द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा (भाग-०७)

काही मने केवळ नात्यात गुंतली जातात अन् प्रत्यक्षपणे मात्र तडजोडीत गुंफली जातात.

अभिध्या भारावलेल्या मनाने कृतज्ञ स्वरात कनिष्कला म्हणाली, " कनिष्क, किती समजुतदार आहात ओ तुम्ही! मला खरंच पटतंय तुमचं मत! तुमचे विचार खरंच फार उत्कृष्ट आहेत. मला काहीच आक्षेप नाही. आपण आधी एकमेकांशी मैत्री करून एकमेकांचे मन जाणून घेऊयात. इतर सर्व घडामोडींसाठी उभं आयुष्य आहेच. " 


" हेच अपेक्षित होतं मलाही! " कनिष्क उत्तरला. 


" बरं! मग मित्रा आता तू तुझं आवरून घे, उशीर झालाय ना फार! " अभिध्या हसू आवरत अन् कनिष्कच्या हातात हात गुंफत म्हणाली. 


" काय? मित्रा? " कनिष्कने आश्चर्याने विचारले. 


" आश्चर्यचकित का होत आहात? तुम्हीच म्हटलंत ना आजपासून आपण दोघे मित्र! मग त्यावर अंमलबजावणी करायला नको? " अभिध्या हसू आवरत उत्तरली. 


" हो का! बरं मग तू मार मला हाक मित्रा अशी! मी ही म्हणेलच तुला आजपासून सखी! " कनिष्क मंद हसून उत्तरला. 


" ह्म्म. चालतंय! " अभिध्या हसून म्हणाली. 


" बरं, मग मी जातो आणि आवरतो माझं. " कनिष्क उत्तरला अन् न्हाणीघराकडे वळला; परंतु त्या दिशेने जाण्याआधी त्याने अभिध्याच्या केसांना अलवार कुरवाळले व तिच्याही नकळत अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. 


                         संपूर्ण घटना इतक्या जलद झाली होती की, अभिध्याला काही क्षण खबरच लागली नाही; परंतु कालांतराने जाणीव होताच तिच्या गालांवर गुलाबसर लाली चढली. तथापि तिने स्वतःच्याच ओंजळीत स्वतःचा लाजून गोरामोरा झालेला चेहरा अलगद झाकून घेतला. 


                         काही वेळाने नित्य दिनक्रम सुरू झाला. पाहता पाहता एक आठवडा सरून गेला. अभिध्या घरकाम सांभाळून तिचा व्यवसाय हाताळत होती. कनिष्क त्याच्या कार्यालयीन कामकाजात व्यग्र होता. वानखेडे कुटुंब अगदी प्रसन्न होते. सुमित्राताई देखील आनंदी होत्या. 


                         तथापि एके दिवशी नाष्टा करताना सुमित्राताईंनी मधुचंद्राबद्दल विचारपूस केली. त्या चर्चेत अभिध्या सामील झाली नव्हती; परंतु कनिष्कने सुमित्राताईंच्या शब्दांचा मान राखून मधुचंद्राचा बेत आखला. साधारण एक आठवड्यासाठी कनिष्क अन् अभिध्या रतनवाडीला मधुचंद्रासाठी गेले. 


                         रतनवाडीदरी खोऱ्यातून भटकायचे असेल तर रतनवाडी हा उत्तम पर्याय आहे, असे कनिष्कच्या सहकारी मित्रांनी सुचवले होते. त्यामुळे ते दोघेही मधुचंद्रासाठी आवर्जून त्या ठिकाणी गेले; परंतु मधुचंद्र केवळ निमित्त होते. तिथे गेल्यावरही त्या दोघांनी शारीरिक जवळीकता निर्माण केली नव्हती. याउलट त्यांनी कामकाजापासून थोडा विसावा घेत त्यांच्या ऐच्छिक सहलीचा मनाप्रमाणे आस्वाद घेतला. 


