पत्रास कारण की ...

About Letter


पत्रास कारण की...


प्रिय ममता,
कशी आहेस ? अरे ! मी पण किती वेडी आहे...कसा प्रश्न विचारते आहे? माझी ममता सुखातच असेल ...हो ना ?
आता, तू म्हणत असशील आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात, संवादाची इतकी प्रगत साधने असताना ही मला पत्र का लिहीते आहे ते...
अगं ...थांब थोडी ...पत्र सावकाश वाच म्हणजे तुलाही कळेल मी पत्र का लिहीते आहे ते...

प्रिय सखी , तुला पत्र लिहीण्यास कारण की,
आज कपाट आवरत असताना , आनंदाचा खजिना सापडला मला आणि तो मी शब्दांत तुझ्यासोबत शेअर करत आहे. तू मला पाठविलेले पोस्टकार्ड्स, आंतरदेशीय पत्र , चिट्ठ्या व त्यांची पाकीटे, ग्रीटिंग कार्डस हे सर्व आठवणींच्या रूपात , कपाटाच्या एका कप्प्यात ठेवलेले होते. आज किती वर्षांनी त्या आठवणींचा आनंद घेण्यास मिळाला आहे.

25 वर्षांपूर्वी, आपण एकमेकांसाठी किती अनोळखी होतो ना ! ना ओळख ना पाळख ! ना काही नातं ना मैत्री ! मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा तू आईप्रमाणे,बहीणीप्रमाणे मला जवळ घेतले, माझ्या अंगावरून मायेचा हात फिरवला. तुलाही आठवण असेल ना तो दिवस... तो क्षण!

मी नेहमी आजारी पडायची आणि गावातल्या डॉक्टरांना आजाराचे निदान होत नव्हते म्हणून त्यांनी शहरातील मोठ्या डॉक्टरांना दाखविण्यास सांगितले. माझे बाबा कंपनीत नोकरीला होते.
त्यामुळे पुण्याच्या ESIS हॉस्पिटलमध्ये मी व बाबा आलो होतो. घरी लहान बहीण भाऊ असल्याने आई घरीच होती.डॉक्टरांनी काही टेस्ट करून घेण्यासाठी ऍडमिट होण्यास सांगितले.आईच्या व
घराच्या आठवणीने मी रडत होती, तेव्हा तू माझ्या जवळ आली , तू मला जवळ घेतले आणि मला बरे वाटले. त्या स्पर्शात मला जी आपुलकी वाटली, प्रेम मिळाले ते मी आजही विसरले नाही.
तू ही बहीण शितलसाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. शितलची काळजी घेण्यासाठी तू तिच्या सोबत राहत होती. शितलची तर तू बहीण या नात्याने काळजी घेतच होती पण मी तर तुझी कोणीच नव्हती तरी तू माझी तिच्या सारखीच काळजी घेत होती. त्यामुळे मला आईची इतकी आठवण येत नव्हती.
एकमेकांसाठी अनोळखी असणाऱ्या आपण 3,4 दिवसांत एकमेकांच्या छान मैत्रीणी झालो. असे वाटत होते, जसे आपण एकमेकांना कितीतरी वर्षांपासून ओळखत आहोत ..
शितलला बरे वाटायला लागल्यामुळे तिला डिस्चार्ज दिला आणि आपल्याला घरी जाण्यास मिळणार म्हणून तुम्ही किती आनंदी होत्या. आणि मी शितल आजारातून बरी झाली हा आनंद मनात असतानाही, तुम्ही मला सोडून जाणार म्हणून रडत होती.

माझे रडणे पाहून सिस्टरने सांगितले ,
\"आपल्या मैत्रीणीसाठी एवढी रडते आहे,मग पत्ता वगैरे घेतला की नाही तिचा.. पत्र वगैरे पाठवायला.\" मग तेव्हा कुठे मी तुझ्याकडून पत्ता घेतला. तुला तर घरी जाण्याची एवढी घाई होती की, तू तर माझा पत्ताही घेतला नाही.
तुम्ही गेल्यानंतर , दोन दिवसांत माझे
रिपोर्ट्स आले, डॉक्टरांना दाखवले,त्यांनी औषधे लिहून दिली आणि घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्हीही घरी आलो.
घरात आईला, बहीणभावाला, वर्गातील मैत्रीणींना तुझ्याबद्दल सांगितले. आपली भेट पुन्हा कधी होईल ? हे माहित नव्हते पण मला एक चांगली मैत्रीण मिळाली. याचा खूप आनंद होत होता.

डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे माझी तब्येत सुधारत होती. शाळा व अभ्यास व्यवस्थित सुरू होते.पण तुझी आठवण येत होती. तुझा पत्ता होताच माझ्याकडे ...त्यामुळे तुला लगेच पत्र लिहिले.

\"सोने का घडा हिरोसे झडा, सहेली तेरी याद आयी तो लेटर लिखना पडा।\"

अशीच सुरुवात करून पत्र लिहिले होते ना गं ? अजून बरेच काही लिहिले होते ..आज ते आठवले की हसू येते ..
तुला पत्र पाठवले त्या दिवसापासून मला आतुरता लागलेली होती तुझ्या पत्राची..
त्यामुळे पोस्टमन काका घराजवळ आले की, वाटायचे , तुझे पत्र असेल त्यांच्याकडे...पण ते पत्र न देताच पुढे गेले की वाईट वाटायचे.

एके दिवशी शाळेतून मी घरी आली तेव्हा आईने सांगितले, "तुझ्या मैत्रीणीचे पत्र आलेले आहे."

आईचे हे शब्द ऐकताच काय आनंद झाला होता मला ! दप्तर ठेवले बाजूला आणि अगोदर पत्र वाचायला घेतले.कितीदा ते पत्र पाहत होते, वाचत होते...रडत होते ...हसत होते...तुलाच डोळ्यासमोर जणू बघत होते.

\" फुल,फळ बागेत,पक्षी उडे आकाशात,
आपली भेट नाही प्रत्यक्षात
म्हणून भेटत आहोत पत्राच्या स्वरूपात.\"

तू लिहीलेल्या या ओळी अगदी खऱ्या वाटत होत्या.

आपली ती 3,4 दिवसांत झालेली मैत्री, आपण एकमेकांपासून दूर गावी राहूनही फुलत होती, बहरत होती...फक्त पत्रांमुळेच!
पत्रांतून आपण आपल्या भावना, सुख-दुःख व्यक्त करत होतो. एकमेकांच्या सुखदुःखाविषयी कळत होते. मैत्रीचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत होते.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू पाठविलेले सुंदर ग्रीटिंग... किती आनंद द्यायचे ...काय ते सांगू ! आज व्हाट्सएप,फेसबुक वर वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळतात पण आताच्या या शुभेच्छांमध्ये भावना कमी आणि दिखावा जास्त असतो. असे वाटते.
संक्रांतीला तू पाठविलेल्या तिळगुळामुळे आपल्या मैत्रीचा गोडवा अजून वाढत असे. मी तुझ्यासाठी आवडीने ग्रीटिंग बनवायची आणि तुला पाठवायची. तुला ते आवडले हे पत्रातून वाचून मला खूप आनंद व्हायचा.
वेळ काढून आपल्या आवडत्या व्यक्तिला पत्र लिहीणे, मनातले भाव शब्दांत उतरविणे आणि आपण पाठविलेल्या पत्राच्या उत्तराच्या अपेक्षेत जी प्रतिक्षा असायची तिचा आनंद काही वेगळाच !
तेव्हा पोस्टमन काका देवदूतच वाटायचे.

सासरी गेलेल्या मुलीचे खुशालीचे पत्र येताच आईवडिलांना होणारा आनंद,बाहेरगावी नोकरीला असणाऱ्या पतीच्या पत्राने पत्नीला मिळणारे समाधान. आजी, आजोबा, मामा,मावशी,आत्या अशा सर्व नातेवाईकांना पत्र पाठविण्याचा आनंद !
खरचं किती छान होते ते दिवस!

