द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा(भाग-०९)

नात्यांची वीण पुसटशी काहीशी... तडजोडींनी विणलेली...

                         गडचिरोलीहून साताऱ्याला कनिष्क परतून येताच अभिध्याला वाटले होते की, तिच्या वैवाहिक आयुष्याची यापुढे नक्कीच सुरुवात होईल; परंतु तिच्या पदरी निराशाच पडली. पाहता पाहता कित्येक दिवस निघून गेले. ते दोघेही एकाच खोलीत राहत असायचे. अवघ्या जगासाठी ते दोघे पति-पत्नी होते परंतु प्रत्यक्षात त्या दोघांमध्ये नवरा-बायकोसारखे असे काहीच नव्हते. 


                         तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा; पण तो मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तिच्यापासून दूर दूर पळायचा. अलिखित दुरावा त्याने त्यांच्या नात्यात निर्माण केला होता. किंबहुना, नियतीचे फासेही असे पडायचे की, त्या दोघांमध्ये समागम होण्याची ना परिस्थिती निर्माण होत असायची, ना संधी मिळत असायची. दिवसच नव्हे तर महिनेही ढळत होते अन् त्याहून अधिक प्रमाणात अभिध्याचे मन कटाक्षाने खिन्न होत होते.


                         एकप्रकारे मानसिक दडपण तिच्या मनावर जडले होते अन् याची खबर ना कनिष्कला होती, ना सुमित्राताईंना! कनिष्क त्याच्या कामात व्यग्र असायचा अन् सुमित्राताई तथाकथित शुभचिंतकांच्या सांगोवांगी गोष्टींचा अति विचार करण्यात मग्न असायच्या; पण अभिध्याच्या मनाची कुचंबणा जाणून घेण्यात दोघेही अकार्यक्षम होते. 


                         सुमित्राताई तर भलत्याच भावविश्वात रमल्या होत्या. सुनेवर हक्क गाजवणे अन् तिला मुठीत ठेवण्याची कला त्यांनी अक्षरशः अंगिकारली होती. \"सासू\" असल्याचा अहंकार त्यांच्या आविर्भावात मुरला होता. 


तथापि, वर्चस्वाची प्रचिती करून देण्यासाठी एके दिवशी कनिष्कच्या अनुपस्थितीत सुमित्राताई अभिध्याला उद्देशून म्हणाल्या, " अभिध्या, पूर्वी कनिष्क इथे नव्हता म्हणून काही फारसं नव्हतं; पण निदान आतातरी मुलबाळ होण्याचं मनावर घे. चार-साडेचार वर्षे झाली आहेत तुमच्या लग्नाला आणि अद्याप पाळणा हलला नाही या घरात! कसं वाटतं ते? 


                         आजुबाजूला राहणाऱ्या सर्वजणी कुजबुज करतात तुझ्याबद्दल. तुमच्या लग्नानंतर ज्यांचं लग्न झालं होतं त्यांच्याही घरी मुलबाळ आहेत आणि एक तू आहेस की, अद्याप काहीच मनावर घेत नाहीये. लोक तुलाच वांझोटी म्हणून हिणवतात. निदान त्यांचं तोंड गप्प करण्यासाठी तरी मनावर घे. 


                         आतापर्यंत मी तुला फारसे काही बोलली नाही; पण आता मलाही वाटतंच की नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवावं म्हणून! कोणत्याही स्त्रीला पूर्णतः स्त्रीत्व आई झाल्याशिवाय प्राप्त होत नाही, हे तरी शिकवलंय की नाही तुझ्या आजी-आजोबांनी? " 


" आई, माझ्या आजी-आजोबांनी योग्य ती शिकवण दिलीय मला आणि उत्कृष्ट संस्कार केले आहेत माझ्यावर. शिवाय तुमची आतुरता मला कळत आहे; पण ह्यात माझा काय दोष? " अभिध्या अडखळून म्हणाली. 


                         त्या क्षणी अभिध्याला तिचा आक्रोश आणखी विस्तृत स्वरूपात व्यक्त करायचा होता पण आवंढा गिळून घेत ती मौन राहिली. हुंदका दाटून आला होता पण तरीही त्या वेळी तिने स्वतःच्या शब्दांना आवर घातला. 


