द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा (भाग-दहा)

कथा गुंतागुंत असलेल्या नात्याची... तडजोडीच्या साच्यात गुंफलेली...

                         अभिध्याला बऱ्यापैकी कनिष्कचे मत पटले होते; पण काही अंशी तिला वाटत होते की, कदाचित कनिष्क टाळण्याचा करण्याचा प्रयत्न करत असावा. तरीही तिने नकारात्मक विचारांना झटकून दिले व आक्षेप नोंदवला नाही; पण त्या दिवसापासून तिच्या स्वभावात बराच बदल झाला होता. त्या रात्री तिला आलेला अनुभव तिच्या मनावर खोल परिणाम करून गेला होता. त्यानंतर तिने स्वतःच कनिष्कशी जवळीक साधण्याचा पुढाकार घेतला नाही अन् अशा रीतीने पुन्हा एक महिना सरून गेला. 


                         कनिष्क त्याच्या नोकरीत अन् अभिध्या तिच्या इव्हेंट कंपनीच्या कामकाजात व्यग्र होती. एके दिवशी खुद्द व्यवस्थापन केलेल्या कार्यक्रमात अभिध्या गेली होती. कार्यक्रम पार पडल्यावर तेथून घरी परतताना तिला कनिष्क त्याच्या कारमध्ये एका व्यक्तीबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत दिसला. 


                         ते दोघेही क्षणाक्षणाला एकमेकांचे चुंबन घेत होते. ते दृश्य पाहून अभिध्या अक्षरशः गोंधळून गेली होती. तिला तिच्या डोळ्यांवर जराही विश्वास बसत नव्हता. तिने मनाचा हिय्या केला अन् थरथरतच स्वतःच्या शंकेची चाचपणी करण्याकरिता कनिष्कला कॉल केला. कनिष्कने कॉल उचलला व बहाणा देत लगेच कॉल आटोपला; परंतु कॉल ठेवताच अभिध्याच्या डोळ्यात पाणी साचले कारण तिचा संशय अचूक ठरला होता. 


                         त्या क्षणी ती फार खचून गेली होती. कनिष्कचे ते रूप पाहून तिला भोवळ आली. ती चक्कर येऊन पडणार होती; परंतु तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला सावरून घेतले. तिची मैत्रीण अर्थात रक्षंदा सराफ अभिध्याला जवळच्याच एका कॅफेमध्ये घेऊन गेली. तिथे रक्षंदाने अभिध्याला विश्वासात घेत विचारपूस केली. अभिध्यानेही हुंदका आवरून संपूर्ण आपबिती सांगितली. 


सर्व जाणून घेतल्यावर रक्षंदा ही गोंधळून गेली होती. ती काळजी व्यक्त करत म्हणाली, " अभिध्या, किती मोठा विश्वासघात झालाय तुझ्याबरोबर! खरंच आकलनापलिकडे हे सर्वकाही पण तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. 


                         या संपूर्ण प्रकरणाचा तपास मी स्वतः करेल. मी एक डिटेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर ना कनिष्क मला ओळखतो, ना ती व्यक्ती! त्यामुळे त्या दोघांची काय भानगड आहे आणि त्या दोघांमध्ये काय नाते आहे, मी या सगळ्याचा सुगावा घेईलच. " 


" रक्षंदा, माझ्याशी असे का वागले असतील कनिष्क? मी माझं सर्वस्व त्यांना अर्पण केलं, त्यांच्याच मनाप्रमाणे वागत राहिली, त्यांची मैत्री स्विकारली अन् निभावली देखील; पण त्यांनी माझ्याशीच व्याभिचार केला. 


                         निदान आमच्यातील मैत्रीचा तरी सन्मान करायला पाहिजे होता. ते अशाप्रकारे कसे वागू शकतात? त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. छे!मला उल्लेखही करावासा वाटत नाहीये त्याबाबत आणि आई माझ्या मातृत्वावर शंका घेत राहिल्या. 


