Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मी पाहिलेली दुर्गा!

Read Later
मी पाहिलेली दुर्गा!

गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय - एक दुर्गा अशीही

शीर्षक -मी पाहिलेली दुर्गा!

लेखिका - स्वाती  बालूरकर , सखी


नवरात्रीच्या दिवसात नेहमी वाटत राहतं की देवीची ही वेगवेगळी रूपं, आपण - म्हणजे स्त्रिया जगत असतो रोजच्या जीवनात, पण जाणवत नाही . कदाचित या शक्तिरूपाची ओळख व्हावी म्हणूनच तर हा उत्सव साजरा केला जातो.

अचानक कुठल्यातरी स्त्रीचा संघर्ष पाहिला किंवा तिला संकटावर मात करताना पाहिलं की , अरे ही तर जिवंत दुर्गाच आहे किंवा सरस्वती आहे किंवा काली आहे असं वाटायला लागतं.

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संघर्ष करून जिंकणार्‍या स्त्रिया पाहिल्यात पण किमान आमच्या पीढीमधे तरी मनासारखं झालं नाही म्हणून व्यसनाधीन झालेल्या , निराश होऊन आयुष्य गमावलेल्या किंवा चुकीच्या संगतीत पडलेल्या स्त्रिया पाहिलेलं विशेष आठवत नाही.

पण याउलट थोड्याशा अपयशाने किंवा मनासारखं न झाल्याने किंवा संकटांना भिऊन मार्ग चुकलेले व आयुष्याची राखरांगोळी करून घेणारे पुरूष मात्र खूप पाहिले आहेत.

आयुष्यात पाहिलेल्या किंवा भेटलेल्या अनेक दुर्गांपैकी एका दुर्गेची कथा संक्षिप्त रूपाने आज मांडावी वाटली.

साधारण अठरा -एकोणीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , शाळेत मला निरोप आला की "एक जण कँडिडेट आहे , एकदा इंटरव्यू घेवून बघ हिन्दी डिपार्टमेंट ला चालेल का ?"

एक मध्यम वयाची स्त्री, कदाचित माझ्यापेक्षा मोठी असेल त्यावेळी, नोकरीसाठी आली होती.

कळत होतं की पहिली नोकरी आहे. मी बोलले त्या महिलेशी पण तिच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं. थांबवलेले अश्रू वगैरे, तिला नोकरीची गरज होती पण तिचं शिक्षण या पोस्ट साठी योग्य नव्हतं .

पण प्रिंसिपल मॅडम शी बोलून मग तिला हिन्दी टायपिंगचं काम द्यावं आणि तृतीय भाषा हिन्दी द्यायचं ठरलं. तिचा मुलगा आमचा विद्यार्थी होता म्हणून इतका विचार करत होतो. मदत म्हणूनच ही नोकरी देवू केली होती.

ती दुसर्‍या दिवशीच जॉईन झाली प्रचंड घाबरलेली असायची, भीत भीत काम करायची.

मग हळू हळू कामात रूळत गेली. प्रत्येक गोष्टींसाठी किंवा कामासाठी, सल्ला घेण्यासाठी ती माझ्याकडे यायची. हळूहळू माझ्यासोबत खुलायला लागली. पंधरा वीस दिवसांनंतर मी तिला विचारलं "तुमच्या डोळ्यात काहीतरी दु ख दडलेलं आहे, हरकत नसेल तर सांगा कधीतरी!"

तिने माझ्यावर विश्वास ठेवून जे सांगितलं त्यातून कळालं की ती खूपच अडचणीत आहे व त्या वेळी ती आयुष्यातल्या खूप वाईट स्टेजमधून जात होती.

तीन लेकरं घेऊन नवऱ्यापासून विभक्त झाली होती.

"का ?"
सांगेन कधीतरी म्हणाली.

पण तिला नोकरीची खूप गरज आहे हे मात्र सांगायची.

येणार्‍या पगारीत तिला किमान घरभाडं भरून , चौघांचं दोन वेळचं जेवण पुरवायचं होतं.