असेच कालनियमाप्रमाणे दिवस,महिने आणि वर्षे जात राहिली. आणि तुझी लग्नपत्रिका मिळाली. पण नेमकी तुझ्या लग्नाच्या दिवशीच माझी परीक्षा होती,त्यामुळे लग्नाला येता आले नाही. खूप वाईट वाटत होते. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाहीतर परिस्थितीनुसार घडत असतात . हे समजले.
लग्न करून तू संसाराला लागली आणि मी पण कॉलेज,अभ्यास, करीयर यात गुंतून गेली.त्यामुळे आपल्यातील पत्रांचा ओघ थोडा कमी झाला. पण मैत्रीत फरक नाही पडला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर माझेही लग्न ठरले. तुला लग्नपत्रिका पाठवली पण तुझे बाळ आजारी असल्याने तुला येता आले नाही.शेवटी काय ? परिस्थिती मुळे आपल्याला मनातल्या इच्छांना आवर घालावा लागतो.

तू तुझ्या संसारात आणि मी ही इकडे माझ्या संसारात रमून गेलो.

विज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. संवादाची साधने ही बदलली. पत्र, तार यांची जागा ई-मेल, मोबाईल मेसेजेस यांनी घेतली. फोन, मोबाईल यामुळे एकमेकांशी बोलणे सोपे झाले. वेळ वाचू लागला. एकमेकांशी संवाद करणे लवकर व सोपे झाले त्यामुळे पत्रव्यवहार कमी म्हणजे नाहीचं .असे म्हणू या ना!

\"परिवर्तन काळाची गरज\" त्याप्रमाणे काळानुसार बदल करणे गरजेचे असते.

फार पूर्वी तर निरोप, संदेश देण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून माणसे जात होती. नंतर दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे पत्रव्यवहार करणे सोपे झाले. आणि आता तर तंत्रज्ञानामुळे घरबसल्या काही क्षणातच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण संपर्क करू शकतो.

आपल्या मुलांना फोन,मोबाईल, इंटरनेट यासारख्या सुविधा मिळत असल्याने त्यांना पत्र वगैरे या गोष्टींचे महत्त्व नाही समजणार. पत्रलेखन हे त्यांना फक्त अभ्यास आणि परिक्षेपुरते माहित असते.

आपणही बघं ना ...पत्र लिहीतो का कधी ? फोन नाही तर मेसेजेस ...हेचं करतो ना?
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाला लवकर आणि सोपे जे असते ,ते करायला आवडते त्यामुळे आपणही या सर्व गोष्टी स्विकारत असतो.

\"लिखे जो खत तुझे, तेरी याद में...\"
\" चिट्ठी आयी है ..आयी है ..\"
या गाण्यांऐवजी \"व्हॉट इज युवर मोबाईल नंबर ...\"
ही गाणे ऐकायला येतात.
पूर्वी सुखदुःखाचा आनंद देणारे पोस्टमन काका आता फक्त सरकारी किंवा बँकेची कागदपत्रे आणतात. तार ही सुविधा तर बंदच केली. नेट बँकिंग , ऑनलाइन कॅश ट्रान्स्फर मुळे तर मनी ऑर्डर ही कोणी करत नाही.
आधुनिक सुविधांचा आनंद घेत असताना ती मजा कुठेतरी मिस करतोय , जी पत्रांमुळे येत होती. असे कधीकधी वाटायला लागते.

तर प्रिय सखी , पत्र लिहीण्याचा हाच उद्देश की, आपण तो आनंद परत घ्यावा आणि म्हणून मी तुला पत्र लिहीले आहे.
मला माहित आहे की, तू आणि मी पण आपल्या संसारात, मुलांमध्ये बिझी आहोत . तरीही आपल्या मैत्रीसाठी वेळ काढून पत्र लिहिले. कारण आपण आपल्या मैत्रीचा आनंद घेत आलो तो पत्रांमुळेच!
म्हणून तू ही वेळ काढून माझ्या पत्राला छान प्रतिसाद दे...पत्र लिहून.
देणार ना पुन्हा तोचं आनंद मला ?
पत्राच्या उत्तराच्या अपेक्षेत ....


तुझी प्रिय मैत्रीण
स्नेहा