द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा (भाग-०२)

कधीकधी काही नाती जुळतात खरं पण त्याचा अंत कुणासही ठाऊक नसतो. या कथेत ही अनपेक्षित वळण पाहायला मिळतील.

संपतराव आणि अभिध्याच्या इशाऱ्याचे रागिणीताई बराच वेळ निरीक्षण करत होत्या. तथापि अंदाज न लागल्याने रागिणीताई गोंधळून त्या दोघांकडे पाहू लागल्या. तसेच विचारपूस करत म्हणाल्या, " काय सुरू आहे तुम्हा दोघांचं? काय लक्षात आहे ना? " 


" हेच की, छोरी हसी तों फसी! " अभिध्या आणि संपतराव एकत्रच उत्साहात म्हणाले व त्या दोघांनी एकत्रच रागिणीताईंचा प्रत्येकी एक गाल खेचला. 


" तुम्ही दोघे कधीच सुधारणार नाहीत ना? " त्या दोघांचा बालिश आविर्भाव पाहून रागिणीताई दरडावून म्हणाल्या. 


" नाही. " अभिध्या अन् संपतराव ही एक सुरात म्हणाले व जोरजोरात हसू लागले. त्यांना हसताना पाहून रागिणीताई ही हसू लागल्या. 


                         थोड्या वेळाने काळोख होऊ लागताच अन् दिवाबत्तीची वेळ होताच ते तिघेही घरात गेले. अभिध्याने सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावून शुभंकरोति करून घेतली. त्यानंतर ती घरकामात व्यग्र झाली व वेळेचा सदुपयोग करत अभिध्याने स्वयंपाक ही आटोपून घेतला. त्यानंतर जेवणाची वेळ होताच तिघांनीही जेवण केले. पोट भरताच क्षुधातृप्तीचा ढेकर देऊन तिघेही आनंदी होते. 


                         त्यानंतर नेहमीप्रमाणे तिने आवरा-आवर करून घेतली अन् नंतर ती लॅपटॉप घेऊन कानात ब्लुटूथ घालून तिच्या \"अभिध्या इव्हेंट्स\" कंपनीतील कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागली. आगामी प्रकल्पावर (इव्हेंट प्रोजेक्ट्स) कशा पद्धतीने काम करता येईल, याविषयी ती सुयोग्य मार्गदर्शन करत होती. साधारण एक ते दीड तास व्हिडीओ मिटींग सुरू होती. त्यानंतर योग्य ते मार्गदर्शन करून झाल्यावर अभिध्याने मिटींगचा समारोप केला. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना आगामी प्रकल्पावर काम करण्यास प्रोत्साहन देऊन व जिद्द अन् चिकाटीने कार्य करण्यास शुभेच्छा देऊन अभिध्याने निरोप घेत मिटींग आटोपली. 


                         एकीकडे अभिध्या तिचे कार्यालयीन कामकाज आटोपून अंगणात शतपावली करण्यास गेली. दुसरीकडे संपतराव अन् रागिणीताई तिथे आधीच झोपाळ्यावर बसून चर्चा करत होते. गौरी व्हरांड्यात जाताच तिने तिच्या आजी-आजोबांना तिच्यासह शतपावली करण्याचा आग्रह केला. ते दोघेही तिची इच्छा नाकारणार नव्हतेच; कारण शतपावली करण्याची उचित वेळ झाली होती. तथापि ते तिघेही अंगणात सावकाश शतपावली करू लागले. 


दरम्यान शतपावली करताना चर्चेकरिता विविध विषय रंगले होते. ते तिघेही चर्चा करत होते अन् तेवढ्यात रागिणीताईंनी दुसरा मुद्दा छेडला व त्या अभिध्याला उद्देशून म्हणाल्या, " अभि, ऐक ना बाळा! महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. " 


" बोल ना! " अभिध्या मंद हसून म्हणाली. 


