Feb 24, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

बंध प्रेमाचे.... अतूट नात्याचे!

Read Later
बंध प्रेमाचे.... अतूट नात्याचे!

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

जर तारी हे वस्त्र मानवा तुझीया आयुष्याचेआपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्यामुळे, आपले संपूर्ण जीवनच बदलून जाते. आपल्या जीवनाला अचानक वेगळीच कलाटणी मिळते. कधी नात्यांमधली वीण अगदी सैल होते, तर कधी एखादं नातं अगदी नव्यानं उमगत. खरं तर आयुष्य त्याच्या वेगाने पुढे जात असतं. कधी ह्या जीवनात संघर्षाची खाचखळी असतात तर, कधी यशाच्या, विजयाच्या मखमली पायघड्या अंथरलेल्या असतात.

असं म्हणतात वेळ खूप मौल्यवान आहे पण जीवन मात्र अमूल्य. माझ्यापण आयुष्यात अशीच एक घटना घडली. या घटनेने माझ्या आयुष्याला कलाटणी न मिळता मला चक्क नवीन आयुष्यच मिळालं.मातृत्व म्हणजे स्त्रीच्या आयुष्याची संपूर्णता आणि बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म! माझ्या दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेची ही गोष्ट - मध्यमवर्गीय कुटुंबातील चौघी बहिणींमधलं मी शेंडेफळ. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार, आई-बाबांची लाडकी, पदवीचे शिक्षण झाल्यावर लोकमत सखी मंच सहसंयोजिका आणि आकाशवाणी अकोल्याला अर्धवेळ नोकरी करणारी,या नोकऱ्या करता करता मी बी.ए. इंग्लिश लिटरेचर आणि बी.एड. ही पूर्ण केलं. पण करिअरचा जम काही बसत नव्हता.माझ्या इतर मैत्रिणींची लग्न केव्हाच झाली होती,आणि एक दिवस अचानक माझ्या पप्पांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातून ते वाचले खरे पण माझं लग्न ही बाब आता त्यांच्या लेखी सर्वोच्च प्राथमिकतेची होती. त्यातच भांडेकरांच स्थळ मला चालून आलं. चंद्रशेखर भांडेकर एम. एस. सी. कम्प्युटर झालेले, स्वतःचा कम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय असणारे, तेही घरात सर्वात लहान. घरी शेती, चार भावांच्या परिवारात सर्वांचे उत्पन्नाचे साधन वेगवेगळे. शेतीवर कुणीही अवलंबून नव्हते, नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. साधेपणाने विवाह पार पडला. चौकोनी कुटुंबातून मी दहा-बारा जणांच्या गोकुळात आले.


घरी सासूबाईंचं आणि नंणदांच कडक सोवळ.सणवार अगदी रीतीनुसार होत. आजही होतात. घरात सनातनी वातावरण, कुळधर्म, कुळाचार सगळच आहे. सगळे सण अगदी साग्र संगीत आजही साजरे केल्या जातात.हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे आमचे अहो मुळातच अबोल आणि ह्या सगळ्या धबडग्यात आणि व्यवसायाच्या टेन्शनमध्ये त्यांना माझ्याशी बोलायला फारसा वेळ मिळतच नव्हता. तसा तो आजही मिळत नाही तो भाग वेगळा.लग्नाच्या एका वर्षातच मी एका गोंडस परीला जन्म दिला. घरात मोठ्या दोन्ही जावांना मुलीच असल्यामुळे माझ्या मुलीच्या आगमनाने आनंदापेक्षा सगळ्यांच्याच डोक्यावर आठ्याच जास्त पसरल्या.पण आयुष्य कोणासाठी थांबत नसतं. ते त्याच्या वेगाने पुढे जात राहते. मधल्या काळात मी नागपूर विद्यापीठातून एम.एड पूर्ण केलं.काही वैयक्तिक आणि पारिवारिक कारणांनी माझे सलग तीन गर्भपात झाले होते त्यामुळे, मी मानसिक आणि भावनिकरीत्या फारच हळवी झाले होते. पण ज्याला यायचे असते तो येतोच आणि मला परत एकदा मातृत्वाची चाहूल लागली. यावेळी मात्र माझ्या जोडीदाराने माझी छान काळजी घेतली.पहिल्यावेळी ते कधीच माझ्या तपासणी करता डॉक्टरांकडे आले नव्हते पण , यावेळी मात्र दर महिन्याला ते स्वतः जातीने मला डॉक्टरांकडे घेऊन जात. मला कडक डोहाळ्यांचा त्रास होत होता तेव्हा, माझ्या खाण्यापिण्याकडे ते जातीने लक्ष घालत. घरी मात्र नंणदांच अखंड आकांड-तांडव सुरूच होत. \"बायकोचे फजील लाड करतो, आम्ही नाही पाहिल्या एवढ्या तपासण्या आणि डॉक्टरच्या वाऱ्या, फारच कौतुकाची बायको आहे.\" वैगेरे वैगेरे ……. अजून काय काय.


