स्वयंवराचा पण

Princess Riddle For Her Marriage


आई -"जय चल लवकर झोपायला. अरे एका तासापासून तू मोबाईल बघतोयस, साडेनऊ केव्हाच वाजून गेले आहेत, मग सकाळी तू लवकर उठत नाही. शाळेत जायला वेळ होतो.

जय-"मम्मी थोडा वेळ बघू दे ना अजून!"

आई -"एका तासापासून तू हेच म्हणतोय, थोडा वेळ बघू दे, पाच मिनिट बघू दे. चल बंद कर पटकन मोबाइल."

जय-"बर ठीक आहे मी मोबाईल बंद करतो, पण एका अटीवर. तू मला आज गोष्ट सांगायची. राजा राणीची!"

आई -"ठीक आहे. माझ्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत राजा राणीच्या."

जय -"फक्त राजा राणीची नाही काही, त्या गोष्टीत गणितही असलं पाहिजे! कठीण गणित. जसं माझ्या पुस्तकात असतं."

आई -"बर बाबा! ठीक आहे. सांगते राजा राणीची गोष्ट. ती पण कठीण गणित असलेली."

ज्याची आई गोष्ट सांगू लागली…..

आई-" राजकन्या भानुमती स्वतःच्या दालनात अस्वस्थ चकरा मारत होती. तिचे चित्त आज अजिबात थार्यावर नव्हते. आपली सखी सूनयना राजदरबारातून काय निरोप घेऊन येणार या विचाराने भानुमतीच्या जीवाची नुसती उलघाल होत होती. तेवढ्यात सुनयना भानुमतीच्या दालनात आली. खरंतर अगदी धावतच तिने राजकन्याचे दालन गाठले होते, त्यामुळे तिला चांगलीच धापही लागली होती. सुनेचा घामाने डबडबलेला चेहरा बघून भानुमतीच्या काळजाचा ठोका चुकला.


भानुमती -"प्रिय सखी काय झाले? तुला एवढी धाप का लागते आहे? राज दरबारात काय ठरले?"

सुनयना -"हो, हो जरा थांबा. मला एक क्षण विश्रांती तरी घेऊ दे."

पाच मिनिटांनी सुनयनाने एक घोट पाणी पिले आणि ते सांगू लागली…

सुनयना-"सखी आज राजदरबारात राजमातेने तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली."

भानुमती -"बर मग?"

सुनायना -"महाराजांनी त्यांना दुजोरा दिला, आणि लगेच एका भव्य स्वयंवराचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन, त्यांनी राजमातेला दिले."

भानुमती (सचिंत आवाजात) -"सखी आता माझं काय होणार?"

सुनयना-"तेवढ्यात राज ज्योतिषी म्हणाले की, महाराज अजून किमान सहा महिने तरी राजकन्या भानुमतीच्या विवाहाचे योग नाहीत."

राज ज्योतिषी -"महाराजांचा विजय असो, परंतु महाराज राजकन्या भानुमतीच्या कुंडलीचा मी अभ्यास केला आहे. त्यांच्या कुंडलीत सध्या गुरुबळ कमी आहे, त्यामुळे किमान पुढील सहा महिने तरी आपण राजकन्येचे स्वयंवर आयोजित करू नये."

हे ऐकून भानुमतीचा जीव भांडत पडला परंतु दुसऱ्याच क्षणी ती तिच्या सखीला स्वतःची समस्या सांगू लागली…

भानुमती -"प्रिय सखी तुला तर माहिती आहे आमच्या मनात काय आहे ते! पण आता ते साध्य कसे व्हावे? राजकुमार वीरभद्र पर्यंत आमचा निरोप कसा आणि कोण पोहोचविणार?"

सुनयना -"सखी तू काळजी करू नको. एक दोन दिवसात तु आपला मानस राजमाता तारा राणींना सांग. स्वतःच्या मुलीसाठी त्या नक्कीच महाराजांकडे शब्द टाकतील."

भानुमती -"नाही सखी. ते होईल असे वाटत नाही. दुसरा एखादा मार्ग काढावा लागेल."

थोडा वेळ दोघी मैत्रिणींनी विचार केला आणि मग सुनयनाने एक कल्पना राजकुमारी भानुमतीला सांगितली. भानुमतीला ही ती कल्पना एकदम आवडली.

दुसऱ्या दिवशी भानुमती महाराजांना भेटायला गेली.

भानुमती -"प्रणाम पिताश्री, प्रणाम माताश्री."

राजा -"आयुष्यमान भव!"

राणी -"यशस्वी भव!"

राजा -"भानू आज काही विशेष? गेले अनेक दिवस आपण आमच्याशी बोलला नाहीत. आमच्या रागवण्याचा राग आला का?"

भानुमती -"नाही पिताश्री, खरंतर आपण आमच्या भल्यासाठीच आमच्यावर रागावलात. आम्ही थोडे आत्म चिंतन करत होतो."

राजा -"मग आज इकडे येण्याचे कारण?"

