबुजाची गोडी शब्दांनी कशी वर्णन करावी? द्राक्षांचे हिरवे मखमली घोस जणू मनावर आनंदाची तोरण बांधतात. तर कैरी घालून केलेली डाळीची चटणी म्हणजेच आंबाडाळ, कैरी किसून बनवलेला तक्कू, गुळ - मेथीदाणे घालून बनवलेली लुंजी, उकडलेल्या कैरीचं वाळा आणि मोगऱ्याचे फूल घालून थंड केलेल्या पाण्यात बनवलेलं पन्हं, मेथांबा, साखर आंबा, असे अनेक पदार्थ मनाचे, रसनेचे , चवींचे आणि क्षुधेचे सोहळे साजरे करतात.


              आंबा तर फळांचा राजा त्याचे वर्णन मी काय वर्णावे? एकंदरीतच उन्हाळा म्हणावा तसा रखरखीत नसतोच. तो तर असतो रंग, गंध ,स्पर्श आणि चवींचा एक नैसर्गिक सोहळा.


        तेवढ्यात रमाचा लहानगा छोटु तिथे आला आणि म्हणाला - "मम्मा तु फ्रिजमध्ये बर्फ सेट केला आहेस का? प्लीज मला एक बर्फाचा गोला बनवून दे ना!"


आजी - "नेहा मघाशी मी तुला म्हटलं ना की , उन्हाळा हा ऋतू चवींचा ही महोत्सव आहे , त्या चवींमध्ये एक चव थंडगार बर्फाच्या गोळ्याची , आणि एक लहान मुलांना आवडणाऱ्या गोड ,गारेगार आईस्क्रीमची पण असते बरं का!"


           हातातल्या बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेत रमा , नेहा , छोटु आणि आजी एकमेकांकडे बघून हसण्यात गुंतून गेले.



*******************************************



वाचक हो कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत…



जय हिंद

🎭 Series Post

View all