" उद्या रविवार आहे तर नक्कीच तुझ्या ऑफिसला सुट्टी असेल; पण मला पूर्ण खात्री आहे की, तू घरीही लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून तुझ्या टीमला मार्गदर्शन करत बसशील. म्हणून तू उद्या \"वर्क फ्रॉम होम\" या संकल्पनेलाही तिलांजली दे. कार्यालयीन कामकाज करू नको. शिवाय उद्या कोणत्याही कारणाने कोणत्याही मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला जाऊ नकोस. विनंतीवजा धमकी समज पण मी सांगतेय ते कर. मला कोणतेही बहाणे नको. थोडक्यात, उद्या तुझा पहिला-वहिला कांदेपोह्याचा कार्यक्रम आहे. पहिलंच स्थळ आहे म्हणून जरा पद्धतशीरपणा बाळगायला हवा, असं मला वाटतं आणि तू माझ्या या मताचा आदर करावा माझं हे स्पष्ट मत आहे. " रागिणीताई अभिध्याला एकप्रकारे आदेश देत म्हणाल्या. 


                         अभिध्या रागिणीताईंना प्रतिसाद देणार होती पण तेवढ्यात अभिध्याचा फोन वाजू लागला. तिने फोन हातात घेतला तर तिच्या पी.ए.चे नाव झळकले. ती लगेच कॉल उचलणार होती पण त्याआधीच रागिणीताईंनी अभिध्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. अभिध्या आश्चर्याने पाहत होती अन् तेवढ्यात त्यांनी फोन उचलला व त्यांनी बोलायला सुरुवात केली. 


रागिणीताई कॉलवरील व्यक्तीस(अभिध्याच्या पी.ए.ला) उद्देशून म्हणाल्या, " हॅलो, शनाया! मी अभिध्याची आजी बोलतेय. उद्याच्या सर्व मिटींग्स कॅन्सल कर. ऑनलाईन असो वा ऑफलाईन कोणत्याही मिटींग्स असो त्या रद्द कर. उद्याच्या दिवस निदान कार्यालयीन कामकाजासाठी कॉल करू नकोस. इतर कशासाठी ही तू कॉल केलास तर हरकत नाही. केवळ उद्या कामापासून रजा घ्या. तुम्ही सर्व कर्मचारी ही रजा घ्या आणि या तुमच्या अभिध्या मॅडमलाही रजा घेऊ द्या. कळलं? " 


" ठीक आहे. मी रद्द करते सर्व मिटींग्स. " पलीकडून शनाया उत्तरली. 


" ह्म्म. बरं. ठेवते फोन. शुभ रात्री. " रागिणीताई म्हणाल्या. 


" शुभ रात्री. " शनाया उत्तरली व लगेच फोन ठेवला. 


फोन आटोपताच रागिणीताईंनी अभिध्याकडे मोबाईल सोपवला. अभिध्या मात्र गाल फुगवून रागिणीताईंकडे पाहत होती. त्यांनाही थोडा फार अंदाज आला होता परंतु तरीही अभिध्याला चाहूल लागू न देता त्या विचारपूस करत म्हणाल्या, " काय झालं असं बारीक डोळे करून पाहायला? "


रागिणीताईंचे प्रश्न ऐकून अभिध्याने ही मौन सोडले व ती तक्रारीच्या सुरात म्हणाली, " आजी, काय गं तू? सायंकाळी दिलेले तुझे ते तत्त्वज्ञान कमी पडले का? परत झालीस तू सुरू. मलाही कळतं ना ह्या सर्व गोष्टी! निदान मला बोलू तरी द्यायचं होतं शनायाबरोबर. तिने कशासाठी कॉल केला होता हे जाणून न घेता तूच तुझा आदेश सोडून मोकळी झालीस. "


