द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा (भाग-०३)

नातं जुळलं म्हणजे प्रेम जडतंच असं नाही. कधी येतात असंख्य अडथळे अन् कधी होतात गैरसमज अन् कधीकधी होतात घाव अक्षरशः! आणि यातून सुरू होतो तडजोडीचा प्रवास.

संपतराव स्वतःचे कौतुक करत होते. त्यामुळे मध्येच त्यांना बोलता बोलता थांबवून रागिणीताई मंद हसून म्हणाल्या, " ह्म्म. तुमचं स्वप्रशंसापुराण बंद करा आता आणि माझं ऐका! " 


" बोला मॅडम! " संपतराव मस्करीच्या सुरात म्हणाले. 


" मला तर वाटतं की, आपली अभिध्या फारच नशिबवान ठरणार आहे; कारण एकमेवाद्वितीय अन् सर्वसमावेशक असतील माझे भावी जावईबापू! " 


" आजोबा बघत आहात ना! आजीला \"भावी जावई बापूकडून\" जास्तच अपेक्षा आहेत वाटतं. " अभिध्या मुद्दाम \"भावी जावई बापू\" या शब्दांवर जोर देत म्हणाली. 


" ह्म्म. बघ ना! जास्तच भुरळ पडली आहे. " संपतरावही ओठांतलं हसू दाबत म्हणाले. 


" गप्प बसा तुम्ही दोघे. निमित्त हवं असतं तुम्हाला माझी छेड काढण्याचे. डांबिस कुठले! आगाऊपणाचा कळस गाठत असतात कायम. " रागिणीताईंनी हळूच संपतराव व अभिध्याचे कान खेचले. त्या दोघांना मात्र काहीच इजा होत नसल्याने ते दोघेही खळखळून हसत होते अन् त्यांचे खळखळणारे नितळ हसू पाहून रागिणीताईंचेही हसू अनावर झाले व त्या देखील हसायला लागल्या. 


                         थोड्या वेळाने शतपावली करून झाल्यावर अन् चर्चा आटोपल्यावर ते तिघेही आपापल्या खोलीत झोपायला गेले. रागिणीताईंना अति उत्साहामुळे लगेच झोप लागली होती; परंतु संपतरावांच्या मनात मात्र असंख्य विचार सुरू होते. अर्थातच नाती विवाह योग्य झाल्याचे वास्तव स्विकारताना त्याचं मन भावूक झालं होतं. शिवाय अभिध्याच्या विवाहासंदर्भात काळजी ही होतीच. त्यामुळे वारंवार संपतराव कूस बदलून मनोमन विचार करत होते. 


ते मनातल्या मनात म्हणाले, " उद्या अभिध्याला पाहायला स्थळ येतंय खरं पण नेमकं काय होईल? प्रत्यक्षात अभिध्या सर्वगुणसंपन्न आहे पण अभिध्याच्या पसंतीनुसार तिला जोडीदार मिळेल ना? फार अशी अपेक्षा नाहीच आहे तिची फक्त प्रामाणिक जोडीदार हवाय तिला; पण आजच्या काळात हाच एक गुण दुर्मिळ होत चाललाय. 


                         बालपणापासून तडजोड करत आलीये आमची अभिध्या! आई-वडिलांचेही फारसे प्रेम लाभले नाही तिला. अल्पवयात आई-वडिलांचा आसरा गमावलाय तिने! निदान आम्हा दोघानंतर अभिध्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती तिच्या सोबतीला असावी, हीच इच्छा आहे माझी! परमेश्वरा, आतापर्यंत तडजोड करायला भाग पाडलंस तू तिला पण निदान आता तरी तिच्या हक्काचे प्रेम, जिव्हाळा अन् आपुलकी जोडीदाराच्या स्वरूपात लाभो, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. "


संपतराव मनोमन साकडे घालत होते. तेवढ्यात रागिणीताईंना जाग आली. त्यामुळे त्या विचारपूस करत म्हणाल्या, " काय ओ, काय झालं? अजून जागेच आहात? " 


" काही नाही सहजच. तू झोप निवांत. मी ही झोपतोय. शुभ रात्री. " संपतरावांनी विषयाची उकल न करणे श्रेयस्कर मानले व ते निद्रेच्या स्वाधीन झाले. रागिणीताईंना थोडे संशयास्पद वाटले; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यांनीही कूस बदलली व झोपी गेल्या. 


