May 15, 2021
प्रेम

द परफ्युम फॅक्टरी  (भाग ५)

Read Later
द परफ्युम फॅक्टरी  (भाग ५)

द परफ्युम फॅक्टरी  (भाग ५)

सुधाच्या आठवणींमध्ये गुंग असल्यामुळे प्रसादला आत्या खूप वेळ बोलावत होती हे समजलेच नाही. भानावर येईपर्यंत आत्या खोलीत येऊन मागे उभी राहिली होती. लॅपटॉप वरील सुधाचा फोटो दिसू नये म्हणून त्याने लॅपटॉप पटकन बंद केला.

तिथून पुढे...

"काय रे काय विचार करत आहेस एवढा?" आत्याने विचारले.

प्रसाद: "काही नाही. कुठे काय?" .

आत्या: "हो का? मग मघापासून बघतेय, लक्षच नाहीये तुझं. किती हाक मारल्या पण एक नाही नि दोन नाही. बरं काय ठरलं आहे तुझं ?"

प्रसाद: "कशाबद्दल?" गोंधळला होता एकदम.

आत्या: "अरे तुझ्या लग्नाबद्दल बोलते आहे मी. कधीपासून मागे लागले आहे तुझ्या मुली बघायला सुरूवात करू म्हणून!. एकदा तुझं लग्न लावून दिलं, म्हणजे मग मी अमेरिकेला संगीता कडे जायला रिकामी."

प्रसाद: "हे काय आता मधेच? एवढी काय घाई आहे? आणि मी काही तुला अमेरिकेला वैगेरे जाऊ देत नाही बघ!"

आत्या: "बरं मग तू बोललास का सुधाशी?"

चमकून प्रसादने विचारले, "कशाबद्दल?"

आत्या गालात हसतं म्हणाली: "अरे मला माहीत आहे तो फुलांचा म ळा तू कोणासाठी फुलवला आहेस ते? तू काही लपवू नको माझ्यापासून."

आपण पुरते सापडलो आहे हे माहित झाले असूनही सारवासारवं करत तो म्हणाला, "आत्या, प्लीज हा.. असे काही नाही. तो माझा एक वेगळा प्रयोग आहे."

आत्या: "प्रयोग वैगेरे मला नको सांगुस. लहानाचा मोठा केलाय मी तुला. चांगलं ओळखते मी तुला. तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतय मला. सुधा आली कि किती खुश असतोस तू हे पाहिलंय मी."

"आत्या… “प्रसाद मात्र खूप ओशाळला होता. आता आपण काही लपवू शकत नाही हिच्यापासून याची कल्पना आली होती त्याला. अखेर तिनेच सांभाळ केला होता त्याचा अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे! आईची माया दिली होती तिने. आणि आजही त्याच्या न सांगता बरोबर ओळखले तिने.

"नुसता काय आत्या आत्या करतोस? आता तरी बोलशील का? सांग बर मला. अरे मनातलं बोलून टाकायचं असत रे."  डोक्यावरून हात फिरवत आत्या म्हणाली. "का मी विषय काढू आबांकडे?"

"नको… नको..." प्रसाद चटकन म्हणाला.

"आत्या..." त्याला खूपच अवघडल्या सारखं वाटत होत. कसे सांगावे हा विचार करत दोन मिनिटं शांत बसून पुन्हा म्हणाला, "अगं खूप वेळा सांगावेसे वाटले तिला. पण नाही सांगितले. अगं तिची स्वप्न खूप वेगळी आहेत. तिला शहरात राहून चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये काम करायचे आहे. खूप आधीपासून ठरलंय तिचं. तिला शहरी राहणीमान आवडतं . मी तर एकदम उलट आहे. मी साधा शेतकरी. गावातच राहणार. शेतात काम करणार. मग मला शहरातल्या मुलांसारखं राहून कसं चालेल? तिच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत गं. मी नाही बसत तिच्या स्वप्नांमध्ये."  हताशपणे प्रसाद म्हणाला.

आत्या: "तुझं तूच कसं ठरवलंस बरं ?"

प्रसाद: "मी नाही ठरवलं . तिच्या बोलण्यामधून समजल मला." खूपच हतबल झाल्यासारखे वाटत होते त्याला.

आत्या: अरे अल्ल्ड आहे ती अजून. गोड मुलगी आहे रे. थोडी गोंधळलेली असते नेहमी. तिला काय करायला हवे आणि काय नाही हे तुलाच तर विचारून ठरवते नेहमी. हो ना? खरंतर तू बोल तिच्याशी आधी. स्वतःच नको ठरवू मनाने." आत्याला पूर्ण खात्री होती प्रसाद नक्की सुधाचे मन जिंकून घेईल.

प्रसाद: “अगं तिचे सिलेक्शन झालंय आता. आणि जायचंच आहे तिला. तिथेच राहायचे आहे तिला. आता काही उपयोग नाही."

आत्या: "अरे असं काही नसतं. एवढ्यात हार नको मानूस. अरे तुझ्या प्रेमाने नक्की जिंकून घेशील तू तिला.”

 

प्रसाद: “काहीही ... हे सगळं खऱ्या आयुष्यात नाही घडत. फक्त कथा कादंबर्यांत आणि सिनेमा मध्ये घडतं असं. ती खूप प्रॅक्टिकल आहे. ती खूप प्रॅक्टिकल आहे. आणि मला पण व्हायला हवं. सोडून देईन मी हा विचार. तू फक्त मला वेळ दे थोडा."

"आता मलाच काहीतरी केले पाहिजे" असे पुटपुटत आत्या उठली. मनात काहीतरी ठरवूनच.

"काय म्हणालीस?" प्रसादने शंका येऊन विचारले.

"काही नाही जेवायला चल लवकर मलाही भूक लागली आहे." असे म्हणून आत्या खोलीमधून बाहेर पडली.

क्रमशः