" मला माहिती आहे कशासाठी शनाया फोन करत असते ते! शिवाय काही कळत नाही तुला. नुसतं काम एके काम एवढंच कळतं तुला. ना स्वतःच्या शरीराला आराम करून घेत, ना कर्मचाऱ्यांना जरासा विसावा घेऊ देत! अन् वर तोंड करून म्हणतेस की, कळतात साऱ्या रीतीभाती! तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते. मला पूरेपूर खात्री आहे की, तू किती वेंधळी आहेस विश्रांतीप्रती अन् कामकाजाकरिता किती सज्ज आहेस! त्यामुळे तू राहूच दे अन् आता खोलीत जाऊन शनायाला परत कॉल करू नकोस. आजपासून ते उद्यापर्यंत कामकाजाला सुट्टी म्हणजे सुट्टीच आणि हा माझा आदेश आहे. " रागिणी हसून आदेशयुक्त स्वरात म्हणाल्या. 


" ह्म्म. तुला ना एक संधी सोडायची नसते मला छळण्याची! असो. मी नाही जाणार उद्या कुठेच. ना ऑफिस वर्कमध्ये स्वतःला बिझी करून घेणार. उद्या, सगळं तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. याच निमित्ताने बघावे लागेल की, काय भूरळ पाडलीय त्या महाशयाने तुला! फोटो तर पाहिला नाही मी अद्याप पण उद्या प्रत्यक्ष दर्शनच करून घेईल. " रागिणीताईंचा आदेश ऐकून अभिध्या प्रतिसाद देत म्हणाली. 


" फोटो पाहण्याला बंदी नाहीये. बघायचा आहे का तुला फोटो? बघू शकतेस तू. थांब मी खोलीतून आणते लगेच. " रागिणीताई म्हणाल्या व फोटो आणण्याकरिता त्यांच्या खोलीत जाऊ लागल्या. 


त्याच क्षणी अभिध्याने रागिणीचा हात धरला व ती त्यांना उद्देशून म्हणाली, " आजी, थांब. तू फोटो आणू नकोस. " 


" का? " रागिणीताईंनी गोंधळून अभिध्याला विचारले. 


" कारण मला एखाद्या व्यक्तीच्या रुपापेक्षा त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यात जास्त रस असतो. चेहरा काय लाख सुंदर असेल पण स्वभावात खोट निघाली तर कसं चालणार ना! त्यामुळे सध्यातरी तुझ्या तथाकथित भावी जावई बापूंचा फोटो मला दाखवू नकोस. मला अद्याप कित्येक देखण्या मुलांनी मागणी घातलीय पण मी नाकारलंय त्यांना कारण त्यांच्या ना केवळ स्वभावात पण चारित्र्यातही त्रुटी होत्या. त्यामुळे चेहऱ्याचा मोह नाहीये मला फक्त आयुष्यात आजोबांसारखा निस्सीम प्रेम करणारा जोडीदार हवाय मला. कातरवेळेत जो माझा आधार होईल अन् एकांतात जो व्यक्ती माझी सावली होईल, असा व्यक्तीच कायमस्वरूपी जोडीदार म्हणून पाहिजे मला! जर तुझे तथाकथित भावी जावई बापू या सर्व अटींनियमांत उत्तीर्ण झाले तर नकार देण्याचे कोणतेही कारण नाहीये. " अभिध्या स्पष्टीकरण देत म्हणाली. 


" हे अगदी बरोबर बोललीस. चेहऱ्यावर भाळणारे बरेच असतात; पण मला गर्व आहे की, तुला व्यक्ती उलगडून घेण्यात समाधान वाटतं. महत्त्वाचे म्हणजे मी एकुलता एक आहे त्यामुळे माझ्यासारखा जोडीदार मिळणे अवघड आहे. तुझी आजी एक नशीबवान ठरली म्हणा पण तू ही संपतरावाची नात आहेस म्हटल्यावर भाग्यवान तर आहेसच. म्हणून तुलाही तुझ्याही अपेक्षेनुसार जोडीदार मिळेलच. शेवटी आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. " संपतराव अभिध्याचे अन् प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःचेही कौतुक करत म्हणाले. 


क्रमशः

........... 

©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all