द सायको किलर (भाग-११) (अंतिम भाग) (होणार गुन्हेगाराचा अंत)

The CID Team Can Find Out Who Is The Criminal.


द सायको किलर... भाग 11.(अंतिम भाग) (होणार गुन्हेगाराचा अंत)....


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, हर्षने मोबाईल कंपनीमध्ये फोन करून कस्तुरीच्या फोनवर आलेल्या नंबरविषयी माहिती काढली.....तर अविनाशच्या खबऱ्याने शांताबाईंना एका बंद बंगल्यात जाताना पाहिलं....भालचंद्रकडून त्यांचं ते गावचं जुनं घर विकल्याचं कळलं.... आता पुढे.....)


"एलरॉन फिटो, या नावाच्या व्यक्तीला मी ते घर विकलं होतं.... पण सर काय झालं? तुम्ही माझ्या जुन्या घराबद्दल का विचारताय?...."

"आम्हाला त्या घरातून तुमचा फोटो मिळाला.... आणखी हा एक फोटो मिळाला आहे ह्यांना तुम्ही ओळखता का?...." अविनाशने त्या घरात मिळालेल्या एका मॉडर्न मुलीचा फोटो मिस्टर भालचंद्रना विचारलं.....

"नाही सर...!" मिस्टर भालचंद्र म्हणाले.....

"ठीक आहे...! तुम्ही येऊ शकता...!" ए.सी.पी सरांनी मिस्टर भालचंद्र ना जायला सांगितलं....


रुपेश अचानक आनंदाने ओरडला....." सरssss, ह्या फोन मधून मला काय मिळालंय बघा......

"अरे हो, हो....! काय मिळालंय सांगशील का?..." ए.सी.पी सर हसत म्हणाले.....

"सर ह्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं function ऑन होतं....त्यामुळे त्या अननोन नंबरचा कॉल ह्यात रेकॉर्ड झाला आहे....." रुपेश त्या फोनमधील रेकॉर्डिंग दाखवत म्हणाला.....

"वा...! शाब्बास रुपेश...! एक काम कर ते रेकॉर्डिंग ऑन कर बघूयात कस्तुरी का टेंशन मध्ये होती...." ए.सी.पी सर रुपेशला म्हणाले.....

रुपेशने तो फोन स्पीकरला जोडला आणि रेकॉर्ड झालेला कॉल चालू केला....

"हॅलोsss कस्तुरी...!" समोरील व्यक्ती...

"तू...! तू परत परत मला फोन का करतोयस?... तुला सांगितलं होतं ना मला ह्यापुढे एकदाही फोन करायचा नाही म्हणून....!" कस्तुरी समोरील व्यक्तीशी रागात बोलत होती....

"एss, गप्प बस...! त्या रागिणीच्या नादी लागून माझ्या मेहनतीचं क्रेडिट स्वतः घेतलंस, वर मलाच सांगतेस की मला फोन करू नकोस म्हणून...!" समोरील व्यक्तिसुद्धा चिडून बोलत होती....

"कसली मेहनत?... तू सुद्धा हे सगळं स्वतः केलेलं नव्हतं...!" कस्तुरी म्हणाली....

"माझ्याच कंपनीचा सगळा पैसा गुंतला होता त्या structure आणि ब्लू प्रिंट्स मध्ये....! मेहनत सुद्धा माझ्याच माणसांनी घेतली आणि तुम्ही मी तुम्हाला सोडणार नाही लक्षात ठेव, बदला घेणार मी ह्याचा....!" असं म्हणून त्या व्यक्तीने फोन कट केला.....

सगळं रेकॉर्डिंग ऐकून झाल्यावर हर्ष ए.सी.पी सरांना म्हणाला,"सर ह्याच फोनमुळे कस्तुरी टेंशनमध्ये असेल..!"

"हम्म...! मला पण तेच वाटतंय....पण रुपेश, एक काम कर जरा बॅकग्राऊंडचा आवाज वाढव आणि पुन्हा रेकॉर्डिंग ऑन कर...." ए.सी.पी सरांनी रुपेशला बॅकग्राऊंडचा आवाज वाढवायला सांगितला.....

रुपेशने बॅकग्राऊंड वॉल्युम फुल करून पुन्हा एकदा रेकॉर्डिंग सुरू केलं.....

"थांब, थांब...! रिवाईंड कर आणि पुन्हा चालू कर..." अविनाश रुपेशला म्हणाला....

"ऐकलं का सगळ्यांनी?..." ए.सी.पी सरांनी विचारलं....

