सखा सोबती- द रियल कंपॅनियन ( भाग -२)

Companianship


अष्टपैलू  लेखक  महासंग्राम

पहिली फेरी - कथामालिका

शीर्षक  - सखा सोबती- द रियल कंपॅनियन 

(भाग -२)

लेखिका  स्वाती  बालूरकर , सखी.


काही महिन्यानंतर


"अरे विवेक कुठे आहेस गेल्या पंधरा दिवसात आपली बिलकुल भेट झाली नाही बरंच काही तुला सांगायचं होतं, तू भेटलाच नाहीस!"

" अग मलाही तुला खूप काही सांगायचं आहे."

" ते कळालं मला आपल्या सचिव दादांकडून . तू अंधश्रद्धा निर्मुलन सोडून काय सध्या बालविवाह वगैरे थांबवण्याचा प्रणच घेतलास म्हणे. . "

" बघ ना मुक्ता आपण 1999 मधून आताच 2000 सालात प्रवेश केलाय पण लोक आजही पुन्हा तेच शंभर वर्षांपूर्वीच्या गोष्टीत अडकलेत. बदल सगळा शहरी भागात आहे पण खेड्यात आजही बारा - तेरा वर्षाच्या मुलींचे लग्न लावून देतात. बरं त्यांचं शिक्षण झालेलं नसतं . ज्याला मुलगी देत आहोत तो मुलगा किती मोठा आहे, त्याची काय कमाई आहे ? ते पण बघत नाही."

" हो रे खेड्यापाड्याने हा प्रकार अजूनही चालू आहे आणि याची वाच्यता देखील बाहेर होत नाही हे फार मोठे दुःख आहे."

" त्यांना सगळ्यांना हे मान्यच असतं त्यामुळे कोणी विरोध करत नाही शिवाय खूपदा ही लग्न नात्यानात्यातच होतात पण त्या मुलींच्या भविष्याचा कोणीच विचार करत नाही ग! इतक्या लहान वयामध्ये त्यांना संसारात ढकलून देतात.
मुक्ता त्यांचा बौद्धिक विकास , मानसिक विकास , शारीरिक विकास या कशाचाच विचार नसतो ."

" हे बाकी फार पुण्याचं काम करतो आहेस तू! पण नुसतं लग्न थांबवून काय होणार? तू निघून आल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच केलं तर तू काय करणार?"

" सध्या तर मी कमीशनर केंद्रे सरांची मदत घेतोय. ते कसं पोलिसांच्या दबदब्याने त्या अशिक्षित लोकांना थोडा धाक राहतो. "

"इतकं शिकून तू अशिक्षित लोकांसाठी काम करतोस ते बरं वाटलं मला. पण एक सांग? मग नेमकं काय केलंस यादरम्यान ?"

"काही नाही. इथे एक छोटीशी वाडी आहे तिथे माझं पथक घेऊन पोहोचलो होतो मी आणि एका बारा वर्षाच्या मुलीचा 21 वर्षाच्या मुलाबरोबर विवाह होणार होता तो आम्ही थांबवला. पण त्या लोकांना हे काही पचलं नाही आणि त्यांनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. त्यात थोडा मार लागला माझ्या डोक्याला . आठवडाभर पट्टी होती आजच पट्टी काढली अन तुला भेटायला आलो."

मुक्ता थोडावेळ गप्पच बसली.

" हे पहा विवेक हे काही मला पटलं नाही. आपण समाजकार्य करतो आहोत. स्वतःच्या जीवाला जपून करायचं. त्या मुलीचं लग्न वाचवण्यासाठी तुला काही झालं असतं तर ?"

" अगं केंद्रे सर येतच होते पण ते पोहोचेपर्यंत ती लोकं आक्रमक झाली. त्यांना कळालं की आम्ही लग्न थांबवण्यासाठी आलोय."

" शेवटी काय झालं?"

" त्यांनी समजावलं, मुलीच्या वडिलांनी मान्य केलं की ते तीअठरा वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नाहीत."

मुक्ताला या कर्याचा खूप अभिमान वाटला .

थोडा वेळ असंच बोलणं झाल्यानंतर दोघेजण घरी परतले .

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विवेक खूपच आनंदात, हातात दोन -चार वर्तमानपत्र घेऊन मुक्ताकडे आला.

" अरे काय झालं , इतका खुश!"

"अगं, हे पहा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्या घटनेचा फोटो, त्याच्यावरती लेख लिहून आलेत.
अगं, सामाजिक विश्वात खूप मोठी बातमी झालीय. आता तर लोक नक्कीच घाबरून अशी कामं करणार नाहीत."

"छानच आहे. पण . . . ती लोकं अशिक्षित आहेत त्यांच्यापर्यंत वर्तमानपत्र पोहोचत नाही. ते इथेच सुशिक्षित लोकांना कळतं. तुझा चेहरा खूपच आनंदी वगैरे दिसतोय. म्हणजे खूप आनंदी वाटतोयस की बातमी पेपर मध्ये आली."

" माझ्या डोक्यात जी लाठी लागली त्यावेळी कुणी फोटो काढला काय माहित. बघ या पेपरात तर त्यावरपण लिहून आलंय. . . आज संध्याकाळी या अंकात."

मुख्यत्वे हे सांगताना त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असं तिला वाटलं व तिचे भाव बदलले.

"वाईट वाटून घेऊ नकोस विवेक, पण मला एक स्पष्ट सांगशील की तुला आनंद तुझ्या कार्याचा झालाय की त्याचं पेपर मध्ये कौतुक झाले याचा?"
"दोन्हीचा झालाय! अर्थात काम तर सगळेच करतात पण बघ कौतुक सगळ्यांना मिळत नाही. ते मिळाले याचा आनंद तर आहेच."

ती पाच मिनिट शांत बसली.

विवेकला समजत नव्हतं की त्याचं काही चुकलंय.

" अगं पण मुक्ता सांग ना, मी आनंदी झालो तर तुला चांगलं वाटायला हवं . . तू का चिडतेस ?का शांत बसलीयस? तू उगीच शांत बसत नाहीस मला माहित आहे."

" खरं सांगू का विवेक, जर तू त्या मुलीचं आयुष्य त्रासिक होण्यापासून वाचवलं म्हणून आनंदी झाला असतास तर मी तुझ्या आनंदात सहभागी झाले असते. . . पण आपल्या कार्याचा आनंद त्याच्या पूर्ततेत किंवा त्या समाधानात असतो पण तू जर त्याची बातमी झाली म्हणून आनंदी होत असशील तर मला वाटतं तू चुकीच्या रस्त्यावरती चालला आहेस. स्वतःला आताच सोडवून घे."

तिचा बदललेला स्वर ऐकूनही त्याला अजूनही कळत नव्हतं की वर्तमानपत्रात आलेल्या बातमीने तो आनंदी झाला त्यात चूक काय होतं.

तो प्रसंग असाच संपला परंतु दोन वेगळ्या दिशांना का असेना पण मुक्ता व विवेक दोघेही खोलवर विचारात पडले.

*****************************

क्रमशः 

©® स्वाती बालूरकर ,सखी

🎭 Series Post

View all