भानुमती -"पिताश्री, आम्हाला थोडे आमच्या विवाहाविषयी बोलायचे आहे. जर आपली अनुमती असेल तर….


राजा -"भानू तो विषय तिथेच संपला."


भानुमती -"क्षमा असावी महाराज, आपला काहीतरी गैरसमज झाला आहे."

राजा -"काय ते स्पष्ट बोल भानू."

भानुमती -"पिताश्री आमचं म्हणणं एवढंच आहे की, आमच्या विवाहाचे निमंत्रण सर्व राजकुमार आणि राजांना जावे आणि आमच्या स्वयंवराचा पण आम्हीच ठरवू."


राजा -"बर ठीक आहे. जशी तुमची इच्छा. अजून काही?


भानूमती -"महाराज राजकुमार वीरभद्रला स्वयंवराज बोलवावे."

राजा -"भानू अग तो व्यसनी आहे. दुराचारी आहे. का तू त्याच्या ध्यास घेतला आहेस? त्याचा विचार सोड, त्यातच तुझे कल्याण आहे."

भानुमती -"पिताश्री हवं तर ही माझी शेवटची इच्छा समजा, पण अवंतिका नगरीचा राजकुमार विरभद्र यांना स्वयंवराकरिता नक्की आमंत्रण द्या."

आपल्या लेकीची एवढी कळकळीची विनंती ऐकून राजाने केवळ होकारार्थी मान हलवली.

राजकन्या भानुमती ही महाराज शुरसेनाची एकुलती एक कन्या, त्यामुळे त्यांचा तिच्यावर फार जीव होता. त्यातच एकदा शिकारीला जाताना भानुमती वनात हरवली आणि तिथे तिची भेट युवराज वीरभद्र अशी झाली, परंतु शुरसेनचा प्रधान मात्र फारच बदमाश होता. त्याला कसेही करून राजा शुरसेनचे राज्य मिळवायचे होते. त्याकरिता तो अनेक षडयंत्र आणि डाव खेळत होता, पण ते कुठलेच डाव भानुमती यशस्वी होऊ देत नव्हती.

त्या प्रधानाने शुरसेनाला, वीरभद्र हा अतिशय वाईट चरित्र्याचा असून व्यसनी आहे असे सांगुंन, त्याच्या विरुद्ध राजाच्या मनात विष कालवले होते, आणि भानुमतीच्या विवाह करिता स्वतःचा मुलगा विरेन याचे नाव विवाहासाठी पुढे केले होते.

पण भानुमती मात्र हुशार आणि चणाक्ष  होती. तिने प्रधानाचा डाव हाणून पाडायचे ठरवले. तिच्या मदतीला तिची प्रिय सखी सुनयना होतीच. खरंतर विरेनचे सुनयनावर प्रेम होते पण, आपले वडील आणि राज्याचे प्रधान असलेले क्रूरसेन हे किती आतल्या गाठीचे आणि उलट्या काळजाचे आहे, हे विरेनला चांगल्याने माहीत होते, म्हणूनच तूर्त भानुमती, विरेन आणि सुनेना अतिशय काळजीपूर्वक सर्व नियोजन करीत होते.

स्वयंवराचा दिवस उजाडला. संपूर्ण अमरावती नगरी फुलांच्या माळांनी, तोरणांनी सजली होती. प्रत्येक घरासमोर सडा टाकून सुबक, सुंदर रंगसंगती असलेल्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नगरजन ठेवणीतले नवीन कपडे घालून, देशोदेशीच्या येणाऱ्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करत होते, स्वयंपाक घरात अनेक बल्लव नाना तर्हेचे व्यंजन, मिठाया आणि सुग्रास भोजन बनवत होते.

ठरल्यावेळी सर्व निमंत्रित राजकुमार, राजे, युवराज स्वयंवर मंडपात स्थानापन्न झाले. राजकुमारी भानुमती नखशिखांत सुवर्ण अलंकार आणि जयमला घेऊन सलज्ज नजरेने उपस्थित सर्व राजकुमारांना न्याहाळत होती. तेवढ्यात तिच्या पिताजींनी निवेदन करण्यास सुरुवात केली…

राजा -"राजकुमारी भानुमतीच्या स्वयंवरासाठी उपस्थित सर्व राजे, राजकुमार आणि युवराज यांचे मी मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. राजकुमारी भानुमती या सर्व गुणसंपन्न असून, युद्धशास्त्र, नीतीशास्त्र आणि न्यायशास्त्रात त्यांनी शिक्षण, प्रशिक्षण घेतले आहे, पण त्यांची विशेष रुची अंकगणितात आहे, म्हणून आज आजच्या या स्वयंवराचा पण तलवारबाजी, धनुर्विद्येचे प्रदर्शन किंवा गदायुद्ध, मल्लयुद्ध असे काही नसून, राजकन्या भानुमती उपस्थित सर्व मंडळींना एक प्रश्न विचारणार आहे आणि जो राजकुमार योग्य आणि अचूक उत्तर देईल राजकन्या त्यालाच जयमाला घालेल. राजकन्या भानुमती आपला प्रश्न विचारा."