                         त्या कायम माझ्या स्त्रीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. किंबहुना, शेजारी-पाजारी वावरणाऱ्या स्त्रियाही माझ्यावर दोषारोप करतात, घृणास्पद कटाक्षाने माझ्याकडे पाहत असतात पण कनिष्कला जाब विचारणारे कुणीच नाही. " अभिध्या रक्षंदाला बिलगून स्वतःचा आक्रोश व्यक्त करत म्हणाली. 


                        रक्षंदाने अभिध्याची समजूत काढली. तिला आश्वस्त केले. त्याचबरोबर तिला तात्पुरते मौन बाळगण्यास सांगितले. त्यानंतर रक्षंदा हेरगिरी करण्यास सज्ज झाली. अभिध्या देखील मनाचा हिय्या करून घरी गेली. रडून रडून चेहरा पार उतरून गेला होता पण तरीही तिला खोटे हसू मिरवणे भाग होते. 


                         ती घरी गेली. नेहमीप्रमाणे इतर घरकाम आटोपून स्वयंपाकाची तयारी केली. कनिष्क घरी येताच तिघांनीही जेवण आटोपले. त्या दिवशी ती काहीच बोलली नाही. किंबहुना, त्या दिवशीपासून ती कनिष्कसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुसडेपणाने वागू लागली. ती देखील कनिष्कला स्वतःजवळ भरकटू देत नसायची. 


                         अशाप्रकारे एक महिना सरून गेला. रक्षंदाचा तपासही पूर्ण झाला होता. तिला खऱ्या अर्थाने वास्तविकता कळली होती. म्हणूनच तिने तिला प्राप्त झालेली एकूण एक बाब पुराव्यांस्वरुपात अभिध्याला सुपूर्द केली होती. 


                         अभिध्याने रक्षंदाने दिलेले पाकीट उघडले अन् त्यात असणारी एकूण एक माहिती अन् सर्व फोटो पाहिले. ते पाहून तिला जबर धक्का बसला. एका क्षणात तिचा स्वप्नांचा बंगला ढासळून पडला होता अन् तिचे हृदय तुटले होते व मन ही पार विखरून गेले होते. 


वर्तमान:


                         एका क्षणात अभिध्याच्या डोळ्यापुढे संपूर्ण भूतकाळ तरळला होता. सर्वकाही आठवून तिच्या डोळ्यात परत एकदा अश्रू दाटून आले होते. तरीही तिने भावनांवर आवर घातला व तिने तिच्या हातात ते पाकीट घट्ट पकडून घेतले. 


                         तात्काळ ती जागेवरून उठली अन् खोलीबाहेर जाऊ लागली. ती हॉलमध्ये जाताच कनिष्क आणि सुमित्राताई तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले; कारण तिच्या एका हातात पुराव्यांचे पाकीट अन् दुसऱ्या हातात लगेज बॅग होती. 


                         सुमित्राताईंनी तिची विचारपूस केली. त्यावेळी अभिध्याच्या पोटात राग खदखदत होताच म्हणून तिने आवेगात पाकिटातील सर्व पुरावे हातात घेतले व त्या पुराव्यांनी सुमित्राताईंचा अभिषेक केला. तिची ती कृती पाहून कनिष्क अक्षरशः चिडला अन् त्याने अभिध्यावर हात उगारला; परंतु अभिध्याने त्याचा हात पकडून तेवढ्याच तिटकाऱ्याने खाली झिडकारला. 


किंबहुना, ती तावातावाने अन् त्वेषाने कनिष्कला उद्देशून म्हणाली, " हा हक्क तुम्ही गमावून बसलात कनिष्क. आजपासून तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही. " 


" अभिध्या, काय बोलतेय तू हे सगळं? काय केलंय कनिष्कने? का तू त्याच्याशी या पद्धतीने वागतेय? " सुमित्राताईंनी चिडून विचारले. 


" उत्तरच हवंय ना तुम्हाला तर ज्या पुराव्यांनी मी तुमचा अभिषेक केलाय ते पुरावे नीटपणे आणि निरखून पाहा. तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. " अभिध्या डोळ्यातून आग ओकत म्हणाली. 


                         सुमित्राताईंनी तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकत त्यांच्या पायालगत जमिनीवर पडलेले सर्व फोटो अन् त्यासह इतर काही कागदपत्रे अर्थात पुरावे उचलले व एकेक करून त्या सगळ्यांची त्या पडताळणी करू लागल्या. 