                         पाहता पाहता रात्र सरून गेली अन् दुसरा दिवस उजाडला. अभिध्याच्या घरी ठरल्याप्रमाणे बरीच वर्दळ सुरू होती. रागिणीताईंनी अभिध्याच्या काही कर्मचाऱ्यांकडून थोड्याफार प्रमाणात घराची साज-सजावट करून घेतली होती व घराची रुपरेषा अगदी सुशोभित केली होती. पाककलेत निपुण असलेल्या अभिध्यानेच चहा, फरसाण आणि कांदेपोह्याची व्यवस्था केली होती. तिने स्वतः सर्व पदार्थ बनविले होते. 


                         पाककृती ते इतर सुशोभीकरण संपूर्ण बंदोबस्त नीटनेटका अन् चोख करण्यात आला होता. त्यानंतर सुनिश्चित केलेल्या वेळी पाहुणेमंडळी ही \"माऊली निवास\"मध्ये हजर झाले होते. पाहुण्यांचे आगमन होताच त्या सगळ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पहिल्यांदा सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. ज्या पंडिताने स्थळ सुचवले होते, ते पंडितही तिथेच हजर होते. त्यांनीच दोन्ही कुटुंबाची ओळख करून दिली. दोन्ही कुटुंबे एकमेकांशी संवाद साधून चर्चा करत होते. 


                         एकीकडे मुख्य खोलीत पाहुण्यांची रेलचेल होती अन् दुसरीकडे माजघरात थांबून मुख्य खोलीतील संवादाचा कानोसा घेत होती. त्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीनुसार अभिध्याने साडी नेसली होती. साधाच परंतु आकर्षक असा साज-श्रृंगार केला होता; त्यामुळे विशेष आकर्षक दिसत होती ती! नाकंडोळी तशी ती सुंदर होतीच पण त्या दिवशी अस्सल पारंपरिक पेहरावाने तिच्या सावळ्या सौंदर्यात विशेष भर घातली होती. 


                         बराच वेळ मोरे अन् वानखेडे कुटुंबातील सदस्यांमध्ये निखळ चर्चा रंगली होती. जुन्या ओळखी-पाळखी निघाल्या होत्या. त्यामुळे कळत-नकळत वातावरणातला अवघडलेपणा मावळून गेला होता व सौहार्दपूर्ण हितगुज सुरू झाले होते. 


काही वेळाने सुमित्राताई वानखेडे अभिध्याचा उल्लेख करत म्हणाल्या, " तुमचे स्वभाव आवडले आम्हाला. आता अभिध्याशी ही ओळख करून घ्यायला आवडेल आम्हाला. " 


                        सुमित्राताईंचा सूचक इशारा कळताच रागिणीताईंनी अभिध्याला हाक मारली. हाक ऐकू येताच अभिध्या ट्रेमध्ये चहा-नाश्ता घेऊन मुख्य खोलीच्या दिशेने रवाना झाली. सावकाश अन् जपून पावले टाकत तिने तिथे उपस्थित सगळ्यांना चहा-नाश्ता दिला. सुमित्राताईंनी काही ठराविक प्रश्न विचारले. ठराविक प्रश्नांची उत्तरे अभिध्यानेही सुटसुटीत स्वरूपात दिले. शिक्षण, छंद इत्यादीविषयक प्रश्न ही सुमित्राताईंनी विचारले होते. अभिध्यानेही योग्य ती उत्तरे दिली. त्यानंतर भावी वधू-वरांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता यावे व एकमेकांना जाणून घेता यावे म्हणून वडीलधाऱ्यांनी त्या दोघांनाही एकांतात हितगूज अर्थात संवाद साधण्यासाठी पाठविले. त्यानंतर ते दोघेही वडीलधाऱ्यांच्या शब्दांचा मान राखून ते दोघेही गच्चीवर गेले.