                         सुमारे चारशे वर्षे जुन्या रतनगडाच्या पायथ्याशी वसलेले तीस-चाळीस घरांचे रतनवाडीत जोडप्यांसाठी नावाजलेल्या एका आकर्षक स्थळी ते दोघेही गेले. रतनवाडी परिसरातील अनेक धबधबे अन् इतर नैसर्गिक सौंदर्याला त्यांनी मनमुराद न्याहाळले. त्याचबरोबर \"नेकलेस फॉल\" या विशेष लोकप्रिय धबधब्यालाही त्यांनी भेट दिली. एकमेकांच्या सोबतीत कित्येक आठवणी त्यांनी विणल्या. 


                         एक आठवड्यानंतर ते माघारी परतले. त्यांच्या मैत्रीने संकोचपातळी फार मागे लोटली होती. त्या दोघांमध्ये सलोख्याचे नाते निर्माण झाले होते. संवाद न साधताही ते दोघे एकमेकांचे मन जाणून घेण्यात बरेचसे पारंगत झाले होते. थोडक्यात, साधारण मैत्रीचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले होते. एवढेच नव्हे तर, अभिध्याच्या मनात कनिष्कसाठी प्रेम उत्पन्न झाले होते. 


                         तिचे मन कनिष्कवर पूर्णतः भाळले होते. त्यामुळे ती त्यांच्या मैत्रीच्या नात्याला वैवाहिक नात्यात रुपांतरित करण्यात उत्सुक होती. तथापि, एके दिवशी नेहमीप्रमाणे कनिष्क जेव्हा त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी सज्ज होता तेव्हा अभिध्याने तिच्या प्रेमाची कबुली दिली. त्यासह सायंकाळी ऑफिसहून लवकर येण्याची विनंती केली. तसेच समागमासाठी ती खुद्द सज्ज असल्याचेही ओशाळूनच का होईना पण मूक इशाऱ्यांद्वारे तिने कनिष्कला कळवले. कनिष्कने मंद हसून प्रतिसाद दिला व तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. 


                         त्या दिवशी अभिध्याने रजा घेतली होती. सुमित्राताईंनी रजा घेण्यामागील कारण विचारताच अभिध्याने प्रकृती योग्य नसल्याचा बहाणा करून वेळ मारून घेतली. तथापि, उत्साही अभिध्याने त्यादिवशी कनिष्कच्या पसंतीनुसार स्वयंपाक केला होता. जय्यत मेजवानीचा बेत आखला होता. सायंकाळी कनिष्क ऑफिसहून परत आल्यावर तिचा आनंद अक्षरशः द्विगुणित झाला होता. 


                         तथापि, कनिष्क फ्रेश होऊन डायनिंग टेबलजवळ सज्ज झाला. कनिष्क आवडीचे अन्नपदार्थ पाहून भलताच खूष झाला होता. त्यानंतर त्या तिघांनीही एकत्रच जेवण केले. सुमित्राताई जेवण आटोपून त्यांच्या खोलीत विश्रांती घ्यायला निघून गेल्या. कनिष्क मात्र अंगणात शतपावली करत होता. अभिध्याने संपूर्ण आवरा-आवर करून घेतली व उसंत मिळताच खोली गाठली. 


                         त्यांच्या खोलीचे तिने थोड्याफार साहित्याचा वापर करत दिमाखदार सुशोभीकरण केले होते. मोजक्याच ठिकाणी सुगंधित मेणबत्त्या प्रज्वलित केल्या होत्या. त्यामुळे चोहीकडे दरवळ पसरत होता. त्याचबरोबर बिछान्याला काही ठराविक फुलांची आरास केली होती. म्हणूनच सबंध खोली अगदी विशेष आकर्षक दिसत होती. अभिध्या स्वतःदेखील केसांत गजरा माळून अन् हलकाच साजश्रृंगार करून हलकीशी साडी नेसून सज्ज झाली होती. 


                         काही वेळाने शतपावली आटोपून कनिष्क ही खोलीत गेला. संपूर्ण खोलीचे निरिक्षण करताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला अन् तो गोंधळून अभिध्याकडे पाहू लागला. त्याने मूक इशाऱ्याने विचारपूस करताच अभिध्यानेही गालावरील लाली झाकोळून थोडक्यात माहिती पुरवली. 


