द रिडल: गुंतलेल्या नात्याची कथा (भाग-०४)

नातं जुळलं म्हणजे प्रेम बहरले असं नाही. त्यामुळे कधीकधी लग्न झाल्यावर ही प्रेमकथा फुलतेच असे नाही.

कनिष्कचे नकारार्थी उत्तर ऐकून अभिध्या थोडा वेळ निश्चिंत झाली होती पण लगेच तिच्या मनात प्रश्नांचे वादळ घिरट्या घालू लागले. तथापि, तिने लगेच साडीच्या पदराशी चुळबुळ करत कनिष्कला स्पष्टपणे विचारले, " आणखी काय आहे लपवण्यासारखे? माफ करा, मला म्हणायचं होतं की, कोणता खुलासा करायचा आहे तुम्हाला? " 


अभिध्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहिल्यावर कनिष्कने दीर्घ श्वास घेतला व एका दमात तो अभिध्याला उद्देशून म्हणाला, " ॲक्च्युली, मी बायसेक्शुअल आहे. मी स्त्रियांसह पुरुषांकडे ही आकर्षित होत असतो. " 


" काय? " अभिध्याने आश्चर्य व्यक्त करत विचारले. 


" हो, बरोबर ऐकलंस. मला भिन्नलिंगीच नव्हे तर समलिंगी व्यक्ती ही आवडतात; त्यामुळे जर तुला माझ्या बायसेक्शुअल पर्सनॅलिटीबद्दल आक्षेप असेल तर तू या विवाहाला नकार देऊ शकतेस. " कनिष्क मनमोकळेपणाने स्वतःची बाजू मांडत म्हणाला. 


" अच्छा. बरं, ठीक आहे. " अभिध्या उत्तरली. 


थोड्या वेळाने अभिध्या मनोमन विचार करू लागली. ती मनातल्या मनात म्हणाली, " कनिष्क अस्सल अन् सरळमार्गी व्यक्ती आहेत. त्यांचा प्रामाणिकपणाही मनापासून भावला मला. थोडक्यात नकार देण्यासारखे काहीच नाही. विशेषतः कनिष्कचे बायसेक्शुअल असणे गैर तर मुळीच नाहीये. समलिंगी वा भिन्नलिंगी व्यक्तीप्रती आकर्षण वाटणे निसर्गनियत आहे. वास्तविक पाहता कनिष्कमध्ये जराही त्रुटी नाहीत. आज ज्याप्रमाणे त्यांनी पारदर्शकता बाळगली त्यानुसार ते नक्कीच भविष्यात त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणा जपतील.


                         महत्त्वाचे म्हणजे कनिष्क मला पूर्व खबर न देताच माझ्याशी लग्न करू शकले असते; परंतु त्यांनी ना पौरुषत्वाचा अहंकार बाळगला, ना स्वतःच्या पदाचा मोह न बाळगला व माझ्यापुढे सत्य स्विकारले. त्यामुळे नक्कीच कनिष्क प्रामाणिक अन् साधेभोळे आहेत; पण त्यांच्या बायसेक्शुअल पर्सनॅलिटीमुळे भविष्यात आमच्या प्रापंचिक जीवनात अडचण येणार नाही ना? खरंतर यायला नको अन् नाहीच येणार कुठल्याही अडीअडचणी कारण कनिष्कने केवळ समलिंगाप्रती आकर्षण असण्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं कुणावर प्रेम आहे, हे देखील मान्य केलेले नाहीये.


