आकाशी झेप घेरे पाखरा....

Story Of A House Wife


आकाशी झेप घे रे पाखरा..

सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे..


आटपाट नगर होतं. तिथं एक विवाहित जोडपं सुखान नांदत होतं. नवरा इमाने-एतबारे नोकरी करत होता. बायको उत्तम गृहिणी होती.तिच्या हाताला छान चव होती.पण स्वतः काही पदार्थ बनवण्याचा तिला अतिशय कंटाळा यायचा.

महिन्यातून किमान एखादी पिकनिक, मैत्रिणींबरोबर किटी पार्टी आणि अधेमधे मनाप्रमाणे हॉटेलिंग अशी तिची जीवनशैली होती. साड्या, त्यावर मचिंग सॅंडल, दागिने, कुर्ति-लेगिंन,सौंदर्य प्रसाधने यांची ती मनसोक्त खरेदी करायची.

सणावाराला ही खरेदी जरा जास्तच व्हायची पण म्हणून त्या गृहिणीने कधी हात आखडता घेतला नाही. घरकाम करणारी कामवाली बाई टिकावी म्हणून त्या कामवालीला आठवड्याची सुट्टी,अडल्या-नडल्याला हात-उसने पैसे, सणावाराला सुग्रास जेवणाचं ताट आणि कामवालीच्या घरच्यांसाठी डबा. शिवाय दिवाळी सणाला भरपूर फराळ आणि नगदी बोनस ती देत होती.

एखाद दिवशी तिची कामवाली आली नाही तर सोसायटीतल्या दुसऱ्या बाईकडून तासाला तीनशे चारशे रुपये देऊन ती घरकाम करून घेत होती. तिच्या दोन्ही मुलांचंही राहणीमान उच्च दर्जाच होत. मुलं एका मोठ्या शाळेत जात होती. त्यांचाही वाढदिवस,स्वत:च्या लग्नाचा वाढदिवस ही गृहिणी मोठ्या हौसेने आणि धुमधडाक्यात साजरे करत होती.

एकंदरीतच सुखवस्तू अस तिचे कुटुंब होतं. पण बायकोचा हा खर्चिक स्वभाव बघून अनेकदा तिचा नवरा तिला म्हणायचा…

नवरा -"अगं किती हा अनावश्यक खर्च!"

बायको -"असू द्या हो आपल्यासारख्या लोकांनी स्टेटस मेंटेन नाही करायचं तर मग कुणी?"


नवरा -"अग पण कपाटातल्या अनेक साड्या अश्या आहेत की, एकदा घातली की दोन-तीन वर्षे परत ती साडी तू घालत नाहीस. दर पावसाळी सेल मधे वीस-पंचवीस साड्या तू विकत घेतेस आणि आवडल्या नाही म्हणूण कामवालीला देऊन टाकतेस. जेवढ्या पैशाची तू भिशी भरतेस..

बायको मध्येच नवऱ्याला थांबवत -"भिशी नाही हो किटी म्हणा किटी पार्टी!"

नवरा -"हा तेच ते. हा तर जेवढे पैसे तू किटी साठी भरते, त्याच्या चारपट पैसे तू एका वेळी त्या पार्टीसाठी खर्च करतेस. अजून मुलांचे शिक्षण, त्यांचं करिअर बाकी आहे. तुझ्या या वायफळ खर्चाला थोडा आवर घाल."

बायको -"झालं का तुमचं सुरू? मी करते तो वायफळ खर्च आणि तुमच्या ओल्या पार्ट्या, महिन्यांचे डझनभर डीओ. दहा-दहा हजाराचे ब्रॅण्डेड शूज,कपडे, टाय परफ्युम्स आणि बाकीच्या खर्चाबाबत तर न बोललेलं बरं! आधी स्वतःचा खर्च कमी करा मग मला बोल लावा."


बायकोच्या ह्या वाक्यावर नवऱ्याला गप्प बसल्याशिवाय पर्याय नव्हता. पण म्हणतात ना माणसाचे दिवस पालटायला वेळ लागत नाही. आणि ह्या जोडप्याच्या बाबतीतही तसेच झालं. अचानक टाळेबंदी सुरू झाली. नवऱ्याचा पगार अर्ध्यावर आला आणि ज्या परदेशी कंपनीत तिचा नवरा कामाला होता ती कंपनीच मग बंद पडली. मग होती नव्हती ती गंगाजळी संपायला लागली. मुलांची शाळेची फी भरणही मग कठीण जाऊ लागलं. कामवाल्या बाईला सुट्टी मिळाली होती. सवय नसल्याने, घरचं काम अंगावर पडल्यामुळे त्या गृहिणीची चिडचिड होत होती. पण आता तिच्याजवळ पर्याय नव्हता.

सुरुवातीला हे सगळं तिला आणि तिच्या नवऱ्याला स्वीकारण कठीण जात होतं. फ्लॅटचे हप्ते भरणे ही कठीण झाले होते. ई.एम.आय. वर घेतलेली मोठी कार बँकेने केव्हाच उचलून नेली होती. मुलांची शाळेची भरमसाठ फी भरणे त्यांच्या आवाक्या बाहेरच होत. एकंदरीतच काय राजा राणीचा संसार आता उघड्यावर पडला होता. राजाचा रंक झाला होता,आणि राणीची मोलकरीण.