"हो सर, ही जी कोणी व्यक्ती आहे तिच्या बॅकग्राऊंडला एका बाजूला शाळेच्या मुलांचा आवाज येतोय तर दुसरीकडे गुड्डू वडापाव घ्या..... असा आवाज येतोय..... याचा अर्थ हा गुड्डू वडापाववाला तिथला फेमस वडापाववाला असणार....." हर्ष म्हणाला....

"हो...! आता ती जागा आपल्याला शोधून काढायला हवी..." ए.सी.पी सर म्हणाले.....

"सर, मी मिस्टर विजय गावडे चा पत्ता शोधत होते तो पत्ता एका जुन्या \"स्मूर्ती\" बंगल्याचा होता.... तिथे देखील असेच आवाज येत होते..." मनस्वी म्हणाली.....

"सर, मगाशी मिस्टर महेशशी बोलत असताना सुद्धा असाच आवाज मागून येत होता...!" अविनाश म्हणाला......

"ह्याचा अर्थ मिस्टर महेश आपल्याशी खोटं बोलले...." हर्ष म्हणाला....

सगळे लगेचच \"स्मूर्ती\" बंगल्यावर जायला निघाले.....

बंगल्याच्या बाहेरून कुलूप लावलेलं होतं, पण आता मात्र सगळ्यांना खात्री होती की आतमध्ये नक्कीच मिस्टर महेश असणार म्हणून अविनाशनी कुलूप तोडलं आणि सगळे आत गेले.....

"ओह, मिस्टर महेश...! तुम्ही इथे लपून बसला आहात...." अविनाश म्हणाला.....

"काय झालं सर?..." मिस्टर महेशनी विचारलं.....

"काय झालंss?... तुम्ही तर बाहेरगावी गेला होतात ना? अचानक इथे कसे आलात?..." ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"सर ते..." मिस्टर महेश अडखळले....

"सर अहो, ह्यांनीच रागिणी, कस्तुरी आणि सायलीचा खून केला आहे.... म्हणून तर खोटं बोलले ते सगळ्यांशी...!" हर्ष म्हणाला....

"नाही सर...! खरंच असं काहीच नाहीये... मला तर तुम्ही सांगितलंत तेव्हा कळलं की, त्या तिघींचा खून झाला आहे...! मी त्यांचा खून का करू?..." मिस्टर महेश म्हणाले.....

"सगळे गुन्हेगार पकडले गेले की हेच बोलतात...!" मनस्वी म्हणाली.....

"नाही मॅडम खरंच मी काहीच केलं नाहीये..." मिस्टर महेश म्हणाले....

"मग आमच्याशी खोटं का बोललात?" ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"सर, माझ्या कंपनीने मेहनतीने तयार केलेले structure आणि ब्लू प्रिंट्स रागिणीने चोरल्या होत्या.... त्या ब्लू प्रिंट्स रागिणीपर्यंत नक्की कोणी पोहोचवल्या हे पाहण्यासाठी मी लपून इथे राहत होतो..." मिस्टर महेश म्हणाले.....

"मग मिस्टर परेश तुमचे विश्वासू एम्प्लॉयी त्यांनी आम्हाला खरं का सांगितलं नाही?...." हर्षने विचारलं.....

"ऑफिसमध्ये कोणालाच माहिती नाही की मी इथेच आहे आणि ह्या बंद बंगल्यात राहतोय...."मिस्टर महेश म्हणाले....

"मग कशावरून तुम्ही त्या तिघींचा खून केला नाही?..." अवनीने मिस्टर महेशना विचारलं....

"सर, माझ्यावर विश्वास ठेवा..! मी एक businessmen आहे, एवढ्या-तेवढ्या गोष्टीवरून मी त्यांचा खून नक्कीच नाही करणार.... मलासुद्धा कायद्याच्या मार्गानेच त्यांना धडा शिकवायचा होता.....मी सगळे पुरावे जमा करून त्यांच्याविरुद्ध कोर्टात केस करणार होतो....

त्यासाठी मी एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ना अपॉइंट केलं आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता...." मिस्टर महेश म्हणाले.....

"तुम्ही काय आम्हाला गोल-गोल फिरवून सुटाल असं वाटतंय का तुम्हाला?..." रुपेशने मिस्टर महेशना विचारलं.....

"नाही सर..! मी का खोटं बोलू?..." मिस्टर महेश म्हणाले.....