यथावकाश 27 जुलै 2017ला मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण सिजेरियांचा कट देताना त्या डॉक्टरने माझ्या मोठ्या आतड्याला पण कट दिला होता. त्यामुळे बाळांतपणांच्या तीन दिवसानंतर माझं पोट हळूहळू फुगू लागलं आणि ते नऊ महिन्याच्या गर्भवतीच असतं तेवढं झालं. मला शौच्च होत नव्हते. पोटात जड,लोखंडी वजनदार गोळा ठेवल्यासारखं वाटू लागल. एक्स-रे झाले,घशातून नळीद्वारे पाणी काढून झाले पण, निदान काही होईना! शेवटी पोटातील असह्य वेदनांनी मी तडफडायला लागले आणि रडू लागले. नवऱ्याला म्हटलं \"आता काहीही करा पण मला इथून बाहेर न्या आणि ते शक्य नसेल तर सरकारी दिवाणखान्यात मरायसाठी सोडुन द्या पण काहीतरी करा!\"माझ्या वेदना बघून मग मला एका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परत सगळ्या तपासण्या झाल्या ते तज्ञ डॉक्टर म्हणाले -\"24 तासात ऑपरेट केलं नाही तर पोटातील विष संपूर्ण शरीरात पसरेल आणि माझा जीव वाचवणार नाही.\" दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे माझं ऑपरेशन झालं. सकाळी नऊ वाजता सुरू झालेलं ऑपरेशन संध्याकाळी पाचला संपलं. त्यावेळी माझ्या नवऱ्याने मला दोनदा रक्तदान केलं होतं. त्या ऑपरेशन नंतर जवळपास तीन दिवस मी व्हेंटिलेटर वर होते,आणि पुढे 20 दिवस आय. सी. यू.त होते. या संपूर्ण काळात माझ्या पोटात अन्नाचा एक दाणाही नव्हता दिवसातून दोन वेळा केवळ एक चमचाभर पाणी मला दिल जात होतं. त्या वेळी दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा डॉक्टर मला तपासून जात. त्यानंतर ऑपरेशनच्या चौथ्या दिवशी अचानक मला ताप आला आणि काही केल्या तो उतरेना! डॉक्टरांनी नवऱ्याला सांगितलं होतं की, \"हा ताप लवकर उतरणे गरजेचे आहे नाही तर पेशंटच्या जीवाला धोका आहे.\"


इकडे माझ्या तिन्ही बहिणी आणि माझी एक मावस बहीण यांनी माझ्यासाठी अनेक नवस बोलले, देव पाण्यात ठेवले, सर्वांची प्रार्थना फळास आली आणि माझा ताप उतरला. या महिन्याभरात माझा नवरा अक्षरशः आय. सी. यु. च्या बाहेर ऑगस्ट महिन्याच्या भर पावसात, माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. माझ्या पाच दिवसाच्या बाळाची काळजी माझी आई आणि मोठ्या जाऊ बाईंनी घेतली. माझे मोठे दीर तर त्याला अगदी हाताचा पाळणा करून झोपवत.


ह्या जीवघेण्या प्रसंगातून मी वाचले माझा पुनर्जन्मच झाला. या आजारपणात नवऱ्याने माझ्यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. मी जेव्हा आय.सी.युत होती तेव्हा काही इंजेक्शने मुंबईला मिळत नव्हती ती त्याने चेन्नई, बंगलोर होऊन विमानाने बोलावली. माझ्या हाताच्या नसा मुळातच बारीक त्यातच सततच्या सलाईंन मुळे त्या आणखीनच बारीक झाल्या होत्या, त्यामुळे पोटावरची सर्जरी झाल्यावर मला सेंट्रल लाईनद्वारे मानेतून सलाईन देण्यात आल्या. मोठ्या आतड्याच ऑपरेशन झाल्यावर माझी शौच्चाची जागा बंद केली होती. पोटाच्या डावीकडे थोडी जागा करून एक पिशवी तिथं लावून सगळी घाण त्या पिशवीत जमा होत होती, आणि अगदी लहान बाळासारखं माझा नवरा माझी ती घाण स्वच्छ करत होता.


दोन महिन्यानंतर परत एक ऑपरेशन करून माझं मोठं आतडं परत जोडण्यात आलं आणि आता मी एक सर्वसामान्य जीवन जगते आहे. या काळात आणखीन एक आठवणीतला प्रसंग म्हणजे 2017 च्या  8 ऑगस्ट ला राखी पौर्णिमा होती. आठ ऑगस्ट हा तारखेने नवऱ्याचा आणि राखी पौर्णिमा हा तिथी ने माझा वाढदिवस होता. तो आम्ही पहिल्यांदा दवाखान्यातल्या नर्सेसच्या साक्षीने साजरा केला. त्याआधी आणि नंतरही नवऱ्याने कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तो भाग वेगळा.

या प्रसंगाने आमचं नातं अधिकच दृढ झालं. प्रेम होतंच ते मला नव्यानं कळलं आणि माझ्या नवऱ्याला ते नव्याने उमगल.


नवरा बायकोचं नातं हे खरंच फार गहिर असतं. ती एक कमिटमेंट असते आयुष्यभराची, सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याची. केवळ बाहेर फिरायला गेल्याने, शॉपिंग केल्याने, सोबत सिनेमे किंवा सेल्फी काढल्याने आणि समाज माध्यमांवर ते टाकल्याने हे नातं दृढ होत नाही, तर आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगी तुमचा जोडीदार तुम्हाला कशी साथ देतो त्यावर या नात्याची खरी भिस्त असते आणि मला एक जिवलग साथीदार मिळाला याचा रास्त अभिमान आहे आणि आम्हा दोघांचं एकमेकांवर अगदी मनापासून प्रेमही आहे.


पूर्णविराम.

**********************************************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//