कुणाचाही आधार नव्हता. माहेरही तुटलं होतं व नवर्‍याने तर हात उचलले होते.

ऐकून खूप वाईट वाटलं.

एक दिवस तिचे डोळे सुजलेले होते विचारलं "
"काय झालं?"
ती म्हणाली की \"मुलींची सतत चिंता असते, आम्ही सध्या जिथे गच्चीवर राहतो आहोत एका खोलीत ,त्याच्यासमोर बॅचलर मुलं राहतात आणि ते रात्री पिऊन गोंधळ घालतात , घाणेरडं बोलतात , खोलीकडे बघतात. माझ्या दोन तरुण मुली आहेत ज्यांची भीती मला सतत वाटते. मला घर बदलणं आवश्यक आहे."

मी सांगितलं काही मदत हवी असेल तर सांगा , पण खूप स्वाभिमानी हाेती त्यामुळे स्वत हून कोणाचीच मदत मागायची नाही.
साधारणत महिनाभरानंतर एका रविवारी मी माझ्या घराच्या दारात उभी होते आणि माझ्या गेटमध्ये ती घर भाड्याने विचारायला आली होती,योगायोगच!
मी तिला आत बोलावलं आणि ती विनंती करत होती की एवढी मदत करा. मला भाड्याने घर मिळवून द्या. तिथे राहणं असह्य होतंय किंवा मग नवरा हे करवतोय ते कळत नाही. ती घटस्फोट द्यायला नकार देत होती म्हणून.

एकट्या बाईला तीन मुलांसोबत घर देत नव्हते लोक कारण व नवर्‍याबद्दल विचारत होते.

माझ्याच घरातला बाजूचा पोर्शन रिकामा होता तिथल्या दोन खोल्या मी मिळवून दिल्या. मी मालकाला सांगितलं की तिचा नवरा एक वर्षासाठी दुबईला गेलाय आणि ती माझी मैत्रीण आहे.

तिचा माझा काहीतरी ऋणानुबंधच असेल जणु! तिथून जे नातं मैत्रीचे सुरू झालं, त्या वेळी त्या बाईला मी अक्षरश संघर्ष करताना पाहिलं.

नवऱ्यासोबतचा डिव्होर्स केस कोर्टात चालू होती ज्या दिवशी ते कोर्टातून यायची त्यादिवशी अक्षरशः तासभर रडताना दिसायची दरवाजा लावलेला असायचा, आवाज ऐकू येत असे.

कितीदा भाजीभात, चटणी भात , असं काहीही बनवायची एकाच ताटात तिन्ही लेकरांना खाऊ घालायची आणि शेवटी स्वतः खायची हे दृश्य मी पुन्हा पुन्हा पाहत होते .

पण तिने कधीच माझी मदत मागितली नाही, किंवा देऊ केलं तर ती घ्यायची नाही.

त्यामुळे फक्त तिला मॉरल सपोर्ट देणं एवढं काम मी करत राहिले.
वर्षभर आम्ही सोबत राहिलो असू, शालका तीच होती.
वर्षभराने आमचा स्वतः च्या फ्लॅट जवळ घरात आम्ही शिफ्थ झालो.
शाळेत ती रेग्युलर भेटत होती, मध्ये मध्ये सांगायची किती किती आर्थिक अडचणीतून जात आहे, नवरा पोटगी द्यायला नाही म्हणतोय , आरोप लावतोय वगैरे . पण प्रचंड देवभक्त होती, तिला काही ना काही मार्ग मिळायचा.
तिची मोठी मुलगी ट्यूशन घेऊन बी. एस्सी करत होती.
एक वर्षभरानंतर पुन्हा तिने मला घरासाठी विचारलं. मी आमच्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट होताना ज्या घरात भाड्याने राहिले ते घर तिला मिळवून दिलं. शाळेपासून लांब होतं पण खूप मनशांती होतं.
दोन एक वर्षांनंतर माझ्याच अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर ती राहायला आल।

या सगळ्यात तिच्या नवऱ्याची पोटगी सुरू झाली होती. दरम्यान तिने क्लासेस लावले आणि आयसीटी शिकवण्यासाठी जे क्वालिफिकेशन पाहिजे तेवढं निर्माण केलं आणि ती जवळच्या शाळेत कम्प्युटर टीचर म्हणून जॉब करत होती.