                         ते सर्व पाहताच सुमित्राताईंना धक्का बसला आणि त्यांच्या हातातून सर्व पुरावे खाली कोसळून पडले. कनिष्क मात्र स्तब्ध उभा होता. तो वास्तविकता जाणून घेण्याचा अन् तेथील परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जराही अंदाज लागत नव्हता. 


तथापि, कनिष्कला स्तब्ध उभे असलेले पाहून अभिध्या त्याला तिरस्कारयुक्त स्वरात म्हणाली, " असे का पाहताय मख्खासारखे? ती तुमचीच पुंजी आहे. जा, नीट पाहा आणि सांभाळून ठेवा अगदी हृदयाशी कवटाळून. " 


                        अभिध्याची धारदार नजर अन् तिचे कटू शब्द ऐकून कनिष्क तावातावानेच खाली वाकला व त्याने खाली पडलेले सर्व साहित्य गोळा केले. त्यानंतर तो देखील ते सगळं पाहू लागला. ते सर्व पाहून त्याच्या चेहऱ्याचा क्षणार्धात रंग उडाला. तो गोंधळून अभिध्याकडे आश्चर्य व्यक्त करत पाहू लागला. तिच्या डोळ्यातील राग हेरून त्याने भीतीने आवंढा गिळला. 


" काय झालं? रंग का उडालाय आज तुमच्या चेहऱ्याचा? तुम्हाला काय वाटलं होतं की, मला कधीच कळणार नाही तुमच्या कटकारस्थानाविषयी? 


                         मी तुमच्यावर जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाच्या चिंध्या करताना तुम्हाला काहीच वाटले नाही का? तुम्ही एवढे निश्चिंत होते याबाबत की, मला कधीच काहीच कळणार नाही, हा आत्मविश्वास बळावला? 


                         कनिष्क, तुम्ही बिनदिक्कत अन् अगदी निर्भीडपणे माझ्याशी विश्वासघात केला. तुम्हाला एवढी खात्री होती का तुमच्या कुटिल बुद्धीवर की, तुमचे कुणाशी विवाहबाह्य संबंध असेल याची मला चाहूल लागणार नाही? तुम्हाला काय वाटलं होतं की, तुम्ही मला वेड्यात काढत राहणार, तुम्ही बायसेक्शुअल असल्याचा दावा करून माझी दिशाभूल करत राहणार आणि मी वेड्यागत सर्वकाही स्विकारणार? 


                         खरंतर, पहिल्यांदा मी ही याच भ्रमात होती पण आता वास्तव माझ्या डोळ्यापुढे उघड आहे. कनिष्क तुम्ही बायसेक्शुअल नसून \"गे\" आहात आणि म्हणूनच तुम्ही आपल्या दोघांत कायम दुरावा राखला, हे कळून चुकलंय मला! 


                         मला कळलंय सारं; पण काय गरज होती माझ्याशी खोटं बोलून लग्न करण्याची कनिष्क? मी तुमच्या बायसेक्शुअल असण्याचा बाऊ केला नव्हताच. तसाच मी तुमच्या गे असण्याचाही बाऊ केला नसताच कधी. 


                         मी लग्नाला नकार देऊन तुमच्या आणि तुमच्या प्रियकराच्या मार्गात कधीच अडथळा होण्याचा प्रयत्न केला नसताच. निदान मला खरं सांगायला पाहिजे होतं. कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली तुम्ही मला कनिष्क? 


                         किंबहुना, आपले लग्न झाल्यावर तुम्ही माझ्याशी जे मैत्रीचे नाते निर्मिले होते निदान त्या मैत्रीचा पुरस्कार करून सत्य स्विकारणे तुम्ही योग्य मानले नाही. " कनिष्कचा बदललेला आविर्भाव पाहून अभिध्या कुत्सितपणे हसली आणि क्रोध व्यक्त करत म्हणाली. कनिष्क मात्र मान खाली करून पश्चात्ताप व्यक्त करत उभा होता. 


क्रमशः 

..........


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all