दुसरीकडे तिला मौन झालेले पाहून सुमित्राताई पुन्हा एकदा स्वतःचीच बाजू वरचढ ठरवताना म्हणाल्या, " तुझाच दोष आहे अभिध्या. तुलाच त्याच्या मनावर राज्य करता येत नाहीये. 


                         निदान नव-दाम्पत्याने कसं प्रेमाने राहायला पाहिजे, हे ही तुला ठाऊक नाही. कसं ठाऊक असणार म्हणा... आई-वडिलांविना वाढलीस ना! म्हातारे आजी-आजोबा आणखी काय काय सांगणार होते! "


" आई... " अभिध्या अर्धवटच बोलली. 


                        त्या क्षणी वाद-विवादादरम्यान अभिध्याला पोरके असल्याची जाणीव करून देत तिच्या आजी-आजोबांनाही सुमित्राताई गालबोट लावत होत्या. त्यामुळे अभिध्याचा कंठ दाटून आला होता अन् डोळ्यात अश्रू काठोकाठ तरळू लागले होते. तिला काय प्रतिक्रिया द्यावी, हेच काही क्षणांसाठी सुचेनासे झाले होते. 


सुमित्राताईंनाही अंदाज आला होता पण माघार न घेता त्या उन्मत्तपणे म्हणाल्या, " बरं बाई! काहीच बोलत नाही मी तुला पण तू ही तुझ्या नवऱ्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न का करत नाहीस?


                         तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवायला पाहिजे, एकमेकांशी हितगुज साधायला पाहिजे. त्याला तुझ्याशी जवळीकता साधण्याची आपसुकच इच्छा निर्माण व्हायला हवी; पण असे काही घडताना दिसतच नाही. 


                         कदाचित तुझ्या या हेकेखोर स्वभावामुळे तो तुझ्यापासून लांब लांब पळत असेल. तूच त्याला नकार देत असशील. कोणताही नवरा बायकोपेक्षा कामाला कवटाळून घेत नाही; पण कदाचित तूच त्याला हे सगळं करायला भाग पाडत असशील. " 


                         सुमित्राताई लेकाचा पक्ष घेताना अभिध्याला दोषी ठरवून मोकळ्या झाल्या होत्या. त्यांचे आरोप अभिध्याला मात्र सहन होत नव्हते; परंतु तरीही कनिष्क अन् तिचं नातं प्रत्यक्षात कसं आहे, याचा पाठपुरावा न करता ती रडतच तिच्या खोलीत निघून गेली. 


                         खोलीतही तिला वारंवार सुमित्राताईंचे शब्द आठवत होते. तिच्या मातृत्वावर, तिच्या आजी-आजोबांच्या संस्कारांवर आणि तिच्या पोरकेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने ती फार चिडून गेली होती. तिचं मन आक्रोश करण्यासाठी बंड पुकारत होतं अन् म्हणूनच सरतेशेवटी तिने मन खंबीर करून एक निर्णय घेतला. 


                         त्यादिवशी तिने मुद्दाम रजा घेतली अन् घरीच राहून दिवसभर एकूण एक घरकाम आटोपून घेतले. स्वयंपाक ही करून घेतला. सायंकाळी कनिष्क देखील नेहमीपेक्षा लवकर घरी आला होता. मायलेक बऱ्याच दिवसांनंतर मनमोकळेपणाने गप्पा करत होते. अभिध्याने मात्र हस्तक्षेप केला नाही. ती तिच्या कामात व्यग्र होती. 


                        तिने रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त करून घेतला अन् जेवणाची वेळ होताच तिने तिघांसाठीही ताट वाढले. नंतर त्या तिघांनीही एकत्रच जेवण करून घेतले. जेवण आटोपल्यानंतर सुचित्राताई अन् कनिष्क आपापल्या खोलीत निघून गेले.


