स - सुसंस्कारा चा

Story Of Shivaji Maharaj



गोष्ट छोटी डोंगराएवढी

मना घडवी संस्कार

आई थोर तुझे उपकार
नीज न आली तर गीत म्हणे
प्रेम जिचे अनिवार!!!

आईचे प्रेम आणि उपकार यांची ना मोजदात होऊ शकत, ना परतफेड. आई आपल्या मुलाला केवळ जन्मच देत नाही तर त्याच्यावर अनेक सुसंस्कार करून, त्या मातीच्या गोळ्याला एक सुंदर आकार देते, आणि एक सुजाण, सुसंस्कृत, आणि सद्सद् विवेक बुद्धी असलेली व्यक्ती घडवत असते.

असेच उत्तम संस्कार जिजामातेने शिवरायांवर केले होते. त्या अनुषंगाने इथे एक प्रसंग सांगावासा  वाटतो….

आपल्या भरभक्कम अश्वदळासह शिवाजी महाराज कल्याणकडे आगेकुच करत होते. तर बिजापूरचा गोळा केलेला भरभक्कम,अतिशय मौल्यवान खजिना विजापूरच्या वाटेवर अश्वदळासह कल्याणच्या सुभेदाराचा मुलगा मुल्ला याहीया विजापूरकडे रवाना होत होता. मुल्ला याहीया सोबत त्याची पत्नी ही विजापूर कडे रवाना झाली होती आणि इकडे कल्याणचा सुभेदार आपल्या महालात निश्चिंत होता.

तो भरभक्कम खजिना घेऊन ते अश्वदळ दोन्ही बाजूच्या घनदाट अरण्यातून जाऊ लागलं. मुल्ला याहीया मध्ये मध्ये त्या खजिनाच्या दळावर वळून वळून लक्ष देत होता. पण त्याला हे माहिती नव्हतं की, दोन्ही बाजूच्या घनदाट अरण्यातून शेकडो डोळे त्या सुभेदाराच्या दळावर नजर ठेवून होते. घाटाची चढण लागली, अवजड बोज्याने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. गाड्या धिम्या गतीने पुढे सरकत होत्या. जेव्हा उभी चढण लागली तेव्हा फारच गोंधळ उडाला. गाड्या जागच्या हलेनात तेव्हा अश्व पथक पायउतार झाले. गाड्यांच्या चाकांना सैनिकांनी हात घातले आणि भर थंडीतही सारे घामाघुम झाले. त्याच वेळी चारी बाजूंनी रणगर्जना झाली \"हर हर महादेव\" \"जय भवानी जय शिवाजी\" ची गर्जना त्या डोंगरकपारीत घुमली आणि थोड्याशा चकमकीने खजिना सुरक्षितपणे हाती आला.

मराठा घोडेस्वारांची तुकडी कल्याण दरवाजा जवळ आली दबा धरून बसलेल्या घोडदळाने कल्याण शहर काबीज केले. सुभेदार मुलगा अहमद जेरबंद झाला कल्याणच्या नगर खाण्यावर भगवा ध्वज फडकला.

इकडे शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी आबाजी महादेवाने कल्याणच्या सुभेदाराचा भव्य राजेशाही शामियाना कल्याणच्या बाहेर उभारला होता. दादाजी कृष्ण सखुजी कृष्ण लोहोकरे यांच्यासह महाराजांच्या स्वागताला ते उभे राहिले.

थोड्याच वेळा नंतर महाराजांचं कल्याण वेशीवर आगमन झालं. महाराजांच्या आगमनानंतर साऱ्यांनी मुजरे केले. तूताऱ्यंचा आवाज झाला. कल्याणच्या नगारखाना महाराजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला.

महाराजांनी आबाजी महादेवांना विचारलं, "आबाजी जीवित हानी किती झाली?"

आबाजी उत्तरले "महाराज 15 मावळे कामी आले."

महाराज हळहळले आणि ते म्हणाले "आमच्यासाठी एका जीवाची किंमतही बहुत आहे."

कल्याणचा खजिना महाराजांसमोर आणला गेला सुवर्ण, रौप्य, नाणी, अलंकार,उंची रत्न, तलम रेशमी वस्त्र असा तो बहुमोल ऐवज होता.

जखमींना द्रव्य देण्यात आले तर पराक्रम करणाऱ्यांचा बहुमान झाला.