राजा शूरसेनाची ही घोषणा ऐकून उपस्थित सर्व राजकुमारांमध्ये चुळबुळ सुरू झाली, पण त्याचवेळी राजकुमारी भानुमतीचा मंजूळ, मंत्रमुग्ध आवाज ऐकून उपस्थित अगदी शांत झाले.

भानुमती -"उपस्थित सर्व राजकुमारांना मी सविनय अभिवादन करते, आणि पिताश्री महाराजांनी मला हा पण सांगण्याची संधी दिली त्याकरिता मी त्यांचे आभार मानते.

आमच्या अमरावती नगरीच्या बाजूला एक ठिकाण आहे, जिथे तीन नद्या आहेत आणि प्रत्येक नदीकाठी एक शिवालय आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने पहिल्या नदीच्या बाजूला असलेल्या वनातून काही फुले तोडायची आणि नदीपार करून जे शिवमंदिर आहे, तिथे ती फुल व्हायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही पहिल्यांदा फुल तोडली आणि नदीत गेला कि ती फुले दुप्पट होणार, मग शिवालयात फुल वाहिल्यावर, दुसऱ्या नदीतून जाताना उरलेली फुलं परत दुप्पट होणार, दुसऱ्या शिवालयात फुल पाहिली आणि तिसऱ्या वेळी नदीतून जाताना उरलेली फुलं परत दुप्पट होणार, आता पण असा आहे की, फुलं फक्त एकदाच म्हणजे सुरुवातीलाच तोडायची आहेत, आणि प्रत्येक शिवालयात वाहण्यात येणाऱ्या फुलांची संख्या सारखीच हवी आणि तिसऱ्या शिवालयात फुल वाहिल्यावर, तुमच्या हातात एकही फुल शिल्लक राहिला नको. हाच माझा पण आहे."

राजकन्येचा हा पण सुरुवातीला सगळ्यांना अगदी सोपा वाटला, पण तिन्ही मंदिरात सारख्याच संख्येत फुल व्हायची, नदीत फुल दुप्पट होणार आणि शेवटी एकही फुल शिल्लक राहता कामा नये, अशा एकेक अटी ऐकुन अर्धे अधिक राजकुमार चक्रावले. पण तरीही काहींनी प्रयत्न केला.

पण ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांचीच शेवटी काही ना काही फुल उरतच होती. स्वयंवराचे निरीक्षण करण्याकरिता प्रत्येक मंदिरात सैनिक उभे होते. तिसऱ्या शिवालयात राजकन्या वरमाला घेऊन अधीरतेने युवराज वीरभद्रची वाट पाहत होती. संध्याकाळचे चार वाजून गेले होते भानुमतीचा जीव वर खाली होत होता, काळजीने तिला रडावेसे वाटत होते. तिची सखी सुनयना हा मात्र तिला धीर देत होती. युवराज विरभद्र नक्की येतील अशी तिला पक्की खात्री होती आणि झाले ही अगदी तसेच.


संध्याकाळी साडेचारला वीरभद्रने नदीकाठच्या उपवनातून फुल तोडली आणि सगळे नियम पाळत तिसऱ्या मंदिरात त्यांनी प्रवेश केला. ओंजळीतली सर्व फुले शिवाच्या पिंडीवर वाहिली आणि भानुमतीने जयमला त्याच्या गळ्यात घातली. दोघेही जण रथात बसून अमरावती नगरात आले. उपस्थित सर्व राजे, राजकुमारांना प्रश्न पडला होता दिलेला पण युवराज वीरभद्र ने कसा पूर्ण केला?

युवराज -"उपस्थित सर्व पराक्रमी राजकुमारांना मी अभिवादन करतो. आजच्या या जगा वेगळ्या स्वयंवराच्या कोड्याचं मी आज उत्तर देणार आहे.

अगदी सुरुवातीला मी वनातून सात फुल तोडली नदीत गेल्यावर ती फुल दुप्पट झाली म्हणजे चौदा. पहिल्या शिवालयात मी आठ फुल वाहिली म्हणजे माझ्याकडे उरली सहा फुलं. दुसऱ्या नदीत सहा फुलांची बारा फुले झाली. दुसऱ्या शिवालयात मी परत आठ फुले वाहिली. माझ्या हाती राहिली चार फुलं. तिसऱ्या नदीत त्या चार फुलांची झाली आठ फुले. तिसऱ्या शिवालयात मी सर्व फुलं महादेवाच्या पिंडीवर वाहिली आणि राजकन्या भानुमतीने मला वरमाला घातली."

वीरभद्रचे उत्तर ऐकून उपस्थित सर्व राजकुमारांचे शंका निरसन झाले आणि राजाने मोठ्या थाटामाटात वीरभद्र आणि भानुमतीचे लग्न लावून दिले. त्यानंतर लगेचच सुनायना आणि विरेनही विवाह बंधनात अडकले हे वेगळे सांगायलाच नको."

आईची गोष्ट पूर्ण झाली होती आणि जय मात्र त्याच्या स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाला होता.





©® राखी भावसार भांडेकर.