                         अभिध्याच्या बेधडक आविर्भावाने कनिष्क हलकासा मंद हसला. त्यानंतर तिचे हात हातात घेत त्याने तिला बिछान्यावर बसवले व तो ही बसला. त्यानंतर अलगद अलवार स्पर्श करत त्याने तिचे केस बाजुला सारले व तिचा चेहरा ओंजळीत घेतला. किंबहुना, त्याक्षणी तो तिच्याशी संवाद साधणार होता पण तत्पूर्वीच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली अन् तंद्री भंग पावली. 


                         कनिष्कने लगेच फोन हातात घेतला व वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नाव झळकताच कॉल उचलला. कॉलवर जुजबी बोलून त्याने कॉल आटोपला. 


संभाषण आटोपताच तो घाईगडबडीतच अभिध्याला उद्देशून म्हणाला, " अभिध्या, मी थोडा बाहेर जातोय. वरीष्ठ अधिकारी चितळे साहेब यांनी मला ताबडतोब बोलावलंय. " 


" काय? एवढ्या रात्री? अहो, तुम्ही आपात्कालीन अधिकारी नाहीत ना मग एवढ्या रात्री कसे काय तुमचे साहेब तुम्हाला आदेश देऊ शकतात? आणि कशासाठी त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलंय? " अभिध्याचा हिरमोड झाला होता. त्यामुळे त्रागा व्यक्त करत ती विचारपूस करत होती. 


" एवढ्या तातडीने बोलावलंय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. असो. मलाही फारशी कल्पना नाही; पण मी येतो लगेच त्यांना भेटून. " कनिष्कने थोडक्यात अभिध्याची समजूत काढली. 


" बरं, ठीक आहे. सावकाश आणि जपून जा! काळजी घ्या. " अभिध्याने नाईलाजाने परवानगी दिली व निरोप घेतला. 


                         कनिष्कने ही अंगावर पांढरा सदरा चढवत, केस नीट केले व लगेच खोलीतून धूम ठोकून अभिध्याचा निरोप घेतला. अभिध्या मात्र दाराच्या उंबरठ्यालगत उभी राहून बाहेर जाणाऱ्या कनिष्ककडे पाहत राहिली. काही वेळाने तिने फाटक अन् मुख्य खोलीचे दार नीट बंद करून घेतले व ती तिच्या खोलीत गेली. 


                         कनिष्क बाहेर गेल्यापासून तिचे कशातही मन रमत नव्हते. काही वेळ तिने लॅपटॉप उघडून कामात मग्न होण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. थोडा वेळ विरंगुळा म्हणून मोबाईल हातात घेतला पण त्यातही तिचे मन रमले नाही. तिची तीक्ष्ण नजर घड्याळाच्या काट्याकडे होती अन् कान कनिष्कच्या वाहनाचा अंदाज घेण्यासाठी सज्ज होते; परंतु तिची क्षणाक्षणाला निराशाच होत होती. 


                         बराच वेळ खोलीत येरझारा घालून अक्षरशः दमली होती. मनाचे ही खच्चीकरण झाले होते. तिने रंगवलेल्या गुलाबी स्वप्नांची पायधूळ झाली होती; त्यामुळे ती वैतागली होती. कनिष्कला फोन करण्यासाठी तिचे हात वळवळत होते पण ती स्वतःच्या मनाला आवर घालत होती; कारण तिला कनिष्कच्या कामकाजात बाधा निर्माण करायची नव्हती. तथापि, खिन्न मनाने ती बिछान्यावर पहुडली अन् वेळोवेळी कुस बदलत ती अश्रू गाळत होती. 


                         डोळे मिटताच वारंवार तिला कनिष्कचा आभास होत होता पण लगेच डोळे उघडल्यावर तिला औदासिन्य अनुभवावे लागत होते. अशाच प्रकारे पाहता पाहता अभिध्यालाही एक-दीडच्या सुमारास झोप लागली. बराच वेळ सरून गेला पण त्या रात्री कनिष्क परतला नाही. 


क्रमशः

........ 

©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all