द परफ्युम फॅक्टरी (भाग २)

सुधा एक सर्वसाधारण पण महत्त्वाकांक्षी मुलगी. शहरात राहून मोठ्या कंपनी मध्ये काम करण्याची स्व??

द परफ्युम फॅक्टरी (भाग २)

सुधा एक सर्वसाधारण पण महत्त्वाकांक्षी मुलगी. शहरात राहून मोठ्या कंपनी मध्ये काम करण्याची स्वप्नं बघणारी. प्रसाद मात्र गावात राहून शेती करणारा हुशार समंजस मुलगा. सुधावर जरी खूप प्रेम होते त्याचे तरी तिच्या स्वप्नांची कल्पनाही होती त्याला.  प्रसाद आपली भावना सांगू शकेलं सुधाला? सुधाचा काय निर्णय असेल? तिची स्वप्न पूर्ण होतील?

सुधा आणि प्रसादची खूप छान मैत्री होती. सुधाला अभ्यासामध्ये काही अडले कि प्रसादकडून समजावून घ्यायची. त्याच्या मदतीला आणि मार्गदर्शनानेच तर बारावीला चांगले मार्क मिळाले होते तीला. इंजिनीरिंग ला पण कोणती साइड घ्यायची इ त्याला विचारूनच ठरविले होते तिने. प्रसादनेही  इंटरनेट वरून सर्व माहिती काढून तिला कॉम्पुटर इंजिनीरिंगला प्रवेश घेण्यास सांगितले होते.

ट्रॅक्टर वर बसला असतानाच त्याला लांबूनच सुधा पळत येत असताना दिसली. चेहऱ्यावरूनच काहीतरी बिनसल्याचे त्याला समजले. प्रसादने ट्रॅक्टर थांबविला आणि खाली उतरून आला. येताना जवळच्याच गुलाबाची दोन फुले घेऊन सुधाकडे आला. फुले पाहूनच सुधाच्या चेहऱ्यावर छान हसू फुलले.

"काय इंजिनीअर बाई आज काय बिनसलंय?" असे म्हणताच प्रसादने फुले तिच्या हातात दिली.

हवेतील सुगंधाने तिला थोडे  शांत वाटू लागले होते. "काही नाही रे. तुला मागे न्हवते का सांगितले आमच्या कॉलेजमधे पुण्याची ती मोठी कंपनी येणार होती म्हणून. अरे त्यांनी सिलेक्शन केलेय माझे. तीन महिन्यांची इंटर्नशिप आहे आणि चांगला परफॉर्मन्स असेल तर लगेच जॉब पण! खूप शिकायला मिळेल रे तिथे. पूर्ण कॉलेज मधून आमच्या पाच जणांचे झालेय सिलेक्शन.  पण हि आई बघ ना ऐकतच नाहीये. कस समजाऊ तिला किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी? काय करू काहीच काळात नाहीये रे?  मला जायचं आहे रे खरंच...फायनल एक्साम झाल्या कि लगेच जॉइनिंग आहे."

प्रसाद ला कळेना आता काय बोलावे ते. खरेतर प्रसादला सुधा खूप आवडत होती. तिचे काळेभोर केस. ना कुरळे ना सरळ.... लांब होते आधी. पण सहा महिन्यांपूर्वीच खांद्यापर्यंत कट केले होते तिने. तेही आवडले होते प्रसादला. त्याला सर्वात प्रिय तिच्या चेहऱ्यावरील हसू. हसताना छानशी छोटीशी खळी पडत असे तिच्या गव्हाळश्या गालावर.  आणि ह्याचे हृदय खलास! उंची, अंगकाठी बेताचीच. कधी सलवार कुर्ता  तर कधी जीन्स टॉप. काहीही शोभून दिसत असे तिला. प्रसाद कधी तिच्यात गुंतत गेला हे त्यालाच समजले नाही. तिच्या चेहऱ्यावर हसू फुलण्यासाठी काहीही करायची तयारी होती त्याची. पण पठ्ठयाने सुधालाच काय पण कोणालाच कधी कळू दिले नाही स्वतःच्या भावनांबद्दल. योग्य वेळेची वाट बघता होता.