                         जर त्यांचं कुणावर प्रेम असतं तर त्यांनी नक्कीच सर्वकाही मान्य केले असते; पण अशीही कोणतीच भानगड नाही. याचा अर्थ नक्कीच आमचं लग्न झाल्यावर आमच्या वैवाहिक जीवनात अडचण येणार नाही; पण माझ्या मनाला ही शंभर टक्के शाश्वती आहे का? कारण फासे कधीही पलटतात. शिवाय नियतीच्या मनात काय हे कुणास ठाऊक आहे? माझ्या मनाप्रमाणे काहीच घडले नाही तर? " 


                         अभिध्या त्या क्षणी द्विधा मनस्थितीत होती. असंख्य विचार डोक्यात थैमान घालत असल्याने तिला उचित निर्णय घेता येत नव्हता. खरंतर, प्रथमदर्शनीच तिला कनिष्क पसंतीस पडला होता; परंतु तिच्या मनाला भविष्याची काळजीही वाटत होती. काय करावे अन् काय करू नये? या सबंध पेचप्रसंगात अडकलेली अभिध्या पार गोंधळून गेली होती. सरतेशेवटी तिने घट्ट डोळे मिटून घेतले व ती शांत डोक्याने विचार करू लागली. काही वेळाने तिने मनोमन दृढ निश्चय करत निर्णय घेतला. 


अभिध्याने बराच वेळ मौन धारण केले होते. म्हणून कनिष्क तिला उद्देशून म्हणाला, " अभिध्या, तू निर्णय घेतलाय का? किंवा आणखी वेळ हवाय का तुला? हे बघ, हवा तेवढा वेळ घे. तसेच तुझा जो निर्णय असेल तो सर्वस्वी मान्य असेल मला! तू बिनविरोध मला नकार देऊ शकतेस. तुझी इच्छा माझ्यासाठी प्रथम स्थानी असेल. "


" मला एवढी मोकळीक तुम्ही दिलीत त्यासाठी मी आभारी आहे. शिवाय मी माझा निर्णय घेतलाय कनिष्क! " अभिध्या दीर्घ श्वास घेत म्हणाली. 


" अच्छा! काय आहे तुझा निर्णय? " कनिष्कने आश्चर्य व्यक्त करत विचारले. 


" मी निःसंशय माझा निर्णय तुम्हाला सांगणार आहे पण यापूर्वी एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमची परवानगी असेल तर मी विचारू का प्रश्न? " अभिध्या संकोच व्यक्त करत म्हणाली. 


" परवानगी वगैरे औपचारिकता नको. तू बिनधास्तपणे विचार. तुला जे जाणून घ्यायचे आहे त्याचे उत्तर मी नक्की देईल. " कनिष्क मंद हसून अभिध्याला आश्वस्त करत म्हणाला. 


" ह्म्म. कनिष्क, तुमचा काय निर्णय आहे? अर्थात तुम्हाला मी पसंत आहे का? अथवा जोडीदार या नात्याने माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जोडीदाराबाबत तुमच्या ज्या अपेक्षा आहेत मी त्या साच्यात बसते का? " अभिध्याने कनिष्कवर नजर रोखली व तिने एका दमात तिच्या मनात खोळंबलेले सर्व प्रश्न विचारले. 


" जोडीदार कसा असावा, याबाबत माझं फक्त एकच मत आहे की, व्यक्ती प्रामाणिक अन् विश्वसनीय असावा. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासाच्या आधारावर भरभक्कम असतो; त्यामुळे माझा जोडीदार प्रामाणिक अन् सत्याचा पाठपुरावा करणारा असावा, हे माझे ठाम मत आहे. 


                         तुझ्याबद्दल बोलायचे झाल्यास, सध्यातरी मला फारसे काही माहिती नाहीये; पण तुझी प्रगल्भ वैचारिक शक्ती अन् विचार करण्याचा दृष्टीकोन निश्चितच निराळा आहे. तू कोणत्याही विषयाची खोली जाणून घेतल्याशिवाय उगाच बाऊ करत नाहीस, हे ही मला कळून चुकले आहे. शिवाय तडजोड तुला बऱ्यापैकी जमते. म्हणजे स्वतःचा स्वभाव बोलका असूनही माझ्या अबोल स्वभावाला जाणून घेण्याची कसरत तू केलीस, ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे. आतापर्यंत माझ्या अबोल स्वभावामुळे प्रत्येकाला गैरसमज व्हायचा की, मी रागीट वा अहंकारी आहे; पण तू मनोग्रह न बाळगता माझ्याशी संवाद साधलास. ना कोणत्याही प्रकारे तू चुकीचे व्यक्तिगत मत निर्माण केलेस, ना अहंकाराची पुष्टी केलीस. 