पण ती गृहिणी फार जिद्दी होती. तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. उगीच, विनाकारण केलेला वायफळ खर्च आणि दुनियेला केलेला दिखावा, गरज नसतानाही हायफाय सोसायटीत स्टेटस मेंटेन करण्यासाठी केलेला अवास्तव खर्च, याचा तिला आता स्वतःवरच राग येत होता, म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी तिने कंबर कसली.

पण आता आपण काय करावं या विचारात ती बसली होती. आर्थिक संकटामुळे तिची मती कुंठीत झाली होती. नेमकं तेव्हाच बाजूच्या काकूंना कोरोना झाला होता. बाजूच्या काकूंचे आणि या गृहिणीचं संबंध चांगले होते. कोरोनामुळे काका काकूंना घरी स्वयंपाक करणे, जेवणाच्या डब्ब्या साठी घराबाहेर पडणे शक्य नव्हते. काकूंनी फोनवरून हिला विनंती केली की आम्हाला दोन वेळचा डबा तू बनवून देतेस का?

काकू -"मी काकू बोलते आहे."

बायको -"हां काकू बोला ना!"

काकू -"मी आणी तुझे काका कोरोना पॉझीटीव्ह आणि होम क्वारंटाईन आहोत.कोरोना मुळे अशक्त पणा पण खुप आहे. तू आमच्या साठी जेवणाचा डबा बनवून देशील का?"

बायको -"का नाही देणार काकू?मी पाठवते डबा तुम्हा दोघांसाठी."

आणि हिने शेजार धर्म पाळायचा म्हणून काकू काकांसाठी डबा केला. तिच्या हाताला चवही चांगली होती आणि काकूंविषयी हादरभावही! त्यामुळे काका काकू पंधरा दिवसातच ठणठणीत बरे झाले.

एकदा सहजच ही काकूंकडे जाऊन बसली, आणि हिने आपली मनो व्यथा काकूं ना सांगितली.

काकू -"कोरोनाच्या या काळात अनेकांना घरीस्वयंपाक करणे शक्य नाही. जेष्ठ नागरिकांना डबा पाठवणे अनेकांना शक्य होत नाही. सरकारकडून, स्वयंसेवी संस्थांकडून अन्नाचे, जेवणाचे फूड पॅकेट वाटले जातात. परंतु लोक क्वारंटाईन असल्याने तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तुझ्या नवऱ्याची मदत घेऊन तू अशा लोकांसाठी डब्याची व्यवस्था का करत नाही?"

आणि मग ह्या गृहिणीने काकूंनी सांगितलेली गोष्ट लगेच मनावर घेतली. तिच्या किटीचा ग्रुप होता. नवऱ्याचेही काही मित्र होते. सगळ्यांना तिने सांगितले की, त्यांच्या कडून \"होम क्वारंटाईन लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते आहे. तेही अगदी वाजवी दरात.\"

हिचे चांगले संबंध म्हणा, किंवा सामाजिक कार्याला मदत म्हणून म्हणा अनेकांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला मदत केली. सुरुवातीला अगदी दोन-चार ठिकाणी डबे बनवून देणारी ही, आता जवळपास 100 ते 200 डबे दिवसाला बनवत होती. कामवालीशी हिचे संबंध आधीच चांगले होते म्हणून, हिच्या विनंतीवरून कामवाली बाई हिला मदत करण्यासाठी, हिच्या घरी येऊ लागली.

कोरोना तर संपला पण पाहता पाहता या गृहिणीच्या सुग्रास जेवणाचं आणि हिच्या औदर्याचे प्रतीक म्हणून \"अन्नपूर्णा\" नावाचं भोजनालय मोठ्या थाटात उभ राहिल. बघता बघता त्या भोजनालयाचे  आता एक मोठं हॉटेल झाले होते.


 सकाळी चार वाजता हिचा नवरा भाजी मंडीत जाऊन भाज्या घेऊन येत होता. त्या दोघांचा संपूर्ण दिवस आता अन्नपूर्णेची व्यवस्था पाहण्यात जात होता. जेवणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सुग्रास जेवण मिळावे यासाठी ते दोघेही नवरा बायको मनापासून झटत होते. दोघ नवरा बायको रोजचा मेनू काय असावा यावर चर्चा करायचे. लोकांना उत्तमोत्तम जेवण देऊन चार पैसे गाठीला राहावे, त्या बेताने त्यांनी अगदी वाजवी दरात भोजनाची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांना प्रतिसाद ही चांगला मिळाला. आपल्या या \"अन्नपूर्णा\" भोजनावळीच्या भरवशावर त्या माऊलीने मुलांचे शिक्षण तर पूर्ण केलेच पण, आपल्या मुलीचे लग्नही थाटामाटात केले.मुलाला हॉटेल मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविले.



तिच्या फ्लॅटचे हप्ते थकले होते. बँकेच्या नोटीसी येत होत्या, ते बँकेचे हप्ते तिने पूर्ण भरले. जी गाडी बँकेने उचलून नेली होती ती तिने, स्वतः आणि नवऱ्याच्या मदतीने परत विकत घेतली होती.


असं म्हणतात परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. सुखानंतर दुःख, दुःख नंतर सुख यांचे आवर्तन सुरूच राहते. परंतु आलेल्या संकटांचा जो धीराने सामना करतो, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उंच आकाशात झेप घेतो तोच खरा मनुष्य. आजची ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

धन्यवाद.



©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.