परवा सहज म्हणून एक पुस्तकं वाचायला घेतलं. पुस्तकाचं नाव होतं...."द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स".. लेखिका होती. सोमाली मॅम. सहज म्हणून वाचायला घेतलेलं हे पुस्तक... एव्हढं झपाटून टाकेल असं अजिबात वाटलं नाही. पण वाचून झालं तरी आपण या पुस्तकाच्या बाहेर आयुष्यात येवू शकणार नाही. याची जाणीव झाली.आता पर्यंत मी लाखो पुस्तकं वाचली असतील पण तरीही या पुस्तकाने मला झपाटून टाकले.न कळत सोमाली मनाच्या तळाशी जाऊन बसली.
कंबोडिया सारख्या छोट्या देशात जन्मलेली सोमाली एक अनाथ मुलगी. कुठे होती आणि कुठे जाऊन पोहोचली. सगळंच अकल्पीत, अनाकलनीय आणि अकल्पनीय. प्रचंड वेदनेने भरलेलं आयुष्य, आज किती जणांना आधार ते आधार झालंय, हे तिची ओळख झाल्याशिवाय कोणालाच कळणार नाही.
सोमाली, या शब्दाचा, ख्मेर भाषेत अर्थ होतो "रानात उगवलेले अस्पर्शित फुल". आपला जन्म नेमका कधी झाला हे सुद्धा नीट ठाऊक नसणाऱ्या सोमाली मॅमला, आपल्याला सोमाली हे नाव कोणी दिलं हे देखील ठाऊक नाही. कंबोडिया देशातल्या मोंडुलकीरी प्रांतातल्या छोट्या खेड्यात. सत्तर एक्कात्तर च्या दरम्यान तिचा जन्म झाला असावा असं ती म्हणते. आपल्याला सोमाली हे नाव देण्यात पण देवाने एक क्रूर थट्टा केली आहे असं तीला वाटतं. कारण तिला तिचे आई-वडील कोण आहेत हे देखील माहित नव्हतं. जेंव्हा ती बारा वर्षाची झाली होती तेंव्हा तिला तिच्या आजोबांच्या वयाच्या माणसाला विकण्यात आलं होतं.कोणी विकलं होतं हेही तिला ठाऊक नव्हतं. कसलाच भविष्यकाळ नसलेल्या सोमालीच आयुष्य फारच खडतर होतं. त्या आजोबा एव्हढं वय असलेल्या माणसा साठी जेवण बनवणं, पाणी आणणं वगैरे वगैरे. हा आजोबा खूप दारू प्यायचा आणि तिला सतत मारहाण, शिवीगाळ करायचा. तिला उपाशी ठेवायचा.त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. तेंव्हा, चवदा वर्षाच्या सोमालीला त्याने एका वेश्या गृहात विकून टाकले.
एका अनोळखी माणसा सोबत तिला लग्न करावे लागले. त्या माणसानेच तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं. त्या काळात सोमालीला अक्षरशः पाच सहा गिर्हाइकांसोबत थोड्या पैश्यांसाठी शैयासोबत करावी लागे.त्या काळात तिने क्रूरपणाचा कळस अनुभवला.तिला उपाशी ठेऊन गटारीच्या काठावर साखळीने बांधून ठेवले जाई. तिच्या अंगावर लाल मुंग्या सोडल्या जात. आणि शरीर विक्रीला भाग पाडलं जात असे. दिवस असेच चालले होते. जिथं फक्त यातनामय वर्तमान काळ होता. ना कोणता भूतकाळ होता ना कोणता भविष्यकाळ. सोमालीच दुर्दैव असं की तिला इतर मुलांसारखं शालेय जीवनही उपभोगायला मिळालं नव्हतं. पण तरीही तिची जीवनाबद्दल तक्रार नव्हती. कदाचित बाहेरच्या जगाची कल्पनाच नसल्याने तिला सगळी कडे असंच असतं असं वाटायचं. पण एकदिवस एक गोष्ट घडली. आणि सोमालीच्या भावविश्वाला तडा गेला. तिच्या सोबतिणीने गिऱ्हाइकासोबत जायला नकार दिला तेंव्हा त्या मुलीची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. आणि हे सगळं घडलं होतं छोट्या सोमालीच्या डोळ्यासमोर. ती तर मुळापासून हादरून गेली. तिला कळून चुकलं की ज्या जगात ती जगून राहिली आहे. त्या जगात तिची किंमत शून्य आहे. ज्या दिवशी ती कोणत्याही गोष्टीला नकार देईल त्या दिवशी तिला देखील असंच ठार केलं जाईल. तिलाच काय तिथं ज्या ज्या मुली आहेत. त्यांना देखील असंच मारलं जाईल. आणि त्या दिवसा पासून तिच्या मनात तेथून पळून जाण्याचे विचार यायला लागले. सुदैवाने तिला पेरी नावाचा एका फ्रेंच माणसाने पळून जायला मदत केली.