                         या थोड्या वेळात मी जेवढे तुला जाणून घेतले व उमजून घेतले त्यानुसार लगेच कळले की, तू बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर भर देतेस अन् तू मनाची व्याप्ती जाणून घेतेस. मला निदर्शनास आलेल्या तुझ्या या गुणधर्मांमुळे निःसंशय तू मला पसंत आहेस. तू अतिशय लाघवी, मनमिळाऊ अन् समजुतदार आहेस. एवढेच नव्हे तर, माझी आईदेखील तुला सून बनवून घेण्यास सज्ज आहे अन् मला माझ्या आईच्या पसंतीवर पूरेपूर विश्वास आहे. 


                         तसेच तुला का म्हणून कुणी नापसंत करेल? कारण तू सुशिक्षित आहेस, घरकामात निपुण आहेस, सुगरण आहेस, स्वकर्तृत्वावर भर देणारी आहेस, शुन्यातून जग निर्माण करण्याची ताकद तुझ्यात आहे, समजुतदार ही तू आहेस, व्यावसायिक अन् व्यावहारिक आहेस पण त्यापेक्षा जास्त पटीने मनमोकळेपणाने वागणारी अन् मन जपणारी आहेस तू. थोडक्यात सर्वगुणसंपन्न आहेस आणखी काय हवं! 


                         अभिध्या, तू परिपूर्ण आहेस. तुझ्याशी नातं जोडणारा तुझा जोडीदार एकमेवाद्वितीय असेल अन् भाग्यवान ही असेल. मुख्य म्हणजे तुझा जोडीदार होण्याचे खरे खास सौभाग्य मला प्राप्त झाले तर सोने पे सुहागा जणू; पण माझी बायसेक्शुॲलिटी मी लपवून ठेवू शकत नाही, हे ही तेवढेच खरे. तुला अंधारात ठेवण्याचा माझा मुळीच हेतू नाही. तुझ्या मनाविरुद्ध तू काहीच करू नकोस. तुझा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घे. त्याचबरोबर आपल्या नात्याचं भवितव्य केवळ तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे, हे लक्षात घेऊन तू बिनविरोध स्वतःचा निर्णय मला सांग आणि काळजी करू नकोस तुझा निर्णय माझ्यासाठी सर्वस्वी असेल. तुझ्या निर्णयाचा मी आदर करेल. " कनिष्क मंद हसून स्पष्टीकरण देत म्हणाला. 


" बरं, ठीक आहे. मग आता आपण खाली जायला हवं. सर्वजण आपलीच वाट पाहत असतील. " अभिध्या तिच्या डोळ्यांवर आडवी येणारी बट कानामागे सावरत म्हणाली. 


" अगं, खाली तर आपण जाणारच आहोत पण तू मला तुझा निर्णय कळवला नाहीस? " कनिष्कने आश्चर्याने विचारले. 


" खाली गेल्यावर सगळ्यांसमक्ष मी माझा निर्णय सांगणार आहे. " अभिध्याने खुलासा केला. 


" ह्म्म. बरं ठीक आहे. जशी तुझी इच्छा. " कनिष्क हुंकार भरत उत्तरला. 


                         त्यानंतर ते दोघेही गच्चीवरून पायऱ्या उतरत सावकाश मुख्य खोलीत(हॉलमध्ये) गेले. तेथे रागिणीताई, सुमित्राताई, संपतराव आणि पंडित एकमेकांशी हसत-खेळत बोलत होते. तेवढ्यात अभिध्या अन् कनिष्क तिथे पोहोचले अन् त्यांच्याकडे मुख्य खोलीत उपस्थित सगळ्यांचे लक्ष गेले व त्या सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळून राहिल्या.


क्रमशः

.......... 

©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all