"ठीक आहे, आम्हाला तुम्ही अपॉइंट केलेल्या डिटेक्टिव्हचा फोन नंबर द्या...." ए.सी.पी सर म्हणाले.....

"सर, माझं त्यांच्याकडे काम होतं मी त्यांना इथे बोलावलंच आहे...." मिस्टर महेश म्हणाले.....

तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि दार उघडलं गेलं.....

कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये मोठा लाल टिळा, नववारी साडी, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण, केसांचा अंबाडा घालून त्या अंबाड्यावर फुलांची वेणी घातलेली एक महिला समोर येऊन उभी राहिली.....

"शांताबाई....!" रुपेश शांताबाईंना पाहून आश्चर्याने म्हणाला....

शांताबाईंनी आत येऊन दार लावून घेतलं....

मिस्टर महेशनी शांताबाईंची खरी ओळख सगळ्यांना करून दिली....

"सर, ह्या मिस रोहिणी सुभेदार.... ह्या माझ्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत....

मी मगाशीच म्हणालो माझ्या कंपनीतील ब्लू प्रिंट्स रागिणी,कस्तुरी आणि सायली यांच्याकडे कशा गेल्या हे पाहण्यासाठीच त्या शांताबाई बनून तिथे राहत होत्या...." मिस्टर महेश म्हणाले.....

"पण मग विमल कोण आहे?...." अविनाशने शांताबाईंना म्हणजेच मिस रागिणींना विचारलं...

"तिचं खर नाव प्रांजल आहे, ती माझी असिस्टंट आहे..... ती माझ्याबरोबर विमल बनून माझी मदत करत होती....

त्या दिवशी रात्री रागिणी जेवून झोपली.... विमलने म्हणजेच प्रांजलने मला दार उघडून घरात काही पुरावे मिळतात का? ते शोधण्यासाठी आत घेतलं.....

मी रागिणीची बेडरूम चेक करत होते आणि प्रांजल हॉल चेक करत होती.....प्रांजलने कपाटाचं दार उघडलं आणि अचानक कळवळली.... मी बाहेर येऊन पाहिलं तर तिला गोळी लागली होती.....

रागिणी मात्र गाढ झोपेत होती....मी लगेच तिच्या हाताला रुमाल बांधला आणि तिथलं रक्त पुसून काढलं...... नंतर मी तिला घेऊन मिस्टर महेशकडे आले....

मी फोनवर मिस्टर महेशना ह्या सगळ्याची कल्पना दिली होती......मिस्टर महेश यांचे एक मित्र डॉक्टर आहेत, मिस्टर महेशनी त्यांना बोलावून घेतलं.....त्यांनीच प्रांजलच्या हातातील गोळी काढली व ड्रेसिंग केलं....." मिस रागिणी नी सगळा प्रकार सांगितला.....

"मिस्टर महेश, सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत.... आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू?...."ए.सी.पी सर मिस्टर महेशना म्हणाले.....

"सर, हे माझं आयकार्ड आहे....!" मिस रोहिणीने स्वतःचं कार्ड ए.सी.पी सरांना दाखवलं.....

"आम्ही शोधून काढूच, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते...! पण हो मिस्टर महेश जोपर्यंत ही केस solve होत नाही तोपर्यंत तुम्हाला सी.आय.डी च्या कस्टडीत राहावं लागेल...." ए.सी.पी सर म्हणाले......

"सर, मला वाटतंय तोच मला ह्या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असणार...!" मिस्टर महेश म्हणाले.....

"कोण तो? तुम्ही एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता?..." ए.सी.पी सरांनी मिस्टर महेशना विचारलं....

"सर, तो रागिणी, कस्तुरी आणि सायली ह्यांच्यात सामील होता.... त्याला फार कमी वेळात श्रीमंत व्हायचं होतं.....

बाहेर देशातून मागवलं जाणारं एक मटेरिअल ज्यामुळे वास्तू अत्यंत सुबक आणि चांगली दिसते त्या मटेरिअल पासून त्याला इमारती तयार करायच्या होत्या.... त्या मटेरिअल पासून बनवलेल्या वास्तूंची आणि आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूची किंमत सारखीच होती.....

पण त्या मटेरीलचा एक तोटा होता.... तो म्हणजे त्या मटेरियल पासून तयार केलेली वास्तू ही दोन ते अडीच वर्षांच्या वर टिकू शकत नाही..... ह्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपन्यांचा जरी फायदा होणार होता.....