                         अभिध्यानेही संपूर्ण आवरा-आवर केली. फाटकाला कुलूप लावले अन् मुख्य द्वारही नीट बंद केले. खिडक्या बंद असल्याची खात्री वगैरे करून घेतल्यावर अभिध्या देखील खोलीत निघून गेली. खोलीत गेल्यावर तिला कनिष्क सोफ्यावर बसून पुस्तक वाचताना दिसला. तिने हलकासा उसासा घेतला व जड अंतःकरणाने मनाचा हिय्या करून ती सावकाश पावले टाकत त्याच्याजवळ गेली अन् त्याच्याशी लगट करू लागली. अर्थात एकप्रकारे जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली.


                         त्या क्षणी मनातील सर्व विचार झटकून अन् तिच्या सर्व नीतिमूल्यांची वा तत्वांची जराही दखल न घेता ती त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती; परंतु कनिष्क प्रतिसाद देत नव्हता. त्याच्यासाठी तो संपूर्ण प्रसंग अनपेक्षित होता. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. 


                         अभिध्याने तरीही तिचे प्रयत्न सुरू ठेवले पण कनिष्क आनंदी वा उत्तेजित होण्याऐवजी चिडला अन् त्याने तिला स्वतःपासून दूर ढकलले. त्याने कंटाळून अन् अनपेक्षितपणे आक्रमकपणे तिला धक्का दिल्याने ती पलंगावर आदळल्या गेली. लोहधातूचा पलंग असल्याने त्या पलंगाच्या एका कोपऱ्यामुळे तिच्या कपाळावर हलकीशी जखम झाली व त्यातून संथ गतीने रक्तस्राव होऊ लागला. 


                         एकीकडे कनिष्कचा आक्रमक आविर्भाव अभिध्याच्या मनाला पोखरून गेला. त्या क्षणी ती फार दुखावल्या गेली होती. रात्रभर ती रडत होती. दुसरीकडे कनिष्कही अभिध्याच्या अनपेक्षित अन् विचित्र आविर्भावामुळे संतापला होता. तथापि, काहीही न बोलता तो त्या रात्री सोफ्यावरच झोपी गेला. 


                         दुसऱ्या दिवशी सकाळीच कनिष्कचा संताप कमी झाला. त्याचे अभिध्याच्या जखमेकडे लक्ष गेले अन् त्या क्षणी त्याला त्याची चूक कळली. त्याने अलबत अभिध्याची माफी मागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंघोळ आटोपून अभिध्या न्हाणीघरातून बाहेर येताच त्याने तिची माफी मागितली. तिनेही माफ केले. 


                         थोड्या वेळाने दीर्घ श्वास घेत त्याने अभिध्याला तिच्या विचित्र व्यवहाराबद्दल विचारपूस केली. तिनेही थोडक्यात आपबिती सांगितली. सर्वकाही जाणून घेतल्यावर कनिष्कलाही अभिध्याची मनस्थिती कळली परंतु त्याने तिचे समर्थन केले नाही. उलटपक्षी तो तिची निराळ्या पद्धतीने समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला.


" अभिध्या, तुझा हेतू योग्य असला तरी तुझ्या भावनेत पावित्र्य नव्हते. समागम बळजबरीने केले जात नाही. ती एक पवित्र भावना आहे. मातृत्व सिद्ध करण्याचा मार्ग नाही. 


                         तू माझी मैत्री अनुभवलीस ना? त्यावरून एवढा अंदाज तुलाही आला असेलच ना की, मला बळजबरी पसंत नाही. मी स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देतो. त्यामुळे मनाविरुद्ध समागम साधणे मला पटत नाही. तुझ्या मनाचा हिरमोड होत असेल पण समजून घे ना! 


                         तुझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे मान्य आहे मला पण समागम करताना दोन मनांचा संगम होणे अपेक्षित असतो. बळजबरीने ना यथेच्छ समागम साधले जात, ना तृप्तीचे अंतिम चरण गाठले जात. " कनिष्कने त्याच्या परीने अभिध्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अभिध्या मात्र त्याचा एकूण एक शब्द ऐकून विचारात हरवली.


क्रमशः

......... 

©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all