द परफ्युम फॅक्टरी (भाग १)

द परफ्युम फॅक्टरी सुधा एक सर्वसाधारण पण महत्त्वाकांक्षी मुलगी. शहरात राहून मोठ्या कंपनी मध्य

" बाबा... सांगा ना हो आईला " वैतागून सुधा  म्हणाली.

"वर्गातील चाळीस जणांमधून फक्त आम्हा पाच जणांचीच निवड झाली आहे ह्या इंटर्नशिप साठी. तेही एवढया मोठ्या कंपनी मध्ये! मी जाणार म्हणजे जाणार."

आई: अग पण एवढ्या मोठ्या शहरात, कोणी ओळखीचे नाही काही नाही, तीन महिने कशी राहणार तू? बरे बाबांनाही एवढी सुट्टी नाही मिळायची ग आत्ता. तू आपल्याच शहरात का नाही करत इंटर्नशिप का काय ते? तिथे पुण्याला काय अन इथे काय काम ते कामच ना शेवटी?"

बाबां ना  तर कळतच न्हवते कोणाला समजावून सांगावे. लेकीच्या काळजीने आईचे मन ऐकणारच नाही हे पक्के माहीत होते त्यांना. आणि दुसरीकडे सुधा. एकुलती एक हुशार पोर. स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी सुधाच्या शिक्षणात काहीच कमी केली नाही कधी. तिने शिकून स्वावलंबी व्हावे हि अपेक्षा होतीच त्यांची. सुधाची पण शिक्षणात चांगली प्रगती होती. खूप अभ्यास करून इंजिनीरिंग ला प्रवेश मिळवला होता तिने. खरेतर त्याचवेळी पुण्यातील कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा होता तिला. पण आई लांब पाठविण्यास तयार होईना. कसेबसे समजावले होते सुधाला त्यावेळी. आणि जवळच्याच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

पण जसजशी सुधा कॉलेज च्या वातावरणात, मित्रमैत्रिणींमध्ये गेली तसे तिला मोठ्या शहरांचे आकर्षण वाटू लागले. अशातच कॉलेज मध्ये ह्या शेवटच्या वर्षात काही मोठ्या कंपन्या येऊन गेल्या होत्या. त्यामुळे सुधाला एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या शहरात मस्त जॉब करावा अशी महत्वाकांक्षा निर्माण झाली  होती. आणि आता तर काय सुवर्णसंधीच होती सुधासाठी!

शेवटी विषय पुढे ढकलत बाबा म्हणाले, " मी चौकशी करून बघतो. सुरक्षित असेल तर विचार करू." ह्यावर दोघीही शांत झाल्या. बाबांनी दुसऱ्या दिवशी आबासाहेबांच्याकडे जायचे ठरविले. त्यांचे आणि आबासाहेबांचे चांगले घरोब्याचे संबंध होते.

आबासाहेब म्हणजे गावातील अत्यंत प्रतिष्ठित सद्गृहस्थ होत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती. पण पुरोगामी विचारांचे होते ते. शिक्षणाची आणि विज्ञानाची आवड असल्याने त्यांनी स्वतःच्या शेतीचा तसेच गावांचाही विकास साधला होता. त्यांच्याच सांगण्यावरून सुधाच्या बाबांनी ह्या गावात राहून आपली शिक्षकाची नोकरी करायची ठरवली होती. अनेक प्रसिद्ध उद्योजक, डॉक्टर्स, नामवंत प्राध्यापक, वकील इ. लोकांशी आबासाहेबांचा संपर्क होता. त्यामुळे त्यांना शहरांमधील राहणीमान, सामाजिक परिस्थिती यांचा अंदाज होता.

रविवारी सकाळीच सुधाचे आई बाबा आणि सुधा आबासाहेबांकडे पोहोचले. सुधाचे बाबा आबासाहेबांच्या सोबत बसले आणि आई आत्याबाईंना भेटण्यासाठी आत गेली.

" आत्या, प्रसाद मळ्यातच आहे ना?" असे विचारून सुधा परस्पर मळ्यातच गेली.

प्रसाद म्हणजे आबासाहेबांचा एकुलता एक मुलगा. अगदी आबासाहेबांवर गेलेला. शेतीवर अपार प्रेम. त्यामुळेच बारावीला ब्यानणव टक्के असूनही बी एससी  ऍग्रीकल्चर करून यशस्वीपणे शेती करणारा. लहानपणीच आई गेली. आत्याबाईंनीच सांभाळले याला. आत्याबाईंना एक मुलगी. लग्न होऊन अमेरिकेत स्थाईक झाली होती. प्रसाद तिच्यापेक्षा लहान. सर्वांचा अतिशय लाडका.

प्रसाद सकाळी लवकरच शेतावर यायचा. पिकांबरोबर हितगुज करीत शेतीची काम करायचा. हाताखाली बरेच मजूर, नोकर चाकर असूनही बारीक सारीक कामे स्वतः करून बघायचा. शेतीमधील विविध प्रयोग यशस्वी करून आबासाहेबांचे कृषीधन अजूनच संपन्न बनविले होते त्याने.

क्रमशः

🎭 Series Post

View all