पण ते मटेरियल वापरून तयार केलेल्या इमारती जास्त काळ पाऊस, वादळ ह्यांचा मार सोसू शकत नव्हता..... ह्यामुळे सामान्य माणसांच्या जीवाचा देखील खेळ-खंडोबा झाला असता, म्हणून मी ह्या प्रस्तावाला नकार दिला..... तेव्हापासून तो माझ्यावर खार खाऊन आहे...." मिस्टर महेशनी सांगितलं.....

"हो सर, मलासुद्धा असंच वाटतंय की मिस्टर महेश निर्दोष आहेत...! कारण निशाद सरांनी आपल्याला सांगितलं होतं, खुनी हा पाच ते सहा फूट उंच असावा.... आणि मिस्टर महेश यांची उंची साडेचार- पावणेपाच फुटांपेक्षा जास्त नसेल....." हर्ष म्हणाला.....

"हम्म...! मिस्टर महेश आम्हाला तुम्ही सांगत होतात त्यांचं नाव आणि पत्ता द्या...!" अविनाश म्हणाला.....

मिस्टर महेशनी ए.सी.पी सरांना नाव आणि पत्ता मेसेज केला.....

सी.आय.डी टिम त्या पत्त्यावर जायला निघाली.... साधारण अर्ध्या तासात सगळे त्या पत्त्यावर पोहोचले....

अतिशय शांत ठिकाणी एका जंगलाच्या कडेला एक घर बांधलेलं होतं.... तिथे एखादं घर असेल असा कोणी विचारही केलेला नव्हता....घराचं दार नुसतंच ढकलेलं दिसलं.....

अविनाशने दबक्या पावलांनी पुढे जाऊन घराचं दार उघडलं....तिथे पाच-साडेपाच फूट उंच, सावळ्या रंगाचा, शरीराने बळकट पण मनाने विकृत असा दिसणारा एक माणूस जोर-जोरात हसत होता.....

हर्षने मागून जाऊन त्याला धरलं....
तो पळण्यासाठी फार प्रयत्न करत होता, पण हर्षची पकड मजबूत असल्याने तो काही सुटू शकला नाही.... आणि अचानक जोरात हसू लागला....

"हा....हा....हा.... तुम्ही यायला फार उशीर केलात...! माझं सगळं काम करून झालंय...." तो विकृतपणे हसत म्हणाला.....

"मिस्टर ईशान... तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हे सगळं करून नामानिराळे राहाल आणि आम्हाला कळणारही नाही..." अविनाश म्हणाला....

"पण उशिरा कळलं ना...! हा...हा...!" पुन्हा ईशान हसू लागला....

"एss बोल आता लवकर, हे सगळं का केलंस?..." ए.सी.पी सरांनी चिडून विचारलं....

"बदला....! बदला घेतला मी सगळ्यांचा....
माझ्या विरोधात गेला तो महेश.... सगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांना फायदा होणार होता तरी त्याने त्या प्रस्तावाला नकार दिला..... त्याच्या नकारामुळे त्या प्रस्तावाला परवानगी मिळाली नाही.....

म्हणून मीच रागिणी, कस्तुरी आणि सायलीला हाताशी घेऊन त्याला बरबाद करायचं ठरवलं...त्या तिघींना त्या कामाचे मी सतत त्या तिघींना पैसे देत होतो......महेशच्या कंपनीतील एकाला आम्ही खच्चून पैसे दिले, मग त्या माणसाने आम्हाला structure आणि ब्लू प्रिंट्स दिल्या....."ईशान सांगत होता....

"पण मग रागिणी, कस्तुरी आणि सायली ह्यांचा खून का केलास?..." मनस्वीने विचारलं....

"त्या तिघींना पैशाची हाव सुटली होती.... मी त्यांना जे पैसे देत होतो ते त्यांना कमी पडू लागले..... त्या तिघी पैशांसाठी मला ब्लॅकमेल करू लागल्या..... तेव्हाच मी ठरवलं, ह्या तिघींचा बंदोबस्त करायचा आणि ह्या सगळ्या प्रकरणात महेशला अडकवायचं....." ईशान म्हणाला....

"एवढं घातक रसायन तुझ्याकडे कुठून आलं?..."ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"मी माझ्या मित्राकडून घेतलं..... त्याने त्याच्या लॅब मध्ये पाच ते दहा एम.एल रसायन सांडायचं नाटक केलं.... पण तिथल्या पाईपच्या खाली त्याने आधीच एक बाटली फिट करून ठेवली होती.... त्याच्या लॅबमधील लोकांना ते रसायन वाहून गेलं असं वाटलं पण ते रसायन माझ्याकडे होतं.....