                         गच्चीवर गेल्यावर अभिध्याने वर मुलाची थोडीफार विचारपूस केली. त्यानेही तिच्या सर्व प्रश्नांचे थोडक्यात उत्तर देत तिच्या शंकाकुशंकांचे निरसन केले. \"वर मुलाशी\" बोलताना तो व्यक्ती विशेष बोलका नसल्याचे अभिध्याच्या लक्षात आले होते. त्याबाबत तिलाही फारसा आक्षेप नव्हता. खरंतर, मुळात अभिध्याचा स्वभाव \"वर मुलाच्या\" अगदी विपरीत होता. अर्थात ती अतिशय बोलकी, मनमोकळी, क्षणात ओळख निर्माण करणारी, सगळ्यांशी जुळवून घेणारी अन् चंचल स्वभावाची होती; परंतु त्याक्षणी \"वर मुलगा\" फारसा प्रतिसाद देत नसल्याने तिनेही फारशी दखल घेतली नाही व अतिरिक्त प्रश्न विचारण्याची तसदी देखील घेतली नाही. 


बराच वेळ ते दोघेही गच्चीवर उभे होते. थोड्या वेळाने \"वर मुलाने\" दीर्घ श्वास घेतला व तो अभिध्याला उद्देशून म्हणाला, " अभिध्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. " 


" हो, बोला ना कनिष्क! काय बोलायचंय तुम्हाला? " अभिध्या \"वर मुलास\" उद्देशून मंद हसत म्हणाली. (कनिष्क वानखेडे अर्थात पंडिताने सुचविलेले स्थळ) 


" अभिध्या, मला तुमच्यापैकी कुणाचीही दिशाभूल करायची नाहीये. तुला तुझ्या आजी-आजोबांनी मोठ्या लाडाने वाढवले आहे. तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. त्यामुळे तुम्हा तिघांशी खोटं बोलून ना मला संसार थाटायचा आहे, ना तुमच्यापासून काहीच लपवून ठेवायचंय. " कनिष्क चाचरत स्वतःची बाजू मांडताना गूढ स्वरात म्हणाला; परंतु त्याच्या शब्दांतील गांभीर्य ओळखून अभिध्याला संशय आला. त्यामुळे ती कनिष्कचे बारकाईने निरीक्षण करू लागली. 


तिने दीर्घ श्वास घेतला व लगेच साशंक नजरेने विचारले, " कनिष्क, कोणता खुलासा करायचा आहे तुम्हाला? एक मिनिट, तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही इथे आलेले आहात का? तुमचं कुणावर प्रेम आहे का? " 


" नाही. " कनिष्क नकारार्थी मान हलवून उत्तरला. 


" बरं, ठीक आहे! परंतु जर तशी कुठलीही बाब असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने मला सांगू शकता. मी कोणताही आक्षेप घेणार नाही. याउलट मी स्वेच्छेने माघार घ्यायला तयार आहे. तुमच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती नाहीये. सरतेशेवटी आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि ह्या शतकातही लग्नासाठी बंधन लादले जाणे मला चुकीचे वाटते. विवाह हा एक संस्कार असेल तरीही दोन कुटुंबांआधी दोन हृदय जुळणे अग्रगण्य कर्तव्य वाटतं मला. त्यामुळे तुम्ही ही मनात कोणतेही मनोग्रह बाळगू नका अन् बिनदिक्कत मला तुमची समस्या सांगा. " अभिध्या मंद हसून कनिष्कला दिलासा देत म्हणाली. 


" तुम्ही फार समजुतदार आहात पण तुम्ही विचार करत आहात अशी कोणतीही भानगड नाहीये. माझं बाहेर कुठेच प्रेम-प्रकरण नाही. " अभिध्याचा समजुतदार स्वभाव पाहून कनिष्क थोडा आश्वस्त झाला होता. म्हणून तो लगेच मंद हसून म्हणाला. कनिष्कचे उत्तर ऐकून अभिध्या देखील आश्वस्त झाली व मंद हसू लागली. 

क्रमशः

......... 


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all