हा पेरी तिच्या आयुष्यात एका देवदूता सारखा अवतरला. तो तिला घेऊन सरळ फ्रान्स मध्ये आला. फ्रान्स मधील स्त्रिया, त्यांचे विचार स्वातंत्र्य, त्यांचे शिक्षण या गोष्टी सोमाली साठी कल्पनेपलीकडच्या होत्या. तिने फ्रेचं आणि इंग्रजी भाषेचा अभ्यास करून पाश्चात्य जगाशी ओळख करून घेतली. या आधी तिला फक्त तिच्या देशाची ख्मेरच भाषा येत होती. त्याच काळात पेरीने तिच्या जवळ विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याला मान्यता दिली. त्या दोघांचा सुखाचा संसार सुरु होता. पण सोमाली मनातून खूप अस्वस्थ होती. तिच्या मनातून आपल्या गरीब देशातल्या तिच्या सारख्या अशिक्षित स्त्रियांची दयनीय अवस्था जात नसे. तिच्या देशात आईवडीलच मुलीला देहव्यापाराला भाग पाडत असत. गरीबीचं इतकी असे की त्यात काही वावगं आहे असंही त्यांना वाटत नसे. शेवटी तिने पेरीला आपण अश्या मुलींसाठी काहीतरी करू अशी विनंती केली. पेरीलाही ती कल्पना आवडली.
दोघं पून्हा कंबोडियाला परत आली. सोमाली म्हणते मला जसा माझा आतला आवाज सापडला होता तसा प्रत्येक पीडित महिलेला तो सापडावा म्हणून मी झपाटली गेली. माझ्या मित्राच्या घराचच मी अश्या दुर्दैवी मुलींसाठी आश्रय केंद्र केलं.थायलंड, व्हिएतनाम आणि लाओ या देशात कार्यकर्त्यांचं एक विशाल जाळं निर्माण केलं. जिथून जिथून सोमालीला अशा दुर्दैवी स्त्रियांची माहिती मिळत असे तिथे तिथे ती धावून जात असे आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन त्या मुलींची सुटका करत असे. कितीतरी वेळा या मुली अवघ्या आठ नऊ वर्षाच्याच असतं. त्यांना कशाशीच काहीही माहिती नसे. या मुलींना घरचे लोकही स्वीकारायला तयार नसत. मग त्यांचं पुनर्वसन, शिक्षण हे प्रश्न देखील सोमालीलाच सोडवावे लागत. स्थानिक गुंड, दलाल यांच्या त्रासाला सामोरं जावं लागायचं ते वेगळंच.
हळू हळू तिच्या या कार्याची दखल शासनाला घ्यावी लागली. इसवीसन दोन हजार सात मध्ये अमेरिकेतील काही लोकांनी तिला मदती साठी हात पुढे केला. तिने एक रजिस्टर्ड संस्था स्थापन केली. AFESIP असं आहे या संस्थेचं नाव. सोमाली म्हणते आज या संस्थेचे हजारो कार्यकर्ते अनेक देशांमध्ये जरी कार्यरत असले तरी मी रात्रंदिवस काम करत असते. माझ्या मनात माझ्या देशातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक स्त्री बद्दल फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. मी नेहमी त्यांच्या कल्याणाचाच विचार करते. आज मला माझ्या देशात जे भोगावं लागलं त्या भूतकाळाला मी विसरु इच्छिते.
अशा या सोमाली ला एक दिवस व्हाईट हाऊस मध्ये भाषणाला आमंत्रित केलं गेलं. जगातली उच्च सुसंस्कृत लोकं तिथं उपस्थित होती. सोमालीला अशा भाषणाची सवय नव्हती.डोळे मिटून ती बोलायला लागली. आणि स्वतः अनुभवलेले ते क्षण बोलता बोलता जेंव्हा ती पून्हा अनुभवू लागली. तेंव्हा स्थळाकाळाचे आणि औचित्याचे सगळे भान विसरून भाषण संपल्यावर ती हमसाहमशी रडू लागली.आणि खाली बसून गेली. तेंव्हा व्हाईट हाऊस देखील सुन्न होऊन गेलं. एका क्षणात सोमाली जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली. आजही तिचं हे कार्य अखंड सुरुच आहे.जगातल्या असंख्य दिन दुबळ्या स्त्रियांची ती आई झालेली आहे.
तिच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. गार्डीयन हा स्त्रियांचा सर्वोच्च बहुमान तिला दिला गेलेला आहे. त्या खेरीज टाइम्स या मासिकाने तिची विसाव्या शतकातील शंभर प्रभावशाली व्यक्तीमत्वा पैकी एकात तिची निवड केली केली आहे. इटली देशाने देखील ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी तिला आपला ध्वज हातात घेण्याची संधी दिली होती.रेगीस युनिव्हर्सिटीने तिला सामाजिक कार्याबद्दल सर्वोच्च डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला.
आजच्या आपल्या संपन्न जीवना बद्दल सोमाली म्हणते आज माझ्या जवळ जगातली सगळ्यात महागडी अत्तरं आणि सुगंधी द्रव्य आहेत. मी दिवसातून अनेक वेळा जगातली सगळ्यात महागड्या साबणांनी स्नान करते पण लहानपणी झालेल्या त्या घाणेरड्या स्पर्शांना मी कधीच विसरु शकत नाही. मला वाटतं तिच्या या उद्गारांत स्त्री जीवनाची चिरंतन शोकांतिका दडलेली आहे.
दत्ता जोशी, अंबरनाथ