भरल्या घराच सुख

A short story about a woman who wanted a small corner in her own house.

आज राणी खुप खुशीत होती.पार्लर मधून सुटल्यावर ती झपाझप पावलं टाकत स्टेशनकडे जात होती. पण मध्येच काही विचार करुन तिनं लोकल ट्रेन ने जाणं टाळलं आणि शेयर ऑटो ने जाण्याचा निर्णय घेतला. कारण आज तिला लवकरात लवकर घरी पोहचायचं होतं. ऑटो धरायच्यया आधी तिनं स्वताच्या आवडीचा वडा पाव,छोटा सा कप केक आणि समोसा पेक करुन घेतला.
              आज आयुष्यात पहिल्यांदाच ती घरात एकटीच असणार होती.नवरा,मुलं आणि सासू सासरे नणंदेच्या मुलाच्या लग्नासाठी गावाला गेले होते,ती पार्लर मध्ये मोठं काम होतं म्हणून उद्या निघणार होती. आजचा दिवस ती फक्त आणि फक्त स्वता बरोबर सेलिब्रेट करणार होती.
लहान पणा पासून ती मुंबईच्या दोन खोल्यांच्या घरा मध्ये तीन भावंडं,आई-बाबा, आणि आजी अश्या सात लोकांमध्ये मोठी झाली होती. नावालाच असणार्या दोन खोल्यांच्या त्या घरात इतक्या लोकांमध्ये स्वताची एक खोली तर फारच दूर ची गोष्ट होती,एक निवांत कोपराही मिळणं ही अशक्य होतं. दिवसभर नुस्ता आवाज आवाज आणि आवाज. सिनेमा आणि सिरियल मध्ये पाहून ती सुद्धा  मोठ्या घराचे आणि स्वताच्या एका खासगी खोली ची स्वप्नं रंगवत बसायची. मग जसं जसं वय वाढत गेलं,हे ही कळत गेलं कि माहेरी तर हे शक्य नाही आहे कदाचित सासरी असं होऊ शकतं. मोठं घर आणि त्या मोठ्या घराची ती एकुलती एक राणी.
पण लग्न ठरलं आणि हे ही कळालं कि आपलं नुसतं नावच राणी आहे, जास्तीत जास्त आपण कोणाच्या तरी हृदयाचीच राणी होऊ शकतो. लग्नाची बोलणी सुरू असताना ती ही मुलाच्या घरी जाऊन आली होती आणि सर्व सर्व स्वप्नं भंग करुन परत आली होती.  हृया घरा पेक्षा काय वेगळं होतं तिथे.मुलगा,त्याची एक बहीण,आई बाबा,आजी आजोबा असे सहा जण दोन खोल्यांच्या त्या घरात राहत होते.
त्या दिवशी तिला आई बाबांचा फार राग आला होता,का म्हणून तिचं नाव राणी ठेवलं होतं, मुळात गरीब लोकं काय विचार करुन आपल्या मुलीचं नाव राणी ठेवतात माहित नाही.
      संसाराची गाडी असीच चालत गेली. घरातले तीन मेंबर कमी झाले आणि दोन नवीन मेंबर वाढले होते, येऊन जाऊन एकच गणित. तिनं ब्युटीपार्लर चा कोर्स केला होता तर तिला एका मोठ्या पार्लर मध्ये काम मिळालं होतं. घर चालवण्यासाठी  नवर्या सोबत तिचं ही काम करणं गरजेचं होतं.
तिच्या हातात खुप कला होती  आणि खुप लवकर ती खुपश्या क्लाइंट्सची फेवरेट ब्युटिशियन झाली होती. तीची मालकिण पण तिच्यावर खुप खुश होती.
मिसेस मेहता आणि मिसेस वर्मा तर तिच्या शिवाय कोणाच्या ही हातुन काही ही करवायला तैय्यार नसायच्या.  पण तीला ह्या दोघींचा खुप हेवा वाटायचा त्या दर पंधरा दिवसांनी एकदा पार्लर मध्ये भेट देऊन वर पासून तर अगदी पायाच्या नखा पर्यंत जे काही पार्लर मध्ये शक्य आहे सगळं  सगळं करवून घेतात.वरुन खुशीनं पन्नास रुपये टिप पण देऊन जातात.पन्नाशीच्या जवळच्या ह्या बायका जातात तरी कुठे हे सगळं करुन, तिला फार प्रश्न पडायचा.मग येऊन जाऊन एकच प्रश्न तिच्या डोक्यात यायचा,ह्यांच घर नक्कीच फार मोठं असणार, किती श्रीमंत बायका आहे ह्या.
                  राणी,ऑटोत बसुन विचार करत होती कि घरी गेल्या बरोबर हात पाय धुवायचे आणि टीव्ही लाऊन मस्त वडा पाव आणि समोसा खात सिरियल बघायची त्या बरोबर मस्तं चटनी. चटनी वरुन आठवलं कि लहानपणी बाबा महिन्यांतून एकदा सगळ्यांसाठी मोजून एक एक वडापाव आणायचे, आणि त्या बरोबर आणलेल्या चटणी साठी आम्ही भावंडं खुप भांडायचो. आताही तसंच होतं होतं, वडापाव किंवा समोसा आणल्यावर तिचे मुलं पण खुप भांडायचे चटणी साठी,मग ती तिच्या वाट्याची चटनी मुलांना देऊन टाकत होती. आज तिनं भईयाला  थोडी जास्त चटणी मागितली तर  कुत्सित हसत त्यानं एक चमचा चटणी वाढवून दिली. एक वडापाव, एक समोसा आणि जास्त चटणी.
                        घरी आल्यावर कुलूप उघडताना तिला कसं तरी झालं, आज ही पहिली वेळ होती कि ती दाराचं कुलूप उघडत होती. घराच्या आत गेलेल्यावर घर एकदमच भकास वाटलं तिला. तिला पाहून धावत येणारी मुलं, हातातुन भाजीची पिशवी घेत मुलांना "आईला जरा बसु तर द्या रे" म्हणणारी सासू, काहीही न बोलणारे पण डोळ्यातून माया दाखवणारे सासरे आणि अगदी मिसेस मेहता किंवा मिसेस वर्मा सारखी टिपटाप आणि सुंदर नसली तरी प्रेमाने तिच्या कडे पाहणारा नवरा, सगळे तिला दिसतच नव्हते कुठेच.
ती ज्या एकटेपणा मिळवण्यासाठी इतकी स्वप्नं पाहायची,तो आता तिच्या पुढ्यात होता पण तिला तो आवडत न्हवता. आत्ता थोड्याच वेळा पूर्वी तर ती अगदी रंगुन गेलेली होती, आता काय झालं रिकामं घर पाहून.
तिनं हात पाय धुतले आणि ठरवल्या प्रमाणे टिव्ही ऑन करुन एका प्लेट मध्ये वडापाव, समोसा आणि कप केक सजवून आणि बाजूला चटणीची वाटी घेऊन टीव्ही पूढे येऊन बसली. सगळं अगदी तिच्या मना सारखं आणि ठरवल्या प्रमाणे सुरू होतं. पण मन काही साथ न्हवतं देत.सगळ्यांना सोडून खाताना अगदी अपराधीपणाची जाणीव होत होती. मजाच न्हवती येत काही. रिकामं घर खायला उठत होतं. असच असतं का बाईचं मन. ज्या गोष्टी च स्वप्नं ती आयुष्य भर पाहत आली होती,ते तिच्या समोर साकार होतं तरी ती मनापासून खुश न्हवती.
भरल्या घराच सुख काय असतं तिला कळालं होतं.