मी एक दिवस रागिणी, कस्तुरी आणि सायलीला जेवणासाठी बोलावलं..... आम्ही चोघेही ह्याच जागी एकत्र भेटून पुढचे प्लान तयार करायचो.... त्यादिवशी देखील त्या तिघींनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, पण मी त्यांच्या जेवणार ते रसायन टाकलेलं असल्यामुळे मला त्यांच्या धमक्या पोकळ वाटत होत्या......

पण मला त्यांच्यावरचा राग त्यांच्यावरच काढायचा होता......म्हणून मीच रागिणीच्या सोसायटीचा सी.सी.टी. व्ही कॅमेरा बंद केला.... तिच्या सोसायटीतील मिस्टर विराजना पैसे देऊन थोडे दिवस सी.सी.टी.व्ही चं काम करण्यास नकार दिला, पण त्यांना खरं कारण माहिती नव्हतं.....

रागिणीचा मृत्यू झाल्यानंतर मी बदला घ्यायला तिच्या घरात गेलो आणि तिच्या शरीरावर चाकूने घाव केले.....

मीच रागिणीच्या घरी कपाटात गन फिट केली होती....ह्या सगळ्याचा संशय महेशवर जावा म्हणून मीच ती बॅगसुद्धा बदलली..... त्या बॅगेला एक ट्रान्सपरंट कव्हर लावलं होतं जेणेकरून त्या बॅगेवर फिंगरप्रिंट्स येणार नाहीत......

नंतर मी ते कव्हर काढून टाकलं, आणि बॅग मुद्दाम तिथेच ठेवली......

रागिणीच्या बाबतीत मी जे केलं तेच सायली आणि कस्तुरीच्या बाबतीत केलं, कस्तुरीचा फोन नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला......

मला माहित होतं महेशनी त्याच्या ब्लू प्रिंट्स आणि structure चोरी झाल्यामुळे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अपॉइंट केली आहे.....

तिचीच असिस्टंट विमल बनून राहत आहे जिला मी फिट केलेल्या गन मधून गोळी लागली होती......
ती विमल खोटी आहे ह्याचा संशय कस्तुरीला आधीच आला होता..... त्यावरून तिचा त्या खोट्या विमलशी वादसुद्धा झाला होता.....

नंतर ही केस सी.आय.डी कडे आहे हे कळल्यावर मी मुद्दाम तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी खोटे मिस्टर विजय, दक्ष, शशिकांत तयार करून त्यांची फाईल रागिणी, कस्तुरी आणि सायलीच्या ऑफिसच्या केबिनमध्ये ठेवली....

एलरॉन, अमन, आणि विनायक हीसुद्धा माझीच माणसं होती.....

मी कस्तुरीला केलेला धमकीचा कॉलसुद्धा महेश ज्या बंद बंगल्यात राहत होता तिथून केला जेणेकरून सगळी केस त्याच्यावर शेकेल....." ईशान सगळी कबुली स्वतःच देत होता.....

"पण महेश तिथे राहतात हे कोणालाच माहिती नव्हतं.... मग तुला कसं कळलं?..." अविनाश ने विचारलं.....

"मला सगळं माहिती होतं.... मला तुम्ही केलेल्या सगळ्या हालचाली सुद्धा कळत होत्या.... त्यासाठी मी एक माणूस ठेवला होता.....

तुम्ही इथे येणार हे मला माहिती होतं.... मला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाहीये, मी कायद्याला शरण जाणार नाही.....मी जे काही केलं त्याचा मला पश्चाताप तर अजिबातच नाही....." ईशान विकृतपणे हसत बोलत होता.....

"किती विकृत आहे हा...! अविनाश घेऊन चल ह्याला..... तुम्ही सगळे जाऊन ह्याला सामील असणाऱ्या प्रत्येकाला ब्युरोमध्ये घेऊन या.....
सायको आहे हा सायको....!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"हा....हा....हा..... मी तुम्हाला सांगितलं मी कायद्याला शरण जाणार नाही..... आssss, आsss.... मी ते रसायन स्वतः घेतलं आहे...." अचानक ईशानने पाणी पिलं.... हे सगळं सांगताना देखील तो हसतच होता.....

ईशान मरता मरता हसतमुखाने म्हणाला," हा...हा...! येस आय अम द सायको किलर.....!"


समाप्त.....

🎭 Series Post

View all