आबाजी महादेवांना कल्याणची सुभेदारी देण्यात आली तर दादाजी कृष्ण आणि सखोजी कृष्ण यांना भिवंडीचा कारभार देण्यात आला.

कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद आणि त्याचा मुलगा मुल्ला याहीया यांना महाराजांसमोर हजर करण्यात आले. त्या दोघांनाही जीवाच्या भीतीने कापर भरलं होतं, पण महाराजांनी त्यांना जीवनदान दिलं, सन्मानाने विजापूरला जाण्यास संमती दिली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि कृतज्ञता होती.

त्याचवेळी आबाजी महादेव म्हणाले "महाराज अजून एक कैदी आहे."

महाराज -" कुठला कैदी आहे?"

आबाजी महादेव -"महाराज सुभेदाराची सून."

महाराज रागाने म्हणाले -"आबाजी तुम्हाला माहिती नाही काय स्वराज्यामध्ये आपण कुणाच्याच मुलीबाळीवर हात घालत नाही? मग हिला का पकडलं?"

आबाजी -:महाराज सुभेदाराची सून सुभेदाराच्या मुलासह विजापूरकडे जात होती. झालेल्या चकमकीत तिलाही अटक करण्यात आली. तिचा निवाडा तुम्हीच करावा."


महाराज -"आबाजी हा निवडा तुम्हीही करू शकले असते. इतका काही तो कठीण नाही पण तरी ही असो.. सुभेदाराच्या सुनेला संपूर्ण मान सन्मानासह दरबारात घेऊन या."


शामियान्या च्या डावीकडील चिकाचा पडदा बाजूला झाला. दोन दासींसह सुभेदाराची सून महाराजांसमोर हजर झाली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत कपड्याच अवगुंठन होतं आणि नजर खाली झुकलेली होती. \"आता आपलं काय होणार\" याच्या काळजीने ती थरथरत होती. महाराजांनी एक क्षण सुभेदाराच्या सुनेकडे बघितले. मग आपल्या उच्चासनावरून ते पायउतार झाले. ते सुभेदाराच्या सुनेजवळ आले. तिचे पाय दरबारातल्या गालीच्या वरच्या जाजमात रुतलेले होते. तर हाताची मेहंदी लावलेली बोटं थरथरत होती. महाराजांनी एक क्षण आपले डोळे मिटले. ते परत आपल्या सिंहासनावर जाऊन बसले…..

महाराज -"सुभेदाराच्या सुनेच लावण्या खरंच अप्रतिम आणि अनुपम आहे. आमची आई पण जर अशी सुंदर असती तर आम्ही हे तेवढेच सुंदर असतो. आबाजी, माँ साहेबांची रवानगी करण्यात जो राजेशाही इतनाम तुम्ही जपला असता, त्याच मान सन्मानाने सुभेदाराच्या सुनेची ही विजापूरास रवानगी करा. खणानारळाने तिची ओटी भरा आणि यानंतर लक्षात ठेवा मुली-बाळी कुणीच्याही असो, आपल्या किंवा परकियांच्या त्या नेहमीच स्वराज्याला आणि स्वराज्यांच्या मावळ्यांना आपल्या माते भगिनी समान आहेत."


*************************************************


आज आपण आपल्या आजूबाजूला जर नजर टाकली तर अगदी सहा महिन्याच्या मुली पासून ते 80 वर्षाच्या वृध्देवरही अत्याचार होत आहे. बस, रेल्वे, चालत्या गाड्या, शाळा, मंदिर, मस्जिद अगदी स्वतःच्या घरात सुद्धा महिला,मुली ओरबाडल्या, विटाळल्या जात आहेत.


आपल्या अवतीभवती जी सामाजिक अराजकता माजलेली आहे त्यासाठी खरंच जिजाऊ सारखी माता आणि शिवबां सारख्या पुत्रांची नितांत आवश्यकता आहे. ज्या जिजाऊने आपल्या मुलाला परस्त्री ही मातेसमान, भगिनी समान असते हे शिकवलं त्या जिजामातेला शतशत नमन. आणि शिवरायांना मानाचा मुजरा.


संदर्भ

 लोक कथांवर आधारित.





फोटो साभार गूगल.



©® राखी भावसार भांडेकर.


जय भवानी जय महाराष्ट्र.