सखा सोबती- द रियल कंपॅनियन ( भाग -३)

Companianship in life.


अष्टपैलू लेखक महासंग्राम

पहिली फेरी - कथामालिका

शीर्षक - सखा सोबती- द रियल कंपॅनियन
( भाग -३)

लेखिका - स्वाती बालूरकर , सखी

कथा पुढे -


महिना-दीड महिना मुक्ता तिच्या अभ्यासात व्यस्त होती आणि विवेक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोहिमेवरती जात होता.

मुक्ताची परीक्षा झाली आणि एक दिवस खूप आनंदात ती विवेकला त्याच्या घरी भेटायला आली.

दोघेजण गप्पा मारत ,चालत चालत त्या डोंगरा जवळचा तलावाकडे आले.

मुक्ता शांत होती पण डोळ्यात विलक्षण चमक होती.
त्यांने विचारलं , " तुझ्या चेहऱ्यावरती कसला तरी ग्लो आहे. . . काय विशेष?"

" माझे पेपर्स खूप चांगले गेले. त्यात दुसरं असं की बाबांच्या ओळखीतून एक स्थळ आलंय आणि मी त्या मुलाला होकार देण्याच्या मनस्थितीत आहे. फक्त मला एकदा त्याच्याशी मोकळं बोलायचं आहे . त्याची आणि माझी मत जुळतील असं वाटलं तर मी निर्णय घेऊन टाकेल."

" मग डायरेक्ट सासरी का?"

" नाही रे स्पर्धा परीक्षांची तयारी चालू आहे ना , त्याच्या अगोदर नाही. पण विवेक तू हे नाही विचारलंस की मुलगा काय करतो किंवा कुठला आहे?"

" त्याने काय फरक पडतो? तुला त्याच्यासोबत राहायचं आहे मला नाही. आणि तसंही तू इतकी बुद्धिमान आहेस की तू कुणासोबतही जुळवून घेशील."

"असं काय रे, सगळी उत्सुकताच संपवून टाकतोस. बरं यूपीएससी क्रॅक केलीय. पुढच्या महिन्यात गोहाटीला पोस्टिंग आहे त्याची. कलेक्टर आहे. म्हणजे बौद्धिक पातळी चांगली आहे म्हणून निश्चिंत झालेय. मला पण पुढे त्याच क्षेत्रात करीयर करायचंय. तो फ्रीडम राहील."

" बघ आज तू तशीच आनंदी दिसतीयस. म्हणजे लग्न ठरलेला ग्लो आहे की कलेक्टर नवरा मिळेल याचा?"

"टिपिकल मुलांपेक्षाही बौद्धिक पातळी जुळेल हा आनंद आहे. त्याची पोस्ट आणि दिसणं बाकी सगळं नंतर. त्याने मला काही फरक पडत नाही."

"मुक्ता किती क्लारीटी आहे गं तुझी. पण कितीतरी गोष्टी असतात ना लग्नात. आर्थिक सुबत्ता हवी, दिसायला चांगले म्हणजे अनुरूप तरी शिवाय स्वभाव , आवडी निवडी आणि मग पुढे सगळे वैवाहिक संबंधही."

" त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी काही आताच बोलू शकत नाही. एकतर या सगळ्याला अजून वर्षभर तरी लागेल. बरं एक सांगू शकते की पुरूषांच्या व स्त्रियांच्या प्राथमिकता वेगळ्या असतील कदाचित पण मला असे लेचेपेचे पुरूष आवडत नाहीत अगोदर पासूनच . . . यस मॅडम म्हणणारे." आणि ती हसली.

"ओह ! म्हणजे भांडणारा नवरा हवाय का या मैत्रिणीला? "

"असं काय चिडवतोस रे, भांडणारा नाही, बुद्धीला चालना देणारा, माझे विचार समजून घेणारा म्हणजे संवाद साधू शकणारा साथीदार हवाय. . . द रियल कंपॅनियन यू नो!"

"ग्रेट! काय शब्द शोधलास यार . आम्ही आपलं जोडीदार , साथीदार असं म्हणत असतो किंवा नवरा बायको वगैरे. तुला मिळेल तसाच , तुला हवं तसा!"

" या शिवाय आयुष्य आनंदी होत नाही रे! म्हणजे आयुष्य असं ओढावं लागू नये किंवा हतबल होवून सोबत रहावं लागू नये , एवढंच वाटतं मला." मुक्ता असं बोलली आणि तिच्या या विचारांवर मुग्ध होवून विवेकने टाळी दिली.


* * * * * * * * * *


"मुक्ता कुठे होतीस गं?"

" आई सांगितलं ना, विवेक कडे गेले होते."

"पण बाबा येताना थांबले होते त्याच्या घराजवळ , तुला घ्यायला तर तू नव्हतीस तिथे."

"अगं ते होय . आम्ही असंच चालत चालत त्या तलावापर्यंत गेलो होतो."

" काय विशेष ?"

" काही नाही गं. मागच्या महिन्यात विवेकला अनुदानित महाविद्यलयात नोकरी मिळाली. पण आमची भेटच नाही झाली. म्हणून सहज गप्पा मारत होतो."

"पण मुक्ता घरी बसून बोलत जा गं , लोक काही बाही बोलतात असं बाहेर एकत्र पाहून . तुझं लग्न ठरतंय त्यात काही व्यत्यय नको. म्हणजे लोकांना वाटतं की दोघांमधे काहीतरी ?"

मुक्ता हसायला लागली.

" अगं आई , तरूण मुलगा मुलगी बोलले की ते असे प्रियकर प्रेयसी तरी असावेत नाहीतर सर्वांसमोर राखी बांधून बहिण भाऊ तरी असावेत. इतकंच का स्त्री पुरूषांचं नातं?"

"अजून काय असतं गं मग?"

" आई इतकी वर्षे मला बघतीयस , काही गैर वाटलं का तुला? चार वर्षांपासून आम्ही सामाजिक कार्यात एकत्र आहोत. चांगले मित्र आहोत गं. आता विदुला व मी पण किती सोबत असतो गं मग तुमच्या दोघांत काय आहे ? असा संशय येतो का ? नाही ना . म्हणजे हे लिंगभेदाची मैत्री मान्यच होत नाही लोकांना. विवेक छान सखा आहे गं. . . म्हणजे मित्र !"

" बरं बाई. आम्ही पुष्कळ स्वातंत्र्य देतो तुला , तू फक्त काळजी घे!

*********************************
क्रमशः
©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक -३१.०१ २३



🎭 Series Post

View all