"मला जर पाठवायचेच न्हवते कुठे तर कशाला एवढे शिकू दिले? का स्वप्न दाखविली शिकून मोठी होण्याची?इथे ह्या छोट्या शहरात राहून काय होणार माझे करियर?  उगाच एवढा अभ्यास केला मी! काही करूच द्यायचे न्हवते तर का शिकवले मला? बांधून द्यायचे होते कोणाच्या तरी गळ्यात!" बोलता बोलता सुधाच्या डोळ्यातून टपोऱया थेंबांची साराच लागली जणू.

आता मात्र प्रसाद चमकला. " ए चल काहीही काय बोलतेस? कोणाच्या तरी गळ्यात कसे बांधतील तुला? (असे कसे होऊ देईन मी?: मनात) अस्वस्थ होऊन प्रसाद म्हणाला. पण तिच्या डोळ्यातील पाणी नाही बघवले त्याला. थोडे सावरून म्हणाला " सर आणि काकू तुझ्या काळजीने बोलत आहेत. असा काहीही विचार करू नको. म्हणालेत ना चौकशी करतो म्हणून. मग शांत हो बरं. चल तुला एक गंमत दाखवतो."

असे म्हणत तो तिला एका आंब्याच्या  झाडाकडे घेऊन गेला. आंब्याला मस्त मोहोर आला होता आणि त्याच दरवळ सगळीकडे पसरला होता. "थांब, इथूनच बघ." असे म्हणत प्रसादने एका छोट्याश्या घरट्याकडे हात दाखविला.

सुधा : "अरे, दोन पिल्ले आहेत त्यात! किती क्युट आहेत!"

प्रसाद: "ओरडू नको, हळूच बघ. "

सुधाच्या चेहऱ्यावरील टेन्शन जाऊन आता उत्सुकता आली होती. प्रसादलाही  त्यामुळे बरे वाटले. थोड्यावेळाने एक चिमणी आली घरट्यापाशी, आणि पिल्लाला दाणा भरवून गेली. थोड्यावेळाने परत आली आणि पुन्हा दाणा  भरवून गेली. बराचवेळ सुधा त्या चिमणीच्या फेऱ्या बघत होती. आणि प्रसाद सुधाकडे. थोड्यावेळाने प्रसाद भानावर आला.

प्रसाद: "बघितलेस चिमणी कशी आपल्या पिल्लाना खाऊ घालत होती.  थोड्या दिवसांनी ती पिल्लाना उडायलाही शिकवेल.  आणि एके दिवशी पिल्ले तयार होतील आकाशात उंच भरारी मारायला. पण तोपर्यंत मात्र चिमणी पिल्लांची काळजी घेईल. हो ना? अगं आई-वडिलांचे कर्तव्यच असते मुलांना बळ देणे. सक्षम बनविणे. एकदा त्यांच्या लक्षात आले कि आता आपली मुलं सक्षम झाली आहेत, मग ते निर्धास्त होऊन आपल्याला आपले जग बनविण्यासाठी मुक्त  करतात. तुझे आईबाबा पण तेच करत आहेत. त्यांना तुझी काळजी वाटते इतकेच. तू त्यांना शांतपणे समजावून सांग. काहीतरी सोल्यूशन निघेल. ट्रस्ट मी."

सुधा: "पटतंय मला तुझं. मी एवढा टोकाचा विचार नको करायला पाहिजे होता. आता मी सॉरी म्हणेन आईला. आणि नीट समजावून सांगेल तीला. ए तू पण थोडं कन्व्हिन्स करायला मदत कर हं. तसेही बाबा तूझं ऐकतात."

प्रसाद: "हो का?"

सुधा: "पण एक मात्र खरंय हं तू असं समजावून सांगतोस ना एखाद्याला, लगेच ऐकतात लोक तुझं "

प्रसाद नुसता हसतो. (मनातल्या मनात) अजून बरेच काही सांगायचे आहे गं. माहित नाही तुला सांगू शकेन का कधी?

सुधा: तू तर माझा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहेस.

प्रसाद: हो चला आता वाट बघत असतील सगळे. 

असे म्हणून प्रसाद पुढे निघाला घराकडे. प्रसाद थोडा पुढे गेला असेल तेवद्यात सुधा म्हणाली " अरे इथे वास कसला येतो आहे रे?"

प्रसाद: " अगं फुलं आहेत ना तुझ्या हातात!"

पण तो वास फुलांचा नक्की न्हवता हे सुधाला माहित होतं. पण पुढे काही बोलणार तोपर्यंत प्रसाद खूप पुढे गेला होता  त्यामुळे पुढच्यावेळी विचारू असा विचार करून पुढे चालू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all