आता तिच्यात व माझ्यात काहीतरी बंध होते .

२-४ वर्षानंतर एके दिवशी तिने मला तिच्या संघर्षाची गाथा सांगितली, ऐकून मी थक्क झाले .

संक्षिप्त सारांश असा की तिच्या नवऱ्याचे त्याच्या मित्राच्या बायकोशी अफेअर झाले म्हणजे फॅमिली फ्रेंड होते व मित्र अचानक गेला. मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या त्याच्या बायको प्रती असलेली सहानुभूती या अफेअरला कारणीभूत होती.

आणि हळूहळू त्याने घरी दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि मित्रांच्या बायकोकडेच लक्ष द्यायला लागला.
मग हिच्यापासून व लेकरांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने तऱ्हेतऱ्हेचे आरोप लावायला सुरुवात केली.

मग छळायला सुरुवात केली.

तेव्हा एक रात्री त्याने मोठ्या मुलीवर हात टाकण्याचा विचार केला, त्या क्षणी घरातल्या चाकूच्या धारेवर होती तिने ती रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तीन बॅगा भरून मुलांना घेऊन ती घर सोडून निघाली. मिळेल त्या घरात शिफ्ट झाली होती. तशा त्या टेन्शनमध्येच ती जॉब मागण्यासाठी आमच्या शाळेत प्रिन्सिपलकडे आली होती .

मला जाणवलं होतं ते तिच्या डोळ्यात मी पाहिलं होतं.
ती भीती, ती दहशत होती.

पण ती एका दुर्गे प्रमाणे आपल्या लेकरांच्या पाठीशी उभी राहीली, कोर्टामध्ये लढली, नोकरी केली, क्लासेस करून स्वतःला अपडेट केलं.

देवाची कृपा की मुलं खूप म्हणजे खूपच गुणी निघाली.
बारावीतली मोठी , काही वर्षांत मोठी मुलगी बारावीनंतर बीएस एमएस्सी मॅथ केलं. नोकरी करता करता लग्न ठरलं आणि खूप श्रीमंत घरी पडली. तिने वडिलांना लग्नातही बोलवू दिलं नाही.
दुसरी मुलगी खूप हुशार होती, मैत्रिणीच्या मदतीने एज्युकेशन लोन देऊन तिला इंजिनिअर करवलं. तिची नोकरी लागली।
धाकटा मुलगा सीए आणि बीकॉम एकाच वेळी पास झाला . स्कॉलरशिप मिळत गेली.
धाकटय़ा मुलीने आणि लहान मुलाने वर्ष दोन वर्षांत बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले मामाचं कर्ज फेडले आणि आईला होईल तितक्या सुखसुविधा दिल्या .
तिच्या तब्येतीच्या खूप तक्रारी होत्या. आता मुलं सेटल होईपर्यंत आतून तुटली होती .

दुसर्‍या मुलीचं लग्न झालं .

मुलाचं लग्न झालं ,घर घेतलं.
आता खूप आनंदी व स्थिर आयुष्य जगते आहे.

पण तिने तो ५ -७ वर्षे केलेला संघर्ष, स्वाभिमानाने जगण्याची तिची धडपड व कमीत कमी गरजा ठेवून तीनही मुलांना उच्चशिक्षण देतानाचा तिचा पावित्रा एखाद्या अष्टभुजा देवीपेक्षा कमी नव्हता.

तिची काहीही चूक नसताना केवळ नवर्‍याचं मन दुसरीकडे गुंतलं म्हणून तीनही मुलांसकट बायकोची जिम्मेदारी झटकणारा नवरा आणि कुणासमोरही न झुकता कष्टाने व मेहनतीने मुलांच्या आयुष्य चं सोनं करणारी आई पाहून मला मनात अभिमानास्पद भावना यायची.

ती खरी दुर्गा भेटल्यासारखी वाटते मला!

समाप्त

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक ०२ .१० .२०२२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//