Feb 24, 2024
प्रेम

ओल्या सांजवेळी भाग दोन

Read Later
ओल्या सांजवेळी भाग दोन


अविनाश -"अच्छा तू पण आता मिनिटे, तास, दिवस आणि महिन्यांचा हिशेब ठेवायला लागली वाटते. "

अवनी -"हिशोब तर ठेवावाच लागतो. मग तो वेळेचा असो, पैशाचा किंवा नात्याचा. "

अविनाश -"माझा काय दोष होता आऊ? माझी काय चूक झाली? सांग ना? तु मला सोडून गेली हे अजूनही पटत नाही बुद्धीला आणि मनाला!"

अवनी -"अवि मी कुठे सोडलं तूला? पण आयुष्यात असं काही घडलं की, मी तूला ना परत भेटू शकले, ना काही सांगू शकले.

. पण आज मला तुला खूप काही सांगायचं आहे. तूझ्या कडून ऐकायचं आहे."

. पावसाची रिमझिम सुरूच होती, जणू अविनाश- अवनीच्या या भेटीचा तो मूक साक्षीदार होता. आकाश काळाभोर ढगांनी भरून आलं होतं. हवा कुंद होती, असं वाटत होतं हे आभाळ केव्हाही गरजेल, विजांचा कानठळ्या बसवणारा कडकडाट होईल, प्रकाशाचा डोळे दिपवणारा लखलखाट होईल, आणि आत्तापर्यंत एखाद्या सभ्य गृहस्थ प्रमाणे आपले जलतुषार अगदी अदबशीर जमिनीवर शिंपडणाऱ्या ढगांचा संयम संपेल आणि उधाणलेल्या वाऱ्याला सोबतीला घेऊन, मनात दाटलेलं मळभ पावसाच्या थेंबांनी तो मोकळ करेल पण असं होत मात्र नव्हतं.

. आभाळ अगदी भरून आलेलं होतं, हवाही कुंद होती, झाडाची पानं ही अगदी स्तब्ध होती पण तळ्याकाठी मात्र अवनी आपलं म्हणणं अविनाशला सांगत होती….

अवनी -" अवि त्यादिवशी गावातल्या दुर्गादेवीच्या मंदिरात तु मला वचन मागितलं जन्मोजन्मीचं, आणि मी पण तुला नेहमी सोबत करेल असं म्हटलं ".


अविनाश -" पण तू खोटं बोललीस असं तुला म्हणायचं आहे ना आऊ ". अवनी ला मधेच थांबत अविनाश बोलला.

अवनी -" नाही रे अजिबात नाही! घरी मी आईला हे सगळं सांगणार होती पण आत्या घरी आली होती. आत्याने तिच्या नणंदेच्या मुलाचं स्थळ ताई - नंदिनी करता आणलं होतं, आणि पाहुणेमंडळी दोन दिवसांनंतर ताईला बघायला येणार होती. मग मी विचार केला, ताईचं लग्न जमलं की, आपण आपलं म्हणणं आईला सांगूया. आत्याच्या मनाप्रमाणे झालं तर तीही मला मदत करेल, असं मला मनातून वाटलं होतं.


. दुसऱ्या दिवशी आईने ताईला फोन केला. दोनदहुन रजा काढून यायचा. पण ताईचा फोन लागेना! म्हणून आत्याने अजय दादा ला फोन केला. अजय - आत्याचा थोरला, तर त्याने बॉम्बच फोडला आणि स्पष्टच सांगितलं -

अजय -" आई माझं नंदिनी वर प्रेम आहे आणि तीच सुद्धा माझ्यावर! मी तुला वारंवार सांगूनही, तू नंदिनी च्या लग्नाचा घाट का घातला? मी आणि नंदिनी ने महिनाभरापूर्वीच कोर्ट मॅरेज केले आहे, आणि मी आत्याच्या अतुलला अवनी चा फोटो पाठवला होता, त्याला अवनी पसंत आहे त्यामुळे, तू आता नंदिनीच्या नव्हे तर अवनीच्या लग्नाची तयारी कर. "

अवनी - "एकूण झाल्या प्रकाराने आत्या आणि बाबा दोघेही चिडले होते. बाबांची शुगर, बीपी, सगळेच वाढले होते आणि त्यांना मायनर अटॅक आला. घराशेजारील डॉक्टरांनी वेळेत उपचार केले म्हणून बाबांचे प्राण वाचले. पण अतुल मात्र त्याच्या आई-वडिलांना समवेत मला दहा दिवसांनंतर बघायला आला, आणि त्याच वेळी आमचं अगदी मोजक्या लोकांमध्ये घरगुती लग्न झालं. मला कोणी विचारलं नाही, पुसलही नाही.आई माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होती. तिला माझ्याबद्दल खूप करुणा दाटून आली,पण मी आणि आईने परिस्थितीसमोर शरणागती पत्करली होती. कारण अजूनही माझे बाबा माझ्या आत्याला खूप मानतात. तिचा शब्द माझ्या घरी, आजही प्रमाण मानला जातो. त्यातच ताई चा आगाऊपणा, आत्याचा इनामदार पणाचा तोरा, बाबांची जिवापेक्षा, मनापेक्षा, सामाजिक प्रतिष्ठा जपन्याची सवय आणि आईची असह्य,निशब्द, अगतिकता…. मी घरात कुणालाच काहीच सांगू शकले नाही.
©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//